संघटीत अर्थव्यवस्था : पारंपरिक चष्मा का बदलावा लागेल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघटीत अर्थव्यवस्था : पारंपरिक चष्मा का बदलावा लागेल?}

नजीकच्या भविष्यात प्रचंड उलथापालथ करण्याची क्षमता या बदलात असल्याने त्यात आपण सहभागी होणे आणि इतरांनाही सहभागी करून घेणे क्रमप्राप्त आहे.

संघटीत अर्थव्यवस्था : पारंपरिक चष्मा का बदलावा लागेल?

- यमाजी मालकर

अर्थव्यवस्था संघटीत होण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे काम भारतात जागतिकीकरणाच्या स्वीकाराने ३० वर्षांपूर्वी केले होते, त्याला कोरोनाच्या संकटाने ‘एक्सप्रेस वे’वर आणून ठेवले आहे. अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेला हा आमूलाग्र, मोठा बदल आता जीवनाच्या सर्व क्षेत्रांत दिसू लागला आहे. या बदलाकडे विशिष्ट विचारसरणी किंवा राजकीय चष्म्यातून पाहणे धोकादायक ठरेल. नजीकच्या भविष्यात प्रचंड उलथापालथ करण्याची क्षमता या बदलात असल्याने त्यात आपण सहभागी होणे आणि इतरांनाही सहभागी करून घेणे क्रमप्राप्त आहे. हा बदल नेमका आहे तरी काय? आणि आपल्या जगण्याचा त्याच्याशी थेट संबंध कसा आहे?

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्या शहरातील तरुण आपल्या मित्रांना त्याच्या नव्या व्यवसायाविषयी सांगत होता. त्याने त्या शहरात बराच खर्च करून फर्निचरचे शो रूम सुरू केले होते. दुकान सुरु होऊनही दोन-तीन महिने लोटले होते. पण व्यवसाय काही मनासारखा होत नाही, अशी त्याची तक्रार होती. त्यामुळे तो चिंतेत होता आणि ती चिंता तो मित्रांशी शेअर करत होता. ही चर्चा सुरु असताना त्याच्या पायातील बूट नवा असल्याचे एकाच्या लक्षात आले. म्हणून त्या बुटाकडे सर्वांचे लक्ष गेले. आपल्या नव्या वस्तुचे कौतुक कोणाला नसते? म्हणून त्या मित्राने तो बूट कसा ऑनलाईन घेतला, तो किती स्वस्त पडला, त्या बुटाच्या कंपनीची साईट किती चांगली आहे, दुकानात पायाचे माप घेऊन, ट्रायल घेऊन जसा बूट घेतला जातो, तसाच हुबेहूब अनुभव साईटवर कसा येतो, हे त्याने अगदी रंगवून सांगितले आणि तो बूट त्याला किती परफेक्ट आला, हे मित्रांना दाखविले. पुन्हा चर्चा त्याच्या फर्निचरच्या शो रूमची सुरु झाली, तेव्हा एक मित्र म्हणाला, ‘मित्रा, तुला तुझा बूट जर ऑनलाईन चांगला मिळतो, तर तुझ्या शहरातील नागरिकांना फर्निचरही ऑनलाईन मिळू लागले आहे. ते कशाला तुझ्या दुकानात येतील? या घटनेतील अतिशयोक्ती थोडी बाजूला ठेवू. पण त्या मित्राच्या प्रश्नात बरेच काही दडले आहे. ऑनलाईन व्यवहार किती वाढले आहेत, हे सांगणारी ही एक साधी घटना. पण आपल्या देशात होत असलेल्या एका मोठ्या बदलाची ही नांदी होय.

हेही वाचा: ऐतिहासिक वारसा लाभलेले रुबाबदार राजभवन!

