अभिनेत्री प्राजक्ता माळीशी मनमोकळ्या गप्पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta Mali}
अभिनेत्री प्राजक्ता माळीशी मनमोकळ्या गप्पा

अभिनेत्री प्राजक्ता माळीशी मनमोकळ्या गप्पा

मला लहानपणापासूनच नृत्यासह अभिनयाची आवड होती. आईनं प्रोत्साहन अन् बाबांनी पाठिंबा दिला. सातवीत असताना सह्याद्री वाहिनीवर 'ढोलकीच्या तालावर' नृत्यस्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात यश मिळालं. तेव्हापासूनच नृत्याची आवड वाढत गेली, असं उभ्या महाराष्ट्रावर आपल्या नृत्य अन् अभिनयातून अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ‘सकाळ’ला दिलेल्या खास मुलाखतीतून सांगितले. तिच्याच शब्दांत खास मुलाखत....

प्राजक्ताचा अभिनय प्रवास-
मला लहानपणापासूनच नृत्यासह अभिनयाची आवड होती. माझ्या आईला नृत्याची आवड असल्यानं तिनं मला प्रोत्साहन दिलं. माझ्या बाबांनीही मला पाठिंबा दिला. त्यामुळं मी बालनाट्यांमध्ये भाग घेत असे. सातवीत असताना मी सह्याद्री वाहिनीवर 'ढोलकीच्या तालावर' नृत्यस्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात मला यश मिळालं होतं. खऱ्याअर्थाने तेव्हापासूनच नृत्याची माझी आवड वाढत गेली.

मुख्य नायिकेची संधी-

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी अकरावी आणि बारावीसाठी स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावीत असताना 'तांदळा- एक मुखवटा' या चित्रपटात मुख्य नायिकेची फ्लॅशबॅकमधील १७ वर्षीय मुलीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. बारावीनंतर पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रामध्ये प्रवेश घेतला. त्याच दरम्यान 'गुडमॉर्निंग महाराष्ट्र' या वाहिनीवरील कार्यक्रमाचं अँकरिंग करण्याची संधी मिळाली. हे करता करता मी नृत्य विषयात बी.ए. व एम.ए. पूर्ण केलं. महेश कोठारे यांनी 'फिरूनी नवी जन्मेन मी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यानंतर सुवासिनी' मालिकेत काम केलं. त्यानंतर 'जुळुनी येती रेशीमगाठी' ही मालिका केली.

चित्रपटांतही एंट्री-
दरम्यानच्या कालावधीत 'खो खो' या चित्रपटात संधी मिळाली. माझी मुख्य भूमिका असलेला 'संघर्ष' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'एकापेक्षा एक' या डान्स शोमध्येही सहभागी झाले होते. तेथे केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर अनेक चित्रपट व मालिकांमध्येही मी मुख्य भूमिका साकारल्या. त्याचबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यात निवेदकाची भूमिका साकारत असून काही चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.


शिवपुत्र शंभुराजे' नाटकात कसोटी-
राणी येसूबाईची भूमिका कुटुंबीयांच्या पाठबळामुळेच मी गरुडभरारी घेऊ शकले. मालिका, चित्रपट वा नाटकांमध्ये काम करताना मी प्रत्येक भूमिका जीव ओतून साकारत होते व आताही साकारत आहे. मात्र ज्या वेळी मी 'शिवपुत्र शंभुराजे' हे नाटक साकारलं, तेव्हा माझ्या अभिनयाची व माझ्यातील कलागुणांची खरोखरीच कसोटी लागली. या महानाट्यात जवळपास २०० कलाकार होते. त्यात संभाजी महाराज यांच्या पत्नीची अर्थातच राणी येसूबाईंची भूमिका मी साकारली होती. ही भूमिका साकारताना मला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली.

