Intellectual Property and Trademark: काय असतात बौद्धिक संपदा फ्रँचायझिंगचे प्रकार? कंपनीचे ट्रेड सिक्रेट्स कसे राखावे?

प्रत्येक फ्रँचाइझ पद्धतीत कोणती ना कोणती बौद्धिक संपदा केंद्रबिंदू असते..
Intellectual Property and Trademark
Intellectual Property and Trademarkesakal

सेक्शन : उद्योजकता

ॲड. सायली गानू-दाबके
contact@lexonomix.com


मागील अंकातील लेखात आपण मुख्य फ्रँचाइझ कराराबद्दल माहिती घेतली. आता बौद्धिक संपदेचे जतन, त्याबाबतचे नियम आणि फ्रँचायझिंग याविषयीची सविस्तर माहिती करून घेणार आहोत.

फ्रँचायझिंग या व्यवसायाचा गाभा हा यशस्वीरीत्या प्रतिकृती करता येण्याजोगी वस्तू, सेवा, उत्पादन प्रक्रिया किंवा व्यवसाय पद्धती हा असतो.

फ्रँचायझरने त्याचे ज्ञान, अनुभव आणि कल्पनाशक्ती वापरून निर्माण केलेली अशी ही व्यवसाय पद्धती किंवा उत्पादने ही फ्रँचायझरची बौद्धिक निर्मिती असते, त्यामुळे अशा बौद्धिक संपदेचे जतन, त्याबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन आणि अशा निर्मितीच्या वापराबद्दल योग्य तो मोबदला मिळणे, हा फ्रँचायझरच्या दृष्टीने एखाद्या फ्रँचाइझ पध्दतीतला महत्त्वाचा मुद्दा असतो.

बौद्धिक संपदा फ्रँचायझिंगचे प्रकार
बौद्धिक संपदेचा विचार करताना फ्रँचायझिंगचे दोन मुख्य प्रकार म्हणजे

१) व्यवसाय पद्धतीची फ्रँचाइझ आणि

२) सेवा अथवा उत्पादन प्रक्रियेची फ्रँचाइझ.


कोणत्या प्रकारची फ्रँचायझी दिली आहे, यावर त्या फ्रँचाइझ व्यवस्थेत कोणत्या बौद्धिक संपदेचा समावेश होतो, हे ठरते. अशा समाविष्ट एक किंवा अधिक प्रकारच्या बौद्धिक संपदांबद्दल एकत्र किंवा वेगवेगळे करार असू शकतात.

मुख्य फ्रँचाइझ करारात अशा समाविष्ट सर्व बौद्धिक संपदांची यादी देऊन त्याबद्दल फ्रँचायझीला देण्यात येणाऱ्या अधिकारांचे ढोबळ वर्णन करणे व बौद्धिक संपदेबद्दल केलेल्या विविध करारांचा संदर्भ देणे चांगले असते.

१. व्यापारचिन्ह (Trademark)
व्यापारचिन्ह म्हणजे व्यापार करताना उत्पादन किंवा सेवेचा उत्पादक सांगण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह.

यात नाव, शब्द, लोगो, चित्र, अक्षरे, आकडे, आकृती, अथवा यातील विविध प्रकार एकत्र करून तयार होणाऱ्या विशिष्ट अशा चिन्हांचा समावेश होतो. अनेकदा एखादा ब्रँड (नाव किंवा लोगो) पाहिल्यानंतर आपल्या मनात त्या वस्तूच्या दर्जा/गुणवत्तेविषयी काही कल्पना निर्माण होतात.

ग्राहकांच्या मनात नाव ऐकताच गुणवत्तेची खात्री पटणे हेच कोणत्याही व्यापारचिन्हाचे किंवा ब्रँडचे यश समजले जाते.

