‘ब्रेन ड्रेन’ ऐवजी ‘ब्रेन गेन’ उदाहरण सेट करणारा पुण्यातील तरुण ते आयटी क्षेत्रातील मोठं नाव; जितेंद्र सरदेसाई

डेटा सर्व्हिसेस, बिझनेस ॲप्लिकेशन मॅनेजमेंट, क्लाउड व इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आदींची जगातील बाजारपेठ जवळपास ७०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक
businessman  jitendra Sardesai
businessman jitendra SardesaiEsakal

सेक्शन : सक्सेस स्टोरी

प्रसाद घारे
prasad.ghare@gmail.com


अमेरिकेतील संपन्नता, बुद्धिमत्तेला मिळत असलेला सन्मान, योग्य मूल्य अशा विविध कारणांमुळे फार पूर्वीपासून अनेकांचे स्वप्न अमेरिकत स्थायिक होण्याचे असते. त्यामुळे देशातील बुद्धिमान तरुणाई मोठ्या प्रमाणात अमेरिकेत जात असल्याचे दिसून येते.

या ‘ब्रेन ड्रेन’चे रुपांतर ‘ब्रेन गेन’ म्हणजे ही तरुणाई पुन्हा देशात यावी किंवा देशातच राहावी, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, आपल्या गुणवत्तेचा वापर देशासाठी करण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेले तरुण भविष्यकाळ आश्‍वासक असल्याचा दिलासा देतात. अशाच एका तरुणाची ही प्रेरकगाथा...

लहान वयातच ‘अमेरिका’ या चार अक्षरांच्या प्रेमात पडून तरुणपणी शिक्षण, नोकरी, छोकरी आणि तिथेच ग्रीन कार्ड घेऊन स्थायिक व्हायची स्वप्न पाहणारी तरुणाई आपल्या अवतीभोवती बघायला मिळते.

मात्र, गुणवत्ता आणि संधी असूनदेखील अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हायचे नाही, असे मनाशी पक्के ठरवून आपल्या शिक्षणाचा, अनुभवाचा उपयोग आपल्या देशासाठी, येथील समाजासाठी करणारी; तसेच ‘Creation of Wealth for Society’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून स्वतःचा उद्योगव्यवसाय करणारी तरुणाई आजूबाजूला दिसली, की होणारा आनंद काही औरच असतो.

अशा तरुणाईकडे बघितले, की आत्मनिर्भर भारताचे स्वप्न दूर नाही आणि आगामी काळात जगाच्या नकाशावर ‘भारत’ हे नाव ठळक अक्षरात नोंदवले जाईल, याची खात्री पटते.

अशाच एका तरुणाची यशोगाथा येथे सांगणार आहे, ज्याने लहाणपणीच अमेरिकेत अजिबात स्थायिक व्हायचे नाही, असे मनाशी पक्के ठरवले होते.

त्याचवेळी नोकरी न करता भारतातच राहून, स्वतःचा उद्योगव्यवसाय करायचा, असा निर्णय घेतला होता. तो त्याने प्रत्यक्षात साकार करून दाखविला आहे. हा उद्योजक आहे जितेंद्र सरदेसाई.

यशस्वी वाटचाल
पुण्यात जन्मलेले, वाढलेले जितेंद्र सरदेसाई यांची शैक्षणिक वाटचाल कायमच लखलखीत होती. इयत्ता बारावीमध्ये त्यांनी बोर्डात १९ वा क्रमांक पटकावला होता.

त्यानंतर पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून (सीओईपी) त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ँड टेलिकम्युनिकेशन या विषयात पदवी मिळविली आणि त्यानंतर काही काळ त्यांनी भारतात आणि सौदी अरेबियातील रियाध येथील काही लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला.

या अनुभवरुपी भांडवलाची पुंजी जमा झाल्यावर काही मित्रांबरोबर त्यांनी न्यूटेक नेटवर्किंग लि., प्रबोधन इन्फोसिस्टीम्स प्रा. लि. आणि आय सोर्स इन्फोसिस्टीम्स प्रा. लि. अशा आयटी क्षेत्राशी संबंधित कंपन्या स्थापन करून त्या उत्तमप्रकारे चालविल्या.

