महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या निर्मितीची गोष्ट ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District in Maharashtra}
महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या निर्मितीची गोष्ट...

महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या निर्मितीची गोष्ट ...

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० मध्ये झाली. यावर्षी राज्य निर्माण होऊन ६२ वर्षे होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी राज्यात असणाऱ्या २६ जिल्ह्यांमध्ये १० ने भर पडून आजघडीला राज्यात ३६ जिल्हे आहेत. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची गोष्ट मोठी रंजक आहे. बासष्ठ वर्षांतील जिल्हानिर्मितीच्या या प्रवासाविषयी...


आपल्या सर्वांना ज्ञात असल्याप्रमाणे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही सहजसाध्य घडलेली बाब नव्हती. तर ती महत्प्रयासाने साध्य केलेली गोष्ट होती. राज्याच्या निर्मिती पूर्वीचा इतिहास पाहिला असता, ब्रिटिश आमदनीत सध्याचं महाराष्ट्र राज्य (अर्थात मराठी भाषिक प्रदेश) तीन भागांत विभागला गेला होता. यामध्ये सध्याचा मुंबई, कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र हा प्रदेश तत्कालीन मुंबई प्रांतात, मराठवाडा विभाग हा निजामाच्या अधिपत्याखालील हैदराबाद या संस्थानात तर, सध्याचा वऱ्हाड आणि विदर्भ हा प्रदेश तत्कालीन मध्य प्रांत आणि वऱ्हाड या प्रांतात समाविष्ट होता.

हेही वाचा: बोइंग 737 मॅक्स विमानांची महत्वाची माहीती कंपनीने का लपवली ?

ब्रिटिशांनी आपल्या सोयीप्रमाणे या प्रांतांची निर्मिती केली होती. त्यामध्ये कोणताही एकसंधपणा नव्हता. तसेच प्रशासनाच्या सोयीचाही कोणताही भाग यामध्ये विचारात घेण्यात आला नव्हता. ज्या आधारे स्वातंत्र्योत्तर काळात राज्यांची निर्मिती करण्यात आली, त्या भाषा या घटकाला तर त्या रचनेमध्ये गौण स्थान होते. यामध्ये मुंबई प्रांतामध्ये मराठी भाषक भागाप्रमाणेच कन्नड, गुजराती आणि सिंधी भाषक भागाचाही समावेश होता. हैदराबाद संस्थानातही मराठी भाषक जिल्ह्यांप्रमाणेच तेलूगू आणि कन्नड भाषक जिल्ह्यांचाही समावेश होता. तसेच मध्य प्रांतातही मराठी भाषक जिल्ह्यांप्रमाणेच हिंदी भाषक प्रदेशाचाही समावेश होता. थोडक्यात, स्वातंत्र्योत्तर काळात भाषावर प्रांतरचनेच्या तत्त्वामुळे यामध्ये सुसूत्रता आणण्यात आली.

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी म्हणजेच १९४७ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतातील मराठी भाषक जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, ठाणे, कुलाबा (सध्याचा रायगड), रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, पूर्व खान्देश (जळगाव) आणि पश्चिम खान्देश (धुळे) या १२ जिल्ह्यांचा समावेश होता. हैदराबाद संस्थानातील मराठी भाषिक जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड या ५ जिल्ह्यांचा समावेश होता. (यामध्ये सध्याच्या लातूर जिल्ह्यात असणाऱ्या उदगीर, अहमदपूर या भागाचा समावेश त्यावेळच्या निजाम आमदनीतीलच बीदर या जिल्ह्यामध्ये होता.) तर तत्कालीन मध्य प्रांतातील मराठी भाषिक जिल्ह्यांमध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चांदा अशा ८ जिल्ह्यांचा समावेश होता. वेगवेगळ्या विभागांत विभागलेल्या, एकसंध नसलेल्या मराठी भाषक प्रदेशात त्यावेळी एकूण २५ जिल्हे होते. हे सर्व जिल्हे त्यावेळेच्या इंग्रजी प्रशासनाने त्यांच्या सोयीने, त्यांनी ज्याप्रमाणे जिंकले तसे निर्माण केले होते. त्यामुळे आकारानेही हे जिल्हे अवाढव्य म्हणावे इतके मोठे होते.

हेही वाचा: कशी झाली शेअर बाजाराची सुरुवात....

