शहाणी गुंतवणूक : माझ्या 'मनी' चे प्रश्न! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहाणी गुंतवणूक :  माझ्या 'मनी' चे प्रश्न!}

तुमच्या गुंतवणुकीला सुरवात करताना नियोजन म्हणजे रोडमॅप हवाच.

शहाणी गुंतवणूक : माझ्या 'मनी' चे प्रश्न!

संयम आणि आयुष्यातील यश याचा जवळचा संबंध दिसून येतो. गुंतवणुकीतही या तत्त्वाचा नक्कीच प्रत्यय येतो. जे संयम टिकवून ठेवतात, ते त्यांची उद्दिष्टे गाठू शकतात. पण फक्त संयम ठेवणे हे संपत्ती निर्माण करायला आवश्यक असले तरी पुरेसे नसते. त्याकरिता शहाणा गुंतवणूकदार झाले पाहिजे. तो साक्षर तर असतोच; पण डोळसपणे आणि विचारपूर्वक पावले टाकतो. लाभदायी गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या काही संकल्पनांची चर्चा येथे केली आहे. गुंतवणूकदारांना वेळोवेळी जे निर्णय घ्यावे लागतात, त्यावेळी हे मुद्दे उपयोगी ठरणारे आहेत.

प्रवास सुरू करण्यापूर्वी कुठे जायचे हे आपण आधी ठरवतो. नंतर त्या स्थळाचा नकाशा बघून कसे आणि कधी जायचे याचे नियोजन करून प्रवासाला सुरवात करतो. तसेच तुमच्या गुंतवणुकीला सुरवात करताना नियोजन म्हणजे रोडमॅप हवाच. कोणीतरी सांगितले म्हणून सह्या करून चेक दिले, असे करू नये. विशेषत: विमा पॉलिसीच्या बाबतीत काटेकोरपणे बघावे कारण तो अनेक वर्षांचा करार असतो. अनेक पर्यायातून कुठला निवडायचा हे ठरवून मगच पहिले पाऊल टाकावे. गुंतवणुकीचे यशापयश अवलंबून असणारा म्हणजे तुमच्या उद्दिष्टपूर्तीवर सर्वांत जास्त परिणाम करणारा घटक म्हणजे तुमचे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन. त्याचा सर्वात आधी विचार करा. ठेवी (फिक्स्ड इन्कम वा डेट), इक्विटी, सोने आणि स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) या चार अ‍ॅसेट क्लासचे म्हणजे गुंतवणूक प्रकारांचे तुमच्या एकूण गुंतवणुकीत किती प्रमाण असावे, हे ठरवणे म्हणजे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन. कारण यावरच तुमचा परतावा म्हणजे रिटर्न्स अवलंबून असतात. त्याकरिता तुमची जोखीम क्षमता म्हणजे ‘रिस्क टेकिंग़ अॅबिलिटी’ किती आहे, हे पण विचारात घ्यायला हवे. गुंतवणूक प्रकाराची निवड झाली, की त्यानुसार त्याचा परतावा आणि त्याची जोखीम ठरते. याकरिता आर्थिक नियोजन करूनच सुरवात होणे जरूरीचे आहे.

हेही वाचा: ‘अर्थ’भान ते ‘समाज’भान

गुंतवणुकीची त्रिसूत्री कोणती?

अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन करताना प्रत्येक गुंतवणूक प्रकाराची सुरक्षितता, परतावा आणि तरलता या तीन निकषांवर विचार करता येतो. त्यानंतर अ‍ॅसेट प्रकार निवडता येतात. १) सेफ्टी- तुम्ही गुंतवलेली रक्कम त्यात खोट न येता ठरलेल्या वेळी तुम्हाला परत मिळणे, २) रिटर्न्स- गुंतवणुकीतील वाढ आणि ३) लिक्विडिटी म्हणजे किती दिवसात रक्कम काढता येते. यातील फक्त एकाच घटकाचा विचार न करता या तीनही घटकांचा समतोल साधून गुंतवणूक करायची असते. फक्त सुरक्षितता बघितली तर परतावा कमी मिळतो, पण रिटर्न्स जास्त हवे असतील, तर रिस्क (जोखीम) जास्त घ्यावी लागते. एकाच प्रकारातून हे तीनही उद्देश सफल होत नसल्याने वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांचा समावेश करून पोर्टफोलिओ बनवता येतो. पोर्टफोलिओ करण्याचे महत्त्व ओळखून संपूर्ण पोर्टफोलिओवर किती परतावा मिळेल आणि त्याची जोखीम किती असेल, याचा विचार केला पाहिजे. हे सुद्धा लक्षात ठेवा की ‘हाय रिस्क, हाय रिटर्न्स’ हे वाक्य ‘हाय रिस्क, झिरो रिटर्न्स’ असे बदलू शकते.

