जीवनाचा नाही भरवसा! कुटंबीयांसाठी एवढं कराच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनाचा नाही भरवसा! कुटंबीयांसाठी एवढं कराच}
जीवनाचा नाही भरवसा! कुटंबीयांसाठी एवढं कराच

जीवनाचा नाही भरवसा! कुटंबीयांसाठी एवढं कराच

sakal_logo
By
अॅड. रोहित एरंडे

कोरोना काळात अनेकांच्या जोडीदारांचे निधन झाल्यामुळे घराची, गुंतवणुकीची घडीच विस्कटून गेली. निधनानंतर अशा प्रकारे गुंता होऊ नये यासाठी काय करणे गरजेचे आहे, मृत्युपत्रापासून खाते ‘आयदर ऑर सर्व्हायवर’ करण्यापर्यंत कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यांचे नियम कोणते आदी गोष्टींबाबत ऊहापोह.

कोरोना काळात जीवनाची अनिश्चितता आपल्याला उमगली आहे. आपल्या प्रत्येकाच्या ओळखीतले अनेक जण कोरोनाला बळी पडले आहेत. आपण गुंतवणूक करतो ती आपला पैसा सुरक्षित राहावा आणि त्यावर चांगला परतावा मिळावा म्हणून, त्या गुंतवणुकीचा उपभोग घेता यावा म्हणून. मात्र, ज्यांनी गुंतवणुकीची नीट सोय करून ठेवली नव्हती आणि अचानक (कोरोनाला) बळी पडले, त्यांच्या घराची, व्यवसायाची; तसेच गुंतवणुकीची पूर्ण घडीच या धक्क्याने विस्कटून गेल्याचे दिसून आले.

जीवनाबाबत अनिश्चितता कळल्यामुळे की काय, पण कोरोना काळात वकील मंडळींकडे मृत्युपत्राबाबत विचारणा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, या बाबतीत काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात आल्या त्या म्हणजे जोडीदारांना किंवा घरातल्या जवळच्या सदस्यांना एकमेकांच्या प्रॉपर्टी, बँक खाती, पॉलिसी, शेअर्स, ऑनलाईन बँकिंग करत असल्यास त्याचे पासवर्ड, ते कसे वापरायचे यांच्याबद्दल काहीच माहिती नसते.

हेही वाचा: ''स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराला प्रेम करण्याचा अधिकार नाही?''

बऱ्याच वेळा एकमेकांचे फोनचे पासवर्ड्‌सदेखील माहिती नसतात. दुर्दैवाने असा अनुभव आहे, की बरेचदा महिला मंडळींना या गोष्टींबाबत फारच कमी माहिती असते. याचा तोटा पुढे जेव्हा अघटित घडते तेव्हा जाणवतो.

खाते ‘आयदर ऑर सर्व्हायवर’ करा

बऱ्याचदा आम्ही बँक खाती ‘आयदर ऑर सर्व्हायव्हर’ (either or survivor- ई अँड एस) या इन्स्ट्रक्शनने उघडण्यास सांगतो- जेणेकरून जो राहील त्यास रक्कम मिळते. त्यामुळे आपण जर आपल्या हयातीमध्येच आपल्या जोडीदाराबरोबर किंवा मुला-मुलींबरोबर ‘आयदर ऑर सर्व्हायवर’ पद्धतीने खाती उघडली, तर आपल्यानंतर जो खातेदार हयात राहतो, त्याला/ तिला आपसूकच खात्यावरील सर्व रक्कम मिळेल आणि मग मृत्युपत्र, मग त्याचे प्रोबेट आणा किंवा जर मृत्युपत्र नसेल, तर वारसा हक्क प्रमाणपत्र आणा, या त्रासापासून सुटका होऊ शकते. मात्र, जर खाते ‘जॉइंट’ पद्धतीने ऑपरेट होत असेल, तर कायद्याच्या दृष्टीने दोन्ही खातेदारांना सामान हक्क असतो आणि एका खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याचा हिस्सा हा त्याच्या मृत्युपत्राप्रमाणे किंवा मग वारसा हक्काने इतर वारसांना मिळतो. हा प्रकार ‘आयदर ऑर सर्व्हायवर’ या प्रकारामध्ये होत नाही. त्यामुळे खाते उघडताना ‘जॉईंट’ आहे का ‘आयदर ऑर सर्व्हायवर’ आहे, याची नीट माहिती करून घेणे हिताचे आहे. मात्र, खाते ‘जॉइंट’ असेल, तर मात्र प्रत्येक खातेदाराचा ५० टक्के हिस्सा असतो, जो मृत्यूनंतर विलप्रमाणे अथवा वारसा कायद्याप्रमाणे वारसांना मिळतो. अजून एक सांगावेसे वाटते, की उगाचच भारंभार अकाउंट्स वेगवेगळ्या बँकांमध्ये काढण्यापेक्षा मोजक्याच बँकांमध्ये ती ठेवावीत. जेणेकरून पुढे जाऊन वारसांचा त्रास आणि वेळ वाचू शकतो.