राणी येसूबाईची आव्हानात्मक भूमिका-
राणी येसूबाईची भूमिका साकारण्यासाठी मला त्यांच्या देहबोलीसह व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अभ्यासावे लागले. मला ऐतिहासिक पुस्तकं वाचण्याची आवड आहे. या भूमिकेसाठी अनेक पुस्तकांच्या माध्यमांतून मी येसूबाई अभ्यासल्या. या भूमिकेसाठी मला सुरवातीला नऊवारी साडी नेसण्याचा सराव करावा लागला. मी घोडेस्वारी शिकले. त्यासाठी खूप धडपड केली. पण काही कारणास्तव हा भाग वगळण्यात आला. येसूबाई नथ वापरत असल्याने मीही खरोखरची नथ वापरण्यास सुरवात केली. भूमिकेसाठी माझ्या अंगावर जवळपास एक ते दीड किलो सोनं होतं. तेवढं सोनं घालून आम्ही तब्बल चार दिवस रंगीत तालीम केली. येसूबाईंची भूमिका साकारताना त्यांच्यामध्ये मी इतकी गुंतून गेले होते, की जवळपास १५ दिवस मला दुसरं काहीच सुचत नव्हतं.

स्टेज डेअरिंग वाढलं-
'शिवपुत्र शंभुराजे' या नाटकाचा प्रयोग झाला, तेव्हा रसिकांनी मला अक्षरशः डोक्यावर घेतलं. प्रयोग संपल्यानंतरही मी येसूबाईंसारखी वागत होते. येसूबाईंच्या पात्राशी मी इतकी समरस झाले होते, की त्यातून बाहेर पडण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागले. या भूमिकेमुळे माझ्यात स्टेजडेअरिंग वाढलंच; परंतु ऐतिहासिक भूमिका बिनधास्त व हुबेहूब साकारण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळेच ही भूमिका माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली. तिचा उपयोग मला 'सुवासिनी' मालिकेतील सावित्रीचे पात्र साकारताना झाला. अभिनय क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल, तर रंगभूमीवर नक्की काम करावं. कारण त्यातून आत्मविश्वासाबरोबर आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यामुळेच मी स्वतःला भाग्यवान समजते, की एका महानाट्यात मी मुख्य भूमिका साकारली.

आईच्या आदर्शानेच वाटचाल-
प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं अनन्यसाधारण महत्त्व असतं. आपल्या मुलांनी मोठं व्हावं, असं प्रत्येक आईला वाटत असतं. तशीच इच्छा माझ्या आईचीही होती. त्यामुळेच तिनं मी अवघ्या सहा वर्षांची असताना मला शास्त्रीय नृत्याचे धडे घेण्यासाठी तिने प्रशिक्षणाला पाठविलं. खरंतर तिच्यामुळेच मी भरतनाट्यम शिकले. जर आईने मला नृत्याचे धडे घेण्यासाठी पाठविलं नसतं तर मी कधीच डान्सर बनू शकले नसते. मी नृत्यामध्ये नाव कमवून मोठी अभिनेत्री व्हावं, अशी आईची इच्छा होती. त्यासाठी ती मार्गदर्शनही करत होती. तिच्यामुळेच मला नृत्य अन अभिनयाची आवड लागत गेली, अन तिच्या प्रोत्साहनामुळेच त्यात गोडीही निर्माण झाली. त्यामुळे मी ऑडिशन देवू लागले अन मला अतिशय उत्कृष्ट मालिका अन चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याचबरोबर नृत्यामध्येही मी नाव कमावलं. विशेष म्हणजे चित्रीकरण असो वा नृत्याचा कार्यक्रम आई माझ्याबरोबर येत असे. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीचा ताणतणाव येत नव्हता.

आजही आईला माझी काळजी-
मी मुंबईत २०१३ मध्ये राहायला गेल्यानंतर आईचा ताण थोडासा हलकासा झाला. मात्र, आजही आई माझी तेवढीच काळजी घेते, जशी पहिल्यापासून घेत होती. अजूनही ती माझ्या करिअरचा विचार करते. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळेल, याप्रकारचे एक ना अनेक सल्ले देती. अनेकदा माझ्याकडून काही निर्णय चुकले तर ती तेवढ्याचं खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहते. मला पुढं जाण्यासाठी बळ देती. त्याचप्रमाणे ज्या-ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या ही सांगती.

