Monalisa Story: एका चोरीमुळे मोनालिसा जगप्रसिद्ध बनली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monalisa Story: एका चोरीमुळे मोनालिसा जगप्रसिद्ध बनली!}
मोनालिसाच्या चित्राची ही अनोखी कहाणी

Monalisa Story: एका चोरीमुळे मोनालिसा जगप्रसिद्ध बनली!

लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालीयन चित्रकाराने सन १५०३ ते सन १५१९ दरम्यान हे पोर्ट्रेट साकारले. १५ वे व १६ वे शतक हे फ्रान्समधल्या सांस्कृतिक बदलाचे मानले जाते. याच शतकांमध्ये फ्रान्सने आधुनिकतेकडे वाटचाल सुरु केली होती आणि नंतर त्याचे लोण साऱ्या युरोपात पसरले. फ्रेंच बँकर फ्रान्सिस्को डेल गिओकोंडो याची पत्नी लिसा हिच्यावरुन विंचीने मोनालिसा साकारली असे बोलले जाते. पण याबद्दलचे उलट-सुलट मतप्रवाह अजूनही आहेत. लिओनार्दो द विंचीने आपल्या आईचा कॅटेरिनाचा या पेंटिंगसाठी माॅडेल म्हणून वापर केला असाही एक मतप्रवाह आहे. (Story of Monalisa Paiting Story Theft)

मोनालिसा (Monalisa) मूळची कोण याचा शोध लावण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत. २१ व्या शतकात डिएनए चाचण्यांसारखे शास्त्र विकसित झाले. लिसा गिओकोंडोच्या कबरीतील अवशेषांतून डीएनएचे (DNA) नमुने घेऊन त्यावरुन तिचा चेहेरा साकारण्यासारखे प्रयोगही मोनालिसाच्या शोधाच्या नादात लावले गेले. पण त्यातूनही काही निष्कर्ष निघाले नाहीत.

आॅईल पेंट मध्ये लाकडावर साकारलेले मोनालिसाचे या पोर्ट्रेट (Portrait) जगातले सर्वाधिक पाहिले गेलेले, बोलले गेलेले, लिहिले गेलेले आणि काव्य केले गेलेल पेंटिंग मानले जाते. मोनालिसाच्या या पोर्ट्रेटची किंमतच करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. हे पेंटिंग 'द लूर्व्ह'च्या दृष्टीने सर्वात मौल्यवान आहे. या पेंटिंगची जागा दुसरे कुठलेच पेंटिंग घेऊ शकणार नाही, ही संग्रहालयाच्या संचालकांची ठाम भावना आहे. त्यामुळेच हे संग्रहालय या पेंटिंगचा महागडा विमा उतरविण्याऐवजी त्याच्या सुरक्षेवर जास्त खर्च करते.

मोनालिसाचे हास्य हे या पोर्ट्रेटचे महत्त्वाचे अंग. तिच्या हास्याचा अर्थ अजूनही उलगडलेला नाही. कुणाच्या मते हे हास्य छद्मी आहे. तर कुणाला त्यात दुःखाचा भाव दिसतो. कुणाला व्यथा दिसते तर कुणाला आनंद. पण खुद्द विंचीनेही या मोनालिसाच्या हास्याबद्दल काही भाष्य केलेले नाही. त्यामुळे अजूनही मोनालिसाच्या हास्याबद्दल तर्कवितर्क लढवले जातात.

१५१९ मध्ये लिओनार्दो द विंचीचा मृत्यू झाला. त्या आधी तो फ्रेंच राजा फ्रान्सिस १ च्या आश्रयाला होता. विंचीच्या मृत्यूनंतर राजाने हे पोर्ट्रेट ताब्यात घेऊन स्वतःच्या राजवाड्यात लावले. १७८७ ते १७९९ हा फ्रेंच राज्यक्रांतीचा काळ. या क्रांतीच्या काळात बंडखोरांनी फ्रान्सच्या राजांच्या राजवाड्यातील मालमत्ता ही सार्वजनिक असल्याते घोषित केले. त्यानंतर मोनालिसा काही काळ नेपोलिअनच्या शयनकक्षाच्या भिंतीवर विराजमान झाली होती. १९ व्या शतकात मोनालिसाच्या पोर्ट्रेटने 'द लूर्व्ह' म्युझियममध्ये जागा पटकावली.

