देवगडच्या हापूसची चव आणि गंध मधूर कसा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alphonso}

देवगडच्या हापूसची चव आणि गंध मधूर कसा?

हापूस आंब्याची ‘रसाळ’ कहाणी-
उन्हाळा आणि आंब्याचे समीकरण अतूटच. बालगोपाळांपासून आबालवृद्धांपर्यंत हा फळांचा राजा बहुतेकांना आवडतो. आंब्याच्या अनेक प्रजाती असल्या तरी हापूसचा दिमाख न्याराच. हापूस आंब्याची चव, रंग, गंध सगळेच कसे वैशिष्ट्यपूर्ण. त्यामुळे हापूसला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गोड चव, पिवळा रंग, दीर्घकाळ टिकणारा हापूस म्हणजे जणू काही आंब्यांचा राजा. कोकणातील रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस तसेच इंग्रजीत ‘अल्फान्सो’ म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. हापूसची रसाळ कहाणी जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. (Alphonso )

हापूस हे नाव कसे पडले?
भारतात आंब्याची लागवड साधारणपणे चार हजार वर्षांपूर्वी झाली असावी, असा अंदाज आहे. हयुअन सॅंग या बौद्ध भिक्षुकामुळे भारतीयांना आंब्याची ओळख झाली. मात्र पोर्तुगीजांमुळे आंबा जगभर पसरला. जगभरातील १११ देशांमध्ये आंब्याचे उत्पादन घेतले जात असले तरी त्यापैकी जवळपास निम्मे उत्पादन भारतात घेतले जाते. हापूसला ‘अल्फान्सो’ या नावानेही ओळखले जाते. हे अल्फान्सो नाव ठेवण्याचे श्रेयही पोर्तुगीजांना जाते. जिऑग्राफिकल इंडेक्शन जर्नलनुसार पोर्तुगीज लष्करामध्ये अल्फान्सो डे अल्बकर्की हे एक अधिकारी होते. त्यांनी गोव्यात असताना खूप भटकंती केली होती. ही भटकंती करत असताना त्यांनी आंब्यांच्या प्रजातींवर अनेक प्रयोग केले. त्यातूनच हापूसची जात विकसित झाली, त्याला ‘अल्फान्सो’ नाव पडले. मात्र ग्रामीण भागात किंवा स्थानिक लोक ‘अल्फान्सो’ ला अपूस म्हणू लागले. त्यातून आणखी अपभ्रंश होत महाराष्ट्रात जाईपर्यंत आंब्याला हापूस नाव मिळाले. आंब्याच्या झाडाविषयी आंब्याचे झाड साधारणतः चार-पाच वर्षांचे झाले की फळ द्यायला सुरुवात होते. त्यानंतर ते सर्वसाधारणपणे ५० वर्षे फळ देते. मात्र योग्य निगा राखली तर आंब्याचे झाड शंभर वर्षे फळ देते. केवळ कोकणातील हापूसचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक भागात आंब्याची अशी झाडे आढळतील.

खरा हापूस कसा ओळखावा?
हापूसच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे बनावट आंबा हापूसच्या नावाने खपविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात. दरवर्षी उन्हाळ्यात अशा बोगस विक्रीच्या बातम्या वाचायला मिळतात. अनेक ठिकाणी रत्नागिरी हापूसशी साधर्म्य असणाऱ्या कर्नाटक हापूसची विक्री केली जाते. त्यामुळे, फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकराजाने जागरुक राहण्याची गरज आहे. हापूसच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे तो ओळखणे सोपे जाते.
१. सुगंध : नैसर्गिकरित्या पिकविलेल्या अस्सल हापूसचा वास दूरवरूनही येऊ शकतो. एखाद्या खोलीत एखादाच असा आंबा असेल तरी त्याचा घमघमाट खोलीभर पसरतो. कर्नाटक हापूस किंवा हापूसच्या नावाने विक्री होणाऱ्या अन्य प्रजातीच्या आंब्यांना असा वास येत नाही.
२. पातळ साल : हापूसची साल पातळ असते. तो नैसर्गिकरित्या पिकविला असेल तर केवळ हातालाच साल पातळ लागत नाही तर केवळ पाहूनही ती ओळखता येते. कृत्रिमरित्या पिकविलेल्या हापूसची किंवा कर्नाटक हापूस किंवा इतर दाक्षिणात्य आंब्यांच्या साली या जाड असतात.
३. रंग : रंगावरूनही अस्सल हापूस ओळखता येऊ शकतो. त्यासाठी आंब्याच्या रंगाकडे बारकाईने पाहायला हवे. आंबा कृत्रिमरीत्या पिकवला असल्यास तो पिवळाधमक दिसतो. त्याचप्रमाणे, अस्सल हापूस एकदम पिवळाधमक नसतो तर पिवळा, केशरी रंगांचे मिश्रण त्यात दिसते.
४. आकार : अस्सल हापूसचा आकार टोकाशीही गोलाकार असतो. याउलट कर्नाटक हापूस खालील बाजूस निमुळत्या आकाराचा असतो.
५. चव: खरा हापूस अतिशय चवदार असतो. इतर प्रजातींचे आंबे इतके मधुर चवीचे नसतात. काही प्रजातीचे आंबे आंबटगोडही असतात. त्याची फोडही रसाळ असते. आंब्यात गर अधिक प्रमाणात असतो. इतर प्रजातींच्या आंब्यात गर कमी असतो.

