esakal | वेडात मराठे वीर दौडले पाच
sakal

बोलून बातमी शोधा

वेडात मराठे वीर दौडले पाच}

वेडात मराठे वीर दौडले पाच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाच ध्येयवेड्या तरुणांची ही गोष्ट आहे 1973 मधील. याविषयी सांगताना विवेक देशपांडे म्हणाले की, 1972 मध्ये 90 जणांनी पुणे, बेळगाव, बंगलोर, कारवार, गोवा, मुंबई आणि पुन्हा पुणे हा प्रवास 1 मे ते 30 मे 1972 रोजी केला अन तोही सायकलवरून. या सायकल सफरीमधील माझा मित्र अजित ठोसर याने त्यावेळी परीक्षा झाली म्हणून काहीतरी प्लॅनिंग कर, असं सांगितलं. त्यावेळी त्याचे नातेवाईक सिलोन अर्थातच आत्ताचे श्रीलंका येथे जाऊन आले होते. तेव्हा मी एफवाय बीएस्सीला होतो. आम्हा सर्वांची परिस्थितीही बेताची होती; पण एवढ्या लांब जायला खूप खर्च येणार अन ते शक्यही नव्हतं. पण, एक पर्याय सुचला तो म्हणजे सायकल सफरीचा. ही कल्पना अजित ठोसर यांनी मांडली.

मी, शिरीष पानसे, सुभाष गोडसे, बन्सीलाल वाईकर आणि ठोसर आम्ही पाच जणांनी मग कोलंबोला सायकलवरून जाण्याचं प्लॅनिंग केलं. हे प्लॅनिंग रोटरी क्लबचे पद्माकर

सोहोनी यांना सांगितलं. त्यावेळी त्यांनी ठिकठिकाणी असणाऱ्या रोटरी क्लबच्या मदतीने जेवण व राहण्याची सोय करणार असल्याचे आश्वासन दिलं. त्यामुळे आमच्या जीवात जीव आला. त्या काळामध्ये टेलिग्राम व पत्रव्यवहार चालत असे. खूपच इमर्जन्सी असेल तर टेलीफोनची अर्थात ट्रंक कॉलची सुविधा कशीतरी उपलब्ध होत असे. त्यामुळे सोहोनी यांनी सर्व ठिकाणी पत्रव्यवहार करून आमच्या राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले अन तेथून पुढे आमचा प्रवास सुरू झाला.

हेही वाचा: S+ : हेडमास्तरांना ई-मेल

कसे केले प्लॅनिंग

पुणे ते कोलंबो येथे जाण्यासाठी आम्ही नकाशे घेतले. त्यानुसार दररोज किती किलोमीटर जाऊ शकतो, याचा अंदाज घेतला. सायकलच्या सरावामुळे शंभर ते सव्वाशे किलोमीटर दररोज प्रवास करू शकतो, याचा अंदाज आला. त्यानुसार कुठे मुक्काम करायचा, हे ठरवलं. पुण्यापासून टप्पे-टप्पे घेत आम्ही रामेश्वरपर्यंत पोहोचलो. तेथून तालाइ मानार या श्रीलंकेतील बंदरापर्यंत आम्ही जहाजात सायकली ठेवून प्रवास केला. पंधरा दिवस आम्ही श्रीलंकेची सफर केली.

मराठमोळ्या अधिकाऱ्यांकडून पाहुणचार

श्रीलंकेचे डेप्युटी हाय कमिशनर अरविंद देव आम्हाला भेटले. त्यांनी आमचे स्वागत केले. त्याचबरोबर इंडियन एअरलाइन्समध्ये असलेले श्री. आठल्ये यांनीही आम्हाला प्रोत्साहन दिलं. ते व त्यांची पत्नी मूळचे पुण्याचे. आम्ही त्यांच्या घरी राहिलो अन त्यांनी चक्क आमच्यासाठी पुरणपोळ्यांचा पाहुणचार केला.

पहिल्यांदाच एसी हॉटेलमध्‍ये

आमचा उत्साह पाहून टीव्हीएस सर्वेसर्वा आर. रत्नम भारावून गेले अन त्यांनी आम्हाला श्रीलंकेचा व्हिसा मिळवून दिला. आम्हा पाचही जणांची सोय एसी हॉटेलमध्ये केली. दोन रूम बुक केल्या. खाण्या-पिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे आम्ही पाच दिवस मद्रास अर्थातच चेन्नईमध्ये राहिलो.

