
जगभरात संघर्ष कायम राहणे, हेच शस्त्रविक्रेत्या देशांचे व्यापार धोरण आहे
रशिया युक्रेन युद्धामुळे मानवधिकारांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. युक्रेनमधल्या काही शहरांमधून माघार घ्यावी लागल्यानंतर रशियाने तिथल्या जनतेवर प्रचंड अत्याचार केल्याचं स्पष्ट झालं आहे. मारल्या गेलेल्या हजारो जणांना एकत्र जमिनीत पुरल्याचे पुरावेच मिळाले आहेत. याबद्दल रशियाविरोधात युद्ध गुन्हेगारी कायद्या अंतर्गत खटला चालू शकतो. युक्रेनच्या सामान्य जनतेवर झालेल्या अत्याचारांचा निषेधच आहे, पण युक्रेन हा युरोपीय देश असल्यानं तिथे झालेल्या अत्याचारांची जगभरात चर्चा झाली. असेच अत्याचार मध्य आशियातल्या आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होत आहेत.
टोकाच्या विचारसरणीचे हुकूमशहा, दहशतवाद निपटून काढण्याच्या नावाखाली केले गेलेले हल्ले, वांशिक वादातून दशकांपासून सुरू असलेला संघर्ष या सामान्य जनतेशी काहीही संबंध नसलेल्या वादांमुळे लक्षावधी लोकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. मानवी हक्क, मुलांचा शिक्षणाचा हक्क, महिलांची सुरक्षा, स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार, प्रगती साधण्याचा अधिकार आणि मुख्य म्हणजे शांततेत जीवन जगण्याचा अधिकार हे सगळं हिरावून घेतलं जातं आहे आणि हा प्रकार वर्षानुवर्ष सुरू आहे. पण संयुक्त राष्ट्रांमधल्या अहवालाच्या व्यतिरिक्त या अन्यायाला कुठेही वाचा फुटत नाही. श्रीमंत देश दुःखाचे चार अश्रू ढाळून पैशाच्या स्वरूपात मदतीचे तुकडे फेकतात. पण, अन्याय सहन करत आलेल्या या देशांची अवस्था ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी झाली आहे. कारण, अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला युद्धपिपासू विकसित देशच कारणीभूत आहेत. अमेरिकेच्या ‘पर्ल हार्बर’वर हल्ला करणाऱ्या जपानवर अणुबाँब पडतात, पण दहशतवाद्यांना मारण्यासाठी इराक आणि सीरियामध्ये तुफान बाँबवर्षाव करून तिथली अर्थव्यवस्था रसातळाला नेली तरी अमेरिका स्वत:ला जगाचा फौजदार समजते.
महात्मा गांधीजींचे एक वाक्य आहे - An eye for an eye makes whole world blind पण, इतिहासापासून शिकत शहाणे व्हायचेच नाही, असे ठरवले असल्याने गांधीजींच्या आणि अनेक विचारवंतांच्या शिकवणीकडे बहुतांश जगाचे दुर्लक्ष झाले आहे. मध्य आशिया आणि आफ्रिकेत शस्त्र पुरवठा करणारे देश कोणते आहेत?, त्या देशांमधल्या खाणी, तेलसाठे यावर नियंत्रण असावं म्हणून सरकार उलथवून टाकत राजकीय अस्थिरता निर्माण करणारे देश कोणते? आमच्या प्रदेशात किंवा देशात शांतता कायम रहावी, म्हणून आम्ही अण्वस्त्र साठा वाढवत आहोत, असं सांगणाऱ्या देशांची संख्या कमी नाही.
