कोरोना काळात वितळले आइस्क्रीम; पी.व्ही. सिंधूमुळे व्यवसायाला मिळाले बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळात वितळले आइस्क्रीम; पी.व्ही. सिंधूमुळे व्यवसायाला मिळाले बळ }

कोरोना काळात वितळले आइस्क्रीम; पी.व्ही. सिंधूमुळे व्यवसायाला मिळाले बळ

एखाद्या व्यक्तीने किंवा खेळाडूने यश मिळवले तर त्याची वाट्टेल ती इच्छा पुर्ण करताना पालकांना अभिमान वाटतो. पण कोणी जर आइस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली तर. ही इच्छा व्यक्त करणारी दुसरी तिसरी व्यक्ती नसून ती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू होय.

ऑलिंपिकमध्ये पदक जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत आइस्क्रीम खाणार असल्याचे मनोगत तिने पंतप्रधानांनी बोलताना मांडले होते. अर्थात पंतप्रधानांनी ही इच्छा पूर्ण केली. नवी दिल्लीत आयोजित शाही कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सिंधूसमवेत आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. असे काय आइस्क्रीममध्ये की त्याची चव घेण्यासाठी बच्चे कंपनीपासून सिंधूसारखे मातब्बर खेळाडू आतूर असतात. आइस्क्रीमला कोणीच नाही म्हणत नाही. उन्हाळ्यात आणि एरव्ही देखील सर्वांना हवीहवीशी वाटणारी आइस्क्रीमची चव बराच रेंगाळत राहते. पण कोरोनासारख्या जागतिक महासाथीच्या काळात ही चव सर्वजण विसरले. पण कोरोना काळातून तावून सुलाखून निघालेल्या आइस्क्रीम उद्योगाला सिंधूच्या आइस्क्रीम मेजवानीने एकप्रकारे नैतिकच बळ मिळाले आहे, असे म्हणावे लागेल..

चीनच्या वुहानमधून कोरोनाचा विषाणू पसरला आणि पाहता पाहता जगभरात पाय पसरले. अनेक देशांत टाळेबंदी जाहीर झाली. बेरोजगारी आणि गरिबीचे प्रमाण वाढले. उद्योग व्यवसाय अडचणीत आले. लहान मोठा असा कोणताच व्यवसाय यातून सुटला नाही. जिभेचे चोचले पुरवणारा आईस्क्रीम व्यवसाय या कोरोना लाटेत वाहत गेला. एरवीही आइस्क्रीमवर उड्या पडायच्या. परंतु कोरोना काळात दर्जेदार आईस्क्रीम फ्रीजमध्येच पडून राहिले. दोन वर्षात भारताच्या आइस्क्रीम व्यवसायाला चार ते पाच हजार कोटींचा फटका बसला. जगभराचा विचार करता शंभर अब्ज डॉलरकडे जाणाऱ्या या उद्योगाला कोरोनाने ब्रेक लावला. वास्तविक आइस्क्रीमचे नाव काढले की, तोंडाला पाणी सुटते. बर्थ डे पार्टी असो किंवा रिसेप्शन असो, आइस्क्रीम असल्याशिवाय पार्टी पूर्ण होतच नाही. बच्चे कंपनीचे खास आवडीचे आइस्क्रीम. खऱ्या अर्थाने सर्व वयोगटासाठी हा लोकप्रिय पदार्थ. पूर्वी ठराविक प्रकारात मिळणारे आइस्क्रीममध्ये आता असंख्य प्रकार खवय्यांना उपलब्ध आहेत. मग यात मसाला पानाची चव असो किंवा गुलकंद असो. आइस्क्रीम न खाणारा व्यक्ती सापडणे तसे दुर्मिळच. पण गेल्यावर्षी कोरोना संसर्गाची जागतिक साथ आली आणि त्यात असंख्य व्यवसाय ठप्प पडले. यात आइस्क्रीम उद्योगाचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.

हेही वाचा: राजकारणात ‘शहरं’ ठरताहेत प्रभावशाली!

अलीकडच्या काळात आइस्क्रीम उद्योगात नवनीवन संकल्पना आणि चवींचा समावेश होत असताना कोरोनाच्या साथीने सर्व चक्र फिरले. २०२०च्या मार्च महिन्यांपासून कोविडची साथ पसरलेली असताना ती जून-जुलैपर्यंत कमी अधिक प्रमाणात कायम राहिली. आता कोविडची लाट आटोक्यात आल्यानंतर आइस्क्रीम उद्योग सावरत असून लवकरच पूर्वपदावर येईल, असा आशावाद उद्योजकांकडून आणि खवय्या मंडळींकडून होत आहे.

