तुम्ही एकटे नाही, एक काम केलं तर! वाचून सांगा पटतंय का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Happy and satisfactory }
तुम्ही एकटे नाही, एक काम केलं तर! वाचून सांगा पटतंय का?

तुम्ही एकटे नाही, एक काम केलं तर! वाचून सांगा पटतंय का?

‘काय हो सासूबाई, तुम्हाला कशी या चित्रपटाबद्दल एवढी माहिती आणि चित्रपटांबद्दल एवढी आवड हो?’ सीमाच्या या प्रश्‍नाचे मालतीबाईंना अजिबात आश्‍चर्य वाटले नाही.
‘अगं कसं आहे, ’ म्हणत मालतीबाई सांगू लागल्या, ‘आम्ही काही तुमच्यासारख्या नोकरदार महिला नव्हतो. गृहिणी होतो. आपल्या घराच्या स्वामिनी. अगं हे ऑफिसला आणि मुलं शाळेत गेली की आम्ही वाड्यातील महिला शक्‍य असेल तर मॅटिनी किंवा दुपारच्या शोला जायचो..’
सासूबाईंचे उत्तर ऐकून सीमा मात्र चाट पडली. आश्चर्यचकित होण्याची वेळ सीमावर आली होती. तिने सहज विचार केला, आपण नोकरदार असून कधी चित्रपट पाहण्याचा विचार केला नाही आणि विचार केला तर वेळ मिळत नाही. साधं आवडतं नाटक पाहण्यासाठी तीनदा तिकीट काढता-काढता ऐनवेळी प्लॅन बदलावा लागला. घरासाठी पुरेसा पैसा कमावणाऱ्या, नोकरदार महिला असे मानाचे बिरूद मिरविणाऱ्या आपण सुखी की वेळेची अनोखी गट्टी जमवीत वाड्यातील मैत्रिणींना घेऊन चित्रपटाला जाणाऱ्या सासूबाई समाधानी. एका मुलीची आई असलेली सीमा लग्नापूर्वीही नोकरी करत होती. आपण आपल्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभे असावे, अशा विचारांमुळे तिने लग्नानंतर नोकरी करण्याचा निर्णय कायम ठेवला. अर्थात सासरच्या मंडळींनीही तिला ठामपणे पाठिंबा दिला. मालतीबाई तिला घरात मदत करायच्या, मात्र तरीही स्वत:ला मनाप्रमाणे जगता येत नसल्याची खंत सीमाला सहजच चाटून गेली. सकाळी उठल्याबरोबर मुलीच्या शाळेची तयारी करण्यात वेळ कसा निघून जातो, हे सीमाला समजतही नव्हते. ती शाळेला गेल्यावर स्वतःची ऑफिसला जायची तयारी. ऑफिसमधून घरी आल्यावर सायंकाळच्या स्वयंपाकाची थोडीफार जबाबदारी आणि त्याबरोबर मुलीचा अभ्यास घेण्यात तिची सायंकाळ निघून जायची आणि परत उद्याच्या तयारीची धांदल. आठवड्याच्या सुटीच्या दिवशी नवऱ्याबरोबर शॉपिंगला जाण्याचा विचार केला तरी आधी घरात आठवडाभरासाठी काय लागणार याची भली मोठी यादी तयार होत. त्यातून वेळ मिळाला तर स्वतःसाठी शॉपिंग करायची.

