Taro Card: टॅरो कार्डवरून तुमचे पर्सनॅलिटी कार्ड कसे जाणून घ्याल ? | Know Your Personality Through the Taro Card | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Know Your Personality Through the Taro Card }

टॅरो कार्डवरून तुमचे पर्सनॅलिटी कार्ड कसे जाणून घ्याल ?

टॅरो कार्ड रिडींग ही भविष्य बघण्याची इजिप्तशियन पद्धती आहे. या कार्ड्स वरून आपल्याला भूतकाळाचा, वर्तमानकाळाचा आणि आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनांचा थोडक्यात अंदाज घेता येतो. करिअर, आरोग्य, बिजनेस, आर्थिक अडचणी, रिलेशनशिप या सगळ्या गोष्टींवर टॅरोच्या माध्यमातून प्रकाश टाकता येतो. याशिवाय जर तुम्हाला करिअर निवडताना नेमके कुठे जावे यात संभ्रम असेल तर टॅरो कार्ड्वरून योग्य पर्यायाची निवड करणे सोपे जाते. अशा अनेक गोष्टींचा उलगडा टॅरो कार्डच्याच्या माध्यमातून करता येतो. टॅरोच्या माध्यमातून स्वभावाचे SWOT Analisys सुद्धा करता येते. म्हणजेच स्वभावातील S - Strengths, W - Weaknesses, O - Opportunities and T - Threats जाणून घेता येतात.

आज आपण टॅरो कार्ड्सच्या (Taro Cards) माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचा साधारण अंदाज घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला तुमचे पर्सनॅलिटी कार्ड माहिती असायला हवे. तेव्हा तुमच्या जन्मतारखेवरून पर्सनॅलिटी कार्ड कसे काढायचे ते आधी जाणून घेऊयात. (Know your Personality through taro card)

सगळ्यात आधी तुमच्या संपूर्ण जन्म तारखेची बेरीज सिंगल डिजिट येईपर्यत करावी.

उदा.

१२ + ११ + १९९३ = २०१६ , २ + ० + १ + ६ = ९ म्हणून या व्यक्तीचे पर्सनॅलिटी कार्ड क्रमांक नऊ, द हेरमीट होय.

म्हणजेच जन्मतारीख , जन्म महिना आणि जन्म वर्षे या अंकांची बेरीज सिंगल डिजिट येईपर्यंत करावी. सिंगल डिजिटमध्ये येणारा आकडा त्या व्यक्तीचे पर्सनॅलिटी कार्ड असेल.

१. द मॅजिशियन

द मॅजिशियन पर्सनॅलिटी कार्ड असणाऱ्या व्यक्ती अतिशय उत्साही स्वभावाच्या असतात. यांच्याकडे कोणतेही काम करताना प्रचंड ईच्छाशक्ती असते. याशिवाय एकाच वेळी अनेक गोष्टी या व्यक्ती करू शकतात. सुप्त कलागुणांचाही प्रभाव यांच्यात दिसून येतो. कोणत्याही क्षेत्रात आपल्या उत्तम व्यवस्थापन कौशल्याने टॉपची पोजिशन मिळवतात. स्वतःला हवे ते मिळवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. कोणताही प्रश्न यांना विचारल्यास, हजरजबाबीमुळे उत्तमरीत्या व्यक्त व्हायला यांना जमते.

२. द हाय प्रीस्टेस

द हाय प्रीस्टेस पर्सनॅलिटी कार्ड असणाऱ्या व्यक्ती अतिशय शांत स्वभावाच्या असतात. उद्भवलेल्या परिस्थितीवर चिंतन करून त्यातून मार्ग काढण्याची क्षमता यांच्यात असते. अतिशय गूढता यांच्या स्वभावात आढळते. तसेच ह्या व्यक्ती मनाने हळव्या असतात. यांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घेणे अवघड असते. तसेच अनेक प्रकारचे सुप्तगुण यांच्यात आढळतात.या व्यक्तींना बसल्याजागी दुसऱ्याकडून काम करवून घेण्याची कला अवगत असते. या व्यक्तींना इतरांपुढे व्यक्त व्हायला जास्त आवडत नाही.