वय व अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन यांचा संबंध आहे?

(१०० - तुमचे वय = इक्विटीचे प्रमाण) हे सूत्र जसेच्या तसे अमलात आणायचे नसून, ही एक फक्त मार्गदर्शक सूचना आहे, असे समजावे. म्हणजे जर ५० वर्षे वयाच्या व्यक्तीला पुढील १० वर्षांत रक्कम लागणार नसेल, तर त्यांनी फक्त ५० टक्के इक्विटीचे प्रमाण ठेवले पाहिजे, असे नाही. गुंतवणूकदाराचा शेअर बाजाराचा अनुभव, परताव्याची अपेक्षा, किती काळापर्यंत रक्कम लागणार नाही, असे घटक लक्षात घेऊन तुमचे अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन करावे. या सूत्राकडे लक्ष देऊ नये. शेअर बाजारातील अत्यंत आकर्षक किंवा अति महाग मूल्यांकन विचारात घेऊन परिस्थितीनुसार सुद्धा आपल्या अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनमध्ये बदल करू शकता येतो.

हेही वाचा: सेमी कंडक्टरचा तुटवडा आणि जागतिक बाजार

परताव्याची अपेक्षा किती असावी?

सुरक्षित बँक ठेवींपेक्षा (सरकारी बँक) जी संस्था जास्त दराने व्याज देत असेल, तर त्या कंपनीची वा पतसंस्थेची पत किती आहे, ते तपासून बघितले पाहिजे. अशा ठेवी असुरक्षित असतात आणि जर सरकारी बँकेच्या वार्षिक ६ टक्के व्याजदराच्या तुलनेत जर कोणी ८ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देत असेल, तर तो ते कसा देऊ शकतील, याची खात्री केली पाहिजे. बँक ठेवीला जरी पाच लाखांचे विमा संरक्षण असले तरी ती बँक संकटात आली तर पैसे मिळायला विलंब लागतो आणि मनस्ताप होतोच. तसेच एकाच कंपनीत जास्त रक्कम ठेवू नये, कारण एका कंपनीत जोखीम सर्वांत जास्त असते. शेअरमधून किती परतावा मिळाला पाहिजे, हे सांगणे अवघड असते. परंतु, शेअरमधील गुंतवणुकीची जोखीम लक्षात घेता, ६ टक्के सुरक्षित व्याजदर + ५ ते ६ टक्के रिस्क प्रिमियम = ११ ते १२ टक्के परताव्याची अपेक्षा ठेवावी. दरवर्षी असा परतावा मिळत नाही, तर पाच वर्षांचे सरासरी प्रमाण तेवढे असू शकते. प्रत्यक्षात असे दिसते, की शेअरमध्ये अनेक वर्षे गुंतवणूक करणाऱ्यांनाही आपल्याला वार्षिक किती दराने परतावा मिळाला आहे, हे सांगता येत नाही. कारण हे लोक तसा हिशेब ठेवत नाहीत, त्यामुळे जे मोजलेच नाही ते योग्य आहे का नाही, हे ठरवता येत नाही. असे लोक ‘अमुक शेअरमध्ये मी इतका फायदा मिळवला, अशा गप्पा मारतात, पण वार्षिक परतावा मोजण्यासाठी काहीच करीत नाहीत.

घर विकल्यानंतर काय करावे?

प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५४ ईसी नुसार, घर विकल्यानंतर होणाऱ्या भांडवली लाभावरचा प्राप्तिकर वाचवायचा असेल तर ती रक्कम दुसरे घर खरेदीसाठी किंवा एनएचएआय किंवा आरईसी या सरकारी कंपन्यांच्या कॅपिटल गेन बाँडमध्येच गुंतवावी लागते. बहुतेक जण यापैकीच एक काहीतरी करतात. परंतु दुसरे घर घेणे कितपत लाभदायी होईल, हा विचार फारसा केला जात नाही. कारण असे घर घेऊन प्राप्तिकर वाचतो; पण असे घर राहण्यासाठी नको असेल तर पुन्हा तुम्ही घरासारखी तरलता नसलेल्या अॅसेट प्रकारात गुंतवणूक करून परत त्याच चक्रात अडकता. गुंतवणुकीसाठी खरेदीकरिता योग्य घराची निवड करणे आणि नंतरही त्याची विक्री करणे हे वेळखाऊ तर असतेच; पण लाभदायी होईल याचीही खात्री नसते. त्याकरिता थोडी जोखीम घेऊ शकणारे गुंतवणुकदार २० टक्के कॅपिटल गेन टॅक्स भरून उरलेली ८० टक्के रक्कम म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेत गुंतविण्याच्या पर्यायाचा विचार करू शकतात.

