काळ्या जादूचे ‘चक्रव्यूह’ भेदताना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

black magic}

महिलेच्या डोक्यावर लिंबू कापून तिचे केस उपटून काळ्या बाहुलीला चिकटविण्यात आले. तसेच, अमावस्येच्या रात्री रिंगणात बसवून तिच्यावर अघोरी प्रकार केला गेला... या आणि अशाच प्रकराच्या अनेक घटना राज्यात सर्वत्र घडताना दिसतात.

काळ्या जादूचे ‘चक्रव्यूह’ भेदताना

राहुरी इथं एका नवविवाहितेवर काळ्या जादूचा अघोरी प्रकार करण्यात आला. या प्रकारात त्या महिलेच्या डोक्यावर लिंबू कापून तिचे केस उपटून काळ्या बाहुलीला चिकटविण्यात आले. तसेच, अमावस्येच्या रात्री रिंगणात बसवून तिच्यावर अघोरी प्रकार केला गेला... या आणि अशाच प्रकराच्या अनेक घटना राज्यात सर्वत्र घडताना दिसतात. समाज सुशिक्षत झाला असला, तर या घटनांची संख्या कमी होताना दिसत नाही. काळ्या जादुचा हा चक्रव्यूह कसा भेदायचा, या प्रश्‍ना‍चे उत्तर शोधताना.

महाराष्ट्र पुरोगामी आहे, असं म्हटलं जातं. कारण, महाराष्ट्राला संतांचा वारसा आहे. संतांनी भोळ्याभाबड्या जनतेला अंधश्रद्धांमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजही उच्चशिक्षित मंडळी, विज्ञानाची पदवी घेतलेले लोक मंत्रतंत्रांवर विश्वास ठेवतात. राज्यात पूर्वीपासूनच अंधश्रद्धाळू लोक आहेत. सतीप्रथा, जातिव्यवस्था, सामाजिक असमानता, अशा कितीतरी अंधश्रद्धा इथे प्रचलीत होत्या आणि त्यातील काही आजही आहेत. मागच्या आठवड्यात साताऱ्यातील एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तिच्या बाबतीत अघोरी प्रकार करत असल्याचं दिसत होतं. त्यामुळं राज्याच्या काही भागात काळ्या जादूची प्रथा आजही पाहायला मिळते. कधी समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी, तर कधी कुठला तरी हव्यास पूर्ण करण्यासाठी काळ्या जादूचा आधार घेतला जातो.

आज २१व्या शतकातही आपण नरबळीसारख्या घटना ऐकतो. काळ्या जादूचा प्रभाव आजही असल्याचं अलीकडच्या काळात घडत असलेल्या घटनांवरून अधोरेखित होतं. अठराविश्व दारिद्र्य आणि त्यात निरक्षरतेची भर असल्यायामुळं हे लोक चटकन काळ्या जादुकडं आकर्षित होतात. जादूटोणा या प्रकारांत मानवी कवट्या आणि काही जनावरांची हाडे आढळतात. काळ्या जादुसारख्या अघोरी प्रथेचं मोठं प्रस्थ आहे. राज्यातील काही भागात अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा आहे. वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्याचा दावा करणारे अनेक भोंदू बाबा इथे आहेत. लोक जेव्हा या बाबांकडं आपल्या समस्या घेऊन जातात, तेव्हा हे बाबा समस्या दूर करण्याचा आव आणून त्यांना महिलांना संबंध ठेवण्यास भाग पडतात, अशा अनेक घटना समाजात घडत आहेत. त्याचा घेतलेला आढावा.