त्यांच्या आय सोर्स इन्फोसिस्टीम्स प्रा. लि. या कंपनीला ३० डिसेंबर २०२३ रोजी २० वर्षे पूर्ण झाली असून, या कंपनीत सध्या सहाशेपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. कंपनीची पुणे, बेंगळूर, दिल्लीसह देशात १७ ठिकाणी प्रोजेक्ट लोकेशन आहेत.

याचबरोबर अमेरिका, युरोप (लंडन), ऑस्ट्रेलिया, आशिया-प्रशांत टापूत कंपनीचे काम चालते. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ६५ ते ७० टक्के उलाढाल ही भारताबाहेरील कंपन्यांसोबत होते.

ही कंपनी प्रामुख्याने आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, क्लाऊड मॅनेजमेंट, बिझनेस ॲप्लिकेशन, आयटी सिक्युरिटी आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस या क्षेत्रात काम करते. या क्षेत्रात काम करणारी ही एक आघाडीची कंपनी आहे.

पेठी संस्कृतीचा ठसा
पुण्यातील सदाशिव पेठेत लहानाचा मोठा झालेल्या जितेंद्र सरदेसाईंवर पेठेतील अस्सल मराठी संस्कृतीचा प्रभाव आहे, हे त्यांच्याशी बोलताना जाणवते.

अतिशय मुद्देसूद बोलणे, आदर, नम्रता हे त्याचे काही गुण उल्लेखनीय वाटले. सगळे जातात त्या मळलेल्या वाटेने न जाता, आपली निराळी वाट निर्माण करायची, हा वेगळा विचार करायला आपल्याला ज्ञानप्रबोधिनी शाळा, विमलाबाई गरवारे प्रशाला, स. प. महाविद्यालय आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (सीओईपी) यांनी शिकविले, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

अभ्यासाव्यतिरिक्त लहानपणी त्यांनी फटाकेविक्री, राखीविक्री असे विविध उद्योग केले, यातून धिटाई आली. शालेय सहली, ट्रेकिंग, अभ्यासदौरे आदींमुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला.

वडिलांचा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय होता. त्यामुळे नोकरी न करता व्यवसायच करायचा हा निर्णय शाळा, महाविद्यालयात शिकत असतानाच पक्का झाला होता. घरात व्यवसायाला पोषक वातावरण होते.

वडिलांचा नवा व्यवसाय सुरू करण्यास पाठिंबा होता. मात्र, कोणता व्यवसाय निवडायचा, याचा निर्णय व्हायला थोडा वेळ जावा लागला.

देशा-परदेशात नोकरी
इंजिनिअरिंगची पदवी हातात पडल्यावर जितेंद्र यांचे बरेच मित्र उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. ते मित्र त्यांना अमेरिकेत यायचा आग्रह करीत होते.

मात्र, अमेरिकेत जाण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती, तरीही मित्रांच्या सततच्या आग्रहाने त्यांनी अमेरिकेत जाण्यासाठीच्या आवश्यक परीक्षा दिल्या, त्यामध्ये त्यांना उत्तम गुण मिळाले आणि काही विद्यापीठात प्रवेशदेखील मिळाला; पण मनापासून तिथे जाण्याची इच्छा होत नव्हती.

घरचा व्यवसायही साद घालत होता; मात्र तो व्यवसाय इलेक्ट्रिक क्षेत्राशी निगडित होता. इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातील पदवी हातात असल्याने; तसेच १९९० च्या दशकात खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे वारे भारतात वेगाने वाहायला लागले होते.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि संगणक क्षेत्रात झपाट्याने बदल होत होते. भारतात या क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत होत्या, त्या खुणावत होत्या.

कॉम्प्युटर नेटवर्किंग, सॉफ्टवेअर या क्षेत्रात नवे तंत्रज्ञान येत होते, याचा विचार करून जितेंद्र यांनी ‘स्वस्तिक रबर’च्या वसंतराव वैद्य यांच्या डायमंड ग्रुपच्या कंपनीत कामाला सुरुवात केली.

येथे चांगले सहकारी भेटले, नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर सौदी अरेबियातील रियाध येथे एका कंपनीत कॉम्प्युटर डिपार्टमेंट हेड म्हणून संधी चालून आली. रियाधमध्ये दोन वर्षे कामाचा अनुभव घेतला.

