प्रतिभेची वीज | Entertainment News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिभेची वीज}

आशा भोसलेंना ज्या मराठी गाण्यामुळे सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला, त्या `मना तुझे मनोगत` या गाण्यातला वाद्यमेळ पहिल्यांदा त्यांना आवडला नव्हता. मात्र, नंतर संगीतकार आनंद मोडक यांचाच विचार बरोबर होता हे त्यांनी मान्य केलं. तीन प्रतिभावान कलाकारांची प्रतिभा एकत्र आली, की काय होऊ शकतं ते सांगणाऱ्या या अप्रतिम गाण्याच्या निर्मितीची ही अतिशय विलक्षण गोष्ट.

प्रतिभेची वीज

मराठी चित्रपटसंगीतात आत्तापर्यंत जी काही कामं झाली, त्यातली काही माइलस्टोन ठरली आहेत. `पिंजरा` आणि `जैत रे जैत` हे चित्रपट असतील किंवा `या चिमण्यांनो परत फिरा रे`, `तू तेव्हा तशी`, `भेटीलागी जीवा` ही गाणी असतील, त्यांनी एक प्रकारचा धक्का दिला. सगळं बदलून टाकलं. नकळत अनेक ट्रेंड तयार झाले. मला वाटतं, गेल्या तीस वर्षांचा विचार केला, तर याच माइलस्टोनमधलं एक निर्विवाद गाणं आहे ते म्हणजे `मना तुझे मनोगत.` गीतापासून गायनापर्यंत आणि चालीपासून वाद्यवृंदापर्यंत प्रत्येक गोष्टीत उंची गाठलेलं हे गाणं. मराठी चित्रपटसंगीतातला निर्विवाद माइलस्टोन.

हे गाणं म्हणजे मास्टरपीस आहे. सुधीर मोघे यांचे शब्द कमाल आहेत, पण जास्त मार्क्स आहेत ते आनंद मोडक यांनी दिलेल्या संगीताला. काय कमाल चाल. ही चाल म्हणजे मोडकांनी तयार केलेली अक्षरशः `रोलर कोस्टर राइड` आहे. ध्रुवपद, अंतरे सगळं कमाल!! ऐकताना आपण अक्षरशः स्तंभित होतो. याच्यापेक्षा परफेक्ट, जबरदस्त चाल होऊच शकत नाही. ही चाल म्हणजे आनंद मोडक यांचं `द बेस्ट` काम आहे आणि खरं तर त्यापुढे जाऊन सांगीन, की आशा भोसले यांनी मराठीत केलेल्या `द बेस्ट` कामांपैकीही एक आहे. खूप बारकाईनं ऐकलं, तर कळेल, की त्यांनी एक अतिशय विलक्षण, वेगळा आवाज लावला आहे. तो त्यांनी फार कमी चित्रपटांत लावलाय. शब्दांवरची आणि स्वरांवरची हुकमत तर कमाल.

`कळत-नकळत` चित्रपटात वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये पार्श्वगीत म्हणून हे गाणं येतं. त्यासाठी मन हा शब्द वापरून कांचन नायक यांना गाणं पाहिजे होतं. सुधीर मोघे यांनी `मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा` हे गाणं ऐकवलं. हे गाणं स्मिता तळवलकर यांना बेहद्द आवडलं. तेच घेऊ या असं त्या म्हणाल्या; पण मोघे यांनी ते श्रीधर फडके यांच्या एका कॅसेटसाठी लिहिलं होतं. `मन कशात लागत नाही अदमास कसा लागावा, अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा` या ग्रेस यांच्या कवितेचं बीज घेऊन त्यांनी कमाल लिहिलेली ही कविता. मन हा त्यांचा अतिशय आवडता विषय. त्यांनी त्यांच्या प्रतिभेचं देणं वापरून हे दुसरं गीत लिहिलं. खरं तर कविताच ती. `मना तुझे मनोगत मला कधी कळेल का, तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का.` गाण्याचे अंतरे जास्त कमाल आहेत. `कळीतल्या ओला श्वास, पाषाणाचा थंड स्पर्श, तुझ्यामध्ये सामावला वारा काळोख, प्रकाश, तुझे अरूपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का` हा आणि सगळेच अंतरे कमाल.

हेही वाचा: मेटाव्हर्समध्ये तुमचे स्वागत आहे!

