म्युच्युअल फंड घ्यावा, की शेअर्स? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्युच्युअल फंड घ्यावा, की शेअर्स?}

म्युच्युअल फंड घ्यावा, की शेअर्स?

शेअर बाजारात गुंतवणूक करून दामदुप्पट कमाई करावी, त्यातून श्रीमंतीचा झगमगाट अनुभवावा, असे स्वप्न असंख्य मध्यमवर्गीय नवगुंतवणूकदार पाहात असतात; पण त्याची सुरूवात कोठून आणि कशी करावी, यविषयी ते संभ्रमात असतात. त्यांची गुंतवणुकीची वाटचाल कशी असावी, याविषयी...

भारतात अन्य अनेक देशांपेक्षा काटकसर आणि बचत यांना महत्त्व दिले जाते. ‘आजचा दिवस आपला आहे. उद्याची चिंता न करता मौजमजा करा’ हे चंगळवादी तत्त्वज्ञान अन्यत्र पाहायला मिळते. त्याचा प्रभाव येथे तेवढा अनुभवास येत नाही; पण यातही एक गंमत आहे. आपले लोक ‘बचत’ करण्यात आघाडीवर असले, तरी ‘गुंतवणुकी’च्या बाबतीत मात्र तेवढे सजग नाहीत.

ठेवींच्या व्याजदरात घट

बँकांतील मुदतठेव (एफडी) व स्थिर उत्पन्नाची हमी देणाऱ्या तत्सम रूढ पर्यायांच्या पलीकडे जाण्याची मानसिकता बव्हंशी नागरिकांत नाही. सध्या बँकांतील ठेवीचे वार्षिक व्याजदर अवघ्या चार-पाच टक्‍क्यांवर आले आहेत. महागाईचा दर विचारात घेतला, तर व्याजाच्या माध्यमातून मिळणारा परतावा अगदी नगण्य आहे. दुसऱ्या बाजूला शेअर बाजाराचा सेन्सेक्स मात्र रोज नवे विक्रम करीत आहे; पण त्याचा फायदा किती जणांना मिळत आहे?..

गुंतवणूक की ‘सट्टाबाजार’

देशात सध्या जेमतेम साडेचार टक्के लोक शेअर बाजारात सक्रिय आहेत! कारण ‘हे क्षेत्र म्हणजे सट्टाबाजार आहे,’ असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे ही मंडळी त्यापासून दूर राहतात. तथापि, बँकांतील मुदतठेवींचे व्याजदर खूपच खाली आल्यावर अलीकडे त्यांचे शेअर बाजाराविषयीचे औत्सुक्य वाढू लागले आहे. त्याच्यापासून आजवर कटाक्षाने दूर राहिलेले लोक त्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत. त्यांच्यापुढे एक महत्त्वाचा प्रश्‍न आहे. कंपन्यांचे शेअर्स थेट खरेदी करायचे की म्युच्युअल फंडाचा थोडा अधिक सुरक्षित वाटणारा पर्याय निवडायचा?...

हेही वाचा: पार्सलमुळे कोरोनाला आळा मात्र, पर्यावरणीय धोका वाढला

गुंतवणुकीच्या यशोगाथा

हा निर्णय घेण्यापूर्वी या दोन्हींतील फरक नीट समजावून घेतला पाहिजे. अमुक एका कंपनीच्या शेअर्सची किंमत वर्षात किंवा काही महिन्यांत दुप्पट-तिप्पट झाली... गुंतवणूकदार अल्पावधीत मालामाल झाले, अशा बातम्या वेळोवेळी येत असतात. आपल्या ओळखीचा कुणी तरी त्याच्या वैयक्तिक गुंतवणुकीची अशीच यशोगाथा मोठ्या अभिमानाने सांगत असतो. हे पाहिल्यावर आपणही त्यांच्याप्रमाणे साहस केले पाहिजे, असे शेअर बाजारातील प्रवेशच्छुंना वाटायला लागते... हे तेवढे सोपे असते का? खचितच नाही.

योग्य कंपनी, योग्य किंमत

शेअर बाजारात थेट उतरायचे असेल, तर त्यासाठी अर्थजगतातील घडामोडींचा, ज्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे आहेत त्या क्षेत्राचा, बाजारावर परिणाम करू शकणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा किमान प्राथमिक अभ्यास असावा लागतो. फार खोलात न जाता, नावाजलेल्या मोठ्या कंपन्यांचे (लार्ज कॅप) शेअर्स घेतले की मोठी जोखीम न घेता निश्‍चिंत राहता येईल, असा साधा सरळ विचार काही जण करतात; पण गुंतवणुकीसाठी निवडलेली कंपनी योग्य असेल; परंतु तिच्या शेअर्सची किंमत त्या वेळी वाजवी आहे काय, हेही तेवढेच महत्त्वाचे असते. त्यामुळे ‘राइट स्टॉक ॲट राइट प्राइस’ हा सल्ला कायम लक्षात ठेवावा लागतो.