बऱ्याच नव्या गोष्टी, नवे तंत्रज्ञान शिकायला मिळाले. त्यानंतर १९९६ मध्ये ते भारतात परतले. आपल्या देशात कॉम्प्युटर हार्डवेअरपेक्षा सर्व्हर व नेटवर्क सिस्टीम, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन आणि कॉन्फिगरेशन क्षेत्रात काम करावे, असे त्यांना वाटले.

याच दरम्यान ‘केपीआयटी’ या सॉफ्टवेअर कंपनीमधील सेल्सच्या लोकांना कॉम्प्युटर नेटवर्किंग संबंधित ट्रेनिंग देण्याची संधी आली. ‘केपीआयटी’मधील लोकांना हे ट्रेनिंग खूपच आवडले. त्याचा त्यांना बराच फायदा झाला.

हे काम पाहून ‘केपीआयटी’ ने त्यांच्या आयटी डिपार्टमेंटचा हेड म्हणून काम करण्याबाबत विचारणा केली. त्यावेळेस कंपनीत नोकरी न करता स्वतंत्र व्यवसाय म्हणून हे काम करेन, असे जितेंद्र यांनी स्पष्टपणे सांगितले आणि येथूनच एका स्वतंत्र व्यवसायाचा श्रीगणेशा झाला.

स्वतंत्र वाट लाभदायी
‘केपीआयटी’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जितेंद्र यांची ही भूमिका आवडली आणि त्यांनी कंपनीच्या आयटी डिपार्टमेंट उभारणीचे काम त्यांना देऊन टाकले. अशा प्रकारे एका नव्या व्यवसायाची सुरुवात झाली.

या कामाच्या अनुभवाच्या जोरावर अन्य कंपन्यांकडूनदेखील कामे मिळायला लागली. त्यानंतर शाळेतील काही मित्रांसोबत प्रबोधन इन्फोसिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीत जितेंद्र सहभागी झाले. या कंपनीच्या माध्यमातून देशा-परदेशातील लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांबरोबर काम करायला मिळाले.

यातूनच उत्साह, अनुभव वाढला. नवनवीन संधींचे रुपांतर व्यवसायवाढीसाठी कसे करायचे, हे शिकायला मिळाले. वर्ष २००० मध्ये ‘डॉटकॉम बस्ट’चा फटका बऱ्याच आयटी कंपन्यांना सहन करावा लागला. त्याची झळ ‘प्रबोधन’ला जाणवली नाही, याचे कारण ही कंपनी प्रामुख्याने आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि टेस्टिंग सर्व्हिसेसमध्ये कार्यरत होती.

‘आय सोर्स इन्फोसिस्टीम्स’ची स्थापना
आय सोर्स इन्फोसिस्टीम्स प्रा. लि. या नव्या कंपनीची ३० डिसेंबर २००३ रोजी स्थापना करून आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करून नव्या जोमाने कामाला सुरुवात झाली. माहिती तंत्रज्ञान, टेलिकम्युनिकेशन, संगणक, या क्षेत्रात येत असणारे नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन त्याद्वारे विविध कंपन्यांच्या मागणीनुसार काम करायला प्रारंभ झाला.

देशा-परदेशातील लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांसाठी ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिव्हिजन’ उभे करून देणे आणि त्याचे संपूर्ण व्यवस्थापन करण्याचे काम ‘आय सोर्स इन्फोसिस्टीम्स’ ही कंपनी करून देऊ लागली.

या कामात त्यांची ‘मास्टरी’ निर्माण झाली. यातूनच कंपनीची भरभराट व्हायला लागली. वर्ष २००५-२००६ मध्ये भारतात टेलिकॉम हे क्षेत्र झपाट्याने विकसित होऊ लागले. टेलिकॉम कंपन्या देशभरात टेलिकॉम टॉवर उभारणीचे काम करू लागल्या. ही डायव्हर्सिफिकेशनची संधी ‘आय सोर्स इन्फोसिस्टीम्स’ला खुणावत होती.

त्यांनी या क्षेत्रातील काही तज्ज्ञ व्यक्तींना बरोबर घेऊन टेलिकॉम टॉवर उभारणीची कामे मिळवायला सुरुवात केली. अनेक राज्यांत काम सुरू झाले; पण टेलिकॉम कंपन्यांकडून ठराविक वेळेत पैसे येत नसल्याने, आर्थिक गणित बिघडायला लागले. हा गुंता दिवसेंदिवस वाढू लागला. बिले थकू लागली.