त्यामुळेच फ्रँचायझिंगमध्ये व्यापारचिन्हाला अनन्यसाधारण महत्त्व असते. फ्रँचायझी देताना फ्रँचायझर हा त्याचे मालकीचे एक अथवा विविध ब्रँड्स वापरण्याचे काही विशिष्ट व मर्यादित अधिकार फ्रँचायझीला देत असतो.

असे ब्रँड्स वापरण्याच्या परवानगीपोटी फ्रँचायझी हा फ्रँचायझरला मानधन देत असतो. व्यापारचिन्हाबद्दलचे करार करताना फ्रँचायझरने स्वतःचे प्रत्येक व्यापारचिन्हाबद्दलचे हक्क स्पष्टपणे प्रस्थापित करणे व ते राखणे महत्त्वाचे असते, त्यामुळे फ्रँचायझी देण्यापूर्वी फ्रँचायझरने व्यापारचिन्हाची शक्यतो नोंदणी करावी.

नोंदणी न केलेल्या व्यापारचिन्हाच्या मालकांच्या हक्कांचेदेखील कायदा संरक्षण करत असला, तरी नोंदणी केलेल्या व्यापारीचिन्हाच्या हक्कांबद्दलची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया ही अधिक सुलभ होते.

व्यापारचिन्हाबद्दल विविध प्रकारचे हक्क
एखाद्या व्यापारचिन्हाबद्दल त्याचे मालकास विविध प्रकारचे हक्क असतात. उदा. अशा व्यापारचिन्हाचा वापर करणे, असे व्यापारचिन्ह वापरून वस्तू व सेवा पुरवणे, असे व्यापारचिन्ह वापरून वस्तू अथवा सेवांची आयात-निर्यात करणे, व्यापारचिन्हाच्या गैरवापराबद्दल अथवा अवैध वापराबद्दल तक्रार नोंदवणे.

फ्रँचायझी देताना फ्रँचायझर हा फ्रँचायझीला व्यापारचिन्हाबद्दल काही विशिष्ट गोष्टी करण्याचा किंवा काही विशिष्ट अधिकार बजावण्याचा व परवाना (license) देतो. अशा परवानगीची व्याप्ती, कालावधी फ्रँचायझीला दिलेल्या अधिकारांची स्पष्ट यादी व वर्णन केलेल्या परवानगीच्या बाबतीतील बंधने, अटी व शर्ती या सगळ्याचे तपशीलवार वर्णन असलेला करार करणे गरजेचे असते.

अनेकदा अशा करारात व्यापारचिन्हाच्या कोणत्याही प्रकारच्या नव्या किंवा परवानगी दिल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वापरासाठी फ्रँचायझरची पूर्वपरवानगी घेण्याचे बंधन असू शकते; तसेच फ्रँचायझीने अशा व्यापारचिन्हांचे किंवा त्यासारख्याच व्यापारचिन्हांची नोंदणी स्वतःचे नावे करू नये अशी अट लेखी घातली जाणे गरजेचे असते.


व्यापारचिन्हाप्रमाणेच अनेकदा व्यापारचिन्हातील रंगसंगती एकसारखी किंवा त्याला साजेशी रंगसंगती किंवा व्यापारचिन्हांशी प्रत्यक्ष संबंध नसलेली परंतु, फ्रँचायझरच्या दृष्टीने किंवा फ्रँचायझरने ठरवल्याप्रमाणे त्याच्या विविध ठिकाणच्या शाखांमधली एकरूपता जपण्यासाठी गरजेची अशी रंगसंगती किंवा सजावटदेखील फ्रँचाइझ व्यवसायाच्या ओळखीचा किंवा प्रतिमेचा मुख्य भाग असू शकतो.

अशावेळी अंतर्गत सजावटीबद्दलचे नियम, अपेक्षा याबाबत सहसा वेगळा करार होत नाही, तर तो फ्रँचाइझ व्यवसाय पद्धतीतील लेखी नियमावलीचा भाग असतो.