हेही वाचा: ओबीसींचे राजकीय आरक्षण अन् इम्परिकल डेटाचे काय?

माहितीचे स्रोत

हा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ आणि क्षमता असेल, तरच थेट शेअर्सखरेदीकडे वळणे योग्य ठरेल. अन्यथा, तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा गुंतवणूकविषयक विश्‍वासार्ह पोर्टल, नियतकालिके आदींमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे ‘टॉप रेटेड’ म्युच्युअल फंडाची निवड करून त्यांत पैसे गुंतविणे श्रेयस्कर ठरते. फंडाचे व्यवस्थापक आणि त्यांचे सहकारी या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. शेअर बाजारातील अनुकूल-प्रतिकूल प्रवाहांवर त्यांचे नियमित लक्ष असते. ताजी माहिती मिळविणे, तिचे विश्‍लेषण करून खरेदी-विक्रीचे निर्णय तातडीने घेणे, हे त्यांना नवीनतम तंत्रज्ञानामुळे शक्य होते.

जोखमीचे गणित

एका कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आणि फंडात गुंतवणूक करणे, यांत जोखमीच्या दृष्टीने खूप फरक पडतो. आपण म्युच्युअल फंडाच्या एखाद्या योजनेत गुंतवणूक करतो, तेव्हा त्यात जोखीम विभागली जाते. कारण फंड एका वेळी शंभरावर कंपन्यांत गुंतवणूक करू शकतो. त्यामुळे समजा त्यातील एका विशिष्ट कंपनीच्या शेअर्सची किंमत गडगडली तरी योजनेला मोठा फटका बसत नाही. याउलट वैयक्तिक गुंतवणूकदाराने घेतलेल्या एखाद्या शेअर्सची किंमत या प्रकारे घसरली, तर तो त्याच्यासाठी जबरदस्त आर्थिक धक्का असतो.

हेही वाचा: अजून किती क्षितिजांचे आयुष्य फुलण्याअगोदरच कोमेजणार?

सर्वाधिकार म्युच्युअल फंडाकडे

फंडातील गुंतवणुकीत जोखीम कमी असली, तरी फंडातील शेअर्सच्या खरेदी-विक्रीत गुंतवणूकदाराचा कोणताही सहभाग नसतो. त्याबाबतचे सर्वाधिकार फंडाकडे असतात. त्यामुळे आपल्या फंडात विशिष्ट कंपनीचे शेअर्स असावेत किंवा असू नयेत, यासंदर्भात गुंतवणूकदाराला निर्णयस्वातंत्र्य नसते. याउलट, तो स्वतः थेट शेअर बाजारात सक्रिय असेल, तर तो त्याच्या मर्जीनुसार हव्या त्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री करू शकतो, हा फरक लक्षणीय आहे. शेअर बाजार कधी अचानक उसळी घेतो; तर कधी कोसळतो. अशा असाधारण परिस्थितीत खरेदीचा, विक्रीचा किंवा काहीही न करता ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यासंदर्भातील निर्णय पोर्टफोलिओच्या भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक ठरत असतो. फंडव्यवस्थापकांकडे अशी परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य आणि अनुभव असतो. शेअर्सचा व्यवहार आपल्या पातळीवर करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी आपणही अशा प्रसंगांना सक्षमपणे सामोरे जाऊ शकतो काय, हे तपासून पाहायला हवे.

ठरावीक कंपन्यांवरील ‘प्रेम’

काही गुंतवणूकदार खरेदी केलेल्या शेअर्सच्या जणू प्रेमातच पडतात. त्या शेअर्सच्या किमती सातत्याने खाली येऊ लागल्या, तर प्रसंगी तोटा सहन करून त्यातून बाहेर पडणे आणि ती रक्कम अन्य कंपन्यांत गुंतविणे, फायदेशीर ठरू शकते; पण अनेकांना ‘तोटा सहन करणे’ ही कल्पनाच सहन होत नाही. त्यातून मग त्यांना ‘ॲव्हरेजिंग’चा (शेअर्सची किंमत घसरत असताना आणखी खरेदी करीत राहण्याचा) मोह होऊ लागतो. त्यातून काही वेळा बुडत्याचा पाय खोलात, अशी परिस्थिती उद्भवते. म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापक आपली जबाबदारी पार पाडताना सहसा अशा दोषापासून दूर राहतात.

हेही वाचा: भारतातील टॉप 10 महाकाय धरणं !

