श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंब गेल्या ८० वर्षांपासून सत्ता गाजवत आहेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

srilanka}

श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंब गेल्या ८० वर्षांपासून सत्ता गाजवत आहेत

मंजूषा कुलकर्णी

देशातील सत्तेच्या नाड्या ८० वर्षांपासून राजपक्षे कुटुंबाकडे
सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाणाऱ्या लंकेची आर्थिक स्थित सध्या ढासळली आहे. पेट्रोल डिझेलची टंचाई, जीवनावश्‍यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या किमती, औषधांची वाणवा अशा कचाट्यात श्रीलंकेचे नागरिक सापडले आहेत. जगण्यासाठी रोजच संघर्ष करवा लागत आहे. लंकेवर अशी स्थिती ओढविण्यास कमकुवत प्रशासन जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे अप्रत्यक्षरीत्या राजपक्षे कुटुंबाकडे बोट दाखविण्यात येत आहे

राजकारणात १९३१ पासून राजपक्षेंचा प्रवेश
श्रीलंकेची फेब्रुवारी १९४८ मध्ये इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता होऊन स्वातंत्र्य मिळाले. त्याआधीपासूनच राजपक्षे कुटुंबाचा राजकारणात प्रवेश झाला होता. १९३१ मध्ये डाव्या विचारांचे नेते डॉन मॅथ्यू राजपक्षे (डीएम राजपक्षे) यांनी सत्तेत सहभाग घेतला होता. ते सिलोन प्रांतीय परिषदेचे सदस्य होते. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच ‘डीएम’ यांचे मे १९४५ मध्ये निधन झाले. यानंतर त्यांचे लहान भाऊ डॉन एल्विन राजपक्षे (डीए राजपक्षे) हे राजकारणात आले. महिंदा राजपक्षे यांचे ते वडील आहेत. श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डीए राजपक्षे यांनी १९५१ मध्ये एका श्रीमंत घराण्याशी संबंध असणाऱ्या एसडब्ल्यूआरडी भंडानायके यांना बरोबर घेत श्रीलंका फ्रिडम पक्षाची (एसएफएलपी) स्थापना केली.पंतप्रधान विजयानंदा दहनायके यांच्या मंत्रिमंडळात ते कृषी मंत्री होते.

महिंदा राजपक्षेंच्या आयुष्यातील वळण
वडील व काकांपासून सुरू झालेला सत्तेची परंपरा महिंदा राजपक्षे यांनी प्रामुख्याने पुढे सुरु ठेवली. त्यांना विशेष साथ दिली ती गोटाबाया यांनी. हे दोघेही दीर्घकाळ ‘एसएफएलपी’मध्येच होते. या पक्षावर २००५ पर्यंत भंडारनायके कुटुंबाचाही प्रभाव होता. त्याला महिंदा यांनी कोणतेही आव्हान दिले नाही. एसडब्लूआरडी भंडारनायके यांच्या कन्या चंद्रिका कुमारतुंगा या १९९४ ते २००५ पर्यंत श्रीलंकेच्या अध्यक्षा होत्या. पक्षाची सूत्रेही त्यांच्यात हाती होती. कुमारतुंगा यांच्या मंत्रिमंडळात महिंदा मंत्री होते. अर्थ, शहर विकास, न्याय अशी अनेक मंत्रालये त्यांनी सांभाळला. चंद्रिका कुमारतुंगा यांनी २००५मध्ये अध्यक्षपदासह राजकारणातून निवृत्ती स्वीकारली, तेव्हापासून महिंदा यांचे आयुष्य बदलले. त्यावेळी महिंदा हे संरक्षण मंत्री होते. एप्रिल २००४ ते नोव्हेंबर २००५ या काळासाठी त्यांची हंगामी पंतप्रधान म्हणून अध्यक्षांनी त्यांची निवड केली. यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘एसएफएलपी’ने महिंदा यांनाच उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. त्यावेळी त्यांचे भाऊ गोटाबाया देशाचे संरक्षण सचिव होते. याच काळात ‘लिबरेशन टाइगर ऑफ तमीळ ईलम’ (एलटीटीई) या नक्षलवादी संघटनेने श्रीलंकेच्या सैन्यावर विजय मिळविला होता. महिंदा राजपक्षे यांनी याचा लाभ उठवीत राजकारणात पाय रोवले. निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळही त्यांच्या पदरात पडला. या प्रकारे ते २०१५ पर्यंत अध्यक्ष पदावर टिकून होते. देशाबरोबर पक्षाची कमानही त्यांच्या हाती आली होती.

