Electric Vehicle: १८३ वर्षांपूर्वी बनले होते पहिले इलेक्ट्रिक वाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Vehicle: १८३ वर्षांपूर्वी बनले होते पहिले इलेक्ट्रिक वाहन}

Electric Vehicle: १८३ वर्षांपूर्वी बनले होते पहिले इलेक्ट्रिक वाहन

पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता कल वाढला आहे तो इलेक्ट्रिक वाहने घेण्याचा. या इलेक्ट्रिक वाहनांनाही एक इतिहास आहे. पहिले इलेक्ट्रिक वाहन तब्बल १८३ वर्षांपूर्वी बनवले गेले होते यावर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही...पण हे सत्य आहे. (History of Electric Vehicles in the World)

वाढता वाढता वाढे.....पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरांची ही गत. गेल्या काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी बघता बघता शंभरी ओलांडली. सामान्यांचे कंबरडे मोडून गेले. त्यामुळे बोलबाला व्हायला लागला तो इलेक्ट्रिक वाहनांचा (E Vehicles). हिरव्या नंबर प्लेटची इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावरुन फिरताना दिसायला लागली. त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढायला लागली आहे.

केवळ वाढते दरच नाही तर जागतिक तापमानवाढही इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यास कारणीभूत ठरली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वापरातून होणारे उत्सर्जन व त्याने होणारे प्रदुषण आणि तापमानवाढ यावरचा उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिले जाऊ लागले आहे.

विविध कंपन्यांच्या पेट्रोल-डिझेल पंपांबरोबरच आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनही उभारायला मोठ्या शहरांत सुरुवात झाली आहे. आतातर सोसायट्यांना बांधकामाचे पूर्णत्व देण्यापूर्वी चार्जिंग स्टेशन उभारण्याची अट घालण्याच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटर बरोबरच इलेक्ट्रिक सायकलीही लोकप्रियता मिळवत आहेत. विविध कंपन्या इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत उतरवत आहेत. स्कूटरची अनेक माॅडेल भारतीय बाजारपेठेत उपलब्ध झाली आहेत. पण ही अचानक झालेली सुरुवात नव्हे. याचा पाया घातला गेला तो १८३९ साली.

राॅबर्ट डेव्हिडसन या स्काॅटिश संशोधकाने १८३९ साली बॅटरीवर चालणारे एक वाहन बनवले होते. अगदी प्राथमिक अवस्थेतले हे संशोधन होते. या वाहनासाठी चार्ज न करता येणाऱ्या द्रवरुप अॅसिडच्या बॅटऱ्यांचा वापर करण्यात आला होता.

या वाहनाचा प्रदर्शनीय वापर काही काळ केला गेला. हे वाहन बनविणाऱ्या लोकांना राॅबर्ट या वाहनातून फिरवून आणत असे. इटलीचा भौतिक शास्त्रज्ञ अलेसांड्रो व्होल्टा याने सन १८०० मध्ये पहिली बॅटरी बनवली होती. तर फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ गॅस्टन प्लॅंटे याने १८५९ मध्ये पहिली रिचार्ज करता येण्याजोगी बॅटरी बनवली. या शतकात बॅटऱ्यांची अनेक रुपे जन्माला आली. या बॅटऱ्यांचा आणि इलेक्ट्रिसिटीचा वापर पुढच्या टप्प्यांत विविध कारणांसाठी केला गेला.

मात्र, राॅबर्ट डेव्हिडसनने इलेक्ट्रिक बॅटरी वापरून पहिले इलेक्ट्रिक वाहन बनवले याची नोंद इतिहासाने घेतली. त्या काळी डेव्हिडसनचे हे तंत्रज्ञान दळणवळण क्षेत्रात सरसकट वापरासाठी येऊ शकले नसले तरीही आज इलेक्ट्रिक वाहनांचे जे युग येऊ पाहते आहे याचा पाया राॅबर्ट डेव्हिडसनने घातला हे निश्चित.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top