एका दिवसात मिळाले पासपोर्ट

आमच्याकडे फारसे पैसे नव्हते; पण पासपोर्ट काढायचे होते. त्यासाठी 1972 मध्ये जानेवारी ते मार्च असे तीन महिने आम्ही मुंबईत सहा फेऱ्या सायकलवरून मारल्या. मुंबईला गेल्यावर दादर येथे राहात होतो. मंत्रालयात गेलो आणि मेजर साळवी यांना भेटलो. "सिलोनला जायचे आहे. त्यासाठी पासपोर्ट हवा आहे", असे आम्ही त्यांना सांगितले. मात्र, आमच्या हाफ पॅन्ट आणि शर्ट पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यात सायकलवर जाणार म्हटल्यावर त्यांचा विश्वासच बसेना. मग, आम्ही मंत्रालयाखाली लावलेल्या पाच सायकली दाखवल्या. हे पाहून त्यांनी आम्हाला एका दिवसात पासपोर्ट काढून दिले.

हेही वाचा: इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या क्रांतिवीरांगणा हौसाक्का

अशोककुमार स्वामी नारायण यांचा आदर्श

अशोककुमार स्वामी नारायण यांनी दुचाकीवरून भारतभ्रमण केल्याचे ऐकले होते. त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळे आम्ही सायकल सफरीचा निर्णय घेतला. श्रीलंकेतील विविध गोष्टी पाहिलं. तीन महिने सायकलवरून प्रवास करूनही आम्हाला काहीही त्रास झाला नाही.

पोलीस ठाण्यातही मुक्काम

या प्रवासात रोटरी क्लबने आम्हाला खूप सहकार्य केले. मात्र, ज्या ठिकाणी रोटरी क्लब नाही, तेथे आम्ही पोलिस ठाण्यात राहिलो. विशेष म्हणजे सर्वच पोलिसांनी खाण्यापिण्याची व्यवस्था केली. एकदा तर आम्हाला हैदराबाद जवळील होम्नाबाद येथे जादूगार रघुवीर भेटले. त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली.

अतूर संगतानी यांचे दातृत्व

पुण्याहून कोलंबोला जाण्याचं ठरलं, त्यावेळी सारसबागेजवळ आम्हाला निरोप देण्याचा कार्यक्रम आयोजिला होता. त्यावेळी बांधकाम व्यावसायिक अतूर संगतानी तेथे आले आणि प्रत्येकाला शंभर रुपये दिले. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. नंतर ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, "एवढे पैसे पुरतील का पोरांनो?" मी त्यांना हा म्हणालो. मात्र, त्यांनी आणखी पाचशे रुपये आम्हाला दिले.

अशी होती आमची टीम

आमच्या टीममधील बन्सीलाल वायकर व सुभाष गोडसे नोकरीला होते. मी, शिरीष पानसे आणि अजित ठोसर कॉलेज करत होतो. आम्ही पाचहीजण जीदी होतो. त्यामुळेच तीन महिन्यांमध्ये पाच हजार किलोमीटर प्रवास सायकलवरुन करू शकलो. पाच जणांपैकी फक्त बन्सीलाल वायकर यांचं मागीलवर्षी कोरोनामुळे निधन झालं. त्यामुळं जुन्या आठवणींना उजाळा देताना दोन दिवसापूर्वीच त्यांची आठवण झाली.

देशपांडे यांचा तरुणांना सल्ला

1) कोरोनामुळे स्वताची आणि कुटुंबाची काळजी घ्या.

2) मी आणि माझी पत्नी कोरोनाबाधित होतो; मात्र आम्ही सकारात्मकतेने त्यावर मात केली. आम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली नाही.

3) सध्याच्या परिस्थितीत काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. 4) मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. हात साबणाने स्वच्छ धुवून घेत जा. 5) आपल्याला काही लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

6) काळजी घेत नॉर्मल समजून कोरोनाबरोबर जगायला शिका.

go to top