३. द इम्प्रेस

ज्यांचे पर्सनॅलिटी कार्ड क्रमांक दोन आहे. या क्रमांकाची पर्सनॅलिटी असणाऱ्या लोकांच्या मनात एकाचवेळी अनेक विचार येतात. स्वतंत्र विचार करण्याची पुरेपूर क्षमता यांच्यात असते. कोणत्याही गोष्टीचा इमोशनली, मनापासून विचार करतात. तसेच या व्यक्तींकडे अफाट कल्पनाशक्ती असते. कार्यरत असणाऱ्या क्षेत्रात उच्च पदावर जाण्याची अपेक्षा कायम असते. शिवाय अधिकार गाजवून इतरांकडून कामे करवून घ्यायला देखील या व्यक्तीना भरपूर आवडते. कोणत्याही परिस्थितीत यांच्या चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असते. समाजात वावरताना आपला रॉयल कारभार मिरवताना या व्यक्ती दिसतात.नम्र वाचा, प्रेमळ स्वभाव या गुणांमुळे समोरच्याला पटकन आपलेसे करून घेण्याची कला यांच्याकडे असते. तोंडावर आणि स्पष्ट बोलण्याच्या सवयीमुळे जवळच्या व्यक्ती दुरावण्याची शक्यता असते. प्रवासाची आवड शक्यतो निसर्गरम्य ठिकाणी, समुद्र किनारी फिरायला खूप आवडते.

४. द एम्परर

ज्यांचे पर्सनॅलिटी कार्ड ४ आहे.

ज्यांचे पर्सनॅलिटी कार्ड क्रमांक ४ आहे. अशा व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात आपल्या स्व- कर्तृत्वावर अधिकार प्राप्त करण्यात यशस्वी होतात. प्रत्येकवेळी दुसऱ्यांकडून काम करवरून घेताना फक्त धाक दाखवता परंतु प्रत्यक्षात मात्र सगळ्यांशी सलोख्याने वागतात. राजाप्रमाणे समाजात वावर असतो. प्रत्येकवेळी चेहऱ्यावर एक स्मित हास्य असते. कोणत्याही परिस्थितीत चेहऱ्यावरच्या हावभावावर नियंत्रण कसे ठेवावे हे या नंबरच्या पर्सनॅलिटी असणाऱ्या लोकांकडून शिकून घ्यावे. समाजात वावरताना आपला दरारा असावा अशी यांची अपेक्षा असते.

५. द हिरोफन्ट

ज्यांचे पर्सनॅलिटी कार्ड क्रमांक ५ आहे. अशा व्यक्ती अतिशय शांत स्वभावाच्या, धार्मिकतेकडे ओढा असणाऱ्या असतात. या व्यक्तींना दुसऱ्याचे उत्तम प्रकारे समुपनेशन करू शकतात. तसेच यांचा शांत आणि संयमशील स्वभाव सगळ्यांना प्रिय असतो. तसेच निर्णय घेण्याची क्षमता देखील उत्तम असते. या व्यक्ती अतिशय कॉन्शियस असतात. यांचा सिक्सथ सेन्सही खूप चांगला असतो. जबरदस्त इंट्यूनशन पॉवरमुळे एखादी घटना घडणार असेल तर त्याची कधीकधी आधीच चाहूल लागते. या व्यक्ती सतत कुठल्या ना कुठल्या विचारांत गुंतवून ठेवतात. डोक्यात विचारांची वर्दळ सुरु असते.तसेच कोणत्याही गोष्टीत समाधान मानण्याची यांची सवय असते. उच्च पदावर कार्यरत असतात. ज्ञानदान करण्याची प्रबळ इच्छा यांच्यात दिसून येते.

६. द लव्हर्स कार्ड

ज्यांचे पर्सनॅलिटी कार्ड क्रमांक सहा आहे. अशा व्यक्ती अतिशय प्रेमळ स्वभावाच्या असतात. या व्यक्तीना नात्यात कायम ट्रान्स्परन्सी ठेवायला आवडते. परिस्थिती कुठलीही असो या व्यक्ती अतिशय भावनिक होऊन विचार करतात. कोणत्याही क्षेत्रात, स्वतःला झोकून देऊन काम करण्याची सवय असते. त्यातून मिळणाऱ्या यशाचा आनंद यांच्यासाठी खूप वेगळा असतो. तसेच समोरच्याला आपल्या प्रेमाने, मधुर बोलण्याने आपलेसे करणाऱ्या असतात.

विविध प्रकारचे परफ्युम वापरण्याची यांना भारी हौस असते. याशिवाय यांना व्यापारातही अधिक रुची असते. बिझनेस माईंडेड असतात. शक्यतो, कोणताही व्यवसाय करताना पार्टनरशिपमध्ये करायला प्राधान्य देतात. तसेच दुसऱ्याच्या मदतीला कायम धावून जाणारा त्यांचा स्वभाव असतो. ज्ञानाने परिपूर्ण, स्वतःच्या कौशल्याचा खुबीने वापर करण्याचा प्रयत्न असतो.

