गुंठेवारीत घर आहे, नियमित करायचे आहे, मग 'हे' वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंठेवारीत घर आहे, नियमित करायचे आहे, मग 'हे' वाचा}
गुंठेवारीत घर आहे, नियमित करायचे आहे, मग 'हे' वाचा

गुंठेवारीत घर आहे, नियमित करायचे आहे, मग 'हे' वाचा

पुणे : गुंठेवारी कायद्यातंर्गत घरे नियमितीकरणास मुदत वाढ आणि त्यासाठी आकरावयाचे शुल्क निश्‍चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात गुंठेवारीची घरे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. त्यामुळे गुंठेवारीची घरे नियमितीकरणाची थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाले आहे. तुम्ही एक, सव्वा अथवा दोन ते तीन गुंठे जागा घेऊन विना परवाना घरे बांधले आहे. ते तुम्हाला या कायद्यातंर्गत नियमित करून म्हणजे कायदेशीर करून घ्यावयाचे आहे. त्यासाठी किती शुल्क भरावे लागणार आहे, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल, त्यांची माहिती तुम्हाला हवी असेल, तर मग हे वाचा.

राज्यात तुकडेबंदी कायदा लागू आहे. प्रत्येक जिल्हयात तुकडाबंदीचे नियम वेगवेगळे आहेत. तरी देखील तुम्ही या कायद्याचे उल्लंघन करून घरासाठी एक, दोन अथवा तीन गुंठे जागा खरेदी केली आहे. त्यावर घर देखील बांधले आहे. हे करताना कोणतीही परवानगी घेतलेली नाही. आज जरी तुम्ही सुखात राहत असला, तरी देखील हे घर कायदेशीर नाही. त्यामुळे तुमच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलावार कायम आहे. आज तुम्हाला नाही, पण येणाऱ्या पिढीला त्याचा फटका बसू शकतो. अशा घरांची विक्री करताना अथवा अशी घरे बजेट मध्ये असल्यामुळे खरेदीसाठी करावयाचे आहे, परंतु कर्ज मिळत नाही, अशा अनेक अडचणी येतात. डोक्यावरील ही टांगती तलावार कायमस्वरूपी काढून टाकायची असेल आणि तुम्ही आणि तुमची भावी पिढी सुखाने त्या घरात रहावी, असे वाटत असेल, तर राज्य सरकारने गुंठेवारी कायद्यातंर्गत अशी घरे नियमित करून घेण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यासाठी शुल्क देखील निश्‍चित करून दिले आहे. या संधीचा फायदा घ्यायचा आहे, त्यासाठी किती पैसे भरावे लागातील, कधीपर्यंतची घरे नियमित करून मिळणार आहेत, असे अनेक प्रश्‍न तुम्हाला पडले असतील.

कधी पर्यंतची घरे नियमित होणार

गुंठेवारी कायदातंर्गत डिसेंबर २००१ पूर्वीचे घरे या आधी शुल्क आकरून नियमित करून केली जात होती. मध्यंतरीच्या काळात जमिनीच्या आणि सदनिकांच्या किमती भरमसाठ किमती वाढल्या. परवडत नसल्यामुळे नागरीक गुंठेवारीच्या घरांकडे वळाले. त्यामुळे गेल्या वीस वर्षांत मोठ्या प्रमाणावर गुंठेवारीची घरे झाली. अशा घरांना नियमिती करून घेण्यासाठी नियमितीकरणाची मुदत वाढवावी, अशी मागणी होत होती. त्यांची दाखल घेऊन २००१ ऐवजी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत एक, सव्वा, दोन, तीन गुंठे जागा घेऊन सर्वसामान्य नागरीकांनी विनापरवाना घरे बांधली आहेत. त्याना एक संधी देण्याचा निर्णय राज्य घेतला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२० पूर्वी तुम्ही जागा घेऊन बांधकाम केले आहे, अशा नागरीकांची घरे नियमित म्हणजे कायदेशीर होण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.

