पामतेल : चवीसाठी होऊ द्या की खर्च! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पामतेल : चवीसाठी होऊ द्या की खर्च!}
पामतेल : चवीसाठी होऊ द्या की खर्च!

पामतेल : चवीसाठी होऊ द्या की खर्च!

आपला आहार हा अनेक घटकांपासून बनतो. यात महत्त्वाचे म्हणजे तेल. कारण, तेल हे जेवणातील पदार्थांचा मूलभूत घटक बनले आहे. जेवणात तेलाचा वापर नसेल तर त्या जेवणाला चव येत नाही. पण, या चवीसाठी आपण वर्षाला साधारण २६० लाख टन तेल केवळ खाण्यात खर्च करतो. त्यात ९५ टक्के वाटा हा पामतेलाचा आहे.

प्राचीन काळापासून भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. जागतिक बँकेच्या अहवालानुसार देशातील ४३ टक्के लोकसंख्येची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. देशात सध्या केवळ ३.८ लाख हेक्टर क्षेत्रावर पाम शेती केली जाते. भारतात आंध्र प्रदेश, तेलंगण, तमिळनाडू याशिवाय मिझोराम, नागालँड, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पामची शेती केली जाते. इतर देशांच्या तुलनेत भारत देश खाण्यात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे. कारण, तेल खाण्यामध्ये भारत देश तिसऱ्या क्रमांकावर आहे. ८० च्या दशकात पाम तेलाची विक्री सुरुवातीला स्वस्त धान्याच्या दुकानातून करण्यात आली. कालांतरांनी सूर्यफूल, सोयाबिन, जवस, तीळ, भुईमूग, करडई, सरकी या तेलांचा वापर आपण जेवणामध्ये सर्रास करायला लागलो. पण, आपल्या खाण्याच्या तेलाचा वापर इतका वाढत आहे की, आताच्या घडीला आपल्याला बाहेरच्या देशातून तेलाची आयात करावी लागत आहे. दरम्यान, परदेशातून तेलाची आयात १५५ ते १६० लाख टन केली जाते. पण, विशेष बाब म्हणजे खाद्यतेलातील ९५ टक्के वाटा हा पामतेलाचा आहे.

आपल्या देशात तेलबिया लागवडीचे क्षेत्र हे केवळ अडीच कोटी हेक्टर आहे. त्यामध्ये शेंगदाणे, सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, तीळ आदी तेलबियांचा समावेश आहे. आपल्या देशात तेलबियांचा उतारा लक्षात घेतला तर सर्व बिया गाळल्यावर केवळ ८० ते ८१ लाख टन तेल मिळते. आपण आपल्या देशांतर्गत लागवड केलेल्या तेलबियांमधून केवळ २५ ते ३० टक्के तेल मिळते. दीड कोटी टन खाद्यतेल २०१९ मध्ये आपल्या देशाने परदेशातून मागवले होते. आपण यावर सर्वसाधारण ७ हजार ३०० कोटी रुपये खर्च केला होता. आता यात पण वाढ होईल. या सर्वांमध्ये पामची आवक मोठी होत आहे. एक मोठी कंपनी इंडोनेशिया आणि मलेशियामधून पाम तेल भारतात आयात करते. केंद्र सरकार भारतात होणाऱ्या एकूण विक्रीच्या ६५ टक्के आयात करते व ३५ टक्के तेल देशात उत्पादन करते. आयात केल्या जाणाऱ्या ६५ टक्के तेलात ६० टक्के पाम तेल असते. कारण, इतर तेलांमध्ये पाम तेल मिसळले जाते. तसेच पाम तेलाच्या या आयातीवर केंद्र सरकार दरवर्षी ५० हजार कोटी रुपये खर्च करते. आपल्या देशात पाम तेलाच्या किमतीत सर्वसाधारण ६० टक्के वाढ झाली असून गेल्या वर्षी पामतेलाला प्रतिकिलो ८६ रुपये दर होता. पण, यंदाच्या वर्षी १४० रुपये प्रतिकिलो या दरम्यान वाढले आहे. या किमतींकडे पाहिले तर गेल्या अकरा वर्षांतील सर्वात मोठी दरवाढ झालेली दिसून येते. मुळात पामतेल हे स्वस्त तेल म्हणून याकडे पाहिले जाते. पण, भविष्यात हे तेल महागल्याची चिन्हे मोठी दिसत आहेत. त्यासाठी पामची निर्मिती स्वतः केली तर आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