हेही वाचा: श्रीमंत व्हायचंय? मग आधी 'हे' करा!

गृहकर्ज लवकर फेडावे का?

सध्या गृहकर्जावरच्या व्याजाचे दर आजपर्यंतच्या सर्वांत कमी पातळीवर आहेत. ७ टक्क्यांपेक्षा कमी व्याजदराने २०-२५ वर्षे एवढ्या काळासाठी मिळणारे ते एकमेव कर्ज आहे. याशिवाय या कर्जावरच्या व्याजावर प्राप्तिकर सवलतही आहे. त्यामुळे ७ टक्के दराने मिळालेले गृहकर्ज फेडण्याची घाई करू नये. अशी रक्कम इक्विटी म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवली तर त्यावर १० ते १२ टक्के परताव्याची अपेक्षा करता येईल. कर्ज घेणारे प्राप्तिकर भरत असतील तर अधिक फायदा होईल. जे ३० टक्के दराने भरतात, त्यांना तर प्रत्यक्षात ५ टक्के दरानेच हे कर्ज उपलब्ध होत असते.

प्राप्तिकर वाचविण्यासाठी दुसरे घर घ्यावे का?

केवळ प्राप्तिकर वाचवायचा किंवा कमी व्याजाने कर्ज मिळते आहे म्हणून काही जण घर घ्यायचा विचार करतात. दुसरे घर खरेदी करून त्याकरिता कर्ज काढून त्यावरच्या व्याजावरचा प्राप्तिकर वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी होतो; पण ही करसवलत फक्त रु. दोन लाखांपर्यंतच आहे आणि नंतरच्या वर्षांमध्ये जसे व्याज कमी होऊ लागते, तसतसा हा फायदाही कमी होतो. जमीन-घरे यांच्या किंमतीत वाढ होते; पण ती स्थानिक परिस्थितीवर जास्त अवलंबून असते. घराच्या किंमती कमी होतच नाही, असा अनेकांचा समज असतो. पण गेल्या तीन वर्षांत किंमती कमी झाल्यामु़ळे तो गैरसमज आहे, हे लक्षात आले आहे. तसेच फक्त गुंतवणूक म्हणूनही बघितले तर मालकाला मिळणाऱ्या घरभाड्याचा बाजारमूल्यावर काढलेला परतावा ३ टक्के इतकाच असतो, जो बचत खात्यावरच्या व्याजदरापेक्षाही कमी आहे. याशिवाय घराचा हिस्सा विकता येत नाही. अपेक्षित किंमतीला घराची विक्री होण्यात अनेक अडचणी असल्याने उशीर होतो. विक्रीनंतर भांडवली लाभ कर द्यावा लागतो किंवा कमी व्याजाचे बाँड घ्यावे लागतात. मेंटेनन्स चार्जेस, कॉर्पोरेशन टॅक्स, भाडेकरू ठेवणे, भाडे वसूल करणे ही कटकट असतेच. त्यामुळे आधी इक्विटीतील गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे. या सर्व कारणांमुळे पेन्शनसाठीसुद्धा दुसऱ्या घराच्या भाड्यापेक्षा म्युच्युअल फंडातील ‘एसडब्लूपी’चा विचार करावा.

हेही वाचा: जगात भारी; 200 उद्यानांची पुण्याची दुनियाच न्यारी!

शेअर किंवा म्युच्युअल फंड?

गुंतवणूकशास्त्र शिकून ते सातत्याने फायदेशीरपणे राबवणे हे सोपे काम नाही. त्याकरिता अनेक वर्षांचा अभ्यास आणि अनुभव यांची गरज असते. त्यामुळे टर्मिनल समोर बसले की फायदा होईल, असे मानणे चुकीचे आहे. म्हणूनच तज्ज्ञांकडून निवड केलेल्या शेअरचा समावेश असणारी आणि विविधतेमुळे जोखीम कमी करणारी, उद्दिष्टे पूर्ण करणारी म्युच्युअल फंड योजना सर्वसामान्यांच्या दिमतीला अगदी वाजवी खर्चात उपलब्ध असते. म्युच्युअल फंड हे जरी सोपे साधन असले तरी सुद्धा आणि सल्लागारांच्या मदतीने त्यात गुंतवणूक केली, तरीही आपण त्याचा थोडा अभ्यास केला पाहिजे.

