सणासुदीला मिठाई घेताय; तर सावधान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FSSAI}

‘बेस्ट बिफोर डेट’कडेही असू द्या लक्ष; प्रशासनाचीही डोळेझाक

सणासुदीला मिठाई घेताय; तर सावधान!

प्रत्येक सण साजरा करताना मिठाईने (Sweet) तोंड गोड करण्याची आपल्याकडे प्रथा आहे; मात्र मिठाई दुकानदारांच्या बेफिकीरीमुळे विषबाधेला (Poisoning) सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिठाई विक्रेते (SweetSeller) ‘बेस्ट बिफोर डेट’ (मिठाई चांगली असल्याची अंतिम तारीख) (Best Before Date) लावण्याबाबत त्यांच्यात उदासीनता दिसून येत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासना(FDA)चीही डोळेझाक होताना दिसत आहे. (be careful While Buying Sweet and know how to file Complaint if adulteration Found)

अन्न व औषध प्रशासनाने मागील वर्षापासून शहरातील मिठाई विक्रेत्यांना एक्स्पायरी डेट’ लावण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र शहरातील बहुतांश विक्रेत्यांनी या नियमाला केराची टोपली दाखविली आहे. दिवाळी, नाताळ, नववर्षाच्या स्वागतासाठी सर्रास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी केली जाते. नोकरी करणाऱ्या महिलांना घरी फराळ तयार करायला वेळच मिळत नसल्याने तयार फराळ किंवा मिठाई खरेदी करण्यावर भर दिला जातो. अगदी एखाद्या अपवादात्मक कुटुंबात गोडविरहीत सण साजरा केला जात असेल. असे असताना मिठाई खरेदी करताना ती किती दिवसांपर्यंत वापरता येईल, याची कोणतीच माहिती मिठाईच्या पाकिटावर नमूद केलेली नसते. त्यामुळे अधिकचा नफा मिळविण्याच्या उद्देशाने काही विक्रेत्यांकडून मिठाईत भेसळही केली जावू शकते. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मागील वर्षापासून दुकानातून मिठाईची विक्री करताना मिठाईच्या ट्रेसमोर ती मिठाई किती दिवस चांगली राहू शकते, याची तारीख टाकणे अनिवार्य केले आहे. असे असताना बहुतांशी मिठाईच्या दुकानांमध्ये अशी माहिती न लावता सर्रास विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अर्थात, अनेक नागरिकांना अन्न व औषध प्रशासनाने सुचविलेल्या या नियमावलीची माहितीच नसल्याचे दिसून आले. पुणे शहरातील चितळे मिठाईवाले, काका हलवाई, घोडके पेढेवाले, मिश्रा पेढेवाले यांसह मिठाईच्या अनेक दुकानांत एक्पाइरी डेटच्या पाट्या दिसून आल्या, उपनगरांतील कित्येक मिठाईवाल्यांच्या दुकानात अशा प्रकारच्या पाट्या न लावल्याचे दिसून आले. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने नियमीत तपासणी होत नसल्याने दुकानदारांची बेफिकीरी वाढली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते अशा वेळी काही व्यापारी अधिकचा नफा मिळविण्याच्या उद्देशाने भेसळीसारख्या गैरमार्गाचा वापर करून भरपूर नफा कमावण्याचा प्रयत्न करतात. त्याला अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही उत्पादने तयार होण्याच्या ठिकाणी छापे टाकून तपासणीसाठी नमुने घ्यावेत. त्यामध्ये भेसळ झाली असल्याचे आढळल्यास अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.


खाद्य व्यावसायिकांना खाण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी रीतसर परवानगी घेणे, नोंदणी करणे गरजेचे असते. भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण FSSAI) ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे. खाद्य पदार्थांची विक्री करण्यापूर्वी त्याची परवानगी घेणे केंद्र सरकारने सक्तीचे केले आहे. अशा परवानगीशिवाय कोणतेही खाद्यपदार्थ विकणे, उत्पादन करणे, साठवून ठेवणे बेकायदा असून, अशी कृती करणाऱ्यांवर गुन्हेही दाखल होऊ शकतात. यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरण (FSSAI) खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना देऊ शकतात.

तक्रार कुठे करायची


सणासुदीच्या काळात दुग्धजन्य पदार्थ, खवा, पनीर, मिठाईला भरघोस मागणी असते. मात्र अनेक दिवसांची शिळी मिठाई खाल्ल्याने ग्राहकांना उलट्या-जुलाब, विषबाधाच्या घटना घडल्या आहेत. काही प्रसंगी ताबडतोब परिणाम दिसतात, तर काही काळानंतर परिणाम दिसू लागतात, क्वचितप्रसंगी मृत्यूही ओढवल्याच्या घटना घडलेल्या आहेत. भेसळीची शंका आल्यास
ग्राहक व व्यावसायिकांनी अधिक माहितीसाठी आपल्या भागातील अन्ननिरीक्षकांशी संपर्क साधावा किंवा राज्य सरकारच्या आरोग्य प्रयोगशाळांशी संपर्क साधावा या प्रयोगशाळा पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, अमरावती, नाशिक, कोकण भवन, जळगाव व सांगली येथे आहेत. शिवाय स्थानिक प्राथमिक आरोग्यकेंद्रे किंवा जिल्हा परिषदांचे आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्फतही संपर्क साधता येईल. प्रशासनाच्या २४ तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ किंवा पुणे कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक ०२०-२५८८२८८२ यांवर संपर्क साधावा.

