तुफान, बादल, वादळ! इंजिने धावणार कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुफान, बादल, वादळ! इंजिने धावणार कधी?}

शंभू, लखन, तुफान, मन्या, इंजिन, बादल, सरदार, वादळ, टायगर, लक्षा, नसऱ्या...ही नावं आहेत धावणाऱ्या इंजिनांची. एकेकाची मूळ किंमत पंधरा ते वीस लाख. मात्र, अलिकडच्या काळात ती घसरली की, शेतकऱ्यांना घरातील अडगळ वाटू लागली आहे. इंजिनांचा वापर होत नसल्याने ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आता फार कमी जणांकडे ती आहेत. काहींनी घराण्यांची परंपरा म्हणून, काहींनी हौस म्हणून, काहींनी लळा म्हणून ती ठेवली आहेत. खिलार इंजिने पुन्हा धावतील अशी आस साऱ्यांना आहे.

तुफान, बादल, वादळ! इंजिने धावणार कधी?

sakal_logo
By
अविनाश म्हाकवेकर

आपल्या कृषी संस्कृतीमध्ये बैल हा ग्रामीण जीवनातील अविभाज्य घटक आहे. शेतकरी पशूधनाचे पोटच्या मुलांप्रमाणे संगोपन करतो. पेरण्या संपल्यानंतर गावयात्रा आणि त्याच्या जोडीला बैलगाडा शर्यत ही प्रथा, परंपरा आहे. ती शेकडो वर्षांपासून आजही महाराष्ट्रातील गावागावांमध्ये पाळली जाते.

बैलगाडा शर्यतीचे विविध सात प्रकार आहेत. पुणे व नगर जिल्ह्यात चार बैलांची शर्यत केली जाते. त्यामध्ये गाड्यावर माणूस नसतो. दिशादर्शक घोडेस्वार बसलेल्या घोडीमागे बैलजोड्या धावतात. १५० मीटर अंतर असते आणि ते कापण्यासाठी अवघी ४ ते ५ मिनीटे लागतात. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील जिल्ह्यात शंकरपाट, छकडी किंवा छकडा शर्यत होते. यामध्ये ४ ते ५ ट्रॅकवर सर्व बैलजोड्या छकड्यासह धावतात. त्याची लांबी ३५ ते ४० मीटर व रुंदी ४०० ते ४५० मीटर असते. त्यामध्ये छकड्यावर बैलांना हाकणारे दोघे जण असतात. बैलांना काठी किंवा चाबूकच्या सहाय्याने हाकले जाते. तिसरा प्रकार म्हणजे लांब पल्ल्याची आरत पारत शर्यत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर येथे ती भरवली जाते. यामध्ये गाडीवानासह २ बैलांची गाडी शर्यत सुरू होते त्या ठिकाणापासून धावून पुन्हा शर्यतीच्या आरंभस्थळाकडे परतात. चौथा प्रकार लाकूड ओंडका शर्यत. ती सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात होते. यामध्ये बैलजोडीला लाकूड ओंडका लावून पळविले जाते. नगर, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात घोडा बैल (शेंबे गोंडा शर्यत) शर्यत असते. यामध्ये गाडीवानासह घोडा आणि बैल जोडून गाडा शेतातून १००० मीटरपर्यंत पळविला जातो. चिखलगुत्ता हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातली गडहिंग्लज तालुका आणि कोकणात होते. नांगरणी स्पर्धेमध्ये ही शर्यत खेळवली जाते. आठवा प्रकार म्हणजे समुद्र किनारा शर्यत होय. ती कोकणाच्या रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्गात समुद्रकिनारी खेळविली जाते.

हेही वाचा: कोरोनाचा तमाशा; कलावंतांची फरपट

उच्च प्रतिचे खिलार वळू व गायींचे संगोपन करून त्यांच्यापासून होणारे खोंड हे बैलगाडा शर्यतीसाठी वापरले जातात. कारण त्याचा बांधा आखीव-रेखीव, खुर काळे व कडक, मानेजवळ पाळ्या कमी आणि शिंगे गोल व अणूकुचीदार असतात. हा शारिरीकदृष्टया चपळ, काटक आणि धावण्यासाठी सक्षम असतात. खिलार गायांचे संगोपन करणारा मोठा शेतकरी वर्ग महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील दुष्काळ भागातील गावांमध्ये वास्तव्यास आहे. सांगली जिल्ह्यातील महूद, जत, आटपाडी, खर्सुंडी. कर्नाटकातील विजापूर. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, पुसेगाव येथे खोंडांची पैदास, संगोपन व विक्री केली जाते.

