Russia-Ukraine युद्धामुळे जगात अन्नधान्य टंचाईचं संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगावर घोंघावतेय अन्नधान्य तुटवड्याचे भीषण संकट}
युद्धाचे परिणाम सारे जग भोगते आहे

Russia-Ukraine युद्धामुळे जगावर अन्नधान्य टंचाईचं संकट

शियाने गेल्या २४ फेबुवारी २०२२ रोजी युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले अन् साऱ्या युक्रेनमध्ये हाहाकार उडाला. या युद्धाची व्याप्ती केवळ दोन देशांपुरतीच मर्यादित राहिली असली तरी त्याची झळ मात्र साऱ्या जगाला आता चांगलीच बसू लागलेली आहे. युद्धाची ठिणगी पडून आता तब्बल दोन महिने उलटून गेली तरी युद्ध थांबायची लक्षणे दिसत नसल्याने जागतिक नेत्यांची धास्ती वाढली आहे. (World is facing food and food grains scarcity)

हे युद्ध (War) संपण्याची सध्या तरी काही चिन्हे दिसत नाहीत. सुरवातीला युद्धाचा फटका केवळ युक्रेनला (Ukraine) बसला. पण या लांबत चाललेल्या युद्धाचे चटके आता तुमच्या - आमच्या घरापर्यंत जाणवू लागले आहेत. युद्धाचे परिणाम आता थेट स्वयंपाकघरापर्यत पोहोचले आहेत. हे युद्ध आणखी लांबल्यास जगभर अन्नधान्याची (Food Grains) भीषण टंचाई होण्याचे संकट निर्माण होण्याचा धोका आता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

रशियाचे (Russia) अध्यक्ष व्ह्लादिमीर पुतीन यांच्या दृष्टीने युक्रेनला वेळीच आवर घालणे म्हणजे नाटो देशांना रोखण्यासारखे आहे. पुतीन यांच्यासाठी हा फार महत्वाचा गंभीर विषय आहे. त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्याची रशियाची मानसिक तयारी झालेली आहे. तर युक्रेनच्या पाठीशी सारा युरोप व अमेरिका उभी आहे. त्यामुळे हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसेनाशी झाली आहेत.

अमेरिकेने (USA) थेट युद्धात भाग घेतला नाही हे एका अर्थी बरेच झाले. अन्यथा तिसऱ्या महायुद्धाचाच भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली असती आणि सारे जग त्यात भरडले गेले असते. पण रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादत अमेरिकने आपण युक्रेनच्या पाठीशी असल्याचे जगाला सांगितले आहे. त्याचीच री ब्रिटन, फ्रान्स या युरोपिय देशांनी ओढली. त्यामुळे रसियाची अर्थव्यवस्था धोक्यात येत आहे यात शंका नाही. कारण यामुळे रशियाची आमि अर्थातच युक्रेनची निर्यातही ठप्प झाली आहे. मात्र याचे चटके साऱ्या जगाला आता बसू लागले आहेत.

भारताच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास गेल्या दोन महिन्यात देशात खाद्यतेलाचे भाव सातत्याने वाढू लागले आहेत. विशेषतः सूर्यफूल तसेच पाम तेलाच्या किंमती तब्बल ४२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. अजूनही त्या वाढण्याची भिती वर्तविली जाते. गेल्या काही दिवसांत आपल्याकडे या तेलांच्या भावात किलोमागे सरासरी २५ ते ३५ रुपयांची वाढ झालेली आहे. सध्या तरी ते कमी होण्याची शक्यता दिसत नाही.

त्यामुळे गरीबांचे जगणे मुश्कील झाले आहे. मध्यमवर्गीयांच्या महिन्याचे बजेट कोलमडत आहे तर गरीबांची व्यथा विचारायलाच नको. भारताप्रमाणेच तुर्कस्तान, बांगलादेश तसेच अनेक आखाती देशांत खाद्यतेल महाग झाले आहे. कारण जगातील निम्मे सूर्यफूल तेल उत्पादन रशिया व युक्रेनमध्येच होते. यावरून या संकटाची तीव्रता लक्षात येते.