आठवून पाहा. ज्यावेळी पारंपारिक किराणा दुकानांना स्पर्धा करणारे सुपर मार्केट मोठ्या शहरात दिसायला लागले, तेव्हा किराणा दुकानांचे काय होणार, अशी चर्चा होऊ लागली. काहींनी आपले किराणा दुकानच बरे, असे सुरवातीला ठरविले, पण हळूहळू अनेकांचे पाय सुपर मार्केटकडे वळू लागले. नंतर सुपर मार्केटचा आकार मोठा होऊ लागला. मग त्याला मॉलचे स्वरूप आले आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे मध्यम शहरांमध्येही स्पेन्सर, स्टार, डीमार्ट, बिग बझार सुरु झाले. हे बदल सुरु झाले, त्यालाही आता २० वर्षे झाली. छोट्या-छोट्या किराणा दुकानांची जागा आता मोठे मॉल घेताना दिसत आहेत आणि आता तर मॉलची जागा ऑनलाईन खरेदी करताना दिसते आहे. हा बदल काही फक्त किराणा दुकानापुरता मर्यादित राहिलेला नाही. सर्वच क्षेत्रातील बाजारपेठांत तो होतो आहे. मोठ्या शहरात बदलाचे हे चित्र सहजपणे दिसते आणि छोट्या शहरांमध्ये तुलनेने कमी, एवढाच काय तो फरक.

‘जीएसटी’चे संकलन हा पुरावा

ज्याला आपण असंघटीत आणि संघटीत अर्थव्यवस्था म्हणतो, त्यासंबंधातील हा आमूलाग्र असा बदल आहे. आतापर्यंत आपली अर्थव्यवस्था, बाजारपेठ असंघटीत आहे, असे आपण म्हणत होतो. पण आता आपल्याला तसे म्हणता येणार नाही. कारण अजूनही कमी असलेला संघटीत बाजारपेठेचा वाटा वेगाने वाढत चालला आहे. तो वाटा किती वेगाने वाढला आहे, याचे ताजे उदाहरण ही गोष्ट अधिक स्पष्ट करील. कोरोनाच्या संकटातून देश बाहेर पडताना म्हणजे सप्टेंबर २०२१ मध्ये ‘जीएसटी’चे संकलन १.१७ लाख कोटी रुपये झाले आहे. एकीकडे व्यवहार पुरेसे सुरु झाले नाहीत, असे आपण म्हणत असताना जीएसटी महिन्याला सातत्याने एक लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक जमा होताना दिसत आहे, याचा अर्थ व्यवहार सुरु झाले आहेत. याचा अर्थ व्यवहार तर होत आहेत, पण ते संघटीत अर्थव्यवस्थेमध्ये जास्त होत आहेत. हा बदल जीवनाच्या सर्व क्षेत्रात कसा होतो आहे, हे विविध संदर्भाने समजून घ्यावे लागेल.

हेही वाचा: गाव ते महानगर आणि उद्योगनगरी ते क्रीडानगरी पिंपरी-चिंचवडचा प्रवास

दिशाबदलाची शक्यता नाही

अधिकाधिक सेवा आणि वस्तूंचे उत्पादन असंघटीतकडून संघटीतकडे जाण्याची ही प्रक्रिया जगभर अनेक वर्षे सुरु आहे. विकसित देशांत त्याचे टोक गाठले गेले असून, भारतासारख्या विकसनशील देशात त्याचा वेग जागतिकीकरणाच्या स्वीकारापासून म्हणजे गेले तीन दशके वाढला आहे. आपली बाजारपेठ आपण जगाला टप्प्याटप्प्याने खुली केली. ही प्रक्रिया कशी होत गेली, याची काही उदाहरणे दिली तर ते अधिक स्पष्ट होईल. त्याचे अगदी प्राथमिक उदाहरण म्हणजे गावातील किराणा दुकानात आता गावात तयार होणाऱ्या वस्तू मिळत नाहीत. गावातील लग्नात पूर्वी गावातील एक-दोन ‘महाराज’ स्वयंपाक करून देत असत आणि गावातीलच भाऊबंद वाढपी होत असत. पण आता ही सेवा आपण विकत घेऊ लागलो आहोत. हा बदल अगदी किरकोळ स्वरूपाचा आपण मानला तरी अर्थव्यवस्था संघटीत होण्याची ही सुरवात होती. पुढे प्रत्येक वस्तू आणि सेवेचे ब्रँड होत गेले आणि ते आपण स्वीकारत गेलो. कारण ते सर्वांना हवेहवेसे वाटू लागले. आजूबाजूला होत असलेल्या बदलासोबत राहिले पाहिजे, हा तरुण पिढीचा रेटा म्हणून म्हणा, ते खात्रीचे आणि दर्जेदार आहेत म्हणून म्हणा किंवा त्याला असलेली प्रतिष्ठा म्हणून म्हणा, पण त्याचा स्वीकार जसा वाढत गेला, तसाच आज संघटीत अर्थव्यवस्थेचा स्वीकार वेगाने वाढताना दिसतो आहे. गेल्या ३० वर्षात या संदर्भाने पुलाखालून इतके पाणी वाहून गेले आहे, की ती दिशा आता बदलण्याची शक्यता राहिलेली नाही.