एका संशोधनात असे आढळून आले की, एखादा व्यक्ती जेव्हा कामाऐवजी घरी असतो तेव्हा त्याची गोड खाण्याची इच्छा असते. या संशोधनाला आइस्क्रीम व्यवसाय पूरक ठरणारा आहे. आइस्क्रीमची गोडी सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी आहे. आइस्क्रीमचा व्यवसाय प्रामुख्याने उन्हाळ्यात म्हणजेच तीन महिन्यात होतो. मात्र त्यासाठी ९ महिने वाट पाहावी लागते. गेल्यावर्षी मार्चपासूनच्या लॉकडाउनमुळे आइस्क्रीम उद्योगात नैराश्‍य पसरले. २०१९ चा शेवटचा टप्पा आणि २०२० या वर्षातील उन्हाळा आइस्क्रीमविनाच गेला. त्यामुळे दोन्ही हंगामात मिळून भारतीय व्यवसायिकांना अपरिमित नुकसान सहन करावे लागले. साधारणपणे एप्रिल ते जून या कालावधीत वर्षाच्या एकूण महसुलाच्या सुमारे ४५ टक्के लक्ष्य पूर्ण केले जाते. परंतु गेल्यावर्षी हा हंगाम निघून गेला. हा या उद्योगाला एकप्रकारचा मोठा धक्का मानला जातो. लॉकडाउन टप्प्या टप्प्याने मागे घेण्यात आले असले तरी आइस्क्रीम पार्लरमध्ये नागरिकांची संख्या अपेक्षेप्रमाणे कमीच दिसून येत आहे

हेही वाचा: जागतिक वारसास्थळांच्या यादीत भारत आता ‘सुपर-४० क्लब’मध्ये सामील

चालू वर्षाच्या प्रारंभी ८० ते ८५ टक्के घट
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मार्च ते एप्रिल महिन्यात आइस्क्रीमच्या विक्रीत ५० ते ६० टक्के घट दिसून आली. काही भागात कडक तर काही भागात आंशिक लॉकडाउनमुळे आइस्क्रीम उद्योग स्थिरस्थावर वेळ लागला.. मे महिन्यांपर्यंत लोक घराबाहेर पडत नव्हते. मागणी असतानाही लोकांना आइस्क्रीम उपलब्ध होत नव्हते. परंतु परिस्थिती आता निवळत असल्याने उद्योगात समाधानाचे वातावरण आहे. दुर्दैवाने गेल्यावर्षी आइस्क्रीमचा हंगाम आणि कोरोनाचा शिरकाव एकाच काळात झाला. उन्हाळ्यात आइस्क्रीमची विक्री ही उच्चांकी पातळीवर असते, हे सर्वांनाच ठाऊक असते. याच काळात लग्नसराईचा मोसम असतो आणि आइस्क्रीमला मोठी मागणी असते. पण कोविड काळातील कडक निर्बंधामुळे वीस ते पंचवीस लोकांतच लग्न लावणे बंधनकारक केल्याने आइस्क्रीम हा लग्नाच्या मेन्यूतून गायब झाला. यादरम्यान, दुग्धजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानात आइस्क्रीमची विक्री नियमितपणे सुरू राहीली. या विक्रीचे प्रमाण तब्बल २५ टक्के आहे. परंतु निव्वळ आइस्क्रीम पार्लर असणाऱ्या व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागले.


भारतीय उद्योगाची उलाढाल २० हजार कोटींची
कोरोना काळाच्या आघातापासून वाचण्यासाठी धडपड करणाऱ्या आइस्क्रीम उद्योगाची संघटना आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केंद्र आणि राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा केली आहे. यासंदर्भात सरकारला लिहलेल्या पत्रात वीज बिलात किमान ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे. ही सवलत मार्च २०२० ते जुलै २०२० पर्यंत द्यावी, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. व्याज, भाडे, अन्य स्थायी खर्चावर सरकारकडून सवलतीची मागणी केली जात आहे. आइस्क्रीम उत्पादक हे शेतकऱ्यांकडून दूध घेतात आणि त्यापासून आइस्क्रीम तयार करतात. त्यास अत्यावश्‍यक सेवेत सामील करावे अशी मागणी उत्पादकांकडून केली जात आहे. भारतातील आइस्क्रीम उद्योगाची उलाढाल वार्षिक तब्बल १९ ते २० हजार कोटींच्या आसपास आहे. ती कालांतराने २५ हजार कोटीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आइस्क्रीम उद्योगाची लोकप्रियता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या चवीचे आइस्क्रीम आणले जात आहे. देशभरात सुमारे १० हजार कोटी लहान मोठे आइस्क्रीम उद्योग आहेत.


जागतिक पातळीवर ७० अब्ज डॉलर उलाढालजागतिक पातळीवरचा विचार केल्यास जगभरात आइस्क्रीम उद्योगाची २०१९ रोजी तब्बल ७० अब्ज डॉलरची उलाढाल नोंदली गेली. या नुसार हा उद्योग येत्या पाच वर्षात म्हणजेच २०२६-२७ या काळात ९० अब्ज डॉलरपर्यंत पोचेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु कोरोनाकाळामुळे हा उद्योग काही प्रमाणात पिछाडीवर गेला. जगभरातील व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होत असताना आइस्क्रीम पार्लर समोर पूर्वीप्रमाणेच गर्दी दिसेल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: पर्यावरणासाठी जगतवारी करणारा 'सायकलबाबा' आहे तरी कोण?

