अंटार्क्टिकाचे भवितव्य | Global News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंटार्क्टिकाचे भवितव्य}
अंटार्क्टिकाचे भवितव्य

अंटार्क्टिकाचे भवितव्य

जागतिक तापमानवाढीनं सजीवसृष्टीसमोर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण केलाय. एकीकडं कार्बन उत्सर्जनाला चाप लावण्यासाठी जगभरातील राष्ट्रे फक्त निर्धाराचे विडे उचलत असताना दुसरीकडं निसर्गाच्या लहरीपणामुळं होणारं नुकसान कुणीच रोखताना दिसत नाही. कार्बन काजळीनं जगातील बहुतांश देशांची वाट लावली आहे. दक्षिणेकडील अंटार्क्टिका खंडाची स्थितीही फारशी वेगळी नाही. जगाचं क्लायमेट इंजिन असणारा हा हिमप्रदेश आता मानवी मोहिमा आणि संशोधन प्रकल्पामुळं आक्रसू लागला आहे. आता या हिमखंडाची जैवसाखळीच तुटण्याची भीती व्यक्त होते आहे. अंटार्क्टिकावरील सुक्ष्मजीवांचं जग मोठं विचित्र आहे. ते आता कुठं माणसाला थोडं समजू लागलं आहे. माणसानं त्यांच्या थेट संपर्कात येणं नव्या शोधांप्रमाणं आव्हानांना देखील जन्म देऊ शकतं.

हेही वाचा: अशांत आफ्रिका

जैविकदृष्ट्या विचार केला तर अंटार्क्टिका खंड हा माणसापासून फार दूर होता, पण ही गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे. अनेक देशांचे संशोधन प्रकल्प आणि पर्यटन मोहिमांमुळं या खंडावरील माणसाची वर्दळ वाढली. सील आणि पेग्विनच्या राज्यातही मानवी पावलांचे ठसे उमटू लागले. एखाद्या अनभिज्ञ प्रदेशात माणसानं पाऊल ठेवणं हे फक्त त्याच्यापुरतंच मर्यादित नसतं. तो त्याच्या संपर्कात येणारी प्रत्येक गोष्ट पडताळून पाहत असतो. या दक्षिण ध्रुवावर पहिलं मानवी पाऊल पडलं १४ डिसेंबर १९११ साली..नॉर्वेच्या रोआल्ड अॅमुंडसेन आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी येथे मानवी विजयाची पताका रोवली. या शोधानंतर विविध देशांनी असंख्य मोहिमा आखत या खंडाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. डोक्यावरचे उपग्रह असो अथवा रडार किंवा लेसर उपकरणं.. माणसांना येथील प्रत्येक हिमनगाचा रहस्यभेद करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. काही संशोधकांनी फक्त मागील पाच वर्षांमध्ये या खंडाला भेट देणाऱ्या मालवाहू जहाजा आणि त्यावरून झेपावणाऱ्या विमानांचा अभ्यास केला असता त्यांच्या हाती धक्कादायक निष्कर्ष लागले. आतापर्यंत मानवी हस्तक्षेपापासून दूर समजला जाणारा हा प्रांत पर्यटन आणि संशोधन मोहिमांमुळे गजबजू लागल्याचं दिसून आलं. मालवाहू जहाजांच्या कटरनी येथील हिमनगांना निर्दयीपणे कापायला सुरूवात केली आहे.

हेही वाचा: सुप्रसिद्ध गट फिजिओ डॉ. अजित मापारी यांचा प्रेरणादायी प्रवास; पाहा व्हिडिओ