सत्तेचा लोभ
सत्तेच्या सर्वोच्च स्थानी येताच महिंदा राजपक्षे यांनी श्रीलंकेची सत्ता स्वतःकडेच ठेवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. देशात अनेक चढ-उतार आले तरी राजकारणावर वर्चस्व व स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्यात त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. कधी माजी अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांच्यासारख्या समर्थकांच्या मदतीने तर कधी कुटुंबातील सदस्यांमार्फत (गोटाबाया) मार्फत महिंदा यांनी सत्ता काबूत ठेवली. श्रीलंका पीपल्स फ्रंट’ नावाने त्यांनी २०१६मध्ये नवा पक्ष स्थापन केला होता. अध्यक्षपदासारखे सर्वोच्च पदानंतरही त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. सध्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे जनतेत असंतोष असूनही व देशाच्या सर्व २६ मंत्र्यांनी राजीनामा दिला तरी महिंदा व गोटाबाया त्यांच्या पदावर कायम आहेत.

राजपक्षे कुटुंबीयांचे मंत्रिमंडळ
वर्तमान काळाचा विचार करायचा झाला तर राजपक्षे परिवारातील सर्वांत प्रभावशाली राजकारण्यांमध्ये महिंदा राजपक्षे यांचे नाव घेतले जाते. lत्यांना देशातील अराजकाची स्थिती पाहता राजीनामा द्यावा लागलाय. ऑगस्ट २०२० मध्ये झालेली सार्वत्रिक निवडणूक जिंकल्यानंतर ते पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. राजपक्षे घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्व ते करत होते. याआधीच्या दोन पिढ्यांमध्ये त्यांचे वडील व काका हे राजकारणात सक्रिय होते. श्रीलंकेचे विद्यमान अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे हे महिंदा राजपक्षे यांचे कनिष्ठ बंधू आहेत. गोटाबाया हे पूर्वी संरक्षण मंत्री होते अन आता देशाचे राष्ट्रापती आहेत. नोव्हेंबर २०१९मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर ते या पदापर्यंत पोहोचले. गोटाबाया यांचे लहान भाऊ बासिल राजपक्षे काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचे अर्थमंत्री होते. आर्थिक संकटामुळे देशात अशांतता निर्माण झाल्याने अध्यक्ष असलेल्या मोठ्या भावाने मंत्री असलेल्या लहान भावाला पदच्युत केले. तरीही श्रीलंकेतील सरकारमधील ११ महत्त्वाची मंत्रालये राजपक्षे कुटुंबाच्या सदस्यांकडेच आहेत. अन्य नातेवाईक अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या कार्यालयांत रुजू आहेत.

भ्रष्टाचारी कारकीर्द, चीनची जवळीक
राजपक्षे यांचा २००५ नंतरचा संपूर्ण कार्यकाळ आणि कुटुंबाभोवती वाद निर्माण झालेला आहे. याच काळात महिंदा यांचे मूळ गाव असलेल्या हंबनटोटा येथील बंदर चीनला भाडेपट्ट्यावर देण्यात आले. श्रीलंकेतील अंतर्गत रस्ते व रेल्वे मार्ग निर्मितीची अनेक कंत्राटेही चीनी कंपन्यांना देण्यात आली आहेत. या सर्व कामांत प्रचंड भ्रष्टाचार व अंदाधुंद कारभार असल्याच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’च्या अहवालानुसार २०१२मध्ये रस्ते बांधणीच्या एका कामामध्ये ३०० कोटी रुपयांचा (श्रीलंकेच्या चलनात) भ्रष्टाचार उघडकीस आला होता. मे २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री मंगला समरवीरा यांना चार देशांमधून एक गुप्त अहवाल मिळाला होता. राजपक्षे कुटुंबाच्यावतीने विदेशी बँकांत सुमारे २४ हजार कोटी रुपयांपेक्षा (श्रीलंकेच्या चलनात) जास्त काळे धन जमा केल्याचे अहवालात म्हटले होते.

चौथी पिढीही सत्तेच्या दिशेने
केवळ राजकीयच नव्हे तर राजनैतिक पदांवरही राजपक्षे कुटुंबाच्या सदस्यांनी कब्जा केला आहे. महिंदा यांची सख्खी बहीण प्रीती यांचे पती ललित पी. चंद्रदासा हे सध्या अमेरिकेत महावाणिज्यदूत आहे. महिंदा यांची मानलेली बहीण कमला यांचे पुत्र जलिय विक्रमसूर्या यांनी अमेरिकेत श्रीलंकेचे राजदूत म्हणून काम केलेले आहे. एवढेच नाही तर या कुटुंबातील चौथी पिढीलाही सत्तेवर आणण्यासाठी तयार केले जात आहे. पंतप्रधान महिंदा यांचे एक पुत्र नमल हे मागील आठवड्यापर्यंत युवक कल्याण व क्रीडा मंत्री होते. महिंदा यांचे सर्वांत मोठे बंधू चमल राजपक्षे (गृह राज्य व राष्ट्रीय संरक्षण मंत्री) यांचे चिरंजीव शशेंद्र कृषी मंत्री होते. पण जनतेतील असंतोषामुळे राजपक्षे यांना मंत्र्यांसह राजीनामा द्यावा लागला आहे. महिंद यांचे दुसरे पुत्र योशिता पंतप्रधानांच्या खासगी कर्मचारी पथकाचे प्रमुख आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top