हेही वाचा: 1985 च्या निवडणुकीत शिवसेनेचा केवळ एक आमदार निवडून आला होता

सीमाच्या मनातील घालमेल एव्हाना मालतीबाईंच्या लक्षात आलेली. ‘अगं, कुटुंबासाठी जगण्यात आनंद आणि समाधान आहेच, परंतु आपल्यालाही भावना आहेत. नवरा, मुलगी यांच्याबरोबर कधीतरी स्वतःसाठीही वेळ काढावा लागतो. तो मिळत नसतो.’ या सासूबाईंच्या शब्दांनी सीमा भानावर आली. आता आपणही चक्क सुटी टाकून आवडतं नाटक पाहायला जायचं हा निर्धार करत. सासूबाईंचे आभार मानत स्वयंपाक घरात कामासाठी उत्साहाने शिरली. मुळात प्रश्न असा असतो की, विवाहानंतर महिलांच्या सुखाच्या आणि पर्यायाने दुखाःच्या संकल्पनाच बदलून जातात. त्यांचे संपूर्ण आयुष्य नवरा, सासू-सासरे, मुलं आणि सासरच्या मंडळींभोवतीच फिरत असते. त्यामध्ये आपणही एक व्यक्ती आहोत, याचा त्यांना पार विसर पडलेला असतो. पाल्यांचं सगळं काही करण्यात आयुष्याचा मोठा काळ निघून जातो. नंतर पाल्य मोठे होऊन आपापल्या नोकरी-व्यवसायात गर्क होतात. आपल्या संसारात रमून जातात आणि मग पालकांच्या जगण्यात मोठी पोकळी निर्माण होते. अशा वेळी आपलं पालकत्व केवळ आपण जन्म दिलेल्या मुलांपुरतंच मर्यादित न ठेवता त्याचं क्षितिज आपण विस्तारू शकतो. वेगवेगळी विधायक कामं करून. त्यातून रिकामपणही सत्कारणी लागू शकतं आणि काही विधायक कार्य केल्याचं समाधानही मिळू शकतं.

आता अनुराधाचे उदाहरण पाहूयात. अनुराधाची दोन्ही मुलं लहानपणापासून अभ्यासात कधीच मागं नव्हती. मोठा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला. त्याला कंपनीतर्फे अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. गेली दहा वर्षं तो तिकडंच आहे. पाच वर्षांपूर्वी त्याचं लग्न करून दिलं. त्यांना आता तीन वर्षांचा मुलगा आहे. आम्ही अधूनमधून अनुराधा त्याच्याकडे जात असते. अनुराधाची मुलगी आमची मुलगी आर्किटेक्‍ट झालीये. ती लग्नानंतर दिल्लीला असते. जावई आणि ती तिथं मोठ्या कंपनीत नोकरी करतात. तिच्याकडंसुद्धा अनुराधा आणि तिचे पती अधूनमधून जात असतात. अर्थात दोघांच्याही नोकऱ्यांची वेळ साधारण दहा तासांची आणि घर ते ऑफिस आणि पुन्हा ऑफिस ते घर असा प्रत्येकी एक तासांचा प्रवास (नशीब वाहतूक कोंडी नसेल तर) नातवंडांना डे केअर सेंटरची सवय. त्यामुळे स्वाभाविकच अनुराधाला दोन्ही मुलांच्या घरी करमत नाही. सकाळी थोडफार फिरणं, योगासनं, सायंकाळी नाना-नानी पार्क. दिवसभर काहीतरी गुंतवून घ्यायचा प्रयत्न केला जातो परंतु त्याचाही कंटाळा येतो. निवांतपणाचाही काय त्रास असतो याचा अनुभव अनुराधा पदोपदी घेत आहे.

अवंती यांचा विषय आणखीनच वेगळा आहे. त्यांना दोन मुलीच आहेत. दोघी त्या राहतात त्याच शहरात असतात. दोघींच्या नोकऱ्या, संसार, मुलं-बाळं सगळं छान चाललेलं आहे. पती वारल्यानंतर अवंती एकट्याच असतात. एकटेपणा जाणवयाला नको म्हणून मुली आईला वारंवार बोलावतात किंवा आठवड्यातून एखादी चक्कर दोघीही आईकडे मारत असतात. आता अवंती यांना एकटेपणाची इतकी सवय झाली आहे, की मुलींनी कितीही बोलावले तरी त्यांच्या घरी त्यांना जावंसं वाटत नाही. अवंती यांनी स्वतःला चांगले गुंतवून घेतले आहे. घराभोवती छोटीशी बाग विकसित केली आहे. माझं स्वयंपाकघर, माझी खोली, माझी खुर्ची या सगळ्या गोष्टी त्यांना इतक्‍या सवयीच्या आहेत, की दुसरीकडं चैनच पडत नाही. शिवाय त्यांच्या घरात मी सत्तेनं काही करूही शकत नाही अशी त्यांची धारणा असते. जावयांनासुद्धा मी घरात वावरत असले की अवघड होतं. मी घरातल्या घरात बोअर होते; पण करणार काय? आयुष्य आहे तोवर जगत राहायचं.