याखेरीजही व्यापारचिन्ह किंवा व्यवसायाची प्रतिमा याबद्दल प्रत्येक व्यवसायाच्या दृष्टीने विविध मुद्दे असू शकतात व त्याचा त्या-त्या व्यवसायाच्या अनुषंगाने तपशिलात विचार केला जातो.

२. कॉपीराईट
कॉपीराईटबद्दल एक सामान्य गैरसमज म्हणजे कॉपीराईट हे हक्क फक्त ग्रंथ, पुस्तके, कथा-कादंबऱ्या किंवा कवितासंग्रह या बाबतीत उपलबध असतात. परंतु, कॉपीराईट हे कलाक्षेत्रातील अनेक प्रकारच्या ‘निर्मिती’ (work) बद्दल उपलब्ध असलेले कायदेशीर हक्क असतात. यात कोणताही एकच विशिष्ट अधिकार नसून, ही अनेक वेगवेगळ्या अधिकारांची एकत्र बांधलेली मोळी असते.

फ्रँचाइझ व्यवसायांचा विचार करता विविध प्रकारचे लेखी साहित्य (नियमावलीपासून जाहिरातींच्या मजकुरापर्यंत सर्व काही), चित्रे, छायाचित्रे, जाहिराती, दृकश्राव्य स्वरूपातील साहित्य यांसारख्या विविध गोष्टीत फ्रँचायझरचे कॉपीराईट हक्क असतात.


फ्रँचाइझ पद्धतीमध्ये कॉपीराईट असलेले जाहिराती, ध्वनिमुद्रणे, चित्रफिती, नियमावली आदी वापरणे याबद्दल नुसती परवानगीच नव्हे, तर सर्व साहित्य वापरण्याचे बंधन फ्रँचायझीवर असते; तसेच अशा साहित्यातील कोणताही मजकूर न बदलण्याचे किंवा न वगळण्याचेदेखील बंधन फ्रँचायझीवर असते.

त्याचबरोबर असे साहित्य कोणत्या परिस्थितीत वापरायचे आणि कोणत्या परिस्थितीत वापरायचे नाही, याबद्दलही काटेकोर नियम व बंधने असतात. अनेकदा अशा साहित्याच्या वापराला फ्रँचायझीने फ्रँचायझरला देण्याचे मानधन हे मुख्य मानधनाचा (फ्रँचाइझ फी व रॉयल्टी) भाग नसते.

कॉपीराईटच्या मोळीतील वेगवेगळ्या अधिकारांच्या वापरासंबंधात फ्रँचायझीला कोणत्या परवानग्या दिल्या आहेत, त्या परवानग्यांची व्याप्ती, कालावधी, फ्रँचायझीला दिलेल्या अधिकारांची स्पष्ट यादी व वर्णन केलेल्या परवानग्यांच्या बाबतीतील बंधने, अटी व शर्ती या सर्व बाबींचे तपशीलवार वर्णन असलेला करार करणे महत्त्वाचे असते.

३. पेटंट
पेटंट म्हणजे कोणत्याही शास्त्रीय अथवा तंत्रज्ञानातील शोधाचे व्यावसायिक वापराबद्दल कायद्याने दिलेले एकाधिकार. ज्या फ्रँचाइझ पद्धतीत विशिष्ट प्रक्रिया अथवा पद्धती वापरून वस्तूंचे उत्पादनाचे हक्क फ्रँचायझीला दिले जातात अशा पद्धतीत पेटंट्स महत्त्वाची ठरतात.

पेटंटच्याबाबतीत पेटंट मिळालेली प्रक्रिया वापरणे किंवा उत्पादनांची निर्मिती करणे हा फ्रँचायझीला मिळालेला मुख्य हक्क असतो.

त्याचबरोबरीने परवानगी दिलेल्या पद्धतीचा सोडून इतर पद्धतीचा वापर न करणे अथवा तयार वस्तूचे अथवा पद्धतीचे उलट दिशेने विश्लेषण न करणे हा फ्रँचायझीवरील बंधनाचा मुख्य भाग असतो.