मिळालेला फायदा काढून घ्यावा का?

शेअर बाजार खूप वाढू लागला, की चढेल भावातील शेअर किंवा म्युच्युअल फंड विकून फायदा कमावून नंतर परत जेव्हा बाजार खाली येईल, तेव्हा खरेदी केली पाहिजे, असे सांगितले जाते. तत्त्व म्हणून हे योग्य आहे; पण हे प्रत्यक्षात आणणे अत्यंत अवघड आहे. वरच्या भावात विक्री आणि कमी भावात खरेदी झाली तरच फायदा होईल. अनेक वेळा विक्री होते; पण अपेक्षित भावात परत खरेदी होत नाही किंवा वरच्या भावाला होते. बाजाराकडे लक्ष ठेवून खरेदी-विक्री करणे हे वरून वेगाने पडणारा धारदार चाकू पकडण्याएवढे कठिण आहे. यातील संभाव्य अपघात टाळण्याकरिता ‘पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग’चे तत्त्व आचरणात आणावे. या शिस्तीमुळे भावनात्मक निर्णय होत नाहीत आणि ‘बाय लो-सेल हाय’ हे उद्दिष्ट पुरेसे होते. ‘गुंतवणूकदार हाच त्याचा शत्रू आहे,’ असे बेंजामिन ग्रॅहम यांनी म्हटले आहे, ते लक्षात ठेवावे.

हेही वाचा: कोरोनातील अनलॉकनंतर ‘हाय डिमांड’ असणाऱ्या नव्या संधी!!

लाभांश घ्यावा का ‘एसडब्लूपी’ करावे?

निवृत्तीची तरतूद करण्यासाठी म्युच्युअल फंडातील ‘एसडब्लूपी’ (सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन) या नावाचे सोपे साधन आहे. ‘एसआयपी’च्या ते बरोबर विरुद्ध आहे. ‘एसआयपी’ने तुम्ही नियमितपणे पैसे टाकत जाता, तर ‘एसडब्ल्यूपी’ करून नियमितपणे रक्कम काढत जातो. योजनेवरील लाभांश नियमित मिळेल, याची खात्री नसते आणि तोही आता करपात्र झाल्याने ‘एसडब्लूपी’चा पर्याय अधिक योग्य वाटतो. म्युच्युअल फंडातील डायनॅमिक अॅसेट अॅलोकेशन योजना (बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड) अथवा ॲग्रेसिव्ह हायब्रीड इक्विटी योजना याकरिता योग्य आहेत. यामध्ये फंड मॅनेजरकडूनच बाजाराच्या सध्याच्या मूल्यांकनानुसार डेट आणि इक्विटी यांचे प्रमाण वारंवार बदलले जाते. ठराविक गणिती सूत्रांनुसार हे होत असल्याने भावनांच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याचे प्रमाण कमी होते.

आयुर्विमा पॉलिसी कोणती घ्यावी?

तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या गरजेनुसार टर्म प्लॅनच्या स्वरुपातील आयुर्विमा पॉलिसी फक्त जोखीम रक्षणाकरिता घ्यावी. विमा संरक्षण आणि गुंतवणूक एकाच विमा पॉलिसीत घेण्याचा प्रयत्न शक्यतो करू नये. कमी प्रीमियममध्ये जास्त विमा संरक्षण देणारी पॉलिसी घ्यावी आणि इतर गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड यांचा वापर करावा.

हेही वाचा: जीवनाचा नाही भरवसा! कुटंबीयांसाठी एवढं कराच

सल्लागाराची मदत घ्यावी का?

श्री. गुगल यांच्याकडून प्रचंड माहिती मिळू शकते; पण ज्ञान आणि शहाणपण हे ते देऊ शकत नसल्याने आपण डॉक़्टर, आर्किटेक्ट, वकील अशा अनेक व्यावसायिकांचा वेळोवेळी सल्ला घेतो. म्युच्युअल फंडातील ‘डायरेक्ट’ पर्याय निवडला, तर आपल्याला एक टक्क्यापर्यंत अधिक फायदाही होऊ शकतो. पण आर्थिक नियोजन आणि त्यानुसार आवश्यक असलेली कार्यवाही आपल्याला जमणार नसेल तर अनुभवी आणि तज्ज्ञ सल्लागाराची मदत जरूर घ्यावी. गुंतवणुकीच्या सुरवातीपासूनचा प्रवास सुरळीत करून अपेक्षित स्थळी पोचण्याची आपली क्षमता नसेल, तर सल्लागार मदत करू शकतील.