पुरावे काळ्या जादुचे
१) सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मनोहर मामा यानं असाध्य रोगांवर दैवी उपाय सांगणे, करणी-भानामती सोडवणं, अशा गोष्टीतून बुवाबाजी सुरू करून लोकांकडून पैसे उकळले. तसंच, बारामतीमधील एका पीडिताला वडिलांचा कॅन्सर दैवी उपायांनी बरा करतो, असं सांगून त्यांनी लाखोंचा गंडा घातला.
२) नाशिकमधील एका व्यक्तीने कोविड लस घेतल्यावर शरीरात चुंबकत्व निर्माण झाल्याचा दावा केला होता. पण, वस्तू चिकटण्यामागे घामातील सिबम हा घटक असल्याचे समोर आले.
३) पुण्यामध्ये मुस्लिम कुटुंबाला करणीची भीती दाखवत सहा लाखांचा फसवणूक केली होती. पण, नंतर त्याच्यावर कारवाई केली.
४) सांगलीत कुटुंबात कलह निर्माण करणारी मांत्रिकबाईने सांगितले की, तुमच्या सासूनं तुमच्यावर करणी केल्यामुळं तुम्हाला त्रास होतो. त्या मांत्रिकबाईनं पीडित महिलेला करणीची भीती घालून अनेकदा पैसा, महागड्या वस्तू उकळल्या. त्या मांत्रिकबाईच्या सल्ल्यानं त्यांच्या घरात कलह निर्माण झाल्याने त्या मांत्रिकबाईवर गुन्हा दाखल झाला.
५) पुण्यात पुन्हा एकदा पैसे लुबाडल्याची घटना घडली. त्यामध्ये पुण्यातील इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्यावर करणी झाल्याचं सांगून देवऋषीनं बारा लाखाची आर्थिक फसवणूक केली.
६) साताऱ्यातील लोणंद तालुक्यातील देवऋषी स्वतःच्या अंगात दत्त संचारल्याचे सांगून त्यानं करणी, भूतबाधा, शारीरिक समस्येवर उपाय सांगण्याचा प्रकार समोर आला.

हेही वाचा: ‘विस्मरणा’कडे नको दुर्लक्ष

७) राहुरी इथं एका नवविवाहितेवर काळ्या जादूचा अघोरी प्रकार करण्यात आला. या प्रकारात त्या महिलेच्या डोक्यावर लिंबू कापून तिचे केस उपटून काळ्या बाहुलीला चिकटविण्यात आले. तसेच, अमावस्येच्या रात्री रिंगणात बसवून तिच्यावर अघोरी प्रकार केला गेला.
८) नागपूर जिल्ह्यातील रनाळा इथं एका महिलेला भूतबाधा झाल्याचं सांगून तिच्याशी अश्‍लील चाळे केल्याचं समोर आलं.
९) पुण्यातील हवेली तालुक्यातील एका नवविवाहितेचा तिची सासरकडील मंडळी मांत्रिकाच्या सांगण्यावरून शारीरिक व मानसिक छळ केला. खेड तालुक्यातील एका विवाहितेला दोन मुली झाल्यानं वंशाला दिवा हवा म्हणून पती आणि सासू या दोघांनी मिळून पत्नीच्या संपूर्ण अंगाला भोंदूबाबाकडून आणलेला अंगारा आणि हळदी-कुंकू फासले.
१०) बुलढाण्यातील नांदुरा येथे एका घरातील वस्तू, कपडे अचानक पेट घेत. त्यामुळे कुटुंबाचे बरेच नुकसान झाले. कुटुंबातील छोटी मुलगी दुसऱ्यांना भीती दाखविण्यासाठी हे सर्व प्रकार करत असल्याचे समोर आले.
११) सांगलीतील कवठेमहांकाळ येथील एका नंदीवाले समाजातील कुटुंबावर जातपंचायतीनं बहिष्कार टाकत त्यांना समाजातून वाळीत टाकलं. पण, पोलिसांच्या मदतीनं पंचांना आदेश देऊन बहिष्कार उठविला.
१२) पुण्यातील मावळ तालुक्यातील एका गर्भवती महिलेवर तिच्या कुटुंबानं एका मांत्रिकाकडून अघोरी उपचार करवून घेतले. पण, बाळंतपणासाठी तातडीनं दवाखान्यात न घेऊन जाता तिला भगताकडे घेऊन गेल्यामुळे तिचा वैद्यकीय उपचारांअभावी मृत्यू झाला.
या सर्व घटना वर्षभरामध्ये घडल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्षिक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