सबब शक्यतो आपल्या हयातीमध्ये ‘ई अँड एस’ करून घ्यावे, जेणेकरून पुढील त्रास वाचतात. कोरोना काळात तर पैसे खात्यामध्ये आहेत; पण सही करणाऱ्या जोडीदाराचे निधन झाले आहे अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेकांचे हाल झाले. आता अशा परिस्थितीमध्ये वारसा हक्क प्रमाणपत्र घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि हे वेळखाऊ काम आहे. म्हणूनच आपले अकाऊंट ‘आयदर ऑर सर्व्हायवर’ केले, की अनेक प्रश्न सुटतील.

हेही वाचा: सामान्य माणसांची असामान्य श्रीमंती!

मृत्युपत्र करणे इष्ट

इतर कोणत्याही दस्तांच्या तुलनेत मृत्युपत्र हा करायला तुलनेने सोपा असा दस्त आहे. कोणतीही सज्ञान व्यक्ती स्वकष्टार्जित मिळकतीबाबत आपल्या हयातीत मृत्युपत्र करू शकते. असे मृत्युपत्र कितीही वेळा बदलता येते आणि सर्वांत शेवटचे मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाते. मृत्युपत्राला कोणताही स्टँम्प द्यावा लागत नाही, त्याचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक नाही. परंतु, प्रॅक्टिकली रजिस्ट्रेशन करणे योग्य- जेणेकरून पुढील त्रास वाचतात. तसेच त्यामुळे लाभार्थ्यांना ते मान्य आहे असे लिहून द्यावे लागत नाही. मात्र दोन साक्षीदारांची सही त्यावर असणे गरजेचे आहे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रदेखील असणे इष्ट आहे. यासाठी तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घ्या. मृत्युपत्र केले नसेल आणि ‘ई अँड एस’ही नसेल, तर वारसांना ‘वारसा हक्क प्रमाणपत्र’ आणावे लागू शकते.

हेही वाचा: जगभरातील नागरिकांना मायदेशी पाठविणारा ‘कतार'!

नॉमिनी आणि मालकी हक्क

बँका, शेअर्स, अशा ठिकाणी नुसते नॉमिनेशन केले म्हणजे भागत नाही- कारण नॉमिनेशन हा वारसा हक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाही. त्यामुळेच नॉमिनेशन केले असले, तरी मालकी हक्क हा मृत्युपत्र किंवा वारसा हक्क कायद्याप्रमाणेच ठरविला जातो आणि हाच कायदा घर, जागा आणि कंपन्या, बॅंका यांनादेखील लागू होतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या २ सदस्यीय खंडपीठाने, २०१६ मध्ये ‘शक्ती येझदानी विरुद्ध जयानंद साळगावकर’ या याचिकेवर दिला आहे. त्यामुळे केवळ नॉमिनेशन केले आहे, यावर विसंबून राहू नका. त्याचप्रमाणे सोसायटी फ्लॅट बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या ‘इंद्राणी वही विरुद्ध सोसायटी रजिस्ट्रार- पश्चिम बंगाल’ या प्रकरणातील निकालामुळे सोसायट्यांचे काम सोपे झाले आहे. एकदा का सोसायटी रेकॉर्डप्रमाणे सभासदाचे निधन झाल्यावर संबंधित नॉमिनी व्यक्तीच्या नावे शेअर हस्तांतरित केले, की सोसायटीची जबादारी संपुष्टात येते. त्यामुळे ज्या वारसांना जागेवर हक्क सांगायचा आहे, त्यांनी सक्षम न्यायालयात जाऊन दाद मागावी- कारण वारस कोण हे ठरविण्याचा अधिकार सोसायटीला नसून फक्त सक्षम न्यायालयालाच आहे. नॉमिनेशन ही एक ‘स्टॉप-गॅप’ अरेंजमेंट असते. त्यामुळे आता घर, जागा, शेअर्स, फंड, बँका काहीही असो, नॉमिनीस मालकी हक्क मिळत नाहीत

तेव्हा एकूणच, काळाची गरज लक्षात घेऊन इथून पुढे ‘विश्वासाने’ वरीलप्रमाणे एकमेकांची माहिती एकमेकांना करून द्या आणि आपल्या मृत्यूपश्चात गुंतवणुकीचा गुंता होऊ नये म्हणून काळजी घ्या.

हेही वाचा: ‘सेन्सेक्स’ने विक्रमी पातळी गाठली; पुढे काय?

माहितीची देवाणघेवाण गरजेची

गुंतवणुकीपासून घरापर्यंत सर्व गोष्टी पैशांशी निगडित आहेत. ‘पैसा खुदा तो नही, लेकीन खुदासे कम भी नही’ हे तितकेच खरे आहे. शेवटी सर्व ठिकाणी पैसा लागतो आणि त्या बाबतीत आपण आणि आपल्या जोडीदाराने, कुटुंबाने स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘विश्वासाने’ एकमेकांच्या अशा माहितीची देवाणघेवाण करा. कुठे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, कुठे काय आहे याची माहिती द्या आणि शक्य असल्यास एखाद्या वहीमध्ये ते लिहून ठेवा.

go to top