FIFA World Cup Politics
Esakal
शैलेश नागवेकर
विश्वकरंडक जिंकणारा संघ इतिहासात नोंदला जातो; पण खेळाला प्रतिष्ठा मिळवून देणारी गोष्ट म्हणजे क्रीडाभावना, सौजन्य आणि सभ्यता. विजयाचा हव्यास जेव्हा अशा मूल्यांवर मात करतो, तेव्हा खेळाचे मैदान नकळत रणांगणात बदलून जाते. यंदाच्या फुटबाॅल विश्वकरंडक स्पर्धेत वारंवार त्याचा प्रत्यय येत आहे. विजयाच्या उन्मादात सौजन्याची ऐशीतैशी होतेय...
स्वतःमध्ये दडलेली गुण वत्ता आणि नैसर्गिक क्षमतेला अपार मेहनत, अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण जिद्दीची जोड देत यशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचणे, तिथे आपल्या श्रेष्ठत्वाची अमिट छाप उमटवणे आणि अद्भुत असा नावलौकिक मिळवत असतानाच स्वतःसोबत आपल्या संपूर्ण प्रवासात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या लाखो-करोडो चाहत्यांनाही मनमुराद आनंद देणे, हीच एका खेळाडूसाठी खऱ्या अर्थाने यशाची परिपूर्ण व्याख्या ठरते. खेळाचे मैदान म्हणजे युद्धभूमी नव्हे; तर ती सौजन्य, कौशल्य आणि जिद्दीची कसोटी असते... एका सच्च्या खेळाडूसाठी स्वतःला अधिक सक्षम आणि सिद्ध करण्याची संधी असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेदरम्यान अनेक प्रमुख संघांमध्ये दिसणारी विजयाची प्रखर ईर्षा आणि कोणत्याही किमतीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची मानसिकता कधी कधी क्रीडाभावनेवरच प्रश्नचिन्ह उभे करते. अशी अनेक प्रश्नचिन्हे यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत उमटत आहेत; पण त्यांची उत्तरे विजयाच्या उन्मादात आणि आक्रमकतेच्या जल्लोषात हरवून गेली आहेत.