Maratha History: हा तलाव चक्क कैद्यांनी बांधून पूर्ण केला होता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कैद्यांकडून पूर्ण झालेल्या आष्टीतील ऐतिहासिक तलावाची कहाणी!}

...हा तलाव चक्क कैद्यांनी बांधून पूर्ण केला होता


महाराणी कैसर व्हिक्टोरिया यांनी १८७६ व ७७ च्या काळात आष्टीचा तलाव बांधला. या तलावाचे काम बारा महिने सुरू होते. या तलावाचे क्षेत्रफळ अडीच हजारमध्ये व्यापले असून या तलावाचे काम किती तरी महिने सुरू होते. दररोज या तलावावर दोन हजार कामगार काम करत. १८८१मध्ये पडल्या दुष्काळामुळे त्या तलावाचे काम अर्धवट राहिले. महाराणी कैसर व्हिक्टोरिया यांनी शेवटी ते काम कैद्यांकडून पूर्ण करवून घेतले.

मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे २० फेब्रुवारी १८१८ मध्ये मराठे (Maratha) व ब्रिटिश यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या युद्धात नरवीर बापू गोखले यांना वीरमरण आले. ही मराठेशाहीची शेवटची लढाई ठरली. आष्टीची लढाई म्हणून ही इतिहासात ओळखली जाते. याच ठिकाणी ब्रिटिशांनी (British) ऐतिहासिक असा तलाव बांधला. या तलावाला येवती तलाव असेही संबोधले जाते. (British Completed lake project with the help of jail inmates)

या तलावाच्या (Lake) माध्यमातून या ठिकाणी नौकाविहार व अन्य साधने उपलब्ध केली तर हे ठिकाण जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन होऊ शकते. मात्र, याबाबत शासनाची मोठी उदासीनता याला कारणीभूत आहे. यामुळे या ठिकाणी असलेल्या ब्रिटिश कालीन विश्रामगृह, खानसामा निवास, पाण्यासाठी असलेला आड व तलावाचा इतिहास लिहिलेला फलक याची मोठी दुर्दशा झाली आहे. या तलावातच नरवीर बापू गोखले यांची समाधी आहे.

मार्गशीर्ष शुद्ध एकादशी १८३८ मध्ये कोल्हापूर (Kolhapur) संस्थांचे तत्कालीन बुवासाहेब ऊर्फ शहाजीराजे पंढरपूरहून तुळजापूरला जात असताना २९ नोव्हेंबर १८३८ या दिवशी त्यांचे याच ठिकाणी निधन झाले. आष्टी येथील मराठी शाळेजवळ त्यांची समाधी आहे. त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. मोहोळ तालुक्याच्या दृष्टीने ही मोठी ऐतिहासिक अशी जमेची बाजू आहे.

या तलावाच्या काठी असलेले ऐतिहासिक असे विश्रामगृह पाहण्यासाठी पर्यटकांना मोठी नामी संधी आहे. मात्र, त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. पूर्ण कौले निघून गेली आहेत. भिंतीची मोठी पडझड झाली आहे. परिसरात मोठी घाण असून बांबूंच्या झाडांचे, निरुपयोगी गवत व चीलारीचे या ठिकाणी साम्राज्य आहे. मोठमोठ्या सापांचा ही वावर या ठिकाणी आहे. परिसरात मोठमोठे खड्डे आहेत, आंबा व चिंचेची काही झाडे आहेत. विश्रामगृहाशेजारीच ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या जेवणासाठी खानसामा निवास आहे. त्या ठिकाणी नेमलेला कर्मचारी स्वयंपाक तयार करून अधिकाऱ्यांच्या जेवणाची सोय करत होता. त्याचीही दुर्दशा झाली आहे.

पाण्यासाठी जवळच सुमारे शंभर ते सव्वाशे फूट खोलीचा बांधीव आड असून त्याचीही पडझड झाली आहे. ब्रिटिश अधिकारी या विश्रामगृहात राहूनच तलावाची देखरेख व नियंत्रण करीत होते. हे ठिकाण शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले व त्या ठिकाणी निधी खर्च केला तर लॉजिंग हॉटेलिंग या माध्यमातून मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विश्रामगृहाच्या बाजूने संरक्षक भिंत असून ती पूर्ण खराब झाली आहे. त्याच्यावरील पाइप निघून गेले आहेत.

प्रवेश करण्यासाठी लोखंडी गेट आहे, तेही निखळून पडले आहे. हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास संपूर्ण जिल्ह्यात आदर्श असे पर्यटन स्थळ होणार आहे. आवक-जावक वाढून मोहोळकडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत. विश्रामगृहा जवळच तलावाचा इतिहास लोखंडी अक्षराने लिहिलेला फलक आहे. पंढरपूर-बार्शी महामार्गावर आष्टीपासून सुमारे सहा किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

असा आहे इतिहास
- महाराणी कैसर व्हिक्टोरिया यांनी सन १८७६, ७७ च्या काळात दुष्काळामध्ये तलावाचे काम सुरू केले.
- त्यावेळी आष्टी माढा तालुक्यात होते
- तलावाच्या दोन्ही बाजूच्या जमिनी भिजण्यासाठी तलावाच्या निर्मितीचा उद्देश आहे.
- एकूण क्षेत्रफळ दोन हजार ८३० एकर
- पाणी साठवण क्षमता १५ हजार ५०० घनफूट
- काम चालले बारा महिने
- या कामावर दररोज दोन हजार २५७ मजूर काम करीत होते.
- सर्वात जास्त मजूर १९ हजार ९४९ एवढे होते.
- एकूण खर्च तीन लाख नऊ हजार ६२१ रुपये
- एकूण कामाची किंमत एक लाख ४६ हजार २७७ रुपये.
- सन १८७८ ला पुन्हा दुष्काळ पडला
- सन १८८०, ८१ साली पुन्हा तलावाचे काम सुरू केले.
- राहिलेले अर्धवट काम कैद्यांकडून करून घेतले गेले.
- १ एप्रिल १८८१ रोजी आष्टी तलावात प्रथम पाणी सोडले.

सन २०१३, १४ साली या ठिकाणी पर्यटन स्थळ व्हावे, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्याला कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे याबाबत शासनाची किती उदासीनता आहे हे दिसून येते- सोमा माने, तत्कालीन सरपंच, येवती

(Edited By - Amit Golwalkar)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :lakeWarbritishHistory