हेही वाचा: श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंब गेल्या ८० वर्षांपासून सत्ता गाजवत आहेत

हापूस आंब्यापासून इतर पदार्थ-
हापूस किंवा कोणत्याही इतर प्रजातीच्या आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. आमरस, आईस्क्रीम, आंबा पोळी, आंबा बर्फी आदी पदार्थ बनविले जातात. त्याशिवाय, लोणचेही बनविले
जाते. त्याचप्रमाणे, मुरांबा किंवा साखरांबा बनविण्यासाठीही आंब्याचा वापर केला जातो.

आंब्याची आढी
झाडावरील कैऱ्यांना पाड लागल्यावर त्या उतरवल्या जातात. त्यानंतर, एखाद्या खोलीत वाळलेले गवत पसरवून त्यावर या कैऱ्या पिकण्यासाठी ठेवल्या जातात. या कैऱ्या पुन्हा गवताने झाकल्या जातात. याला आंब्याची आढी म्हणतात. वाळलेल्या गवताच्या उष्णतेने साधारणत: १०-१५ दिवसांत आंबा पिकतो. त्याचप्रमाणे, आंब्याच्या पानात किंवा धान्यात ठेवूनही आंबे पिकविले जातात. मात्र, अलीकडच्या काळात आंबा लवकर पिकण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडसारख्या रसायनांचा वापर केला जातो. मात्र, या पद्धतीत रसायनांचा अंश मानवी शरीरात जाऊ शकतो. त्यामुळे, ही पद्धत अपायकारक आहे. कायद्याने कॅल्शियम कार्बाईडच्या वापरास बंदी आहे.

देवगड हापूस-
कोकणातील विशेषतः दक्षिण कोकणातील जमीन ,हवा ,पाणी हापुससाठी अतिशय अनुकूल आहे. त्यामुळेच हापूस कोकणचा राजा बनला. रत्नागिरी हापूसबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूस अतिशय लोकप्रिय आहे. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग, मिठबाव आदी गावांतील जमिनीत लोह, मॅंगेनीज पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे. हवेतील ६० टक्क्यांपेक्षा जास्त असलेली आर्द्रता आदी कारणांमुळे देवगड तालुक्यात हापूस कोकणातील इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक जोमाने वाढला. देवगड हापूसची चव रत्नागिरी हापूसपेक्षाही मधुर असते. देवगड हापूस त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सुगंधामुळेही ओळखला जातो. याशिवाय देवगड हापूस रत्नागिरी हापूसपेक्षा अधिक गोलाकार असतो. याशिवाय तो रत्नागिरी हापूसच्या तुलनेत वजनाने हलका असला तरी देवगड हापूसचा आतील गर केशरी रंगाचा असतो, तर रत्नागिरी हापूसचा गर पिवळसर असतो. देवगड आंब्याच्या सालीवर लवकर सुरकुत्या पडत नाहीत. देवगड हापूस रस करून खाण्यापेक्षाही कापून फोडी करून खाण्याचा आंबा आहे. त्या तुलनेत रत्नागिरी हापूस अधिक रस करून खाल्रा जातो.
देवगड हापूसची कलम करून जोपासना केली जाते. आंब्याच्या कोयीची रोपे करून वाढवलेल्या झाडाला देवगड हापूस प्रमाणे चवीचे आंबे लागत नाहीत. यासाठी देवगड हापूसच्या डोळे असलेल्या डहाळीचे दुसऱ्या आंब्याच्या रोपांवर कलम केले जाते. ही कलमे अतिशय काळजीपूर्वक वाढवावी लागतात. सुरूवातीला तीन-चार वर्षे प्लॅस्टिकच्या पिशवीत कलमं वाढवली जातात. त्यानंतर ती टिनच्या पिंपात ठेवली जातात. झाड पाच फुटांचे झाल्यावर जमिनीत खड्डा करून ते लावले जाते. त्यांनतर आणखी तीन-चार वर्षे झाडांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. झाड आठ-नऊ वर्षांचे झाल्यावर फळधारणा सुरू होते.

हापूसची निर्यातीतही आघाडी
भारत हा जगातील प्रमुख आंबा उत्पादक देश आहे. जवळपास ७० देशांमध्ये भारतातून आंब्याची निर्यात केली जाते. जगातील आंब्याच्या एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र भारतात आहे. त्यातही हापूस आघाडीवर आहे. हापूस आणि केशर या आंब्याच्या दोन्ही प्रजातींना भौगोलिक निर्देशांक (जीआय) मानांकन मिळाले आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले तरी रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतही हापूसचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र कृषी पणन महामंडळाने निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. हापूस आंब्याच्या निर्यातीचा हंगाम साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो. त्यानंतर तो मे महिन्याच्या अखेरपर्यंत राहतो. आंब्याच्या हंगामाच्या सुरवातीला फेब्रुवारी-मार्चमध्ये हापूसला स्थानिक किंवा देशांतर्गत बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. मात्र जसजशी आवक वाढत जाते तसा दर कमी होत जातो. त्यामुळे आवक वाढल्यानंतर एप्रिल पासून आंब्याची निर्यात केली जाते. त्यामुळे उत्पादकांचे नुकसान टळते. शिवाय देशाला निर्यातीमुळे परकीय चलन ही उपलब्ध होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top