आईचं स्वप्न पूर्ण झालं-
झी टीव्हीवरील एका तरी मालिकेत काम करावं, असं तिला पहिल्यापासून वाटतं होतं. त्याचदरम्यान "जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण, मला हिंदी मालिकेत काम करायचं होतं. मात्र, आईने हीच मालिका कर असं सांगितलं. त्यामुळे आईच्या इच्छेखातर मी त्या मालिकेत काम केलं. विशेष म्हणजे ती मालिका खूप हीट झाली. त्यावेळी आईला खूपच भरून आलं होतं. पुणे विद्यापीठामध्ये पदवीत मी टॉपर आले होते; तसेच, मला भरतनाट्यममध्ये स्कॉलरशिप मिळाली, त्यावेळी आईच्या आनंदाला पारावार राहिला नाही. खरंतर ज्यावेळी आई आनंदित होते, त्यावेळी मलाही खूप छान वाटतं. कारण, तिने माझ्याकडून जे काही स्वप्न पाहिले आहेत, ते खऱ्याअर्थाने पूर्ण होत असल्याचा मलाही अभिमान वाटतो.

एकदम बेधडक-
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी आई एकदम बेधडक आहे. एखादी गोष्टी करायची ठरवली तर ती नक्कीच करते. मग, त्यामध्ये कोणतेही कारण शोधत नाही. ती खूपच स्ट्रॉंग आहे. तिची विचार करण्याची क्षमता खूपच जबरदस्त आहे. माझ्यापेक्षा ती दहा पटीने काम करते अन माझ्यापेक्षा काम करण्याचा तिचा वेग दहापटीने जास्त आहे. ती जेवढी जिद्दी अन कष्टाळू आहे, तेवढीच प्रेमळही आहे. खरंतर तिच्याएवढे गुण माझ्यात नसले तरी तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पुढे जात आहे, याचा मला खरोखरच आनंद आहे.

फॅशनेबल प्राजक्ता-
मी मध्यम उंचीची मुलगी असल्याने आडव्या लाइन्स किंवा आडव्या प्रिंट असलेले कपडे घालत नाही. कारण, त्यामुळे मी ब्रॉड दिसते. त्यामुळे मी कॉलरबोन ओपन ठेवते. गळा असलेले ड्रेसच घालते. गळा बंद असलेले ड्रेस घालत नाही. त्यामुळे माझी उंची कमी वाटते किंवा मानेची हाइट कमी वाटते. परिणामी, गाल जास्त वाटतात. त्यामुळे मी कॉलर असलेले कपडे अजिबात घालत नाही. तसेच, स्लिव्हलेस कपडे घालणे टाळते. बॅगी ड्रेसेसही मी अजिबात घालत नाही. त्यामुळे उगाचच तुम्ही आडवे व उंचीने लहान दिसता.

कंफर्टेबल कपडे घाला-
काळा रंग असलेले कपडेही मी घालत नाही. कारण, तो रंग खूप उष्णता शोषतो. फ्रेश आणि लाइट कलर्स मला खूप आवडतात. ते मला आणि माझ्या स्कीन कलरला फार उठून दिसतात. खूप पेस्टल कलर्सही मी वापरत नाही. कारण, त्यामध्ये माझी स्कीन काळपट दिसते. प्रत्येकाने स्वतःच्या स्किनटोनचा, उंचीचा आणि शरीरयष्टीचा अभ्यास करून आपल्याला काय सूट होत, त्यानुसार कपडे परिधान करावे. मला कंफर्टेबल वाटतील, अशाच प्रकारचे कपडे परिधान करण्यास मी प्राधान्य देते. लुझ, सुती कपडे मला आवडतात. अंगाला आवळून न बसणारे कपडे मला अजिबात आवडत नाही. जिन्स घालणं तर मी बंदच केलं आहे. कपडे घातल्यानंतर आपल्याला मोकळंढोकळ वाटलं पाहिजे. मला सलवार कुर्ता फार आवडतो. पण, दुप्पटा नाही. थ्री फोर्थ थोड अॅन्कल लेन्थ अशी लुझ पॅन्ट व वर लुझ कुर्ता हे आता जास्त ट्रेंडिगमध्ये आहे माझ्याकडे. ते मी कर्म्टेबल वेअर फॅशन म्हणून मी घालते.

