Co Working Space: का वाढत आहे को-वर्किंग स्पेसची मागणी ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

का वाढत आहे को-वर्किंग स्पेसची मागणी ?}
जाणून घ्या नव्या वर्क कल्चरबाबत

का वाढत आहे को-वर्किंग स्पेसची मागणी ?

कोरोनानंतर जगभरात कामाच्या पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. जसे कामाच्या पद्धतीत बदल झाले आहेत तसेच कामाचे ठिकाण स्वतःचे हवे की, भाडेतत्त्वावर की को-वर्किंग याचा देखील आता प्रमुख्याने विचार केला जात आहे. या सर्वांत आता मोठी पसंती मिळत आहे ती को-वर्किंग स्पेसला.

ऑफिसचे वाढलेले भाडे, त्या तुलनेत तेथे असलेल्या सुविधा, त्यांच्या देखभालीचा खर्च आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्क कल्चर या सर्व बाबींचा यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळेच आता अनेक स्टार्टअप, छोट्या कंपन्या किंवा भारतात ऑफीस नसलेल्या अनेक कंपन्या को-वर्किंगमध्ये आपला व्यवसाय सुरू करीत आहेत. शिवाय या जागा तासाच्या आधारावर देखील बुक करता येतात. त्यामुळे ठराविक वेळेपुरत्या देखील त्या वापरल्या जात आहे. या सर्व कारणांमुळे आता को-वर्कींगला पसंती वाढत आहे. ही पसंती का वाढत आहे याचा घेतलेला हा आढावा. (Why Co working space getting importance in India)

को-वर्किंग स्पेसला पसंती का?
भाडे कमी असते :
स्टार्टअप कंपनी (Start Up) असेल किंवा कोणताही छोटा व्यवसाय (Business). तो सुरू करीत असताना प्रत्येकाकडे पुरेसे भांडवल (Capital) असेल असे नाही. नवीन ऑफीस भाडेतत्त्वावर घेतल्यास ऑफीस शोधण्यापासून त्यात फर्निचर व इतर बाबी उपलब्ध कराव्या लागतात. त्यामुळे असे व्यावसायिक को-वर्किंगमधील व्यावसायिक जागांचा वापर करता. स्वतःचे ऑफिस भाड्याने घेऊन त्यात काम करण्याच्या तुलनेत को-वर्किंग परवडते. कारण या स्पेस तुलनेने कमी भाडे भरावे लागते.

विविध सुविधा मिळतात :
स्वतःच्या ऑफिसमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देत असताना त्या विकत घ्याव्या लागतात. कॉफी मशीनसारख्या वस्तू त्याचे उदाहरण. मात्र को-वर्किंगमध्ये अशा कोणत्याही सुविधा स्वतः उपलब्ध कराव्या लागत नाही. कारण या सुविधा आधीच तेथे असतात. जी व्यक्ती या स्पेस उपलब्ध करून देतात ती व्यक्तीच या सुविधा पुरवते. तसेच त्याची देखभाल देखील घेते. पार्किंग, स्वच्छ स्वच्छतागृह, प्रशस्त लॉबी, वेटिंग रूम, कॉन्फरन्स रूम अशा काही बाबींचा या सुविधांमध्ये समावेश आहे.

ऑफिसमधील इंटेरीअर भन्नाट असते :
ऑफीसबाबत असलेल्या आपल्या कल्पना या अनेक स्टार्टअपने मोडीत काढल्या आहेत. कोणत्याही एका थीमवर आधारित आणि भन्नाट फर्निचर असलेले लुक असे नवनवीन व कल्पक को-वर्किंग स्पेस सध्या उपलब्ध होत आहेत. तसेच ऑफिसमध्ये असलेल्या वस्तू देखील अतिशय विचारपूर्वक मांडण्यात येतात. त्यामुळे पाहताक्षणी आवडले, अशी रचना या जागांची असल्याचे पाहायला मिळते.


