Environment- ..हम होंगे कामयाब म्हणत कोसी नदी वाचविणाऱ्या स्त्रीशक्तीची कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसंती देवी}
स्त्रीशक्तीच्या जिद्दीची कहाणी

..हम होंगे कामयाब म्हणत कोसी नदी वाचविणाऱ्या स्त्रीशक्तीची कहाणी

प्रेरणादायी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा भारत सरकारतर्फे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. अशाच एका नारीशक्तीचा पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांचं नाव आहे बसंती देवी. २०२२ मध्ये पद्मश्रीने त्यांना गौरविण्यात आले आहे. जाणून घेऊ त्यांच्या कार्याविषयी.....

जीवनात आलेल्या समस्या, अडचणी यामुळे खचून अनेक जण आयुष्य ढकलत असतात. ‘नशिबापुढे काही चालत नाही’ असं म्हणत नैराश्‍येतील जीवन जगतात. पण काही जण असे असतात की समस्या व अडचणींनाच एक संधी समजून पुढे जात असतात. आपली स्वप्ने व संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरूच असते. मग वाटेवरचे अडथळे त्यांना दिसत नाहीत. संकल्पपूर्ती हेच लक्ष्य मानून ते मार्गक्रमण करत असतात. (Know about Basanti Devi who saved Kosi River in Uttarakhand)

अशी वेगळ्या वाटेने जाणारी अनेक माणसे (Humans आपल्यात असतात, पण त्यांच्याकडे आपले दुर्लक्ष होते. जेव्हा समाज किंवा सरकार (Government) त्यांच्या कार्याची दखल घेते तेव्हा ही माणसे सामान्य असूनही किती असामान्य काम करणारी आहेत याची प्रचिती येते. त्यांनी केलेले काम किती अवघड पण किती महत्त्वाचे व गरजेचे आहे हे लक्षात येते आणि नकळत त्यांच्यापुढे हात जोडले जातात. त्यांनी ज्या ज्या संकटांवर मात केली ते पाहिल्यानंतर आपल्यापुढे असलेल्या अडचणींना आपण उगीच मोठी संकटे मानून परिस्थितीपुढे लगेच हात टेकतो हे समजेल.


प्रेरणादायी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा भारत सरकारतर्फे (Government Of India) विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. अशाच एका नारीशक्तीचा पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांचं नाव आहे बसंती देवी. २०२२ मध्ये पद्मश्रीने (Padmashree) त्यांना गौरविण्यात आले आहे. त्या उत्तराखंडमधील आहेत. पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. यापूर्वीही त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बसंती देवी यांना लोक बसंती बहन या नावानीच ओळखतात.

बसंती देवी या उत्तराखंडमधील प्रसिद्ध समाजसेविका आहेत. त्यांनी उत्तराखंडमधील पर्यावरण संरक्षण, झाडे न नद्यांच्या रक्षणासाठी बहुमोल कार्य केले आहे. बसंती देवी कौसानी येथील लक्ष्मी आश्रमात राहतात. त्यांनी पर्यावरणाशी संबंधित अनेक वाईट प्रथा दूर करण्यासाठी महिलांना आवाहन केले. एका बाजूला त्यांनी कोसी नदीचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी महिला संघटनांच्या माध्यमातून जंगल रक्षणाची मोहीम सुरू केली. तसेच महिलांच्या बाबतीत होणाऱ्या वाईट प्रथा बंद करण्यासाठीही जागृती केली.

