मराठी डॉक्टरांच्या हातात वैद्यकीय पर्यटनाचे सुकाणू | Premium-Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी डॉक्टरांच्या हातात वैद्यकीय पर्यटनाचे सुकाणू}

जगातील सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा हमखास मिळणारे देशातील अग्रगण्य राज्य म्हणजे महाराष्ट्र. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत परवडणारी तसेच, सहजासहजी उपलब्ध होणारी आरोग्य व्यवस्था हे महाराष्ट्राचं बलस्थान होत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात देशातील वैद्यकीय पर्यटनाचे सुकाणू मराठी डॉक्टरांच्या हातात असेल, हे निश्चित!

मराठी डॉक्टरांच्या हातात वैद्यकीय पर्यटनाचे सुकाणू

पर्यटन हा शब्द आपल्या सगळ्यांच्या कानावर लहानपणापासून सतत पडत असतो. बहुसंख्य जण आपल्या जवळच्या गडकोटांवर पर्यटनासाठी जातही असतात. आंबा, फोंडा, आंबोली या घाटमाथ्यावरून कोकणाचं सौदर्य आपल्यापैकी कित्तेकांनी अनुभवतो. कोकणात उतरून अरबी समुद्राच्या लाटा अंगावर घेत डुंबण्याचा आनंदही घेतो.

धार्मिक ठिकाणे, तीर्थस्थळांवर जातो. महाराष्ट्राचा कुलदैवत जेजुराचा खंडेराया असो, करवीर निवासिनी महालक्ष्मी, पंढरपूरला विठ्ठल, शिर्डीचे साईबाबा अशी मंदिरांपासून नांदेडच्या गुरुद्वारापर्यंत असंख्य ठिकाणी लक्ष्यावधी भावीक मनोभावे एकत्र येत असता. किंवा पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीमध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित केला जातो. या चार दिवसांमध्ये हजारो संगीतप्रेमी राज्याच्या कानाकोपऱयातून पुण्यात येतात. या आणि अशा शेकडो वेगवेगळ्या कारणांनी आपण आपल्या घरापासून लांब अंतरावर प्रवास करून, दुसऱया ठिकाणी रहाण्याच्या घटनेला पर्यटन म्हणतात. अशी ढोबळ पर्यटनाची व्याख्या करता येते.

आपल्या या प्रवासामागचा नेमका उद्देश काय, या प्रश्नाच्या उत्तरातून पर्यटनाचे प्रकार पुढे येतात. त्यात निसर्ग, धार्मिक, कृषी, एतिहासिक, सागरी अशा वेगवेगळ्या प्रकारातून पर्यटनाचे वैविध्यपूर्ण पैलू समोर येतात. पर्यटनामुळे त्या भागातील तरुणांच्या हाताला काम मिळते. नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात. उद्योग वाढतात. वाहन चालक, गाईड, हॉटेल्स यांची मागणी वाढते. त्यामुळे त्या पर्यटन स्थळाच्या परिसरातील अर्थचक्राला गती मिळते. वैद्यकीय पर्यटन हा असाच गेल्या दशकाच्या मध्यापासून सुरू झालेला पर्यटनाचा नवीन प्रकार आहे.

हेही वाचा: दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’

वैद्यकीय पर्यटन म्हणजे काय?

गावातील एखाद्या आजारी माणसाला सुरवातीला आपण आपल्या ओखळीच्या डॉक्टरांकडे दाखवतो. त्या डॉक्टरांपासून उपचाराची सुरवात होते. गावातील डॉक्टरांच्या उपचारातून रुग्णाला बरे वाटत नाही, तेव्हा ते तालुक्याची वाट दाखवतात. तेथून गरज पडल्यास तालुक्यातील डॉक्टर रुग्णाला जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयात पाठवतात. पण, रुग्णाचा आजार गंभीर असल्याने, त्यात गुंतागुंत होण्याचा धोका वाटतल्याने जिल्ह्यातील डॉक्टर मोठ्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा रुग्णाला घेऊन जाण्याचा सल्ला नातेवाइकांना देतात. त्या प्रमाणे रुग्ण महानगरातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. त्याच्यावर उपचारासाठी रुग्णाबरोबर आठ-दहा दिवस नातेवाइक रहातात. उपचारानंतर रुग्ण खडखडीत बरा होऊन, तो परत घरी येतो. ही जी प्रक्रिया आपण स्थानिक पातळीवर अनुभवतो तीच ज्या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर घडते. त्याला ढोबळ मानाने वैद्यकीय पर्यटन म्हटले जाते.