मोनालिसाचे आकर्षण त्या काळीही लोकांना होते. पण आज मोनालिसाला २० व्या शतकात जी प्रसिद्धी मिळाली तेवढी त्याकाळी मिळाली नव्हती. त्याला कारण ठरली ती मोनालिसाची चोरी. व्हिनकेंझो पेरुगिया हा इटालियन कर्मचारी त्यावेळी 'द लूर्व्ह'मध्ये काम करायचा. त्यानेच मोनालिसाच्या पेंटिंगसाठी काचेची पेटी बनवली होती. मात्र, या संग्रहालयात ठेवलेल्या इटलीच्या कलाकृती त्याला अस्वस्थ करायच्या.

२१ आॅगस्ट १९११ रोजी व्हिनकेंझोने कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या दरवाजातून संग्रहालयात गेला. संग्रहालयाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्याने पांढरा पायघोळ झगा घातला होता. मोनालिसाचे पेंटिंग ठेवलेल्या कक्षाकडे जाऊन त्याने पेंटिंग अडकवलेल्या खुंट्या सोडवल्या आणि मोनालिसाचे पेंटिंग आपल्या झग्यात गुंडाळले आणि तो शांतपणे बाहेर पडला.

मोनालिसाची चोरी हा द लूर्व्हच्या संचालकांसाठी जबर धक्का होता. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी कसून शोध घ्यायला सुरुवात केली. प्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासोवरही संशय घेण्यात आला. त्याचीही चौकशी करण्यात आली. अमेरिकन उद्योजक व अब्जाधीश जे. पी. माॅर्गन याने ही चोरी घडवून आणली असाही संशय व्यक्त केला गेला.

या घटनेमुळे साऱ्या फ्रान्समध्ये खळबळ माजली. कलासक्त फ्रेंच नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे 'द लूर्व्ह'ला भेट देऊन ज्या ठिकाणी मोनालिसाचे पेंटिंग टांगले होते, ती जागा पाहून जायला लागले. जगभरातल्या वृत्तपत्रांचे मथळे मोनालिसाच्या चोरीच्या घटनेच्या बातम्यांनी रंगायला लागले. एका रात्रीत या चोरीमुळे मोनालिसा जगप्रसिद्ध बनली होती.

मोनालिसाची चोरी करणाऱ्या व्हिनकेंझोने पुढची दोन वर्षे सुरुवातीला पॅरिसमधल्या आपल्या अपार्टमेंटमध्ये आणि नंतर इटलीतील फ्लाॅरेन्स शहरातल्या आपल्या घरात मोनालिसाला दडवून ठेवले होते. हे पेंटिंग तो इटलीला घेऊन कसा गेला हे देखिल एक कोडेच आहे.

दोन वर्षांनंतर १९१३ मध्ये त्याने व्हिनकेंझोने मोठ्या रकमेच्या बदल्यात हे पेंटिंग फ्लोरेन्समधल्या एका आर्ट गॅलरीला विकण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्याला अटक झाली. मात्र, हे पेंटिंग इटलीमध्ये परत आणल्याबद्दल त्याला देशभक्त ठरवून फक्त सात महिन्यांची शिक्षा झाली.

अखेर मोनालिसा 'द लूर्व्ह'मध्ये परतून पुन्हा आपल्या जागी विराजमान झाली होती. जगभरातले पर्यटक, कलासक्त व्यक्ती पुन्हा एकदा मोनालिसाच्या हास्याचा शोध लावायला मोकळे झाले.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :artMuseumDrawingmonalisa
go to top