आवडेल असे वर्क कल्चर :
कामाच्या ठिकाणचे वातावरण कसे आहे, याचा देखील कामावर परिमाण होत असते. त्यामुळे को-वर्किंगमधील वातावरण प्रसन्न आणि काम करण्यास पूरक असेल याची काळजी घेतले जाते. बदललेल्या वर्क कल्चरच्या गरजा पूर्ण होतील तसेच कर्मचाऱ्यांना आवश्‍यक असलेल्या बाबी त्यात असतील अशी खात्री बाळगली जाते. त्यासह कर्मचाऱ्यांचे मनोरंजन होऊन व त्यातून त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळेल. अशी रचना कार्यालयाची केलेली असते. तसेच तेथे काम करणारे कर्मचारी देखील वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे आपोआप कामाचे कल्चर चांगले होत जाते, असा अनेकांचा अनुभव आहे.

देखभाल दुरुस्ती वेळच्‍यावेळी केली जाते :
ऑफीस सुरू करण्याइतकेच अवघड काम म्हणजे त्याची देखभाल करणे. कर्मचारी वाढतील तसा देखभालीचा खर्च वाढत जातो, जागा कमी पडत जाते. तसेच सुविधांचा देखभाल करणे देखील अवघड होते. या सर्व बाबींवर असलेला खर्च वाढत गेल्यास कंपनीच्या नफ्यावर देखील परिणाम होतो. मात्र को-वर्किंगमध्ये तसे होत नाही. तेथील सुविधा व इतर बाबींच्या देखभालीची जबाबदारी ही स्पेस असलेल्यांची असते. त्यामुळे त्यासाठी तेथे काम करीत असलेल्यांना कोणत्याही बाबीत लक्ष घालावे लागत नाही. अनावश्‍यक बाबींसाठी
वेळ द्यावा लागत नसल्याने कंपनीला त्यांच्या कामावर फोकस करता येतो व त्यातून क्रयशक्ती वाढते.

इतर क्षेत्रातील कामकाज समजते :
को-वर्किंगमध्ये काम करणारे कर्मचारी हे शक्यतो एकाच कंपनीचे नसतात. इतर कंपन्यांचे देखील कर्मचारी असल्याने त्यांच्यात संवाद होऊन त्यांना एकमेकांच्या कंपनीचे व क्षेत्राची माहिती मिळते. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडते. अनेकांनी तर को-वर्किंगमध्ये झालेल्या ओळखीतून नोकऱ्या बदलल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे ही ठिकाणी केवळ चांगले वर्क-कल्चर नाही तर चांगली नोकरी मिळण्यासाठी देखील फायदेशीर ठरत आहेत.

कामासाठी भन्नाट ठिकाण हवे म्हणून को-वर्किंगला पसंती मिळत आहे. तसेच तेथे असलेल्या सुविधा देखील या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. काम करीत असताना कर्मचाऱ्यांना बोर होणार नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत त्यांचे काहीसे मनोरंजन व्हावे, याची देखील खात्री बाळगली जाते. पुढील सुविधा को-वर्किंगचे महत्त्व वाढवते :
- बैठकीसाठी स्वतंत्र कक्ष
- छोटासा काही कार्यक्रम करण्यासाठी जागा
- बालसंगोपन कक्ष
- हाय स्पीड इंटरनेट
- त्याच इमारतीत राहण्याची देखील सोय असते
- लायब्ररी
- दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी बाजारपेठ
- वैयक्तिक लॉकर्स
- प्रिंटर
- ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग

को-वर्किंगची वैशिष्ठ्ये :
- स्टार्टअप्स कस्टमाइज्ड खासगी कार्यालये देखील बुक करू शकतात
- सोयीनुसार आणि गरजेनुसार कस्टमायझेशन करता येते
- २४ तासांपर्यंत तुमच्या सहकाऱ्यांसह ऑफिसमध्ये येवू शकता
- देशातील जवळपास सर्वच लहान-मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहेत

या सेक्टरचा प्रामुख्याने को-वर्किंग स्पेसचा वापर :
- विविध क्षेत्रातील लहान उद्योग
- आयटी कंपन्या
- विपणन आणि विक्रीसंदर्भातील कंपन्या
- विविध स्टार्टअप
- बड्या कंपन्यांचे ग्राहक सेवा विभाग
- वैयक्तिक रित्या काम करणारे व्यावसायिक