रशियानेही युक्रेनवर हल्ला करताना हेच कारण सांगितलं आहे. यासारखा विरोधाभास कुठे नसेल. मध्य आशियात किंवा आफ्रिकेत शांतता निर्माण व्हावी म्हणून संघर्ष करणाऱ्या देशांचा किंवा गटांचा शस्त्र पुरवठा आम्ही बंद पाडू, असं कोणताही विकसित देश म्हणत नाही. कारण, इतरांनी अविकसित राहण्यातच आपलं भलं आहे, ही नीती अनेक वर्षांपासून अनेक पातळ्यांवर राबविली गेली आहे. तेलसाठे असलेल्या आखाती देशांमध्ये, मध्य आशियामध्ये कायमच कशी अस्थिरता असते आणि तिथे अमेरिका-रशिया का वारंवार लक्ष घालतात? अशीच अस्थिरता उत्तर आफ्रिकेत असताना त्याकडे फारसे लक्ष का दिले जात नाही? युद्धजन्य परिस्थिती निर्माण करायची, ज्या देशावर वर्चस्व हवे आहे तिथे आपल्याला अनुकूल नसलेले सरकार अस्थिर करायचे, ते पाडायचे, त्यासाठी बंडखोरांना मदत करायची, शस्त्रे पुरवायची असाच युद्धव्यापार बडे देश करत आहेत.
अमेरिका सर्वांत मोठा 'युद्ध'वीर
आतापर्यंत एकही युद्ध आपल्या मुख्य भूमीत होऊ न दिलेला आणि तरीही जगभरातल्या बहुतांश युद्धांत प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहभाग असलेला अमेरिका हा जगातला सर्वांत मोठा शस्त्र निर्यातदार आहे. हा देश सातत्याने कोणत्या ना कोणत्या संघर्षात असतो, त्याचे कदाचित हेच कारण असेल. शांतता नाही, तर युद्ध हीच या देशाची गरज आहे. जगातील एकूण शस्त्र निर्यातीमध्ये ३९ टक्के वाटा अमेरिकेचा आहे. त्यांच्या एकूण निर्यातीत शस्त्र निर्यातीचा वाटा मोठा आहे. अमेरिकेच्या एकूण शस्त्र निर्यातीपैकी निम्मी (४७%) शस्त्रे किंवा संरक्षण साहित्य मध्य आशिया आणि आखाती देशांमध्ये जातात. जगातील सर्वांत अशांत आणि संघर्षग्रस्त भाग हाच आहे.
या प्रदेशातल्या देशांनी कायम आपल्यावर अवलंबून रहावं आणि त्याद्वारे ही बाजारपेठ आपल्या हातात रहावी, हेच अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. प्रादेशिक पातळीवर हेच उद्दिष्ट सौदी अरेबियाचे आहे. कारण आखाती देशांमध्ये अमेरिकेकडून येणाऱ्या शस्त्रांपैकी निम्मी (२४%) शस्त्रे सौदीतच येतात. सध्या सौदीच्याच नेतृत्वाखाली येमेनमध्ये हौथी बंडखोरांविरोधात संघर्ष सुरू आहे. या बंडखोरांना इराणचे पाठबळ आहे. इराणला शस्त्र पुरवठा करणारे प्रमुख देश आहेत रशिया आणि चीन. रशिया हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्र निर्यातदार देश असून एकूण जागतिक शस्त्र बाजारपेठेत त्यांचा वाटा १९ % आहे. भारत आणि चीन हे त्यांचे प्रमुख ग्राहक आहेत. शस्त्र निर्यातीत आघाडीवर असणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका आणि रशिया नंतर फ्रान्स (१०.७%), चीन (४.६%), जर्मनी (४.५%), इटली (३.१ %), ब्रिटन (२.९ %) आणि दक्षिण कोरिया (२.८%) या विकसीत क्रमांक लागतो. यातील बहुतेक देशांची शस्त्रे संघर्ष सुरू असलेल्या देशांमध्ये जातात. याशिवाय, आपल्याला इतरांपासून धोका आहे, असं वाटून ताकद वाढवण्याची गरज वाटणाऱ्या आणि नंतर ताकद वाढवण्याची स्पर्धाच लागलेल्या देशांमध्ये सर्वांत आघाडीवर भारत आहे. २०१७ ते २०२१ या काळात सर्वाधिक शस्त्र आणि संरक्षण साहित्य आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत क्रमांक एक वर आहे. जगातील एकूण शस्त्र आयातीत भारताचा वाटा ११.३% आहे. त्यानंतर सौदी अरेबिया (११%), इजिप्त (५.७%), ऑस्ट्रेलिया (५.४%), चीन (४.८%) यांचा क्रमांक आहे. या देशांना स्वतः वर हल्ला होण्याची भीती वाटते की भीती घातली जाते?