अशी एक ना अनेक उदाहरणे आपण आपल्या आसपास पाहत असतो. प्रत्येक नात्याला एक विशिष्ठ कंगोरे असतात. तसेच ते पालकत्वासाठीही असतात. पालकत्व म्हणजे काय, याचे प्रशिक्षण देणारा कोर्स अजून तयार व्हायचा आहे. किमान हे आपले नशीबच म्हणावे लागेल. पहिल्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे अलगदपणे झिरपणारी ही बाब आहे. त्याला थोडेफार समाजमनाचे कंगोरेही जोडलेले असतात. मुलांच्या जन्मानंतर आपण पालक होतो आणि पालकत्व निभावताना आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल होत जातो. यापूर्वी स्वतःच्या परिघाबाहेरचा विचार न करणारे आपण आपल्या मुलांच्या दृष्टीनं विचार करायला लागतो. एवढंच नव्हे तर, बऱ्याचदा आपल्या पालक या भूमिकेला आपण इतके चिकटलेले असतो, की त्याच भूमिकेतून आपल्या संपूर्ण आयुष्याचं गणित मांडू लागतो. आपलं करिअर, आपलं कार्यक्षेत्र, आपली सामाजिक ओळख यावरसुद्धा आपल्या पालक असण्याच्या भूमिकेचा प्रभाव असतो.

हेही वाचा: अवीट गोडीची गाणी अन् त्याचे गायक, सध्या दुर्लभ झाले आहेत...

आपली अगदी सुरुवातीची ओळख म्हणजे ‘अमक्‍या-तमक्‍याचा मुलगा/मुलगी’ कालांतराने ती ‘अमक्‍या-तमक्‍याची आई/बाबा’ अशी बदलत जाते. अर्थात तशी ओळख हवीहवीशी वाटते. आपली मुलं सर्वच बाबतींत आपल्यापेक्षा सरस असावीत, अशी बहुतेक वेळा आपली अपेक्षा असते; म्हणूनच मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पालकांची आपल्या मुलांना जास्तीत जास्त सुख-सोयी पुरवण्याची धडपड असते. आपल्या बजेटमध्ये बसणारी चांगल्यात चांगली शाळा निवडण्यापासून ते मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पुंजी गोळा करण्यापर्यंत पालक जागरूक असतात. आपल्याला कपडे, चपला, बूट अशा वस्तू घेताना काटकसर करणारे पालक मुलांना मात्र शक्‍यतो त्यांच्या आवडीच्या वस्तू देण्याचा प्रयत्न करत असतात. मुलांच्या प्रगतीला आणि कर्तृत्वाला आपलंच यश मानून आनंदित होतात.

खरंचच पालकत्व म्हणजे काय? हा प्रश्न गहण आहे. आपण दिलेले संस्कार आणि शिकवण यातून मुलांनी आयुष्यात प्रगती साधावी, हा माफक अपेक्षा प्रत्येक पालकांची असते. अर्थात आपण जे बीज पेरतो तेच उगवते हा साधा सिद्धांत आहे. आपले समाजातील वागणे, बोलणे, समाजाप्रती आपलेले असलेले योगदान, नातेवाइकांशी संबंध याचा पाल्य अत्यंत बारकाईने विचार करत असतो. ते संस्कार घेऊनच त्याची वाढ होत असते.