उत्पादनाची तारीख टाकण्यास टाळाटाळ


पेढे, बर्फी, लाडू, गुलाबजामून, बालूशाही, काजूकतली, बंगाली मिठाई, रसगुल्ले या पदार्थांची एक्स्पायरी डेट अर्थात सर्वोत्तम वापराच्या तारखेचा फलक त्या वस्तूंपुढे लावणे अन्न व औषध प्रशासनाने बंधनकारक केले असताना बहुतांश विक्रेते या नियमावलीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मिठाईच्या उत्पादनाची तारीख टाकणे विक्रेत्यांना बंधनकारक नसले तरी विक्रेते स्वेच्छेने ग्राहकांना ही माहिती देऊ शकतात. मात्र केलेल्या नियमांचीच ज्याठिकाणी अंमलबजावणी होताना दिसत नाही, तेथे स्वेच्छेने माहिती विक्रेत्यांकडून कितपत मिळू शकेल, हा प्रश्‍न अनुत्तरीच आहे.

मिठाई खरेदी करताना घ्यावयाची काळजी

  • उत्पादनाची तारीख पाहणे

  • सर्वोत्तम वापराच्या तारखेची नोंद घेणे

  • परवाना क्रमांक पाहणे

  • घटकांची सूची, पौष्टिक माहिती तपासणे

  • माव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो चोवीस तासांच्या आत करावे

  • चवीत फरक जाणवल्यास मिठाई नष्ट करावी.

विक्रेत्यांनी घ्यावयाची काळजी

  • कच्चे अन्नपदार्थ, खवा नोंदणीधारक व्यावसायिकाकडून खरेदी करावे.

  • अन्नपदार्थांची साठवणूक स्वच्छ ठिकाणी करावी

  • पदार्थांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी

  • पदार्थ बनविताना शुद्ध पाण्याचा वापर करावा

  • मिठाईच्या ट्रेच्या दर्शनी भागावर वापरण्यायोग्य दिनांक टाकावा

  • सरकारने सुचविलेल्या कोरानाविषयक नियमावलींचे पालन करावे.

  • स्वतःसह कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे

भेसळ करणाऱ्यांवर कोणती कारवाई


केंद्र सरकारने ‘अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा - १९५४’ अमलात आणला आहे. १९५५ पासून या कायद्यातील त्रुटी कमी करून त्याची सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्यात आली. आरोग्याला हानिकारक अशा भेसळीबाबत न्यायालयात खटले दाखल करण्याची तरतूद या कायद्यात आहे. नवीन कायद्यात अन्न निरीक्षकऐवजी अन्न सुरक्षा अधिकारी असे नमुने घेणाऱ्या व संस्थांची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला संबोधले जाते, तसेच या अधिकाऱ्याकडून १० लाखांपर्यंत दंडदेखील ठोठाविण्यात येतो.

विषबाधेने दोन सख्या बहिणींचा मृत्यू


मिठाई खाल्याने त्यातून झालेल्या विषबाधेमुळे दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना मरवडे (ता. मंगळवेढा, सोलापूर) येथे २४ डिसेंबर रोजी घडली. आबासाहेब चव्हाण यांनी आपल्या कुटुंबासाठी मंगळवेढा येथून श्रीखंड, बासुंदी, पनीर व रबडी आणली होती. चव्हाण कुटुंबातील सर्वांनी हे पदार्थ खाल्ले होते. हे अन्नपदार्थ खाल्यानंतर सर्वांनाच त्रास जाणवू लागल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यानच भक्ती आबासाहेब चव्हाण (वय ६) व नम्रता आबासाहेब चव्हाण या दोन चिमुकल्या मुलींची मृत्यू झाला. व्यापाऱ्याने केलेल्या भेसळीमुळेच या चिमुकल्या मुलींना आपला जीव गमवावा लागल्याने प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा अशा स्वरुपाचा घटना या नियमीत घडत राहतील, यात तिळमात्र शंका नाही!


''विक्रेत्याने मिठाई चांगली असल्याची अंतिम तारीख लावण्याच्या नियमाची आम्हाला अद्याप माहिती नव्हती. शिवाय तक्रार कोठे करायची याचीही माहिती नसल्याने कधी याबाबत विचारच केला नाही. ''

- दिलीप लोणकर, ग्राहक