आर्थिक क्षेत्रातील ‘संघटीत’

या बदलाचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारात ठळकपणे दिसून येते. संघटीत क्षेत्र म्हणजे अर्थातच सेवा देणाऱ्या आणि वस्तूंची निर्मिती करणाऱ्या मोठ्या कंपन्या. त्यातील बहुतांश भांडवली बाजारात म्हणजे शेअर बाजारात ‘लिस्टेड’असतात. त्यातील काही कंपन्यांचे बाजारमूल्य गेल्या वर्षांत उच्चांकी वाढले आहे. कोविड संकटाच्या गेल्या दीड वर्षांत शेअर बाजारातील कंपन्यांचे एकूण मूल्य सप्टेंबर २०२१ अखेर तब्बल २५० लाख कोटी रुपये झाले आहे. या मूल्याने आता फ्रान्सलाही मागे टाकून जगात सहावे स्थान मिळविले आहे. यालाच संघटीत अर्थव्यवस्थेचा वाटा वाढला, असे म्हणतात. देशाचा ‘जीडीपी’ लॉकडाउनमुळे कमी झाला असताना ही किमया झाली आहे. याचा अर्थ असा, की ज्या कंपन्या संघटीत क्षेत्रात आहेत, त्यांचा व्यवसाय चांगला चालला आहे. मात्र, जे व्यवसाय असंघटीत आहेत, त्यांचा व्यवसाय थंडावला आहे. काही मोजक्या कंपन्याची उलाढाल चांगलीच वाढली आहे. त्या बहुतांश कंपन्या आयटी, वाहतूक, बँक, फायनान्स आणि इन्शुरन्स अशा नवनव्या क्षेत्रांशी संबधित आहेत. सरकार करीत असलेल्या आर्थिक सुधारणांचा आणि जागतिकीकरणाचा हा अपरिहार्य परिणाम आहे. उदा. रोखीचे आणि पर्यायाने रोखीवर चालणाऱ्या व्यवसायांना आता फटका बसल्याने गुंतवणुकीसाठी होत असलेले जमिनीचे आणि घरांचे व्यवहार कमी झाले आहेत. सोन्यातील गुंतवणूकही काही प्रमाणात कमी होते आहे, तर दुसरीकडे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वेगाने वाढते आहे. ‘एसआयपी’च्या मार्गाने महिन्याला तब्बल १० हजार कोटी रुपये शेअर बाजारात येत आहेत. गुंतवणुकीचे असे मार्ग बदलणे याला म्हणतात आर्थिक क्षेत्रात अर्थव्यवस्था संघटीत होणे. असाच बदल भारतीय बँकात होताना दिसतो आहे.

हेही वाचा: फक्त विहिरींच्या पाण्यानेच भागायची पुणेकरांची तहान

अॅमेझॉन, रिलायन्सची आघाडी

कोरोनाच्या संकटाने या बदलाला कसे ‘एक्सप्रेस वे’वर आणून ठेवले पाहा. सर्व जगाचे व्यवहार लॉकडाउनमध्ये तब्बल एक वर्ष बंद राहिले. त्यात मोठ्या कंपन्यांचाही समावेश होता. छोटे आणि मध्यम उद्योग त्यामुळे संकटात सापडले, तर काही बंदच पडले. आज अशी स्थिती आहे, की जग अशा आर्थिक संकटात असताना जे व्यवसाय संघटीत होऊन बहुराष्ट्रीय किंवा मोठ्या कंपन्यांच्या हातात जात आहेत, त्यांची मात्र घोडदौड सुरु झाली आहे. उदा. अॅमेझॉन ही बहुराष्ट्रीय, तर रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतीय कंपनी. जगातील अर्थचक्र संकटात असताना अशा काही मोजक्या कंपन्यांची उलाढाल आणि संपत्ती ही तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वाढत चालली आहे. जगात सर्वत्र रोजगारसंधी कमी होत असताना अॅमेझॉनने आपले मनुष्यबळ ३३ हजारांनी वाढविण्याचा निर्णय गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घेतला. अॅमेझॉनचे अमेरिकेबाहेर सर्वांत मोठे कार्यालय भारतात हैदराबादला उभे राहिले. जे अॅमेझॉनचे तेच रिलायन्सचे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षी एक लाख ५२ हजार कोटी रुपयांचे नवे परकी गुंतवणूकदार मिळविले आहेत. फेसबुक, गुगल यासारख्या कंपन्या या उद्योगात गुंतवणूक करीत आहेत. या दोन्ही कंपन्यांची ही उदाहरणे केवळ दाखला म्हणून. पण संघटीत क्षेत्रातील सर्वच कंपन्या अधिक मजबूत होताना दिसत आहेत, एवढा संदेश यातून मिळतो.