अशा चालतात अघोरी प्रथा, चमत्काराच्या नवाखाली फसवणूक
अनेक जण आपल्या अलौकिक शक्तीनं लोकांच्या आयुष्यातील चिंता, नैराश्य किंवा पिशाच्च बाधा दूर करण्याचा दावा करतात. असा दावा करून लोकांना लुबाडणे, हा त्यांचा व्यवसायच बनला आहे. ते आधी लोकांच्या भावनांशी खेळतात. त्यांच्यामध्ये एकदा मानसिक गंड निर्माण केला की, असे लोक छोट्यातील छोट्या संकटाच्या काळातही सतत बाबांचाच धावा करतात. अशा प्रकारे लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्याची कलाच त्यांना अवगत असते. लोकांच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांना लुबाडतात.

भानामती
अंगावर व कपड्यांवर बिब्ब्यांच्या फुल्या उठणं, घरातील वस्तू जागेवरून आपोआप हलू लागणं, बंद कपाटातून वस्तू बाहेर येणं, कपडे आपोआप पेटणें, घरात विष्ठा पडणं, पैसे नाहीसे होणं, घरातले पदार्थ कडू, खारट होणं, डोळ्यांतून काचा, खडे, सुया निघणं या सर्व गोष्टी भानामतीचे प्रताप म्हणून समजल्या जातात. मराठवाड्यातील भाग (नांदेड, परभणी जिल्हे) या ठिकाणी स्त्रियांच्या अंगात येऊन घुमण्याच्या प्रकाराला भानामती म्हणतात.

चेटूक
लोकांमध्ये अशी भावना असते, की झटपट श्रीमंत झालेल्या कुटुंबाकडं चेटूक असतं. विशिष्ट ठिकाणी ही चेटके मिळतात. ज्याच्या घरी चेटूक आहे, तिथं वैभव असतं, कारण चेटूक शेजारच्या घरातील वस्तू (पोळ्या, भाकरी इ.) अगर शेजारच्या खळ्यातील राशीमधले धान्य गुप्तपणे आपल्या मालकाच्या घरात अगर खळ्यात घेऊन येते. भानामती म्हणजे मानवी हाताच्या भौतिक, रासायनिक करामती असतात.

करणी
ग्रामीण भागात सांगितलं जातं की, आपले कपडे बाहेर वाळत टाकू नयेत, केसांचा गुंता बाहेर टाकू नये, रस्त्यानं जाताना चौफेर लक्ष ठेवावं, कारण आपल्या पायाखालची माती कुणी नेऊ नये. (ग्रामीण भागातील रस्ते मातीचे असायचे) कारण वस्त्र, केस घेऊन त्याची आपल्या नावाची काळ्या रंगाची बाहुली बनवते आणि आपल्यावर करणी करतात. अशा प्रकारची भीती ग्रामीण भागातील लोकांमध्ये रुजवली जाते.

हेही वाचा: ‘तो’ शानदार प्राणी भारतात परततोय

जादूटोणा
सामान्य जणांना अज्ञात अशा युक्तिप्रयुक्तींनी, हातचलाखीने प्रेक्षकांना भुलवून नकळत विविध प्रकारचे चमत्कारजनक दृश्य करून दाखवणं. त्याठिकाणी तयार केलेले आभासी कृत्य हे डोळे, कान, नाक, त्वचा व जीभ यांना जाणवणारा प्रकार. त्यामध्ये किमयाही येते असते. पहिल्या अर्थानं जादूटोणा किंवा दुसऱ्या अर्थाने जादूचा खेळ, असा शब्दप्रयोग करणं योग्य ठरेल.

