गुंतवणुकीतील नवे प्रवाह! ‘सूर तेच छेडिता, गीत उमटले नवे’
‘आजचा काळ वेगळा आहे...’ - This Time Is Different
सर जॉन टेंपल्टन यांनी गुंतवणुकीत यशस्वी होण्याचे १६ नियम १९३३ मध्ये प्रसिद्ध केले, तेव्हाच त्यांनी म्हणून ठेवले आहे, की हे गुंतवणुकीच्या क्षेत्रामधील सर्वांत महाग पडणारे चार शब्द आहेत. आज जे घडते आहे, ते मानवी इतिहासात पूर्वीही वारंवार घडले आहे. गुंतवणूकदारांच्या मोठ्यातील मोठ्या चुका या त्यांची माहिती चुकीची होती किंवा त्यांचे विश्लेषण योग्य नव्हते, म्हणून घडत नाहीत. अशा चुकांचे कारण मनोवैज्ञानिक असते. आर्थिक क्षेत्रातील कोणताही निर्णय घेताना लोभ किंवा भीती या दोनपैकी एका भावनेचा पगडा प्रत्येक व्यक्तीच्या मनावर असतो. बाजारातील भाव गडगडून आपले मोठे नुकसान होईल का, अशी भावना मंदीच्या काळात बळावते. तेजीच्या काळात इतर सर्वजण मोठा फायदा कमावीत आहेत; पण आपण मात्र कोरडेच राहिलो, आपली गाडी चुकली आणि आता जिवाचा आटापिटा करून ती पकडली पाहिजे, असे विचार उफाळून येतात. मागच्या तेजीपेक्षा आताची वेळ कशी वेगळी आहे, असे मुद्दे शोधून काढून आपल्या गुंतवणुकीच्या निर्णयांचा पाठपुरावा केला जातो.