जगभरातील संघर्ष
सध्या सीरिया, येमेन, युक्रेन, इथिओपिया, नायजेरिया आणि सोमालिया या देशांमध्ये युद्ध अथवा संघर्ष सुरु आहे. अफगाणिस्तान, इराक, पाकिस्तान, लेबनॉन, इजिप्त, मेक्सिको, व्हेनेझ्युएला, लीबिया, माली, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, सुदान, म्यानमार, काँगो, श्रीलंका या देशांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. याशिवाय, इस्राईल-पॅलेस्टाइन, भारत-पाकिस्तान, भारत-चीन, तुर्कस्तान-कुर्द, दक्षिण चिनी समुद्र, उत्तर कोरिया, अमेरिका-इराण, अमेरिका-रशिया, अमेरिका-चीन, सौदी अरेबिया-इराण असे अनेक प्रादेशिक वाद आहेतच. यातील बहुतेक देशांचे अमेरिका, युरोप, रशिया अथवा चीन या बड्या देशांशी अथवा गटाशी जवळचे संबंध आहेत. जगभरात संघर्ष कायम राहणे, हेच शस्त्रविक्रेत्या देशांचे व्यापार धोरण आहे, असे सध्याचे चित्र आहे. यातून महिलांवर अत्याचार, एका पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होणे, भुकेचा प्रश्न अशा समस्यांचा जन्म होत आहे. या प्रत्येक प्रश्नावर अनेक अहवाल तयार झाले आहेत.
संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न अपुरे
आफ्रिका खंडातील अशांत देशांमध्ये संयुक्त राष्ट्रांमार्फत शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. बंडखोर गटांशी चर्चा करून आणि इतर समस्यांच्या मूळाशी जाऊन शांततेसाठी योग्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, यासाठी एकट्या संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न अपुरे आहेत. रशियाला विरोध म्हणून युक्रेनमध्ये मदतीचा प्रचंड ओघ गेला. पण गेल्या किमान १० वर्षांपासून अस्वस्थ असलेल्या आफ्रिकेमध्ये पुरेशी मदत पोहोचलेली नाही. जगभरातील संघर्षांमुळे कोट्यवधी लोक विस्थापित होत आहेत, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. स्थलांतरीतांचा देश असलेल्या अमेरिकेलाही या स्थलांतरीतांचं दु:ख समजून घेता येऊ नये, ही आश्चर्याची बाब आहे. जगातील एकूण दोन अब्ज इतकी प्रचंड लोकसंख्या सध्या संघर्षग्रस्त भागात रहात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, येमेनमध्ये दर दहा मिनीटाला एका बालकाचा मृत्यू होतो. कोट्यवधी विस्थापितांपैकी एकट्या सीरियातू विस्थापित झालेल्यांची संख्या दीड कोटी आहे.
सर्वच बडे देश शांततेचे आवाहन करत आहेत, तेच हस्तक्षेप करत आहेत आणि तेच शस्त्रविक्री करत आहेत. जगात शांतता निर्माण करण्याचा हा कोणता मार्ग या सर्वांनी निवडला आहे? भारतीय पौराणिक कथांमध्ये महाभारतातील एका प्रसंगात, कौरव आणि पांडवांमध्ये युद्धाची तीव्र इच्छा निर्माण झाली असतानाही कृष्ण त्यांना शांततेचं महत्व पटवून देण्याचा अतोनात प्रयत्न करतो. युद्धामुळे होणाऱ्या हानीपेक्षा तुमचा अहंकार, मान-अपमान मोठा नाही, हे पटवण्याचा प्रयत्न करतो. शांतता हाच विकासाचा एकमेव मार्ग आहे आणि अशी शांतता निमार्ण करण्याचं दायित्व सामर्थ्यवंतावर असतं, असं कृष्ण सांगतो. पण सूडाच्या, अपमानाच्या, सामर्थ्याच्या आणि अहंकाराच्या भावनेत वाहावत गेलेल्यांना हे महत्व पटत नाही, त्यावेळी कृष्ण म्हणतो - कदाचित तुमचा नाश घडवूनच मला पुढील पिढ्यांना शांततेचा खरा मार्ग दाखवावा लागेल.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”