हिमभूमीवरील जैविक विविधता

तसं पाहता शोध मोहिमा आणि त्यामुळे निर्माण होणारा धोका मोठा असला तरीसुद्धा माणसासोबत तिथे जाणाऱ्या सुक्ष्मजीवांनी जैविक प्रक्रियेसमोर अनेक आव्हानं निर्माण केली असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. आजही अंटार्क्टिकावरील जैवसंरचना माणसाला पूर्णपणे समजलेली नाही त्यामुळे त्या खंडावर अतिहस्तक्षेप करू पाहणाऱ्या देशांना याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. हायड्रोजनपासून ऊर्जा निर्मितीचं स्वप्न माणसाला आता आता पडलं पण या खंडावरील बॅक्टेरिया मागील अनेक वर्षांपासून हवेतील हायड्रोजनपासूनच ऊर्जा निर्मिती करत असल्याचं दिसल्यानंतर संशोधकांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसला.अंटार्क्टिकाच्या पूर्व भागातील भूमीवर आढळून आलेल्या ४५० बॅक्टेरियांचा संशोधकांनी अभ्यास केला असता ते हवेतील हायड्रोजनचा ऊर्जेसारखा वापर करत असल्याचं दिसून आलं. येथील एक ग्रॅम मातीमध्ये लाखो प्रकारचे सुक्ष्मजीव आढळून येतात. सर्वसाधारपणे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वनस्पती ज्या उत्प्रेरकाचा वापर करतात त्याची निर्मिती येथील मातीत आढळून येणाऱ्या सुक्ष्मजीवांच्या मार्फत होत असल्याचं दिसून आलं. संशोधकांनी या उत्प्रेरकाला रूबीसको असं नाव दिलं आहे. हे उत्प्रेरक असणाऱ्या ९९ टक्के सुक्ष्मजीवांना प्रकाश पकडणंही अशक्य असल्याचं दिसून आलं. अंटार्क्टिकाच्या मातीमध्ये आढळून येणारे १ टक्का सुक्ष्मजीव हे मिथेनचा ऊर्जेसाठी वापर करू शकतात तर ३० टक्के जीव हे कार्बन मोनोक्सॉईड वापरत असल्याचं दिसून आलं आहे.

आता आकाशाचं काय?

या ताज्या संशोधनामुळं माणसाला आता अवकाशातील बऱ्याच गूढ गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. यामुळं परग्रहावरील सजीव सृष्टी वेध घेता येईल. अन्य ग्रहांवर अशा प्रकारचे सुक्ष्मजीव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विश्वाच्या अमर्याद पसाऱ्यामध्ये हायड्रोजन वायूचं प्रमाण अधिक आहे. परग्रहावर माणसाला वस्ती करायचीच झाली तर तिथेही हायड्रोजनचाच ऊर्जास्रोत म्हणून वापर करावा लागेल. तो कसा करायचा याचं उत्तर या हिमखंडावरील सुक्ष्मजीवांनी दिलं आहे. आतापर्यंत माणसानं परग्रहावरील सजीवसृष्टीचा वेध घेताना नेहमीच पाण्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे, पण अन्य ग्रहांवर हवेतील हायड्रोजनच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करणारे सुक्ष्मजीव आढळून आल्यास तेथील सजीवसृष्टीचा वेध घेणं अधिक सोपं होईल.

हेही वाचा: या ‘काडी’ मुळे भडकणार आणखी महागाई

सावधपणे पावलं टाकावी लागतील

जागतिक तापमानवाढीच्या समस्येनं या प्रदेशावर मोठा ताण आणला आहे. हिमनगाच्या वितळण्याचा वेग वाढल्यानं समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा धोका तर आहेच पण त्याचबरोबर तेथील जैविक साखळीही धोक्यात येऊ शकते. मानवी संपर्कात आल्यानं तेथील अनेक बॅक्टेरियांचा जगभर प्रसार होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्याचे अन्यत्र परिणाम नेमके कसे? असतील याचा आताच अंदाज व्यक्त करणं कठीण आहे पण या खंडांचं आणि एकूणच जगाचं अस्तित्व कायम ठेवायचं असेल आता सावध व्हावं लागेल. येथील हिमकड्यांना सुरक्षा कवच देण्यासाठी अंटार्क्टिक करार करण्यात आला असला तरी त्यातील तरतुदींची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ही स्थिती बदलणारी नाही. अंटार्क्टिवरून येणारे बॅक्टेरिया मानवी संपर्कात आल्यानंतर नेमके कसे वागतात? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळं सगळ्यांनाच सावधपणे पावलं टाकावी लागतील.

हेही वाचा: लॉकडाउनला करुयात नॉकडाउन

भारताचे शोधप्रकल्प

भारताच्या अंटार्क्टिकावरील शोध प्रकल्पाला १९८१मध्ये प्रारंभ झाला. आतापर्यंत आपण चाळीस मोहिमा केल्या असून तिथे तीन स्थायी संशोधन केंद्रे देखील उभारली आहेत यामध्ये दक्षिण गंगोत्री (१९८३), मैत्री (१९८८) आणि भारती (२०१२) यांचा समावेश होतो. सध्या मैत्री आणि भारती ही दोन्ही केंद्रे सक्रिय आहेत. गोव्यातील ‘नॅशनल सेंटर फॉर पोलर आणि ओशन रिसर्च’ ही संस्था या सगळ्या प्रकल्पांवर देखरेख ठेवण्याचं काम करत असते. भारतानं नुकतेच ४१ व्या शोधमोहिमेला हिरवा झेंडा दाखविला असून यातील २३ संशोधक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची तुकडी रवाना झाली आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभीपर्यंत आणखी चार तुकड्या पाठविण्याचे नियोजन आहे.

टॅग्स :penguinsAntarctica