हेही वाचा: कोण आहेत तेजस्विनी पंडितच्या आयुष्यातल्या 'दुर्गा'

समाजसेवेची सुरुवात
बसंती देवी या मूळ पिथौरागढ येथील रहिवासी आहेत. बारा वर्षांची झाली तेव्हा त्यांचा विवाह करण्यात आला. लग्नापूर्वी त्यांचे जेवढे शिक्षण झाले तेवढेच. लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले नाही. वडिलांनी पाठिंबा दिल्यानंतर त्या परत माहेरी आल्या व पुन्हा शिक्षण सुरू केले. त्या इंटर उत्तीर्ण झाल्या. बारावीनंतर त्या गांधीवादी समाजसेविका राधा यांच्या संपर्कात आल्या व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन लक्ष्मी आश्रम राहण्याचा निर्णय घेतला. येथूनच त्यांनी समाजसेवेच्या मार्गावर चालण्याचा दिशा मिळाली. बसंती देवी यांनी अल्मोडा जिल्ह्यातील धौला देवी येथे आयोजित बालवाडी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन समाजसेवा सुरू केली. या कामात महिलांना पुढे आणून महिला संघटना तयार केल्या. २००३ मध्ये त्यांनी कोसी घाटीतल्या गावांमध्ये महिलांना संघटित करण्याचे काम सुरू केले.

महिला आत्मनिर्भरतेसाठी
बसंती देवी यांनी कौसानीपासून लोदपर्यंत पूर्ण घाटीतील सुमारे २०० गावांतील महिलांचे ग्रुप बनविले. त्यांनी महिला सशक्तीकरणावर भर देऊन २००८ पंचायतीमधील महिलांची स्थिती मजबूत करण्याचे काम केले. पंचायतींमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्यानंतर त्यांनी घरातील हिंसा व पुरुषांकडून होणाऱ्या अत्याचारापासून महिलांना मुक्त करण्याचे काम केले. २०१४ मध्ये त्यांनी ५१ गावांतील १५० महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत केली.

बसंती देवी आणि कोसी नदी
त्याकाळात कोसी नदी आटत चालली होती आणि आपलं अस्तित्वच गमावण्याच्या मार्गावर होती. त्याच वेळी त्यांनी कोसी नदी वाचविण्याचा संकल्प केला. त्यांनी महिलांना संघटित करून जंगलांचे रक्षण करण्यास सुरुवात केली. पण हे करताना त्यांनी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. बरेच प्रयत्न करून हाती निराशाच आली, पण त्यांनी आपला संकल्प सोडला नाही. शेवटी महिलांना समजाविण्यात त्यांना यश आलं. जर आपण पाणी आणि जंगल वाचवलं नाही तर कोसी घाटीतील संपन्न शेती पूर्णपणे नष्ट होईल, हे त्यांनी सर्वांना पटवून दिले. त्यानंतर पूर्ण कोसी घाटीत वृक्षतोडीवर बंदी घालण्यात आली. आणि यावर खुद्द महिलाच लक्ष ठेवून असायच्या.

पंतप्रधानांकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’ या कार्यक्रमात बसंती देवी यांच्या कार्याची प्रशंसा करून इतरांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले होते. बसंती देवी यांनी आपलं संपूर्ण जीवन संघर्ष करण्यात घालवलं. कमी वयातच त्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्या एका आश्रमात राहू लागल्या. जेथून त्यांनी नदी वाचविण्यासाठी संघर्ष केला तसेच पर्यावरण रक्षणासाठीही असाधारण योगदान दिलेले आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.

बसंती देवी यांनी खचून न जाता ज्या-ज्या संकटावर मात करून मार्गक्रमण करीत आपला संकल्प पूर्ण केला ते इतरांसाठी प्रेरणादायी आहे. एखादी गोष्ट पूर्ण करण्याचा मनात संकल्प केल्यानंतर काही माणसे झपाटलेल्यासारखे कसे काम करू शकतात हे बसंती देवी यांनी दाखवून दिले आहे. बसंती देवी यांनी ‘हम होंगे कामयाब...हम होंगे कामयाब...हम होंगे कामयाब एक दिन...हो हो मन मे हैं विश्‍वास...पुरा हैं विश्‍वास...’ या ओळी मनात ठेवल्या व आपल्या कार्यातून या ओळी त्यांनी खऱ्या करून दाखविल्या.