एक खोंड सहा महिने खिलार गायींचे दूध पिऊन मोठा होतो. चरण्यायोग्य झाल्यानंतर वार्षिक पशू खरेदी विक्री बाजार किंवा आठवडे बाजारात विक्री केली जाते. खरेदी करणारा वर्ग हा प्रामुख्याने पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि मराठवाड्यातील सधन शेतकरी असतो. १० ते १२ महिन्यांचा खोंड ४० ते ७० हजार रुपयांना विकला जातो. काही उंच देखण्या बैल जोडींची विक्री किंमत १ ते २ लाखांपर्यंत देखील गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, सध्या शर्यतीवर बंदी असल्यामुळे बैलांची किंमत ८ ते १० हजार अशी झाली आहे. खिलार गायींची विक्री क्वचितच होते. परंतु खिलार बैलांच्या विक्रीतून उपजीविका करणारा समुदाय आता आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे.

खरेदी केल्यानंतर ते शर्यतीत धावण्यासाठी सक्षम आहेत की नाही याची चाचणी केली जाते. खोंडांना घोडींच्या सहवासात ठेवले जाते. त्यांची खुरे कडक बनविण्यासाठी खुराखाली माती टाकली जाते. मोकळ्या रानात किंवा डोंगर उतारावरून माथ्याकडे त्यांना पळविले जाते. अतिशय खडतर अशा निवड प्रक्रियेतून शर्यतीसाठी धावू शकणाऱ्यांची निवड केली जाते. नंतर खुराक म्हणून विशेष आहार दिला जातो. त्यामध्ये सुका चारा, ओला हिरवा पाला, सोयाबीन, डाळी, शेंगदाणा पेंड, सातू, उडिद चुनी, खोबऱ्यांचा चुरा, बीट, गाजर, मक्यांचे कणीस, भरडलेला गहू, तूप, मोहरीचे तेल, दूध, अंडी, सुका मेवा असा समावेश असतो.

हेही वाचा: बिटकॉईन आणि आभासी चलनांचे विश्व!

खुराक दिल्यानंतर बैलांना प्रशिक्षण दिले जाते. धावण्याच्या निवड चाचणीनंतर प्रत्यक्ष शर्यतीसाठी निवड केली जाते. धावणे, पोहणे, डोंगर चढणे, सुचनांचे पालन करण्याचे प्रशिक्षण देणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. बैलांना गाडामालक प्रशिक्षण देतात किंवा दिशादर्शक घोडीमागे धावण्याचा सराव देतात. एखाद्या पैलवानाला तालीम कुस्तीचे प्रशिक्षण द्यावे, त्याप्रमाणे बैलांना खुराक दिला जातो. त्यांचे प्रशिक्षण आणि सराव घेतला जातो. काही ठिकाणी प्रशिक्षित खिलार बैल किंवा जोडी देखील विकली जातात. प्रशिक्षीत बैलजोडींची विक्री किंमत १० ते १५ लाखांपर्यंत गेल्याच्या अनेक नोंदी आहेत. जसा लाखातून एखादा खेळाडू तयार होतो तसा शेकडो खोंडातून एखादा बैल शर्यतीसाठी सरस तयार होतो. बैलांना रोज शर्यतीसाठी पळविले जात नाही. त्यांना आठवड्यातून एकदा प्रशिक्षण दिले जाते. खिलारसोबत गौलौ, हळ्ळीकर, अमृतमहेल या प्रजातींचे बैल देखील शर्यतीसाठी वापरले जातात. परंतु महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी खिलार बैलांनाच पहिली पसंती दिली जाते. कमीत कमी २ ते ३ लाख आणि १० ते १२ लाख रुपये जोडी अशीही विक्री होते.