नियमितीकरणासाठी असे शुल्क आकरणार

घरे नियमित करण्यासाठी किती शुल्क आणि किती दंड आकरावा, याबाबत स्पष्ट आदेश नव्हते. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली होती. परंतु गेल्या आठवड्यात याबाबतचे आदेश राज्य सरकारने कढून दर निश्‍चित करून दिले. त्यानुसार किती शुल्क भरून कशा प्रकारे घरे नियमित करून घेता येईल, त्यांचे हे उदाहरण : समजा वारजे-शिवणे येथे तुम्ही दोन गुंठे ( २०० चौरस मीटर )जागा घेऊन विनापरवाना घर बांधले आहे. ते या कायद्यातंर्गत नियमित करून घ्यावयाचे असेल, तर सर्वप्रथम जमिनीचे एनए (बिनशेती) करून घ्यावे लागणार आहे. महापालिकेच्या हद्दीत त्याला जमिन विकासन शुल्क म्हंटले जाते. शासनाने ठरवून दिल्यानुसार दोन गुंठे जागा म्हणजे २ हजार १५२ चौरस फूट जागेचा रेडी-रेकनरमधील दर हा २३ हजार १६० चौरस मीटर ( २ हजार १५२ चौरस फूट ) असा आहे. (शहराच्या वेगवेगळ्या भागात जमिनीचे वेगवेगळे दर आहेत) यापूर्वी तुम्ही मान्यता घेऊन बांधकाम केले असते, तर तुम्हाला २ हजार १५२ रूपयांच्या पाच टक्के म्हणजे १०७.६४ प्रति चौरस फूट या दराने विकासन शुल्क भरावे लागले असते. परंतु तुम्ही विकासन शुल्क न भरता बांधकाम केले आहे. त्यामुळे तुम्हाला तीनपट विकसन शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजे १०७.६४ च्या तिप्पट म्हणजे ३२२ .९२ पैसे प्रतिचौरस फूट या दराने २ हजार १५२ चौरस फूट जागेचे ६ लाख ९५ हजार ४६ रूपये हे जमिन विकसन शुल्क करावे लागणार आहे.

त्यावर तुम्ही १ हजार ६०० चौरस फूटाचे बाधकाम केले असेल,जमिन विकास शुल्का व्यतिरीक्त त्या जागेवर जेवढी बांधकाम केले आहे. त्या बांधकामावर रेडी-रेकनरमध्ये जो जमिनींचा दर आहे. त्या दराच्या दहा टक्के रक्कम ही दंड म्हणून आकरावा, असे शासनाने म्हंटले आहे. म्हणजे तुम्ही दोन गुंठे जागेवर १ हजार ६०० चौरस फूट बांधकाम केले आहे. रेडी-रेकनरमध्ये तुमच्या जमिनींचा दर प्रति चौरस फूट १ हजार १५२ रूपये असा आहे. त्याच्या दहा टक्के म्हणजे २१५ रूपये प्रति चौरस फूट या दराने १ हजार ६०० चौरस फूट बांधकावर साधारणपणे ३ लाख ४४ हजार रूपये दंड करावा भरावा लागणार आहे. याचा अर्थ जमिनी विकासन शुल्कापोटी ६ लाख ९५ हजार ४६ रूपये अधिक केलेल्या बांधकामावर दहा टक्के दंडाने ३ लाख ४४ हजार रूपये असे मिळऊन १० लाख ३९ हजार ९६ रूपये इतका दंड महापालिकेकडे भरून घर नियमित करून घेता येणार आहे. बांधकाम करताना नियमानुसार तुम्ही सामासिक अंतर ( फ्रंट आणि साईड मार्जिन) सोडले नसेल, तर अधिकचा दहा टक्के दंड आकरला जाणार आहे. तो ३ लाख ४४ हजार रूपये येतो. म्हणजे १३ लाख ८३ हजार ९८ रूपये तुम्हाला भरावे लागणार आहे. जर तुम्ही सामासिक अंतर सोडून बांधकाम केले असेल, तर दहा टक्के दंड भरावा लागणार नाही.