पेटंटच्या वापराच्या परवानगीबद्दलही फ्रँचायझी हा फ्रँचायझरला रॉयल्टी फी किंवा मानधन देतो. ट्रेडमार्क व कॉपीराईटप्रमाणेच पेटंटबाबतदेखील परवानग्यांची व्याप्ती, कालावधी फ्रँचायझीला देलेल्या अधिकारांची स्पष्ट यादी व वर्णन केलेल्या परवानग्यांच्या बाबतीतील बंधने, अटी व शर्ती याचे तपशीलवार वर्णन पेटंटविषयक करारात करावे.

४. गोपनीय माहिती आणि ट्रेड सिक्रेट्स
कोणत्याही फ्रँचाइझ पद्धतीमध्ये फ्रँचायझरने फ्रँचायझीला विविध प्रकारची गोपनीय माहिती अथवा व्यवसायाची; तसेच व्यवसायातील गुपिते सांगणे गरजेचे ठरते. अशी माहिती व गुपिते दरवेळी कोणत्याही बौद्धिक संपदेच्या नियमांखाली नोंदणीकृत करण्याजोगी असतातच असे नाही.

याखेरीज काही खासगी मालकीची माहितीदेखील फ्रँचायझर हा फ्रँचायझीला देत असतो. अशा सर्व माहितीची गोपनीयता राखण्यासाठी काही विशिष्ट व नेमकी बंधने फ्रँचायझीवर घालणे गरजेचे असते.

गोपनीय माहितीच्या करारात अत्यंत महत्त्वाची असते, ती गोपनीय माहितीची व्याख्या. कोणत्याही प्रकारच्या गोपनीय माहितीची सर्वसमावेशक यादी ही फ्रँचायझर व फ्रँचायझीमधील नात्याच्या सुरवातीलाच देता येणे शक्य नसते.

अनेकदा थोड्या थोड्या कालावधीनंतर व्यवसायातील किंवा परिस्थितीतील बदलांनुसार विविध प्रकारची गोपनीय माहिती फ्रँचायझीला देत राहाणे गरजेचे असते.

म्हणूनच सामान्यतः गोपनीय माहितीच्या व्याख्येत विशिष्ट माहितीच्या यादीपेक्षा अशा माहितीची वर्गवारी लिहिणे हे अधिक योग्य ठरते. सामान्यतः अशा माहितीचे वर्गीकरण शास्रीय अथवा तंत्रज्ञानाविषयी; आर्थिक अथवा जाहिरात व व्यवसायवाढीच्या दृष्टीने महत्त्वाची अशा गटात केले जाते.

सहसा गोपनीय माहितीची शक्य तितकी व्यापक व्याखा करारांमध्ये लिहिली जाते. अशी माहिती वापरण्यासंबंधीचे नियम व अटी अशी गोपनीय माहिती जाहीर न करण्याबाबत बंधने, त्याला लागू अपवाद व गोपनीय माहिती फ्रँचायझीच्या चुकीने अथवा कृतीने जगजाहीर झाल्यामुळे फ्रँचायझरला होणाऱ्या नुकसानाची भरपाई करून देण्याबद्दल फ्रँचायझीवर असलेली जबाबदारी याबाबत एक तपशीलवार वेगळा करार करणे गरजेचे ठरते.

प्रत्येक फ्रँचाइझ पद्धतीत कोणती ना कोणती बौद्धिक संपदा केंद्रबिंदू असते व अशा व्यवसायाचे यशाचे गमक असते, त्यामुळेच अशा संपत्तीची राखण होणे याला योग्य ते महत्त्व दिले जाणे गरजेचे आहे.

(लेखिका व्यवसायाने कायदा सल्लागार आहेत. मोबाईल ९१७५९३२२७७)
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com