मुलांच्या जन्मानंतर आपण पालक होतो आणि पालकत्व निभावताना आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल होत जातो. यापूर्वी स्वतःच्या परिघाबाहेरचा विचार न करणारे आपण आपल्या मुलांच्या दृष्टीनं विचार करायला लागतो. एवढंच नव्हे तर, बऱ्याचदा आपल्या पालक या भूमिकेला आपण इतके चिकटलेले असतो, की त्याच भूमिकेतून आपल्या संपूर्ण आयुष्याचं गणित मांडू लागतो. आपलं करिअर, आपलं कार्यक्षेत्र, आपली सामाजिक ओळख यावरसुद्धा आपल्या पालक असण्याच्या भूमिकेचा प्रभाव असतो.आयुष्यभर पालकत्वाची भूमिका जगलेल्या पालकांना मग रिकामपण जाणवायला लागतं. आयुष्यात बराच काळ मुलांच्या जगालाच आपलं जग मानलेलं असतं आणि आता मुलांचं जग आपल्यापेक्षा वेगळं आहे, तिथं आपल्या आवडीच्या गोष्टी फारशा नाहीत; त्यामुळं तिथं आपलं मन रमणार नाही, याची जाणीव होते. त्यामुळं कुठं तरी मनाच्या एका कोपऱ्यात सल राहतो. बऱ्याचदा आयुष्यभर काटकसरीच्या, मोजून-मापून खर्च करण्याच्या सवयी लावून घेतलेल्या असतात. त्यामुळं बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असते. व्यवसाय, नोकरी यातून निवृत्ती आलेली असते. नव्या कामाचा रेटा झेपणारा नसतो आणि कमाईसाठी काम करायलाच पाहिजे, अशी गरजही नसते. आता काय करायचं? निवांतपणाचाही कंटाळा यायला लागतो. आपण जन्म दिलेल्या मुलांना आता आपल्या पालकत्वाची गरज नक्कीच नाही; परंतु आपल्या पालकत्वाच्या अनुभवांची शिदोरी अशीच का वाया घालवायची? समाजात अनेक वंचित मुलं आहेत, ज्यांचं पालकत्व त्यांचे जन्मदाते निभावू शकत नाहीत, त्यांना कोणत्याही व्यावहारिक फायद्याची अपेक्षा न ठेवता आधार देऊ शकणारे पालक हवेत

शैक्षणिक प्रगतीत कमी पडणारी, वयानुरूप शारीरिक, मानसिक विकासात थोडीशी कमी पडणारी काही मुलं आहेत, ज्यांना विशेष प्रकारे शिक्षण देण्याची गरज आहे. त्यांच्या पालकांना इच्छा असूनही यासाठी वेळ काढता येत नाही. काही अपंग, आजारी मुलं आहेत, ज्यांच्या पालकांना कमाईसाठी बाहेर जाणं गरजेचं आहे आणि अशा मुलांना सोबतीची गरज आहे.
अनेक सामाजिक प्रश्‍न आहेत, तिथं पालकत्व निभावणारे स्वयंसेवक हवे आहेत. आपलं पालकत्व फक्त आपण जन्म दिलेल्या मुलांपुरतं मर्यादित न ठेवता त्यांचं क्षितिज आपण असं विस्तारू शकलो, तर त्यातून आपलं रिकामपणही सत्कारणी लागू शकतं; शिवाय काही विधायक कार्य केल्याचं समाधान मिळेल, ते वेगळंच.

सुदैवानं अशा पद्धतीनं कार्यरत असणारे अनेक स्वयंसेवक आहेत. आपल्या कामाचा गाजावाजा न करता, कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांचा निष्काम कर्मयोग सुरू आहे; परंतु समाजाच्या गरजेच्या तुलनेत अशा स्वयंसेवकांची संख्या नक्कीच कमी आहे. आपली पालकत्वाची जबाबदारी कमी झाल्यावर या पद्धतीनंसुद्धा आपण वानप्रस्थाश्रमातही पालकत्वाची भूमिका निभावू शकतो. फक्त त्या दृष्टिकोनातून आपलं मन मोठं करण्याची मात्र गरज आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top