कामगारवर्ग आणि पुरवठादार पैशासाठी तगादा लावू लागले. याच गोंधळलेल्या परिस्थितीत आयटी सर्व्हिसेस या मुख्य व्यवसायाकडे दुर्लक्ष होत होते. पाच-सहा वर्षे यात गेली. अखेर बराच तोटा सहन करून टेलिकॉम सर्व्हिसेस व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय जितेंद्र यांनी घेतला.

या कामामुळे कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, हे चांगलेच समजले. व्यवसायात खाचखळगे कसे येतात आणि त्यातून बाहेर कसे पडायचे, याचा एक अवघड पेपर सोडवावा लागला.

वर्ष २०१२ मध्ये यातून सहीसलामत बाहेर पडून ‘आय सोर्स इन्फोसिस्टीम्स’ पुन्हा जोमाने कामाला लागली. नेटवर्किंग, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट व मॅनेजमेंट, क्लाउड मॅनेजमेंट, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आदी क्षेत्रात चांगल्या कंपन्यांची कामे मिळू लागली.

केपीआयटी, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, इन्फोसिस, पर्सिंस्टंट यांसारख्या नावाजलेल्या कंपन्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. एक्स्पोर्टच्या मोठ्या ऑर्डर मिळाल्याने कंपनीने पुन्हा भरारी घेण्यास सुरुवात केली. कंपनीला ३० डिसेंबर २०२३ रोजी नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली.

businessman  jitendra Sardesai
तणाव व्यवस्थापनासाठी कधीतरी ‘काहीही करू नका’ असं आता तज्ज्ञ का म्हणू लागलेत? तुम्हाला जमतं का हे ‘काहीही न करणं’...?

भविष्याचा वेध
सध्या माहिती तंत्रज्ञान, मशिन लर्निंग, डेटा सायन्स, एआय या क्षेत्रात प्रचंड वेगाने बदल होत आहेत.

हे नवे तंत्रज्ञान आत्मसात करून पुढील पाच वर्षांत कंपनीची उलाढाल जवळपास तिप्पट वाढविण्याचे; तसेच कर्मचारीवर्गाची संख्या सहाशेवरून दोन हजारांपर्यंत वाढविण्याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात येत आहे, असे सांगताना जितेंद्र सरदेसाई म्हणाले, की अमेरिका, युरोप आणि भारत या क्षेत्रावर ‘आय सोर्स इन्फोसिस्टीम्स’ने लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची’ असे गाणे म्हणत आपली वेगळी वाट निर्माण करणाऱ्या जितेंद्र सरदेसाई आणि त्यांच्या ‘आय सोर्स इन्फोसिस्टीम्स’च्या टीमचा उत्साह, आत्मविश्वास द्विगुणित व्हावा यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा!



महासत्ता करण्यासाठी हातभार हवा!
सध्या भारतात व्यवसायासाठी खूप मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि भविष्यात त्या वाढणारदेखील आहेत, याचा तरुणाईने फायदा करून घ्यावा, असे सांगताना जितेंद्र सरदेसाई म्हणाले, की युवा पिढीने फक्त नोकरीच्या मागे न धावता आपला लहान-मोठा व्यवसाय सुरू करावा. व्यवसायात जोखीम असतेच.

त्याचा मुकाबला करण्याची तयारी ठेवली, तर यश नक्कीच मिळते. कुटुंबीयांनी आपल्या मुलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे, त्यांना मागे न ओढता त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहावे.

डेटा सर्व्हिसेस, बिझनेस ॲप्लिकेशन मॅनेजमेंट, क्लाउड व इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आदींची जगातील बाजारपेठ जवळपास ७०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे.

भारतात मोठ्या प्रमाणावर टॅलेंट व बिझनेस परिसंस्था (इकोसिस्टीम) उपलब्ध आहे. तरुणाईने उद्योग, व्यवसायाचा मार्ग स्वीकारून भारताला महासत्ता करण्यासाठी हातभार लावायला हवा.

(लेखक पुणेस्थित मुक्त पत्रकार आहेत. मोबाईल ९३७३००५४४८)

------

businessman  jitendra Sardesai
Succes Story: शाळेत जाण्यासाठी दररोज 30 किमी चालवायचा सायकल, आज आहे 882 कोटींच्या कंपनीचा मालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com