गुंतवणुकीतील शिस्त

गुंतवणूकदार म्हणून यशस्वी व्हायचे असेल, तर आपल्या व्यवहारांत शिस्त असावी लागते. शेअर बाजारात ‘टायमिग’ साधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, बाजार तेजीत असो किंवा मंदीत, नियमित गुंतवणूक करीत राहिले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ देत असतात. म्युच्युअल फंडांच्या ‘सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन’च्या (‘एसआयपी’च्या) माध्यमातून दरमहा किंवा निर्धारित वेळेला नियमित गुंतवणूक करता येते. अशी शिस्त वैयक्तिक पातळीवरील शेअर्सखरेदीबाबत अभावानेच दिसून येते.

अभ्यास, अनुभव गरजेचा

वरील मुद्दे विचारात घेता, शेअर बाजारात फक्त म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून प्रवेश केला पाहिजे काय, असा प्रश्‍न नवीन गुंतवणूकदारांना पडू शकतो. याचे उत्तर म्हणजे, या क्षेत्रात जे प्रथमच प्रवेश करणार आहेत, त्यांनी पुरेसा अभ्यास आणि किमान अनुभव असल्याशिवाय थेट खरेदी-विक्री करणे त्यांच्यासाठी जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे त्यांनी गुंतवणुकीची सुरूवात म्युच्युअल फंडापासून केली आणि नंतर या क्षेत्राची चांगली जाण आल्यावर स्वतंत्रपणे शेअर बाजारात व्यवहार सुरू केले, तर ‘लक्ष्मी’ प्रसन्न होण्याची शक्यता जास्त असेल. अनेक जण दोन्ही प्रकारे म्हणजे - म्युच्युअल फंडात आणि थेट शेअर बाजारातही गुंतवणूक करीत असतात. जोखीम सहन करण्याची आपली आर्थिक आणि भावनिक क्षमता विचारात घेऊन योग्य पर्याय निवडला पाहिजे.

हेही वाचा: कोरोना काळात वितळले आइस्क्रीम; पी.व्ही. सिंधूमुळे व्यवसायाला मिळाले बळ

भावनिक क्षमता म्हणजे काय?

शेअर बाजारातील चढ-उतारांची दिशा नेमकी कशी असेल, याचा नेमका अंदाज अगदी तज्ज्ञांनाही नसतो. बाजाराचा सेन्सेक्स कधी उच्चांक गाठतो, तर कधी अचानक खाली येतो. त्याला कोणते निमित्त कारणीभूत ठरेल, हे सांगता येत नाही. बाजाराचा हा स्थायीभाव कायम लक्षात ठेवला पाहिजे. सेन्सेक्सच्या भरती-ओहोटीमुळे रोजच ताणतणाव निर्माण होत असेल, तर अशी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असली, तरी गुंतवणुकीचा हा पर्याय तिच्यासाठी योग्य ठरेल काय, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यादृष्टीने भावनिक क्षमतेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो!

नियमित आढावा आवश्‍यक
स्वयंअभ्यासातून किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने एकदा चांगला फंड निवडला की आपली जबाबदारी पूर्णपणे संपली, आपण निर्धास्त झालो, असे समजण्याचे कारण नाही. सर्वोत्तम कामगिरीमुळे ‘फाइव्ह स्टार’ कॅटॅगरीत असलेल्या एखाद्या फंडात गुंतवणूक केली, तरी त्याची कामगिरी कशी आहे, याचा आढावा नियमितपणे घेतला पाहिजे. कारण, आज पंचतारांकित दर्जा असलेला फंड कायम त्याच श्रेणीत राहील, याच खात्री नसते. अमुक एक फंड मॅनेजर बदलला आणि नंतर त्या फंडाची कामगिरी खालावली, असेही काही वेळा घडते. त्यामुळे गुंतवणूकदाराला सजग राहावेच लागते. याचा अर्थ आपल्या फंडाचे ‘रेटिंग’ थोडे कमी-जास्त झाले की लगेच त्यातून बाहेर पडावे, असा नाही. मात्र, त्याच्या कॅटॅगरीतील अन्य फंड उत्तम कामगिरी करीत असताना, याच फंडाबाबत नकारात्मक गोष्टी घडत असतील, तर त्याचा निरोप योग्य वेळी घेतला पाहिजे.

म्युच्युअल फंडांचे प्रकार अनेक आहेत. मात्र, येथे फक्त ‘इक्विटी’शी निगडित फंडाच्या अनुषंगाने ऊहापोह केला आहे. ही माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. नवीन गुंतवणूकदारांना या क्षेत्राची तोंडओळख व्हावी, एवढाच या लेखनाचा उद्देश आहे. त्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूक करताना अधिक अभ्यास करावा किंवा माहितगारांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Share MarketMutual Fund
go to top