नरबळी
कोणीतरी कधीतरी जमिनीत धन पुरून ठेवलं आहे, असं मानून ते गुप्तधन मिळवून श्रीमंत होण्यासाठी गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय असतात. नरबळी म्हणजे मनुष्यप्राण्याचा बळी दिला, तर गुप्तधन हमखास सापडतं, अशीही एक अंधश्रद्धा अशा लोकांमध्ये असते. मग त्यासाठीच बळी देण्यासाठी नर शोधायचा आणि मग त्याचा जीव घेऊन धन हुडकायचे, असे प्रकार होत राहतात. ते करणाऱ्यांना धन तर सापडत नाहीच, पण कुणाच्या तरी घरचं पुत्रधन मात्र हे नरपशू कायमचे नष्ट करून टाकतात.

अघोरी प्रथांचा अवलंबन व उदात्तीकरण
स्वतःला अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूनं लोक कोणत्या ही थराला जातात. त्यामध्ये स्वतःच्या जिवाला धोका निर्माण केला जातो. तसेच शरीराला जीवघेण्या जखमा होतात, अशा अमानुष अनिष्ट व अघोरी स्वतः यांचा अवलंब करतात. तसेच अशा प्रथांचा अवलंब करण्यास समाजातील इतर लोकांना प्रवृत्त करताना दिसतात.

अतींद्रिय शक्तीच्या भीतीनं फसवणूक
संधी साधू लोक आपल्या अंगात अतींद्रिय असल्याचं भासवतात. त्यातून पैसा, दागिने आदीआमिष दाखवतात. तसेच हे करण्यास काही व्यक्ती मान्य नसल्यास त्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या व इतर लोकांच्या मनात भीती निर्माण करतात. तरीही ती व्यक्ती सहमत नसल्यास त्या व्यक्तीला सांगितलं जातं की, त्याचं नाही ऐकले तर वाईट परिणाम होतील, अशा अनेक प्रकारच्या भीती घालून फसवणूक करतात.

नग्नावस्थेत धिंड काढणं
जारणमारण, करणीच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला चुकीचे ठरवून त्याला मारहाण करणे. तसंच त्याला समाजातून तिची किंवा त्याला नग्नावस्थेत धिंड काढून लज्जास्पद वागणूक देणे. तसेच तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.

मंत्र-तंत्राद्वारे भूत पिशाच्चांना आवाहन
मंत्राच्या साहाय्यानं भूत पिशाच्यांचा आवाहन करून किंवा भूत पिशाच्चांना आवाहन करीत अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट निर्माण करणं. तसेच, एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा होण्यास भुताचा किंवा अतींद्रिय शक्तीचा कोप असल्याचा समज करणे. जादूटोणा अथवा अमानुष कृत्ये करून किंवा तसा आभास करून एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती घालणं.

वैद्यकीय उपचारांपासून परावृत्त करणं
ग्रामीण भागात निरक्षता व अज्ञानामुळं चुकीचे समज पसरतात. तसेच, तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळं कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यावर एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यासापासून रोखून त्याला मंत्रतंत्र गंडेदोरे किंवा यासारखे उपचार करणं.

पुत्रप्राप्तीचे आमिष दाखविणे
स्वतःमध्ये विशेष अलौकिक शक्ती असल्याचे सांगणे, तसेच कुणाचा तरी अवतार असल्याचं वा स्वतःच पवित्र आत्मा असल्याचं भासवून लैंगिक संबंध ठेवले जातात.

मानसिक विकलांग व्यक्तीचा उपयोग
एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचं भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा किंवा व्यवसाय यासाठी करणे.

करणी, जादूटोण्याचा आरोप
एखादी विशिष्ट व्यक्ती करणी, जादूटोणा करते किंवा भूत लावते किंवा मंत्रतंत्रानं जनावरांचं दूध आटते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तशी समजूत निर्माण करणं, किंवा एखादी व्यक्ती अपशकुनी आहे किंवा रोगराई पसरण्यास कारणीभूत ठरणारी आहे, असं भासवणं, अशा व्यक्तीचं जगणं मुश्कील करणं, तसेच ती व्यक्ती सैतान असल्याचं किंवा ती सैतानाचा अवतार असल्याचं सांगणं.