आर्थिक स्वातंत्र्याचे उद्दिष्ट गाठणे हे फार अवघड नसते. पण त्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक सातत्याने करणे जरूरीचे आहे. स्वत:चा विचार हवा, नक्कल टाळायला हवी, बाजार-गप्पांना महत्त्व देऊ नये आणि म्युच्युअल फंडासारख्या सोप्या आणि परिणामकारक साधनाचा चांगला उपयोग करायला शिकले पाहिजे. आता सर्वच गोष्टी मोबाईलच्या अॅपवर आलेल्या आहेत. आपला पोर्टफोलिओ नियमितपणे बघितला पाहिजे आणि त्यात आवश्यक ते बदल केले पाहिजेत. असे म्हणतात, की ‘जोखीम न घेणे ही सुद्धा एक जोखीम आहे.’ संपूर्ण सुरक्षित असे जगात काहीच नसते. गरज असते ती जोखीम समजून घेऊन त्याचे व्यवस्थापन करण्याची. ते करा आणि आर्थिक स्वातंत्र्याचे ध्येय गाठा!

हेही वाचा: ‘सेन्सेक्स’ने विक्रमी पातळी गाठली; पुढे काय?

‘एसआयपी’ची परिणामकारकता कशी वाढवाल?

म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ खूपच लोकप्रिय झाले आहे. सध्या तर एकूण चार कोटी ‘एसआयपीं’मधून दरमहा सुमारे १० हजार कोटी रुपये म्युच्युअल फंडात जमा होत आहेत. असे असले तरीही अनेक जण ‘एसआयपी’ करताना पुरेसा विचार करीत नाहीत, असे दिसते. त्यासाठी पुढील सूचनांकडे लक्ष दिल्यास त्यांचा फायदा होऊ शकेल.

- आपली आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून (कशासाठी, किती रक्कम कधी हवी आहे) त्यानुसार योजना, कालावधी आणि रक्कम ठरवावी, तरच उद्दिष्टपूर्तीसाठी मदत होईल. उदा. पाच वर्षांपेक्षा नंतरच्या उद्दिष्टांसाठी इक्विटी योजना निवडावी, तर कमी मुदतीसाठी हायब्रीड प्रकारांचा विचार करावा. जोखीम जास्त घेऊन मिड आणि स्मॉल कॅप योजनांचाही समावेश करणे उचित होईल. कमी जोखीम असलेल्या योजनेत शक्य असल्यास एकरकमी गुंतवणूक करायला हरकत नाही.

- केवळ संख्येने जास्त ‘एसआयपी’ करून फायदा होते नसतो, तर अॅसेट अॅलोकेशन वेगळे असेल तरच विविधता येते. म्हणजे १००० रुपयांचे ५ ‘एसआयपी’ लार्ज कॅप योजनेत केल्याने फक्त व्यवहारांची संख्या वाढेल, ‘परतावा-जोखीम’ एकाच प्रकारची असेल. त्यामुळे स्मॉल कॅप वा मिड कॅप योजनेमध्येही ‘एसआयपी’ करणे योग्य आहे.

- (मासिक उत्पन्न - मासिक खर्च = मासिक गुंतवणूक) असे सूत्र न अवलंबता (उत्पन्न - गुंतवणूक = खर्च) हे सूत्र वापरावे आणि शिस्तीने महिन्याची ठरलेली रक्कम बाजूला ठेवावी.

- सर्व ऋतुंमध्ये व्यायाम करणाराच उत्तम प्रकृती ठेऊ शकतो; तसेच सातत्याने योग्य योजनांमध्ये ‘एसआयपी’ केले की संपत्ती वाढते. त्यातून जर पैसे काढत राहिले तर अर्थातच अपेक्षित रक्कम जमा होणार नाही.

- स्टेप-अप एसआयपी ः जर आपल्याला इच्छित ठिकाण लवकर गाठायचे असेल तर वेग वाढवावा लागतो, तसेच आर्थिक उद्दिष्टे लवकर गाठायची असतील तर दरवर्षी ‘एसआयपी’च्या रकमेत किमान ५ ते १० टक्के वाढ करावी.

(लेखक ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार आहेत.).

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :money
go to top