इंधनाचे दरही वाढण्याचा धोका
खाद्यतेलाबरोबरच इंधनाचे दरही वाढण्याचा धोका आहेच. युद्ध सुरु झाल्यापासूनच्या दोन महिन्यांच्या काळात जगभर इंधनाच्या किंमतीत वीस टक्के वाठ झालेली आहे. इंधनाचे दर वाढले, की त्याचे परिणाम सर्व जिन्नसाच्या दरवाढीवर होतात.

कोरोनामुळे आधीच अन्नधान्याच्या जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली होती. त्यामुळे अन्नधान्याच्या किंमती वाढल्या होत्या. कोरोनातून जग आता कुठे सावरत असतानाच आता या युद्धाची भर पडली आहे. रशियन रॉकेटच्या हल्ल्यामुळे ‘ब्लॅक सी' मधील बंदरात अनेक मालवाहू जहाजे अडकून पडली आहेत. त्यामुळे वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. रशियावरील निर्बंध व युक्रेनमधून होणारी निर्यात ठप्प झाल्याने या देशांवर अवलंबून असलेले अनेक देश धास्तावले आहेत. आणखी युद्ध लांबले तर युक्रेनमधील गव्हाच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे.

ब्रेडच्या किंमती कडाडल्या
रशिया व युक्रेनमध्ये जगातील गव्हापैकी तीस टक्के गव्हाचे उत्पादन होते. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या अनेक देशांत ब्रेडच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत. प्रामुख्याने आखाती देश तसेच हंगेरी, इंडोनेशिया, बांगलादेशला मोठा फटका बसत आहे. इंडोनेशियाने रेशनवरील धान्य व तेलपुरवठा थांबविला आहे. अर्जेटिना, मंगोलिया, कजाकिस्तान, इजिप्त, इराण, तर्की, बांगलादेश गव्हासाठी केवळ या दोन देशांवरच अवलंबून आहेत.

सध्याच्या आकडेवारीनुसार जगातील जवळपास ५० देश गव्हासाठी रशिया, युक्रेनवर अवलंबून आहेत. तर ज्यांच्याकडे जास्त गहू आहे त्यांनी आपली निर्यात थांबविली आहे. भारताला मात्र या परिस्थितीचा थोडा लाभ होत आहे. कारण भारताकडे गव्हाचा अतिरिक्त साठा आहे. त्यामुळे भारतातील गव्हाला सध्या अनेक देशांकडून मागणी वाढली आहे. युक्रेन व रशियाकडून गहू आयात करणारे देश इजिप्तसारखा देश ८० टक्के गहू या दोन देशांकडून घेतो. आता ही आयात थांबल्याने तेथे भीषण टंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईमुळे इराकमध्ये लोक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार अनेक शहरात निदर्शने सुरु झाली आहेत. लेबानन, थायलंडमध्येही लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत.

केवळ अन्न-धान्यच नव्हे तर खत उत्पादनात हे दोन्ही देश आघाडीवर आहेत. जगातील १५ टक्के खते केवळ रशियात बनतात. तसेच पोटॅश, फॉस्फेट येथेच बनते. त्यामुळे येत्या काळात खताच्या पुरवठ्यावर पर्यायाने अन्नधान्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.
येत्या काही महिन्यात जगभरातील महागाई तब्बल ५ ते ६ टक्क्यांनी वाढेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. हा आकडा कमी वाटत असला तरी आतापर्यंतच्या जगातील उच्चांकी भाववाढ असल्याचे मानले जाते. याआधी २००८ च्या जागतिक मंदीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढली होती. त्यानंतर जगाने असा अनुभव घेतलेला नाही.

Edited By - Amit Golwalkar