कोरोना काळातील अफवांमुळे फटका
कोरोनामुळे भारतातील आइस्क्रीमचा व्यवसाय ठप्प पडला. इंडियन आइस्क्रीमच्या मते, थंड खाल्ल्यामुळे कोरोना पसरतो, अशी अफवा पसरल्याने आइस्क्रीम उद्योगावर विपरीत परिणाम झाला. ऑनलाइन डिलिव्हरी देखील थांबवण्यात आली. दिल्लीत आइस्क्रीमचा वार्षिक उद्योग अडीचशे कोटींचा होतो. परंतु कोरोनामुळे हा व्यवसाय किमान पातळीवर आला. गेल्या एक दीड वर्षात राजधानीत तीस टक्क्यांच्या आसपास व्यवसाय राहिला. राष्ट्रीय राजधानीत आइस्क्रीमचे तब्बल अडीचशे कारखाने आहेत. कोरोनाकाळात या कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली. या मंडळींनी जानेवारी २०२० पासून जोमाने काम सुरू केले. परंतु कोरोना येताच सर्व उत्पादन थांबवावे लागले. कारखान्यात आणि आउटलेटमधील आइस्क्रीम फेकून द्यावे लागले. काही काळ आइस्क्रीम वाचवण्यासाठी चोवीस तास फ्रिज सुरू ठेवले आणि त्याचे अव्वाच्या सव्वा बिल भरावे लागले. अनलॉकचा कालावधी देखील आइस्क्रीम उद्योगाला पूरक नव्हता. रात्री नऊ नंतर आइस्क्रीम व्यवसाय सुरू होतो तर त्याचवेळी दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे ७५ टक्क्यांहून कारभार कमी झाला.

गुजरातमध्ये सर्वाधिक आइस्क्रीम निर्मिती
लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे फटका बसलेल्या आइस्क्रीम उद्योगाला सरकारने मदतीचा हात दिला नसल्याचे इंडियन आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने म्हटले आहे. त्यामुळे जवळपास १२ हजार लहान आणि मध्यम आइस्क्रीम निर्माते अडचणीत आले आणि त्यांनी कठीण परिस्थितीचा सामना केला. भारतात गुजरातमध्ये आइस्क्रीमचे सर्वाधिक उत्पादन होते. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक आणि अन्य राज्यांचा उल्लेख करता येईल. विशेष म्हणजे आइस्क्रीमचा चांगला व्यवसाय करणाऱ्या राज्यातच कोरोनाचा फैलाव अधिक राहिला. परिणामी उद्योगाच्या नुकसानीचा आकडा वाढला. आता देश अनलॉक झालेला असताना आणि सर्व हॉटेल पूर्ववत झालेले असताना आइस्क्रीम पार्लरवर देखील गर्दी जमवू लागली आहे. परंतु कोरोना काळात झालेल नुकसान हे मोठा फटका देणारे ठरले. म्हणून अन्य उद्योगांप्रमाणेच आइस्क्रीम उद्योगाला बळ देण्याची गरज आहे. आईस्क्रीमवरचा जीएसटी कमी केल्यास उद्योगाला आणखी चालना मिळू शकते, असे ‘आयआयसीएमए’ने म्हटले आहे.

हेही वाचा: इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या क्रांतिवीरांगणा हौसाक्का


अत्यावश्‍यक सेवेत सामील करण्याची अपेक्षा
दुग्धोत्पदानाचा जीडीपीत पाच टक्के वाटा असून त्यात आइस्क्रीमचा देखील समावेश होतो. जर आइस्क्रीम उद्योगाची कामगिरी खराब राहिली तर त्याचा परिणाम दूध, लोणी, क्रिमवर होऊ शकतो. त्यामुळे शेतीजोड व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. केंद्राबरोबरच सर्व राज्य सरकारांनी आइस्क्रीम उद्योगाला प्रोत्साहन देणे गरजेचे असून यात स्थानिक पातळीवर कुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे हा उद्योग रोजगारपूरक आहे. कर्नाटक सरकारने गेल्यावर्षी दुग्धजन्य पदार्थांना अत्यावश्‍यक सेवेत सामील केल्याने आइस्क्रीम उद्योगासाठी ही बाब मोलाची ठरली. भविष्यात कोरोनासारख्या संकटातही उद्योगांनी टिकून राहण्यासाठी उद्योजकांसाठी सरकारकडून सर्वंकष वेळोवेळी बुस्टर देणे गरजेचे आहे. यात आइस्क्रीमला बाजू ठेऊ नये, अशी उत्पादकांची अपेक्षा असेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Narendra ModiP V Sindhu
go to top