उपयुक्त बैलजोडींच्या संगोपनासाठी सधन शेतकरी स्वतंत्र मोकळ्या जागेत गोठे बांधतात. त्यामध्ये त्यांच्या खाण्यापिण्याची व अंघोळीची देखील व्यवस्था असते. उन्हाळ्यात थंडावा लाभावा यासाठी फॅन आणि एअर कंडिशनर लावल्याची उदाहरणे आहेत. एकूणच काय तर शेतकरी बैलांचा पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ करतात. काही बैलगाडा मालक शेतकरी मृत्यूपश्चात अंत्ययात्रेमध्ये बैलजोड्यांचा समावेश करा विनंती करतात. महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणे आहेत की, शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बैलजोड्या स्मशानापर्यंत सोबत घेतल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बैल मृत झाल्यानंतर त्याच्यावर वाद्यसंगितासह अंत्यविधी केले जातात, समाधी बांधतात. एकूण काय तर बैलांशी जो जिव्हाळा निर्माण होतो तो शेतकऱ्यांच्या हयातीत आणि त्यानंतरही कायम राहतो. बहुतांश गावांमध्ये बैलगाडा प्रेमी लग्नपत्रिकेमध्ये बैलजोड्यांचाही फोटो छापतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे त्याला सर्वजण जपतात.

हेही वाचा: क्रिकेटमध्ये पुन्हा येतंय गोलंदाजांचं राज्य?

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यात शर्यतींचा मोठा वाटा आहे. गावोगावी वार्षिक किंवा आठवडे बाजारात बैलांची खरेदी विक्री केली जाते. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. बहुतांश बाजार हे दुष्काळी भागात भरविले जातात. त्यामुळे येथे बैलांच्या खरेदी विक्रीतून उपजिवीका करणारा मोठा वर्ग आहे. महाराष्ट्राच्या बागायत पट्ट्यात शर्यतींचे आयोजन केले जाते. शेती अवजारे, पशुंना आवश्यक वस्त्रे, वस्तू, रोख रक्कम अशी बक्षिसे असतात. शर्यतींच्या आयोजनामुळे हॉटेल व्यवसाय, बैलांच्या वाहतूक करण्यासाठी होणारी वाहतूक व्यवस्था, वाजंत्री, उद्घोषक, निवेदक, कलाकार मंडळींना वार्षिक यात्रा, जत्रेमध्ये आर्थिक फायदा होतो. वर्षभराची कमाई एकाच शर्यतीच्या आयोजनामुळे होतो.

सध्या शर्यती बंद असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची साखळी तुटली असून एकमेकांवर अवलंबून असलेल्या घटकांमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शर्यती सुरु असतात तेंव्हा बाजारपेठेतील अर्थचक्राला गती मिळते. हजारो बैलगाडा मालक, शर्यतप्रेमींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पैसा चलनात येत असतो. प्राणीप्रेमींनी घेतेलेल्या आक्षेपांनंतर ७ मे २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जलिकट्टु सोबत बैलगाडा शर्यत विरोधातील विविध याचिकांवर दिलेल्या आदेशानंतर बैलगाडा शर्यतीवर संपुर्ण बंदी आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झाले आहेत.

सध्या महाराष्ट्रासह कर्नाटक सीमेवर दुष्काळी भागातील गावांमधील खिलार वळू, गायींचे संगोपन थांबले आहे. खोंडांची विक्री थांबली आहे. तर कालवड यांची विक्री अल्पप्रमाणात सुरू आहे. खोंडाची पैदास मागणीअभावी घटली आहे. परिणामी उच्च प्रतींचे वळू आणि गायींची संख्या घटत चालली आहे.

बागायत भागात शर्यतबंदी असल्यामुळे बैलांचे संगोपन, पालन, पोषण थांबले आहे. अल्प प्रमाणात बैलांचा मरेपर्यंत सांभाळ केला जातो. बहुतांशपणे विक्री होत आहे. शर्यत बंदीमुळे बाजारपेठ, एकमेकांवर अवलंबून सर्व घटकांचा आर्थिक स्त्रोत आटला आहे. सरकारच्या पशू गणनेच्या आकडेवारीनुसार ४६ टक्क्यांनी बैलांची संख्या घटली आहे.

go to top