स्वातंत्र्यानंतर लगेचच १९४९ मध्ये तत्कालीन सातारा जिल्ह्यातील दक्षिण भाग वेगळा करून त्या भागाचा स्वतंत्र जिल्हा करण्यात आला. त्यापूर्वीच्या काळात तत्कालीन सातारा जिल्ह्यात सध्याच्या सातारा आणि सांगली या जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातीलही काही परिसराचाही समावेश होत होता. त्याच्या निर्मितीमुळे राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या २६ झाली. सुरुवातीला बराच काळ या नवनिर्मित जिल्ह्याला दक्षिण सातारा या नावाने ओळखले जात होते. मात्र, राज्याच्या निर्मितीनंतर त्या भागातील राजकीय धुरीणांच्या पुढाकाराने जिल्ह्याचं नाव सांगली असं करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात सुरुवातीला शिराळा, वाळवा, मिरज, खानापूर, तासगाव आणि जत या ६ तालुक्यांचा समावेश होता. कालौघात या जिल्ह्यात कवठे महांकाळ, आटपाडी, पलूस आणि कडेगाव या नव्या ४ तालुक्यांची निर्मिती करण्यात आली.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सुरुवातीची २०-२२ वर्षे राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली नाही. साधारणपणे १९८० च्या दशकात राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा विचार सुरू झाला. यामध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या पुढाकाराने नवीन चार जिल्हे निर्माण करण्यात आले. यामध्ये १ मे १९८१ रोजी कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. तळकोकणाचा भाग त्याकाळी रत्नागिरी जिल्ह्यातच समाविष्ट असल्याने त्या जिल्ह्याचा आकार प्रचंड अशा स्वरुपाचा होता. म्हणजेच उत्तरेला दापोली आणि दक्षिणेला सावंतवाडी इतका मोठा तो जिल्हा होता. या जिल्ह्यात त्यावेळी देवगड, कणकवली, वैभववाडी (हा भाग पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात होता), कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तालुक्यांचा समावेश करण्यात आला. तसेच याच दिवशी मराठवाड्यातील औरंगाबाद या जिल्ह्यातून त्यावेळी जिल्ह्याच्या पूर्वेकडे असणाऱ्या भागात जालना या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. ब्रिटिश काळापासून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी त्यावेळी अखेर पूर्णत्वास गेली. या नव्या जिल्ह्यात भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, जालना, अंबड, घनसावंगी, परतूर आणि मंठा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला.

पुढच्यावर्षी म्हणजे १९८२ मध्ये १६ ऑगस्ट या दिवशी मराठवाड्यातच त्यावेळी उस्मानाबाद या आकाराने मोठ्या जिल्ह्यातून लातूर या बाजारपेठेच्या गावाची जिल्ह्याची मागणी पूर्ण करण्यात आली. या जिल्ह्यात लातूरसह रेणापूर (हा परिसर पूर्वी बीड जिल्ह्याचा भाग होता), औसा, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, चाकूर, अहमदपूर, जळकोट आणि उदगीर या तालुके समाविष्ट करण्यात आले. (या वेळी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील येडशी आणि परिसराचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात करण्यात आला.) तर, त्याचवर्षी २६ ऑगस्ट रोजी विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यातून आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित भाग असणाऱ्या गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. राज्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या या जिल्ह्यात देसाईगंज वडसा, कुरखेडा, कोर्ची, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला. अशाप्रकारे, १९८२ मध्ये राज्यातील जिल्ह्यांची संख्या २६ वरून ३० इतकी झाली.

त्यानंतर काळात मुंबई हे महानगर पूर्वी एकाच जिल्ह्याचा भाग होते. नंतरच्या काळात १ ऑक्टोबर १९९० रोजी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना महानगराचा असणारा एकाच जिल्ह्यावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने मुंबई या एका जिल्ह्यातून बृहन्मुंबईत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन स्वतंत्र जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. नव्याने निर्माण केलेल्या मुंबई उपनगर या जिल्ह्याचे वांद्रे (पूर्व) या ठिकाणी मुख्यालय करण्यात आले. तसेच यामध्ये कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला. या नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे राज्यातील जिल्ह्यांची संख्या त्यावेळी ३१ इतकी झाली.