ग्राहक खुल्या स्पर्धेच्या बाजूने

भारतीय छोट्या व्यावसायिकांना आपण कसे सहभागी करून घेत आहोत, याची जाहिरात जसे अॅमेझॉन करते आहे, तशीच जाहिरात आता किराणा दुकानदारांना आम्ही कसे सहभागी करून घेतले आहे, याची रिलायन्स रिटेल करते आहे. याचा अर्थ या व्यवसायात मक्तेदारी प्रस्थापित करताना आम्ही त्यात अनेकांना सामावून घेत आहोत, असे या कंपन्यांना म्हणावे लागणार आहे. अर्थात, या सर्व उलाढालीचा सर्वाधिक लाभ या कंपन्यांना होणार आहे, हे उघड आहे. म्हणजे याच कंपन्या नोकऱ्या देणार आणि व्यवसायही करणार. याचा अर्थ अशा मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत ज्याचा व्यवसाय कमी होणार आहे, त्याला या कंपन्या नको आहेत, तर ज्या घरातील मुलामुलींना या कंपन्यांत काम मिळणार आहे, त्या घरात या कंपन्यांचे स्वागत आहे! शिवाय किंमतींविषयी अतिशय संवेदनशील असलेला कोट्यवधी भारतीय ग्राहक या कंपन्या देत असलेली सूट आणि सेवा पाहून या कंपन्यांचा माल खरेदी करताना दिसतो आहे.

संघटीत अर्थव्यवस्थेची अपरिहार्यता

जागतिकीकरणानंतरची तीन दशके असे सांगतात, की देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बदलली तरी व्यापारउदीम संघटीत होण्याच्या या प्रवाहात अजिबात फरक पडलेला नाही. देशात कोणत्या पक्षाचे आणि कोणत्या विचाराचे सरकार आहे, याचाही त्याच्याशी संबंध जोडता येत नाही. हा बदल चांगला की वाईट, याविषयी टोकाची मते आजही पाहायला मिळतात. हा बदल चांगला नाही, असे ज्यांना वाटते, त्यांना सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होईल, याचा मार्ग सांगावा लागेल. कारण ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यानेच भारतीय बाजारपेठ खुली करण्याची वेळ आली आहे, हे विसरता येणार नाही. खासगी कंपन्या अधिक जबाबदार कशा होतील आणि सरकारची बहुजन कल्याणाची भूमिका कशी अबाधित राहील, याची काळजी लोकशाहीच्या सर्व मर्यादा मान्य करूनही लोकशाही व्यवस्थाच घेईल, यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. व्यापारउदीम संघटीत होण्याचा हा प्रवाह जागतिक आहे आणि जगाच्या अर्थकारणाचा सर्वाधिक परिणाम सध्या आपल्या देशावर होतो आहे, याचे भान याविषयीची भूमिका ठरविताना आपल्या देशाला आणि जागरूक नागरिक या नात्याने आपणाला ठेवावेच लागणार आहे.

हेही वाचा: ‘आयपीओं’च्या लाटेतून प्रभावी मार्ग कसा काढावा?

आर्थिक सामीलीकरण हाच मार्ग

भारतात होत असलेला हा बदल आता रोखला जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याविषयीच्या शंकाकुशंकांना मनात ठेवण्यापेक्षा पुरेशी काळजी घेऊन आपणही या प्रवाहात भाग घेतला पाहिजे. तो भाग कसा घ्यायचा, हे आपण पाहू.