इंडिया हेल्थकेअर डेस्टिनेशन

जगभरात भारत हे वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र होत आहे. याचं सगळ्यांत महत्त्वाचं पहिलं कारण, म्हणजे भारतात मिळणारे सर्वोत्कृष्ठ वैद्यकीय उपचार. त्यासाठी अत्यावश्यक असलेली दर्जेदार आरोग्य व्यवस्था आपल्या देशात मिळते. त्यामुळे मध्य-पूर्व आशिया, इराण, इराक, कुवे, सैदी अरेबिया, ओमान, बांगलादेश, संयुक्त अरब अमीरात अशा देशांमधून प्रामुख्याने रुग्ण उपचारांसाठी भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये येतात. अमेरिका आणि इंग्लंड येथून खास उपचारांसाठी, प्रसूतीसाठी भारतात येणाऱया अनिवासी भारतीयांचे प्रमाण गेल्या दहा वर्षांमध्ये सातत्याने वाढत आहे. दंतोपचारासाठीही अमेरिकेतील काही अनिवासी भारतीय नियोजित सुटी काढून भारतात येतात. त्या मागचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर. जागतिक पातळीवर अग्रगण्य डॉक्टर देशात आहेत. जगातील मोजक्या देशांमध्येच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होते. त्यापैकी भारत हे देश आहे. आपल्या शेजारच्या पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब आहे. मात्र, तेथे एकही हृदय प्रत्यारोपण करणारा तज्ज्ञ नाही. या वरूनच आपल्या देशातील वैद्यकीय तज्ज्ञांची गुणवत्त अधोरेखित होते.

दुसरे म्हणजे, वैद्यकीय सुविधा. देशात रुग्णालयांचे दर्जा निश्चित करणारे `अँक्रिडिटेशन सिस्टम` आहे. वैद्यकीय पर्यटनासाठी सगळ्यांत महत्वाच मानलं जात ते ‘जॉइंट कमिशन इंटरनॅशनल’ (जेसीसी) या संस्थेचे प्रमाणपत्र. रुग्णालयाची वैद्यकीय सेवा आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे असल्याचं हे प्रमाणपत्र असतं. असे प्रमाणपत्र मिळवणारे देशातील 35 रुग्णालये भारतात आहेत. तसेच, ‘नॅशनल अँक्रिडीटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँण्ड हेल्थकेअर पोव्हाडर्स’ (एनएबीएच) या राष्ट्रीय पातळीवर संस्थेने प्रमाणीत केलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेचा एक निश्चित निकष असतो. ती एक प्रकारची व्यवस्था असते. त्यातून एकप्रकारे सर्वोत्तम रुग्णसेवेची खात्री मिळते. अशी देशभरामध्ये 729 रुग्णालये आहेत.

प्रशिक्षित मनुष्यबळ हे तिसरे कारण आहे, ज्यामुळे देशातील वैद्यकीय पर्यटन वाढत आहे. उपचार किंवा शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ डॉक्टरांबरोबरच प्रयोगशाळा तंत्रज्ञापासून ते रुग्णाची शुश्रूषा करणाऱया डॉक्टरांपर्यंत प्रत्येक आरोग्य सेवकांने योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. त्याबाबचे प्रमाणपत्र त्याच्याकडे असावे लागते. अशा प्रशिक्षित मनुष्यबळामध्ये भारत आघाडी घेत आहे.

तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित मनुष्यबळ किंवा पायाभूत सुविधा यासाठीच परदेशातून रुग्ण उपचारांसाठी भारतात येतो का, असा प्रश्न तुमच्या मनाला पडला असते. तर त्याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. त्या वेळी चौथं कारण पुढे येते, ते म्हणजे कमी खर्चातील उपचार. परवडणाऱया किंमतीत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा, हे भारतीय वैद्यकीय पर्यटनाचे वेगळेपण आहे. कर्करोग, अस्थिविकार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, स्थुलता कमी करण्याचे उपचार अशांसाठी इतर देशांमध्ये लक्षावधी अमेरिकन डॉलर्समध्ये खर्च येतो. उदा. कॅलिफोर्नियामध्ये गुडघ्याचे आणि खुब्याच्या शस्त्रक्रियेसाठी मिळून सुमारे 25 लाख रुपये खर्च येतो. हीच शस्त्रक्रिया, तितक्याच तज्ज्ञ डॉक्टरांकडून, त्याच पद्धतीने भारतात केल्यास साधारणतः सहा लाख रुपयांपर्यंत खर्च जातो. यावरून रोगनिदान आणि उपचार भारतात 60 ते 90 टक्के कमी खर्चात होते. त्यामुळे भारत हे मेडिकल टुरिझमची डेस्टिनेशन होत आहे. थायलंड आणि सिंगापूर ही मेडिकल टुरिझममधील प्रतिस्पर्धी आहेत.