मोदी सरकारने पाम शेतीसाठी नवीन निर्णय घेतला आहे. देशामध्ये पामच्या लागवडीस पाठिंबा मिळण्यासाठी ११ हजार कोटींची योजना आखली आहे. पाम शेतीसाठी ८ हजार ८४४ कोटी रुपये केंद्र सरकार स्वतः खर्च करणार आहे. बाकीची उर्वरित रक्कम ही त्या-त्या राज्यांना पाम लागवडीसाठी उभी करावी लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार तेलफळांच्या खरेदीची रक्कम जाहीर करून त्यासाठी गेल्या पाच वर्षांतील कच्च्या पामतेलाची किंमत, या काळातील घाऊक महागाई निर्देशांक यांचा आधार घेण्यात येणार आहे. येत्या काळात भारत पाम तेलाची आयात कमी करण्यासाठी पूर्वोत्तर भारत आणि अंदमान-निकोबारमध्ये पामची शेती आणि त्या संबंधीच्या प्रक्रियेवर अधिक भर देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कृषी संशोधन परिषदेच्या अहवालात असे स्पष्ट करण्यात आले की, देशभरात २८ लाख हेक्टरवर पामवृक्षांची लागवड केली जाऊ शकते. यामधील एक लाख हेक्टर जमीन ईशान्य भारतामध्ये आहे. या परिसरातील सात राज्यांत या लागवडीसाठी पोषक परिस्थिती असून, त्याठिकाणी पामवृक्ष लागवड आणि नंतर तेल उत्पादनासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे पामवृक्ष लागवड करणाऱ्यांस अधिक हमी भाव मिळेल आणि त्या राज्यांत तेल कारखाना काढणाऱ्यास पाच कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्यात येणार आहे. या सर्व उपायांमुळे सन २०२५-२६ पर्यंत आपल्या देशातील पामतेल उत्पादन ११.५ लाख टनांपर्यंत जाऊ शकतो, असा अदांज वर्तविण्यात येत आहे. या योजनेची गती अपेक्षेइतकी राहिली तर त्यानंतरच्या पाच वर्षांत म्हणजे सन २०२९-३० पर्यंत भारतातील पामतेल उत्पादन २८ लाख टनांपर्यंत जाऊ शकेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

‘राष्ट्रीय खाद्य तेल मिशन-पाम ऑइल

- अकरा हजार कोटींची आर्थिक मदत देणार असून, यातील ८ हजार ८४४ कोटी केंद्र सरकार देणार, तर २ हजार १९६ कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

- सरकारचे २०२५ पर्यंत १० लाख हेक्टर क्षेत्रावर पाम तेलाची शेतीचे उद्दिष्ट

- भारतातील पाम तेलाचे उत्पादन येत्या १० वर्षांत २८ लाख टनांपर्यंत जाईल.

- याआधी प्रति हेक्टर १२ हजार रुपये दिले जात, आता ही रक्कम वाढवून २९ हजार रुपये केली आहे.

- जुने बगीचे पुन्हा चालू करण्यासाठी २५० रुपये प्रति वृक्ष याप्रमाणे सरकार विशेष मदत करणार

