इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या क्रांतिवीरांगणा हौसाक्का| Premium Article | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रांतीविरांगना हौसाक्का}

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून निर्भीडपणे लढत स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा उचलला. इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी हौसाक्का गोवा मुक्ती संग्रामासह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही सहभागी झाल्या होत्या.

इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या क्रांतिवीरांगणा हौसाक्का

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक महिलांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यापैकी क्रांतिवीरांगणा हौसाक्का पाटील एक आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून निर्भीडपणे लढत स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा उचलला. इंग्रजांना सळो की पळो करणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी हौसाक्का गोवा मुक्ती संग्रामासह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही सहभागी झाल्या होत्या. स्वातंत्र्यलढ्यात संघर्ष करताना त्यांनी महिला म्हणून न्यूनगंड बाळगला नाही. महाराष्ट्राच्या पुरोगामी, सुधारणावादी व समतेच्या चळवळीला बळ देण्याऱ्या क्रांतिवीरांगणा हौसाक्का पाटील यांच्या जीवनकार्याचा आढावा...

देशप्रेमाचे बाळकडू
हौसाक्कांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२७ रोजी वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथे झाला. हौसाक्का चार वर्षाच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वडील क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या वंशाचा दिवा मानले. देशवसेवेचा वसा घेतलेल्या वडिलांचा सहवासही हौसाक्कांना पुरेशा प्रमाणात मिळाला नाही. आईचे छत्र हरपल्यावर दुधोंडी येथे आजी गोजराबाई यांनी हौसाक्कांना देशप्रेमाचे बाळकडू पाजत आईची माया देत मोठे केले. त्यांच्यामुळेच हौसाक्कांच्या रक्तात महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ भिनली. देशभक्ती आणि इंग्रज सरकारविरुद्ध काम करण्याची मशाल आजीने पेटवली. बालपणीच देशप्रमाचे धडे गिरवलेलेल्या हौसाक्कांचा १९४०मध्ये भाई भगवान बाप्पा पाटील यांच्याशी हुंडा, मानपान, मंडप, वाजंत्री, जेवण, कोणताही धार्मिक विधी न करता ‘गांधी पद्धतीने’ विवाह झाला. ही परंपरा पुढे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवली.

पोलिसांचा ससेमिरा...
वडील व पती दोघेही स्वातंत्र्ययोद्धे असल्याने त्यांच्या कुटुंबाच्यामागे सतत पोलिसांचा ससेमिरा असायचा. इंग्रजांनी त्यांच्या घरावरती अनेक वेळा छापा टाकला. तरीही न डगमगता हौसाक्का घर, शेती सांभाळत लढत होत्या. त्यांनीही अनेकदा तुरुंगवास सोसला. पोलिसांची नजर चुकवून स्वातंत्र्यसैनिकांच्या निरोपांची देवाणघेवाण त्या करत असत. प्रति सरकारच्या कालखंडात हत्यारांची ने-आण करणे, तसेच कार्यकर्त्यांकडे ती जबाबदारीने पोहच करणे, अशी धाडसी कामेही त्यांनी पार पाडली. भूमिगत अ‍सलेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही त्या करत असत.

हेही वाचा: राजकारणात ‘शहरं’ ठरताहेत प्रभावशाली!

इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटला
सन १९४३ मध्ये साताऱ्यात गोऱ्या सरकारपासून स्वातंत्र्य मिळाल्याचे जाहीर करणाऱ्या भूमीगत, हंगामी सरकारची, प्रति सरकारची सशस्त्र सेना म्हणजे तुफान सेना होय. कुंडल हे प्रति सरकारचे केंद्र आणि जवळपासच्या सहाशेहून अधिक गावांमध्ये प्रति सरकारचा अंमल होता. क्रांतिसिंह नाना पाटील प्रति सरकारचे प्रमुख होते. क्रांतीकारी भूमीगत चळवळीचा भाग बनून हौसाक्कांनी १९४३ ते ४६ दरम्यान साताऱ्यात इंग्रजांच्या कचेऱ्यांवर हल्ले चढवले, शस्त्र पळवली, बसगाड्या आणि पोलिस चौक्या लुटल्या. सांगली जिल्ह्यातील वांगी येथील इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्याच्या मोहिमेत त्या आघाडीवर होत्या. तसेच कराडजवळील सुर्ली घाटात इंग्रजांचा त्यांनी खजिना लुटत दोन्ही मोहिमांत त्यांनी यशस्वी केल्या. याकाळात हौसाक्का आणि त्यांच्या पथकाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. इंग्रजांच्या विरोधातील लढ्यात प्रति सरकारमधील कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची सोंग व विविध कल्पना लढवून इंग्रजांना जेरीस आणले होते. यातील एक आठवण हौसाक्कांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. दारुड्या नवऱ्याने (तोतया) त्यांना भवानी नगरच्या पोलिस चौकीसमोर मारायला सुरुवात केली. चौकीतील चारपैकी दोन पोलिस जागेवर होते, तर दोन जण जेवायला गेले होते. मग त्यांच्या नवऱ्याने एक मोठा दगड उचलला अन् ‘आता हितंच या दगडानं तुझा जीव घेतो बघ,’ असे करत गुरकावला. त्याचा हा आरडाओरडा ऐकून चौकीतले दोघे पोलिस बाहेर आले. त्यांनी भांडण सोडवायचा प्रयत्न केला. तेव्हाच हौसाक्का तिथेच असलेल्या त्यांच्या भावाला विनवत होत्या, त्यांना असल्या मारकुट्या नवऱ्याकडे नांदायला जायचे नाही म्हणून पण त्यांच्या भावानं काही त्यांचे ऐकले नाही. पोलिसांनी किती तरी वेळ त्या दोघांना समजावयचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी समजूत घातली आणि या जोडप्याला त्यांच्या गावी जाणाऱ्या गाडीत बसवून दिले. हे सगळे सुरू असताना दुसरीकडे हौसाक्कांच्या साथीदारांनी पोलिस चौकी लुटली होती. तिथे असलेल्या चार रायफली पळवल्या. ते सगळे करता यावे म्हणूनच हौसाक्का आणि त्यांच्या तोतया पतीने आणि भावाने हे नाटक केले होते. यातून महिलादेखील कर्तृत्ववान, शूर आणि बुद्धिमान असतात, हे हौसाक्कांनी दाखवून दिले.

शेतकऱ्यांसाठी लढा
स्वातंत्र्यानंतर देखील अनेक आंदोलनांमध्ये त्यांना तुरुंगवास झाला. पण त्या डगमगल्या नाहीत. त्या कायम बाणेदारपणे लढत राहिल्या. गोवा मुक्ती लढ्यातही त्या सहभागी झाल्या. मांडवी नदी पार करून पणजीत पोहोचत धाडसी कामगिकी त्यांनी फत्ते केली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्या अग्रभागी होत्या. १९५८ साली कर्नाटक- महाराष्ट्र सीमा प्रश्‍नावरील आंदोलनात निपाणी येथे सहभागी झाल्या होत्या. हैदराबाद मुक्तिसंग्राम व मराठवाडा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता. शेतकरी कामगार पक्षात सहभागी होत त्यांनी शेतीमालास वाजवी दर मिळावा, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी त्यांनी लढे उभारले. कष्टकरी वर्गाला न्याय मिळावा, यासाठीही त्या सतत व्यवस्थेविरुद्ध लढत राहिल्या. भाजप सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, तेव्हा बालगंर्धव रंगमंदिरात हौसाक्कांनी जाहीर विरोध केला. सांगलीत शिवसन्मान जागर परिषदेमध्ये जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यावर सनातन्यानी येऊन हल्ला केला. तेव्हा कार्यक्रमात सनातन्यांच्या विरुद्ध हातात काठी घेऊन त्या उभ्या राहिल्या. २००२मध्ये खानापूर येथील तहसील कार्यालयासमोर शंभर दिवसांहून अधिक दिवस धरणे आंदोलन केले होते.
महागाई, अवैध वाळू उपसा अशा विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली. आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक- सांस्कृतिक लढ्यासाठी त्यांनी समर्पित केले.