को-वर्किंग स्पेस मॉडेल काय आहे?
को-वर्किंग स्पेस म्हणजे एक ऑफिस ज्यामध्ये एकापेक्षा जास्त कंपनीचे कर्मचारी काम करतात. सुरवातीला ही संकल्पना वैयक्तिकरित्या किंवा फ्रीलांन्स पद्धतीने काम करणाऱ्या अनेकांनी स्वीकारली. केबिन किंवा दोन खुर्च्यांची गरज असलेल्या उद्योजकांसाठी चांगल्या ठिकाणी त्याचे ऑफीस असावे यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून हे स्पेस उदयास आले आहेत. आता तर मोठमोठ्या कंपन्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुर्गम ठिकाणी तयार सेटअपमध्ये बसवण्यासाठी केबिन आणि डेस्क भाड्याने देण्यास सुरवात केली आहे.

स्टार्टअपसाठी ठरत आहे फायदेशीर :
को-वर्किंग स्पेसने अनेक स्टार्टअप्सना तेथे काम करण्याची संधी दिली आहे. स्टार्टअप्ससाठी आवश्‍यक असलेल्या बाबी पुरवून त्यांच्या वाढीसाठी क्षमता निर्माण केली जाते. त्याचा फायदा स्टार्टअपला होतो. त्यामुळे अनेकांनी अशा जागांचा वापर करीत व्यवसायाला सुरवात करीत मोठा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची अशा जागांना मागणी आहे.

आयटीयन्सकडून को-वर्किंग स्पेसची मागणी वाढली :
वर्क फार्म होम मिळाले आहे. मात्र घर छोटे असल्याने, घरी कोणी अचानक जास्त पाहुणे आल्यामुळे, ऑफिसच्या वातावरणाचा फील मिळावा अशा विविध कारणांसाठी आता अनेक आयटीयन्सची पावले को-वर्किंग स्पेसकडे वळू लागली आहेत. त्यामुळे आयटी हब असलेल्या परिसरातील को-वर्किंग स्पेसचे आयटीयन्सकडून असलेली मागणी वाढली आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून अनेक आयटीयन्सला घरून काम देण्यात आले आहे. आजही सुमारे ५० टक्के आयटीयन्स हे घरून काम करीत आहे. मात्र प्रत्येकाच्या घरी वर्क फॉर्म होमसाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा असतीलच असे नाही. त्यामुळे ते को-वर्किंग स्पेसचा वापर करीत आहेत. तसेच कोरोना काळात अनेक छोट्या कंपन्यांनी त्यांची भाडेतत्त्वावर असलेले ऑफीस कायमस्वरूपी बंद केले आहे. त्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य होत नाही, अशांची सोय कंपन्यांकडून को-वर्किंग स्पेसमध्ये करून देण्यात आली येत आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर आणि आयटीचे वर्क फॉर्म होम वाढल्यानंतर को-वर्किंग स्पेसचा वापर वाढला आहे. आमच्याकडे व्यक्ती आणि कंपनी देखील स्पेस घेत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आयटीयन्स वैयक्तीक रित्या येण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे. पूर्ण नवीन जागा घेण्यापेक्षा को-वर्किंग परवडत असल्याने यास कंपन्या आणि नोकरदारांची पसंती मिळत आहे.
निनाद सेलमोकर, ट्रायोस को-वर्किंग

को-वर्किंग स्पेसमध्ये येणाऱ्यांची संख्या मार्चनंतर काही प्रमाणात वाढली आहे. सर्व क्षेत्र पूर्णपणे खुली झाल्याने ही वाढ दिसते. याठिकाणी येणारे केवळ लघू व्यावसायिकच नाही तर बड्या कंपन्या देखील आहेत. अचानक वाढलेल्या मनुष्यबळासाठी या जागांचा वापर केला जात आहे.
अजित घोगरे, भागीदार, अस्टर को-वर्किंग स्पेस

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”