प्राजक्ताचा फॅशनफंडा-
मला काय आवडतं अन मला काय चांगलं दिसत, या गोष्टी पाहून प्रत्येकाने हाच फॅशनफंडा अवलंबला पाहिजे.आपल्या स्किनटोनला काय मॅच होत अन् काय चांगलं दिसत, हे ओळखूनच कपडे परिधान करावे. सावळ्या रंगाच्या लोकांनी फार पांढरेशुभ्र कपडे घालू नयेत. यलो किंवा थोडेसे ऑफ कलर्सकडे गेले पाहिजे. गोऱ्या लोकांनी डार्क कलर्स जसे की जांभळे किंवा व्हायब्रंट असे कपडे खूप छान दिसतात.

प्राजक्ताचे फॅशन आयकॉन-
माझे फॅशन आयकॉन खूप असले तरी प्रत्येकीचच काही ना काही चुकत असतं. मात्र आलिया भट्ट हिचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे. त्याचबरोबर श्रद्धा कपूर हिचाही फॅशन सेन्स चांगला आहे. सोनम कपूर कधी- कधी खूप एलिगंड कपडे वापरते. एलिगंड म्हणजे हाय ब्रॅण्ड, हाय फॅशन तिची खूप चांगली आहे. नॉर्मल कॅज्युअल वेअर मला अनुष्का शर्मा हिचे आवडते.आता मी रोड शॉपिंग बंद केली असून ब्रॅण्ड शॉपिंग मी करते. पाच रोडवरील कपडे घेण्याऐवजी एक ब्रॅन्डेड कपडा घेतला तर तो जास्त काळ टिकतो आणि एलिगंड दिसतो. अर्थात सगळ्यांच्या खिशाला ते परवडणारे आहे, असे नाही. पण, पाच गोष्टी घेण्यापेक्षा एकच गोष्ट घ्या, पण ती चांगली घ्या यावरच माझा जास्त भर आहे.

प्राजक्ताकडून फॅशन टिप्स-
१) सध्या जे ट्रेंडमध्ये आहे, ते काहीही मी फॉलो करत नाही. "हम करे सो कायदा, हम करे सो स्टाइल, या तत्त्वावर आपण वाटचाल करावी.
२) आपल्याला काय शोभून दिसते, याचा अभ्यास करून फॅशन करावी. आपली बॉडी स्ट्रक्चर, स्कीन कलर यानुसार तुम्ही स्टाईलिंग केली पाहिजे.
३) सगळ्याच पद्धतीचे कपडे आपल्याकडे असायला हवेत. कारण, मी जिन्स घालत नसले तरी काही मिटींग्ससाठी जिन्सच चांगली वाटते. साड्या, जिन्स, सलवार कुर्ता, शॉर्ट मिनी स्कर्ट, मिनी पार्टीवेअर वन पिसेसही पाहिजे. कारण, सगळ्याच स्टाइल आपण कॅरी केल्या पाहिजेत. कारण, मला ते आवडतं. एकाच पद्धतीचे कपडे घालून मला कंटाळा येतो. आपल्या वॉर्डरोबमध्ये आपल्याला शोभणारे सर्व प्रकारच्या रंगांचेही कपडे असावेत. उन्हाळ्यात मला सुती कपडे, फ्रेश कलर्स, डोळ्यांना बरे दिसणारे रंग आवडतात. थंडीमध्ये डार्क कलर्स, कोझी जे ऊब निर्माण करतात, असे मी सिझननुसार कपडे घालते.
४) आपल्या कपड्यांबरोबर इतर वस्तूंचाही फॅशन करताना विचार करावा. कारण, कपडे चांगले घातले की अनेकजण ॲक्सेसरीज व फूट वेअरमध्ये कमी पडतात. त्यामुळे माझ्याकडे कपड्यांप्रमाणे अॅक्सेसरीज व फूट वेअर भरपूर आहे.
५) मी मिनीमलीस्टीक आहे. म्हणजे अंगावर कमी ज्वेलरी घातली पाहिजे. गळ्यात, कानात, हातात अन पायात कमी घातले पाहिजे; पण ते एलिगंट असले पाहिजे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top