त्यानंतरच्या काळात बराच काळ जिल्हानिर्मितीची प्रक्रिया काहीशी मागे पडली. या काळात राज्यच्या राजकारणात मोठा बदल घडला, तो म्हणजे राज्यात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेसी पक्षांची सत्ता आली. यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आघाडीची सत्ता येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री तर भारतीय जनता पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळाले. ही आघाडी जिल्हानिर्मितीच्या बाबतीत सुरुवातीला काहीशी उदासीन राहिली. मात्र, त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात त्यांनी १ जुलै १९९८ रोजी मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत खान्देशातील धुळे जिल्ह्यातून आदिवासीबहुल नंदुरबार या नव्या जिल्हा निर्माण केला. यामध्ये जिल्ह्याच्या उत्तरेकडील अक्राणी, अक्कलकुवा, तळोदा, शहादा, नंदुरबार, नवापूर या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला. त्याचदिवशी विदर्भातील अकोला जिल्ह्यातून नव्याने वाशिम या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या नवनिर्मित जिल्ह्यामध्ये रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरुळपीर, कारंजा (लाड) आणि मानोरा हे तालुके समाविष्ट करण्यात आले.

यानंतरच्या काळात युती शासनाने १ मे १९९९ रोजी नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठवाड्यातील परभणी या जिल्ह्यातून नव्याने हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या नव्या जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या परभणी जिल्ह्यातील जुन्या तालुक्यांसह नव्याने निर्माण केलेल्या सेनगाव आणि औंढा नागनाथ या तालुक्यांचा समावेश करण्यात आला. याच दिवशी विदर्भातील राज्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या भंडारा या जिल्ह्यातून नव्याने रेल्वे जंक्शन व बाजारपेठेमुळे प्रसिद्ध असणाऱ्या गोंदिया येथे जिल्हा मुख्यालयाची स्थापना केली. नागझिरा व नवेगाव बांध यांसारखी अभयारण्ये असणाऱ्या या जिल्ह्यात गोंदियासह तिरोरा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडक अर्जुनी, देवरी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आला.

त्यानंतरच्या काळात राज्यात १९९९ ते २०१४ या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीची सत्ता होती. या काळात राज्यात आघाडीने नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली नाही. राज्यात अनेक ठिकाणी नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित असतानाही या पंधरा वर्षांच्या काळात शेवटच्या टप्प्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ठाणे जिल्ह्यातून, पालघर या नव्या जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. आत्यंतिक शहरीकरण झालेल्या आणि सागरी, आगरी, डोंगरी आणि नागरी अशी विभागणी झालेल्या ठाणे या जिल्ह्यातून नव्याने जिल्ह्यांची निर्मिती करण्याची नागरिकांची मागणी अनेकवर्षे होती. सरतेशेवटी, या मागणीला यश येऊन यातील डोंगरी तसेच आदिवासी समाजाचे प्राबल्य असणाऱ्या भागात पालघर या ठिकाणी मुख्यालय ठेवून जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. नव्या जिल्ह्याचे मुख्यालय पालघर, डहाणू की जव्हार या ठिकाणी करावे, अशी मागणी तिन्ही ठिकाणांहून झाली. मात्र, यामध्ये यामध्ये सोयीचा विचार करता पालघरची निवड करण्यात आली. या नव्या जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे तालुके समाविष्ट करण्यात आले.

अशाप्रकारे, राज्यात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या ६२ वर्षांत आजपावेतो केवळ १० जिल्ह्यांची निर्मिती ठरावीक काळाने झाल्याचे दिसून येईल. एकूणच राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा वेग अतिशय कमी असल्याचं दिसतं. नुकतेच २०१४ मध्ये आंध्र प्रदेशातून निर्माण झालेल्या तेलंगण या राज्याने स्थापनेनंतर अनेक नव्या जिल्ह्यांची निर्मिती होऊन आता त्याठिकाणी ३३ जिल्हे आहेत. छोट्या राज्यांतील जिल्ह्यांची स्थिती काय आहे, समजण्यासाठी हे वानगीदाखल उदाहरण. छोट्या राज्यांसह देशातील अनेक राज्ये विशेषतः उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील आकाराने मोठी असणारी राज्येही या बाबतीत खूपच आघाडीवर आहेत हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top