पामची शेती

पाम वृक्षाला मराठीत ‘तेल माड’ असे ओळखले जाते. त्याची उंची सुमारे ६-२४ मीटर, उपयुक्त, शोभिवंत, नारळासारखा हा सरळ वृक्ष असल्याने बहुवर्षीय पिकांपैकी सर्वात जास्त तेल उत्पादन देणारे पीक आहे. पाम हा मूळचा उष्ण कटिबंधीय, पश्चिम व मध्य आफ्रिकेतील असून तेथे तो जंगलात व समुद्रकिनारी आढळतो. इंडोनेशिया आणि मलेशियात १.३ कोटी हेक्टर जमिनीवर तेलासाठी ताडाची झाडे लावण्यात आली आहे. जगभरातील निम्मे झाडं इथे आहेत. पामचे शाखाहीन खोड भरभक्कम असून, त्यावर खोलगट वलय असते. तसेच शेंड्याकडे संयुक्त व पिसासारख्या, मोठ्या, काटेरी देठाच्या भरपूर पानांचा झुबका असतो. प्रत्येकावर ५०-६०, तलवारीसारखी लांब, टोकदार व जाड दले असतात. शेंड्यांकडे पानांबरोबरच आखूड आणि जाड फुलोरे येतात. ते एकाच वेळी ३ ते ७ असून नर-फुलोरे प्रथम व स्त्री-फुलोरे नंतर येतात. फुले एकलिंगी व एकाच झाडावर असून त्यांची संरचना सामान्यपणे पामकुलात वर्णिल्याप्रमाणे असते. आठळीयुक्त फळे अक्रोडाएवढी, पिवळी, लाल, शेंदरी किंवा काळी आणि चकचकीत, लंबगोल, टोकदार असून त्यांची साल मांसल व त्यात १-३ कठीण कवचाच्या बिया असतात. बियात पांढरा गर असतो. एक एकरात ताडाची शेती करण्यासाठी शेतकऱ्याला ५० हजार रुपये खर्च करावे लागतात.

यातही होतो वापर

जगातील एकूण उत्पन्नाच्या फक्त उद्योगांसाठी तसेच साबण उद्योगात कच्चा माल म्हणून १० टक्के पाम तेल वापरले जाते. टुथपेस्ट, व्हिटॅमिनची गोळी किंवा मेकअपच्या सामानात वापर केला जातो. इतर वनस्पती तेलापेक्षा पाम तेल स्वस्त आहे. तसेच दिवसेंदिवस या तेलाचा वापर वाढत आहे. याचा अनेक खाद्य पदार्थांत वापर करतात. त्याचबरोबर सौंदर्यप्रसाधनातही वापर केला जातो.

हवामान व जमीन

उष्ण कटिबंधातील २५०० ते ४००० मिलिमीटर पाऊस व २० ते ३३ अंश सेल्सिअस तापमान आवश्‍यक असते. कमीत कमी ५-६ तास सूर्यप्रकाश व ८० टक्के आर्द्रता असेल तर या झाडाची अतिशय उत्तम वाढ होते. एकंदरीतच उबदार हवामानात पामची वाढ चांगली होते.

पाम कुठल्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकते. तथापि, हलक्या ते मध्यम, कर्बयुक्त व पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत या झाडाची चांगली वाढ होते. पामच्या जमिनीची खोली लागवडीसाठी कमीत कमी एक मीटर असावी. क्षारपड व रेदाड जमिनीमध्ये याची लागवड करणे टाळावे.

लागवड

सर्वसाधारणपणे ताज्या व पक्व फळांपासून मिळालेल्या बिया नवीन रोपे तयार करण्यास वापरतात. बिया लागवडी अगोदर ४-५ दिवस गरम पाण्यात भिजत ठेवाव्या म्हणजे त्या लावल्यानंतर १०-१२ दिवसांत उगवतात. तसेच रोपवाटिकेमध्ये रोप तयार करून १२ ते १५ महिन्यांचे रोप लागवडीसाठी वापरणे जास्त सोयिस्कर ठरते. पामच्या लागवडीसाठी नऊ मीटर अंतरावर ०·६ बाय०·६ बाय ०·६ मीटर मापाचे खड्डे खोदून रोपांची लागवड करतात. त्यात कुजलेले शेणखत, निचऱ्यासाठी थोडी वाळू व रासायनिक खताची एक मात्रा खड्ड्यांमध्ये भरतात. पाम हे जरी कोरडवाहू, काटक फळ पीक असले तरी व्यावसायिकदृष्ट्या उत्पन्नासाठी झाडांना पुरेसे पाणी देणे गरजेचे आहे. कमी पाणी असणाऱ्या क्षेत्रात पामची लागवड करता येत नाही. वाढीच्या महत्त्वाच्या काळात एका झाडाला दोनशे लिटर पाणी आवश्यक असते. पामच्या झाडाला वर्षांतून चार वेळा म्हणजे प्रत्येक तीन महिन्यांनी समप्रमाणात खत दिली पाहिजे. तसेच लागवडीची पहिली मात्रा दिल्यानंतर खतांची दुसरी मात्रा देताना ७५-१०० किलो शेणखत आणि पाच किलो निंबोळीपेंड देणे गरजेचे आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Farmers Agitation
go to top