महाराष्ट्राला संधी

मुंबई, दिल्ली, बंगळुर आणि चेन्नई या चार महानगरांमधील रुग्णालयांमध्ये परदेशी नगरिक मोठ्या संख्येने उपचारांसाठी दाखल होतात. जवळपास 70 टक्के परदेशी रुग्ण या चार ठिकाणी जातात. मात्र, महाराष्ट्रातील विशेषतः पुणे, नाशिक आणि नागपूरमधील डॉक्टरांना आणि रुग्णालयांसाठी वैद्यकीय पर्यटनाची संधी निर्माण होत आहे. अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टरांची टिम, प्रशिक्षित मनुष्यबळ, आधुनिक सुविधा येथे आहेत. तसेच, आता विमानांची ‘कनेक्टिव्हिटी’ या भागात वाढत आहे. त्याचा थेट परिणाम वैद्यकीय पर्यटनाला गती मिळण्यावर होईल. तमिळनाडू आणि दिल्लीच्या तुलनेत राज्यातील या शहरांमधील वैद्यकीय उपचारांचा खर्च खूप कमी येतो.

देशातील ‘एनएबीएच’ प्रमाणित रुग्णालयांची संख्या 729 आहे. त्यापैकी 78 (11 टक्के) रुग्णालये एकट्या महाराष्ट्रातील आहेत. त्या पाठोपाठ कर्नाटकचा (64) आणि पंजाबचा (60) क्रमांक लागतो.

राज्यात ‘एनएबीएच’ प्रमाणपत्र मिळालेली 64 टक्के (50) रुग्णालये एकट्या पुण्या-मुंबईत आहेत. त्यामुळे भविष्यातील वैद्यकीय पर्यटनाचा मोठे केंद्र म्हणून ही दोन्ही ‘जुळी शहरे’ विकसीत होतील. या दोन्ही शहरांमधील दळण-वळणाच्या सुविधा सातत्याने वाढत आहेत. त्यातूनही वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळेल.

पुण्यातील काही मोठी रुग्णालये आणि काही मोजक्या स्पेशालिटी रुग्णालयांमधून गेल्या पंधरा वर्षांपासून वैद्यकीय पर्यटन सुरू आहे. त्या रुग्णालयांनी त्यासाठी स्वतंत्र शाखा सुरू केल्या आहेत. त्याचा सातत्याने विस्तार होत आहे. मध्य पूर्वेतील काही देशांच्या सरकारशी या रुग्णालयांनी समन्वयक करार केले आहेत. त्या माध्यमातून तेथील रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात.

देशात वैद्यकीय पर्यटनाचा व्यवसाय दरवर्षी 20 ते 25 टक्क्यांनी वाढत आहे. जगात सर्वाधिक वेगाने वाढणारे हे क्षेत्र असल्याचा विश्वास अर्थतज्ज्ञ व्यक्त करतात. त्याचे नेतृत्त्व करण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली आहे, हे निश्चित!

हेही वाचा: कोष्टी साप खातात...!

कोरोनाचा फटका

राज्यात 9 मार्च 2020 पासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. त्याचा थेट फटका वैद्यकीय पर्यटनाला बसला आहे. पुण्यात आखातामधून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरातील काही रुग्णालयांनी तेथील देशांशी वैद्यकीय उपचारांचासाठी समन्वय करार देखिल केले आहेत. तेथून रुग्ण उपचारांसाठी पुण्यात येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या रुग्णांचे पुण्यात उपचारासांठी येण्याचे प्रमाण वेगाने कमी झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय पर्यटन पाच टक्क्यांपर्यंत कमी झाले असल्याचे निरीक्षण रुग्णालयांनी नोंदविले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top