१) जन धन, आधार आणि मोबाईल फोनची जोडणी (जॅम) यामुळे देशातील बँकिंग वेगाने वाढत असून, व्यवहार अधिकाधिक पारदर्शी होणार आहेत. बँकिंगचे आणि क्रेडिट हिस्ट्रीचे सर्व फायदे घेतले पाहिजे, २) डिजिटल व्यवहार आणि ई कॉमर्सचा प्रवासही वेगवान होणार असल्याने त्याच्याशी संबंधित क्षेत्राशी जोडून घ्यावे, ३) रोखीवर आधारित गुंतवणुकीचे जे मार्ग होते (जमीन, सोने), ते मागे पडून नव्या गुंतवणूक मार्गांचा स्वीकार (उदा. म्युच्युअल फंड, शेअर बाजार, डिजिटल स्वरुपात सोने), ४) सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहेत, त्यामुळे सेवा क्षेत्राशी संबंधित शिक्षणाला प्राधान्य, ५) नागरिकत्व आणि सामाजिक सुरक्षिततेसंबंधीच्या नोंदी बँकिंग आणि डिजिटलच्या मार्गानेच होणार असल्याने आणि त्यांनाच मदतीचा लाभ होणार असल्याने आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, डिजिटल व्यवहार यास प्राधान्य, ६) असंघटित अर्थव्यवस्थेतील समूहांना सरकारने आर्थिक आधार देणे भाग पडणार असल्याने (उदा. पिक विमा, पेन्शन योजना, शेतकरी सन्मान योजना) अशा सरकारी योजनांचे महत्त्व मान्य करणे, ७) आपण असंघटित क्षेत्रात असलो तरी त्याचा संबंध संघटीत क्षेत्राशी कसा येईल, म्हणजे आपला समावेश बँकिंगसारख्या अधिकृत अर्थव्यवस्थेमध्ये कसा होईल, यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागणार आहे.

‘झोमॅटो’चे बाजारमूल्य काय संदेश देते?

हॉटेलमधून खाण्याच्या पदार्थांचे पार्सल ऑर्डरप्रमाणे पोचविणे आणि अनेक हॉटेलांना सल्ला देण्याचे काम हा असा किती मोठा व्यवसाय होऊ शकतो? पण ‘झोमॅटो’ने त्याची सर्व गणिते बदलून टाकली आहेत. तिचे अस्तित्व केवळ एका दशकाचे. ही कंपनी अलीकडेच भारतीय शेअर बाजारात ‘लिस्ट’ झाली. गेली काही वर्षे सतत तोट्यात असलेल्या या कंपनीच्या ‘आयपीओ’साठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. त्यामुळे बाजारातील नोंदणीच्या पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअरचा भाव रु. ७६ वरून जवळजवळ दुप्पट म्हणजे रु. १४० झाला आणि कंपनीचे बाजारमूल्य एक लाख कोटी रुपयांवर पोचले. आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनात माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व आता लपून राहिलेले नाही. त्याचे महत्त्व वाढण्याची सुरवात होण्यालाही आता किमान दोन दशके उलटून गेली आहेत. विकसित देशांनी हा बदल थोडा आधी स्वीकारला. चीननेही हा बदल स्वीकारून डिजिटल व्यवहारांवर भर दिला. चीनमध्ये ही सेवा वापरणाऱ्यांची संख्या ५० कोटींच्या, तर अमेरिकेमध्ये ती १० कोटींच्या पुढे गेली आहे. भारतात ही सेवा वापरणारे आज एक कोटीच नागरिक असले, तरी त्याच्या वाढीची शक्यता किती आहे, हे यावरून लक्षात येते. एकही मालकीचे हॉटेल नसलेल्या ‘झोमॅटो’ची केवळ अन्नपदार्थ पोचविण्याची सेवा देऊन एवढी मोठी कंपनी होऊ शकते, याला म्हणतात आर्थिक व्यवहार संघटीत होणे. जे आपण ओला, उबर यासारख्या कंपन्यांच्या बाबतीतही पाहिलेच आहे.

(लेखक अर्थव्यवस्थेचे अभ्यासक-विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

टॅग्स :economy
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top