हेही वाचा: मावळातील अल्पपरिचित लेणी आणि धबधबे

आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी अंजन
इतिहासाचे अभ्यासक प्रा. श्रीमंत कोकाटे म्हणाले, ‘‘हौसाक्का त्या काळात सशस्त्र लढल्या. त्याप्रमाणे सध्याच्या मुलींनी कोणत्याही परिस्थिती पुढे हार न मानता लढले पाहिजे. हौसाक्का सत्यशोधक चळवळीशी प्रामाणिक होत्या. कर्मकांडावर त्यांचा विश्‍वास नव्हता, तर स्वकर्तृत्वावर होत्या. त्या स्वतः बुद्धीप्रामाण्यवादी होत्या. आपल्याकडे मुलाला वंशाचा दिवा मानला जातो. परंतु, वयाच्या तिसाव्या वर्षी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्नीचे निधन झाल्यावर दुसरा विवाह केला नाही. मुलीलाच वंशाचा दिवा मानले आणि हौसाक्कांनीही त्यांच्या कार्यातून मुलगी ही लढाऊ असते, हे दाखवून दिले. यातून आजच्या पिढीने शिकले पाहिजे. मुलागा वंशाचा दिवा आहे, त्याप्रमाणे मुलगीही वंशाचा दिवा आहे. मुलगी झाली म्हणून निराश होऊ नये. आपल्या भारतीय समाज वृत्तीमध्ये पराक्रमी, शूर, लढवय्ये फक्त पुरूषच असतात. ही अंधश्रद्धा आहे. मुलगी सुद्धा लढाऊ, पराक्रमी, हिंमत असते हे हौसाक्कांनी दाखवून दिले. आजसुद्धा आपल्या समाजामध्ये मुलींना दुबळे समजले जाते. आजसुद्धा आपल्याकडे महिलांचे खूप मोठे प्रश्‍न आहेत. महिलांवर अन्याय, अत्याचार करणे, त्यांना त्रास देणे, खच्चीकरण करणे असे प्रकार घडतात. त्याकाळी ब्रिटीश सरकारनेही हौसाक्कांच्या घरावर सतत छापे टाकले. वडील, पती यांना तुरूगांत डांबले. तरी देखील त्या हतबल झाल्या नाहीत. तर त्या बाणेदारपणे लढल्या. त्या रडणाऱ्या नव्हत्या, तर लढणाऱ्या होत्या. आज महिलांच्या मुलींच्या जीवनात अनेक संकटे येतात. त्याने नाउमेद न होता सामोर गेले पाहिजे. महात्मा फुले व संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा हौसाक्कांवर प्रचंड प्रभाव होता. आज २१व्या शतकात मुली सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. समाजाने आपली मानसिकता बदलली पाहिजे. हौसाक्का इतिहासातील महामानव आहेत तर वर्तमानातील दीपस्तंभ आहेत.

खुर्च्याच जाळाय पाहिजे...
‘गोरं घालिवलं अन् काळं आलं, त्यापेक्षा खुर्च्याच जाळाय पाहिजे होत्या,’ अशा शब्दांत राजकारणाविषयीची कटुता हौसाक्कांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.

क्रांतिकारक दुवा निखळला...
सांगली जिल्ह्यातील हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे हौसाक्कांचे अखेरपर्यंत वास्तव्य होते. वयाच्या ९५व्या वर्षी, २३ सप्टेंबर २०२१ रोजी हौसाक्का पाटील यांचे कराड येथील रुग्णालयात निधन झाले. ‘‘ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी हौसाक्का पाटील यांच्या निधनाने आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील क्रांतिकारक दुवा निखळला आहे. त्यांचे जीवन कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रांतिवीरांगणा हौसाक्का पाटील यांना सोशल मीडियद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.’

हौसाक्का पाटील यांचा जीवनपट
जन्म ः १२ फेब्रुवारी १९२७
विवाह ः १९४०मध्ये भाई भगवान बाप्पा पाटील यांच्याशी लग्न
-१९४३ मध्ये साताऱ्यात इंग्रजांच्या कचेऱ्यांवर हल्ले.
- १९५८मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्‍नावरील आंदोलनात सहभाग
- २००२मध्ये खानापूर येथील तहसील कार्यालयासमोर शंभर दिवसांहून अधिक दिवस धरणे आंदोलन
मृत्यू ः २३ सप्टेंबर २०२१

आत्मचरित्रासाठी...
हौसाक्का पाटील यांच्यावरील अधिक माहितीसाठी ‘मी क्रांती मी संघर्ष’ हे दमयंती पाटील यांनी शब्दांकन केलेले आत्मचरित्र वाचता येईल.

टॅग्स :Day Maharashtra