हेही वाचा: कोरोनोत्तर शिक्षणाला दिशा

हा आहे कायदा
‘‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अध्यादेश २०१३ (अनुसूची कलम २(१)ख)’’-

कायद्यानुसार यावर आहे बंदी
- भूत भानामतीवरील विश्वासातून बळजबरीने अघोरी उपाय योजणे
- तथाकथित चमत्कारातून आर्थिक प्राप्ती, फसवणूक व दहशत पसरविणे
- अलौकिक शक्तीच्या हव्यासापोटी अघोरी प्रथांचा अवलंब करणे व त्याचे उदात्तीकरण करणे
- करणी, भानामती, जादूटोण्याची भीती दाखवून अमानुष कृत्य करणे व नरबळी देणे
- अतींद्रिय शक्तींचा शरीरातील संचाराचा दावा करून भीती, धमकी व फसवणूक करणे
- विशिष्ट व्यक्तीवर करणी, जादूटोण्याचा आरोप करून व त्याला सैतान ठरवून त्याचे व तिचे जगणे मुश्कील करणे
- चेटूक केल्याचा आरोप करून नग्नावस्थेत धिंड काढणे, मारहाण करणे व समाजातून बाहेर काढणे
- मंत्र-तंत्राद्वारे भूत पिशाच्चांना आवाहन केल्याचा आभास निर्माण करून घबराट व अघोरी कृत्य करण्यास भाग पाडणे
- साप, विंचू चावल्यास वैद्यकीय उपचारापासून परावृत्त करून मंत्र-तंत्र, गंडेदोरे यांचा अवलंब करणे
- रक्तविरहित शस्त्रक्रियेचा आभास निर्माण करून लिंग बदलाचा वा इतर उपचाराचा दावा करणे
- अलौकिक शक्तीच्या आभासातून पूत्रप्राप्तीचे आमिष दाखविणे, अवतारी व्यक्ती, पवित्र आत्मा वा पुनर्जन्म या आभासातून लैंगिक शोषण करणे
- मानसिक विकलांग व्यक्तीला अलौकिकता बहाल करून फसवणूक करणे

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा उद्देश
समाजातील चुकीच्या विचारांची जळमटे दूर व्हावी. तसेच भोंदू बाबांवर आळा बसावा. या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा उद्देश आहे.

वैचारिक असमर्थतेचा गैरफायदा
आधी आपली अशी धारणा होती, अघोरी प्रथा, पंरपरा ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार-प्रचार झालेल्या नाही त्या ठिकाणी म्हणजे मेळघाटात, विदर्भाच्या काही भागात होत असतात. पण, प्रत्यक्षामध्ये सांगली, सोलापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये, म्हणजे जिथे शिक्षणाचा प्रसार महाराष्ट्रात जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये आणि उच्चशिक्षित लोक त्याला बळी पडतात. एका बाजूला शिक्षणाचा प्रभाव वाढला असला तरी डॉ. नरेंद दाभोलकर म्हणण्याचे, ‘विज्ञानाची सृष्टी घेतली, पण दृष्टी नाही घेतली.’ आपल्या शिक्षणामध्ये चिकित्सा विचार करण्याची क्षमता शिकवली जात नाही. समाजात अस्थिरता वाढते, ताणतणाव वाढतात किंवा कुटुंबामध्ये टोकाचे आजार म्हणजे त्याला उपचार नाही, अशा स्वरूपाचे आजार किंवा अतिशय अडचणीच्या परिस्थिती निर्माण होतात, त्यावेळी माणसांचा विचार करायची मेंदू हा काम करेनासा होतो, त्या परिस्थितीमध्ये अशा भोंदू बाबांना ते बळी पडतात.
- डॉ. हमीद दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

टॅग्स :Maharashtra NewsPremium