Science Behind Tickle: बोट लाविन तिथे गुदगुल्या...पण स्वतःच्या स्वतःला नाही..... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोट लाविन तिथे गुदगुल्या...पण स्वतःच्या स्वतःला नाही.....}
स्वतःच्या स्वतःला का होत नाहीत गुदगुल्या

बोट लाविन तिथे गुदगुल्या...पण स्वतःच्या स्वतःला नाही.....

`बोट लाविन तेथे गुदगुल्या` असा एक वाक््प्रचार आहे. गंमत म्हणून एकमेकांशी खेळताना गुदगुल्या केल्या की त्याची अनुभूती येते. प्रत्येकाने असा अनुभव कधी ना कधी घेतलेला असेल. अशा गुदगुल्यांची मजा येते, मात्र अति गुदगुल्या सहन करायची वेळ आली की त्या खेळाचा समारोप रडण्यातही होऊ शकतो. पण स्वतःच्या हाताने स्वतःला गुदगुल्या होत नाहीत. असे का होते? याचा शोध बर्लिनमधील हुमबोल्ड विद्यापीठातील संशोधकांनी घेतला. गुदगुल्या केल्यानंतरच्या प्रतिक्रिया या मेंदूतील विशिष्ट भागात होणाऱ्या बदलांमुळे होत असतात. दुसऱ्याने स्पर्श केल्यानंतरच ही प्रतिक्षिप्त क्रिया घडते, असे संशोधकांना आढळून आले. (Know about tickle and the science behind it)

बर्लिनमधील संशोधकांनी उंदरांवर याबाबतचे प्रयोग केले. मानवाच्या मेंदूची रचना आणि उंदराच्या मेंदूच्या रचनेत बरेच साम्य असल्याने त्यांनी उंदराची निवड केली. माणसाला गुदगुल्या केल्यानंतर जशी प्रतिक्रिया मिळते, तशीच प्रतिक्रिया उंदरांना गुदगुल्या (Tickle) केल्यानंतर संशोधकांना मिळाली. शरीराला दुसऱ्याने स्पर्श केल्याचा संदेश मेंदूतील `सोमॅटसेन्ससी सिस्टिम`पर्यंत पोहोचतो व प्रतिक्रिया दिली जाते. उंदरांना (Mice( जेव्हा गुदगुल्या केल्या गेल्या तेव्हा हीच प्रक्रिया झाली व उंदरांनीही प्रतिक्रिया दिली व आवाजही काढला.

कारण काय?

स्वतःच स्वतःला स्पर्श केला तर शरीर प्रतिक्रिया देत नाही. गुदगुदगुल्यांच्या बाबतीत हीच गोष्ट लागू होते. स्वतःच्या स्पर्शाची सवय असते, त्यामुळे मेंदूकडून (Brain) तीव्र प्रतिक्रियेचा संदेश दिला जात नाही. स्वतःच्या स्पर्शाने कोणतेही नुकसान होणार नाही, याची जाणीव मेंदूला असते,असे मत ह्युमरकेअर इन्स्टिट्यूटमधील संशोधक मिशेल तित्से यांचे मत आहे.

थोडी भीती अन् रोमांच

गुदगुल्या केल्यानंतर नेमके होते काय याचे वर्णन `नेरफेनकित्सेल` या शब्दाने केले जाते. याचा अर्थ थोडी भीती आणि थोडा रोमांच असा होतो. गुदगुल्या केल्यानंतर मेंदूमध्ये थोडा आनंद आणि हवीहवीशी किंचित वेदना निर्माण होते. त्याचा ताण मेंदूवर येतो आणि अनियंत्रित हास्याच्या रुपाने तो बाहेर पडतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. गुदगुल्या आपल्याला काही प्रमाणात हव्याहव्याशा वाटत्यात पण त्याची मर्यादा ओलांडली की त्रासही होतो. उंदरांच्या बाबतीत हीच क्रिया घडत असल्याचे संशोधकांना आढळून आले.

आपण हसतो का?

गुदगुल्या कधीकधी धोक्याचा संदेश असतो. आपल्या शरारातील ज्या भागात न्यूरॉन असतात (उदा. पोट, काखा, जांघा ) तो भाग गुदगुल्यांच्या दृष्टीने जास्त संवेदनशील असतो. गुदगुल्या आपल्या शरीराला हानी पोहोचवणार नाहीत, असे जेव्हा शरीराला वाटते, तेव्हा मेंदूवरील तणाव हास्याच्या रुपाने बाहेर येतो. हसण्यामुळे तणावही कमी होतो व आरोग्यही सुधारते.

काही जणांना गुदगुल्यांच्या केवळ कल्पनेनेही हसायला येते.कधी कधी गुदगुल्या करण्याआधीच हसण्याला सुरवात होते. उंदरांना शरीराच्या ज्या भागात गुदगुल्या झाल्या, तो भाग गुदगुल्या करण्यापूर्वी काही क्षण सक्रिय होत असल्याचे संशोधकांना आढळून आले. `लुटुपुटूच्या लढाईत`ही मेंदूला अशाच प्रकारचे संदेश पोहचवले जातात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

माणसाचे शरीरही वेगवेगळ्या भागात गुदगुल्यांसाठी संवेदनशील असते. त्यामुळे जर कोणी तुम्हाला गुदगुल्या करायला आले, तर तुमचे हास्य जरा रोखून धरा, म्हणजे समोरच्याला कळणार नाही की तुम्हाला सर्वांत जास्त गुदगुल्या कोणत्या भागांत होतात !

Edited By - Amit Golwalkar

टॅग्स :science