मोकळा भूखंडला किती शुल्क भरावे लागणार आहे.

समजता तुम्ही वारजे-शिवणे येथे दोन गुंठे जागा घेऊन ठेवली आहे. परंतु त्यावर कोणतेही बांधकाम केले नसेल. आणि आता तुम्हाला त्या जागेवर कायदेशीर बांधकाम करावयाचे असे, अथवा गुंठेवारी कायद्यातंर्गत तो नियमित भूखंड नियमित करून घ्यावयाचे असेल, तर किती पैसे भरावे लागणार आहे. त्यांचे हे उदा : दोन गुंठे जागा आहे. त्या जागेचा रेडी- रेकरनमधील दर हा २ हजार १५२ रूपये प्रतिचौरस फूट दर आहे. त्याच्या पंधरा टक्के म्हणजे ३२२.९२ पैसे या दराने ६ लाख ९५ हजार ४६ रूपये शुल्क भरून तो नियमित करून घेता येईल. त्यानंतर रितसर बांधकामासाठी वास्तूविशारद यांच्या मार्फत प्लॉन तयार करून अन्य शुल्क भरून कायदेशीर बांधकाम करता येणार आहे.

भूखंड नियमित पण बांधकाम विनापरवाना

गुंठेवारी कायद्यातंर्गत नियमित झालेला जागा तुम्ही घेतली आहे. परंतु त्यावर विनापरवाना बांधकाम केले आहे. तर अशा प्रकरामध्ये तुम्ही असाल, तर किती दंड भरावा लागणार आहे. उदा : तुम्ही गुंठेवारी कायद्यातंर्गत नियमित करण्यात आलेला दोन गुंठ्यांच्या भूखंड खरेदी केला आहे. सामाजिक अंतर सोडून १६०० चौरस फूट बांधकाम केले आहे. आता या कायद्यान्वये बांधकाम नियमित करून घ्यावयाचे असेल. आणि त्या जागेचा रेडी-रेकनरमधील दर हा प्रतिचौरस फूट २ हजार १५२ रूपये असा दर असेल, तर त्याच्या दहा टक्के म्हणजे ३ लाख ४४ हजार रूपये शुल्क भरून ते बांधकाम नियमित करून घेता येणार आहे. समासिक अंतर सोडले नसेल, तर आणखी दहा टक्के म्हणजे ३ लाख ४४ हजार अधिक ३ लाख ४४ हजार असा ६ लाख ८८ हजार रूपये दंड करून ते नियमित करून घेता येणार आहे.

गुंठेवारी नियिमतीकरणाचे फायदे काय आहे.

गुंठेवारी कायद्यातंर्गत तुम्ही तुमची जागा अथवा घरे नियमित करून घेण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला घर खरेदी अथवा विक्री करताना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच त्या घरावर अथवा जमिनींवर कर्ज मिळण्यातील अहचणी दूर होणार आहे. घरावर कारवाईची टांगती तलावर दूर होणार आहे. तुम्ही आणि तुमची पुढची पिढीला सुखाने या घरात राहता येणार आहे.

नियमितीकरण कुठे होणार

महापालिकेची जुनी हद्द आणि १९९७ मध्ये समाविष्ट झालेली व २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावातील गुंठेवारीची बांधकामे नियमितीकरणाचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या बांधकाम खात्याकडे दाखल करावा लागणार आहे. तर सहा महिन्यांपूर्वी महापालिकेच्या हद्दीत दाखल झालेल्या २३ गावांमध्ये तुमचे बांधकाम असेल, तर तुम्हाला पीएमआरडीएकडे नियमितीकरणाचासाठी प्रस्ताव दाखल करावे लागणार आहे.

उमेश शेळके

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top