७. द चॅरीअट

ज्या व्यक्तींचे पर्सनॅलिटी कार्ड क्रमांक सात आहे. त्या व्यक्ती उत्तम व्यवस्थापक असतात. स्वतःची कामे स्वतः करण्याकडे यांचा कल असतो. मनात आणलेली गोष्ट, ठरवलेली गोष्ट नेटाने पुढे नेण्याची त्यांच्यात धमक असते. तसेच ठरवलेली गोष्ट नेटाने पुढे नेण्यासाठी या व्यक्ती कायम प्रयत्नशील असतात. या व्यक्तींच्या डोक्यात विचारांचे वादळ कायम घोंगावत असते. तसेच, विचार अगदी स्पष्ट असतात. तसेच ऑल्वेज रेडी टू गो पर्सनॅलिटी असे यांच्या स्वव्हवाचे वर्णन करता येईल. तसेच या व्यक्तींच्या मनात काय चालले आहे हे ओळखणे अतिशय कठीण असते.

या व्यक्तींना इतरांनी कितीही सल्ले देण्याचा प्रयत्न केला. तरीही आपल्या मानाप्रमाणेच वागतात. तसेच मोकळेपणाने बोलण्यापेक्षा, आपले विचार मनातच ठेवणे अधिक पसंत करतात. या व्यक्तींना, घरात राहण्यापेक्षा, घराच्या बाहेर जास्त रमणाऱ्या असतात. आयुष्यातील संकटांना तोंड देण्यास सदैव सक्षम असतात. यांच्याकडे, उत्तम नेतृत्व करण्याची क्षमता असते.

८. द स्ट्रेंथ

ज्या व्यक्तींचे पर्सनॅलिटी कार्ड क्रमांक आठ आहे. त्या व्यक्ती अगदी नावाप्रमाणेच, स्ट्रेंथफुल असतात. कोणत्याही परिस्थितीत न्यायाला धरून वागणाऱ्या असतात. तसेच चारचौघांत वावरताना, निभिडपणे वावरतात. तसेच या व्यक्तींना समाजात आपला दरारा, कायम ठेवायला आवडतो. तसेच या व्यक्ती वरवर दिसायला अतिशय शांत दिसतात. परंतु, यांच्या मनात प्रचंड भावनांचा कल्लोळ असतो. असतीशय संयमी स्वभाच्या असतात. या व्यक्तींची एनर्जी लेवल कायम जास्त असते. कोणतेही काम करताना, यांना नशिबाची, उत्तम साथ लाभते. उत्तम प्रकारचे व्यवस्थापन कौशल्य या व्यक्तींना अवगत असते.

सकारात्मक विचार करण्याच्या पद्धतीमुळे, अवघड परिस्थितीतही, तग धरून राहण्याची क्षमता यांच्याकडे असते. निसर्गाच्या ठिकाणी फिरायला याना खूप आवडते तसेच या व्यक्तींना मुक्या प्राण्यांविषयी प्रचंड आत्मीयता असते.

९. द हेरमीट

ज्या व्यक्तींचे पर्सनॅलिटी कार्ड क्रमांक नऊ आहे. अशा व्यक्ती स्वभावाने अतिशय, शांत, संयमी असतात. एकांतप्रिय असतात. आपल्या भावना दुसऱ्या व्यक्तींसमोर, मांडायला यांना कायम संकोच वाटतो. या व्यक्ती इतरांशी नाते जोडताना, त्यांचा चेहरा बघून नाहीतर मन बघून नातं जोडतात आणि मनापासून जपतातही. तसेच समाजात वावरताना, अतंर्मुख होऊन जगणाऱ्या, स्वतःच्या आचरणाकडे लक्ष देऊन जगणाऱ्या असतात.

एक उत्तम उपदेशक, टीम लीडर म्हणून छान काम सांभाळू शकतात. माणसांच्या गर्दीत असूनही, स्वतःला कायम एकटे समजतात. स्वतःला अलिप्त ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. यांच्याकडे ज्ञानाचा प्रचंड मोठा साठा असतो. यांच्यात टिचिंग क्वालिटी खच्चून भरलेली असते. मदतीसाठी सदैव तत्पर असणारा यांच्या स्वभावामुळे, समाजात प्रसिद्ध होतात. संघटन कौशल्याची उत्तम जाण असते. परंतु अतिस्पष्ट बोलल्यामुळे, यांच्यापासून माणसे दुरावतात.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”