हे गाणं आनंद मोडक यांच्याकडे आलं, तेव्हा त्यांना बरेच दिवस त्याची चाल सुचत नव्हती. गाणं त्यांच्या हाती आलं ती तारीख होती 6 मे 1989. त्यानंतर ते त्यांच्या पुतणीच्या लग्नासाठी भुसावळला गेले. गाणं अक्षरशः तोंडपाठ झालं होतं; पण चाल सापडत नव्हती. भुसावळहून परत पुण्याला आले, तरी ती काही हाती लागत नव्हती. अर्थातच त्यांच्या संपूर्ण मनोविश्वाचा ताबा त्या गाण्यानं घेतला होता आणि गाणं दिसतंय, पण हाती लागत नाही अशी अवस्था असणार. मुलीच्या म्हणजे आलापिनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी म्हणून मोडक कँपात एका दुकानात गेले होते आणि तिथून परत येताना अंधुक अंधुक काही सापडायला लागलं. मुलीचा वाढदिवस साजरा करून ते त्यांच्या खोलीत निवांतपणे टेपरेकॉर्डर आणि हार्मोनियम घेऊन बसले. साधारण अर्ध्या तासात या अजरामर गाण्याचा जन्म झाला. एक विलक्षण काही तरी सापडलं होतं. त्याच ऊर्मीत आनंद मोडक स्मिता तळवलकर यांच्या फ्लॅटवर गेले. दिग्दर्शक कांचन नायक तिथं आले होते. त्यांना त्यांनी ते गाणं ऐकवलं. या सगळ्या प्रवासात गाण्याचं टेक्स्चर कसं असावं याचाही त्यांनी विचार केला होता. गाण्यातले शब्द आणि चाल जबरदस्तच होतं. त्याला तालवाद्यांनी हात लावावा असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे पियानो, बासरी, गाण्याबरोबर साथ करणारं सॉंग व्हायोलिन आणि संपूर्ण गाण्याला आधार देणारा असा भारतीय आणि पाश्चात्त्य पद्धतीचा मिलाफ असणारा कोरस एवढंच त्यांना घ्यायचं होतं. हा खरं तर अतिशय क्रांतिकारी विचार होता त्या काळात. तो मोडक यांच्यासारखा प्रयोगशील संगीतकारच करू शकतो. पियानो आणि कोरस हे मोडक यांचे आवडते साथीदार असणार. कारण साधारण अशाच प्रकारचा प्रयोग त्यांनी नंतरही केला आहे. `ओंजळीत स्वर तुझेच` या अल्बममध्ये. ग्रेस यांची `मी खरेच दूर निघालो` ही कविता त्यांनी रवींद्र साठे यांच्याकडून गाऊन घेतली आहे. तेही अशाच प्रकारचं काम आहे. तेही नक्की ऐकलं पाहिजे.

...तर, अशा प्रकारे गाण्याची मूर्ती कशी पाहिजे त्याची रचना झाली, तिचा रंग ठरला आणि या मूर्तीचा चेहरा कोण असणार हेही अर्थातच ठरलं. या मूर्तीचा चेहरा असणार होता आशा भोसले यांचा!! शब्दांतले आणि शब्दांत नसलेले सगळे भाव शंभर टक्के ओतू शकणारी गायिका. मोडक यांना हे नाव का सुचलं असावं याचंही एक कारण असावं. मोडक यांनी डॉ. जब्बार पटेल यांच्यामुळे `जैत रे जैत`मधल्या गाण्यांचं रेकॉर्डिंग अनुभवलं होतं. `नभ उतरू आलं` आणि `जांभूळ पिकल्या झाडाखाली`या गाण्यांमध्ये आशाताई किती देहभान हरपून आत्मरत होतात हे त्यांनी बघितलं होतं. नंतर त्यांनी `नशीबवान`सारख्या चित्रपटांत त्यांनी त्यांच्याबरोबर कामही केलं. त्यामुळे या अफाट गाण्यासाठी आशाताईंचं नाव सुचणं योग्यच होतं.

गंमत बघा, गाण्याची चाल तयार झाली, तरी खुद्द आशा भोसले यांना रिहर्सल करणं शक्य नव्हतं. रेकॉर्डिंगच्या आदल्या दिवशी मोडक त्यांच्याकडे जाणार होते- पण आर. डी. बर्मन आजारी असल्यानं ते शक्य नव्हतं. आदल्या दिवशी मोडक वाद्यवृंद संयोजक लिऑन डिसुझा यांच्या घरी गेले. त्यांनी उत्तम तयारी केली होतीच, पण मोडक यांना जे परफेक्शन हवं होतं ते वेगळंच होतं. या दोन प्रतिभावान संगीतकर्मींनी एकत्र विचार करून सगळा संगीतमेळ निश्चित केला. काही तरी विलक्षण होतंय हे दोघांनाही कळत असणारच. या गाण्याच्या निर्मितीत मोडक, मोघे, आशाताई यांच्याइतकाच लिऑन डिसुझा यांचाही मोठा वाटा आहे. अनेकदा वाद्यवृंदसंयोजक कमाल करून जातात, पण त्यांचं नाव कुठे येत नाही. आजही या गाण्याशी निगडित हे नाव खूपच कमी जणांनाच माहीत असेल.

रेकॉर्डिंगच्या दिवशी सकाळी मोडक आशाताईंकडे गेले. तिथं त्यांनी त्यांना चाल ऐकवली. लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांची तुलना का होऊ शकत नाही याचं कारण इथं दिसतं. आशाताईंनी अक्षरशः टिपकागदासारखा संगीतकाराचा विचार, चाल टिपून घेतली. इतकी अवघड चाल त्यांनी किती कमी वेळात आत्मसात केली बघा. आज हे गाणं पूर्ण तयार असूनही, अनेकदा ऐकूनही त्याची नुसती नक्कल करतानासुद्धा अनेक गायिकांची दमछाक होते. मात्र आशाताईंनी वाद्यवृंदापासून इतर कशाचीही कल्पना नसताना त्या अवघड गाण्याची चाल काही मिनिटांत आत्मसात केली.

यानंतर दुपारी दोन गाण्यांचं डबिंग करून संध्याकाळी आशाताई वेस्टर्न आऊटडोअर स्टुडिओत गेल्या. ही दोन गाणीसुद्धा कुठली होती, तर `निवडुंग` सिनेमाची. म्हणजे एका दिवशी काय कमाल गानकृती तयार झाल्या याचा तुम्हीच विचार करा.

हेही वाचा: आनंददायी मुलं वाढवा, सुदृढ समाज घडवा

आशाताई स्टुडिओत आल्या आणि कोरसबरोबर रिहर्सल करू या असं म्हणाल्या; पण हा कोरस त्यांच्याबरोबर गाणार नाही, तर तो वेगळ्या प्रकारे गाण्याला लपेटणार आहे असं मोडक यांनी सांगितलं आणि काही तरी वेगळं आहे हे आशाताईंच्याही लक्षात आलं. `इतकं सुंदर गाणं असूनही असा पाश्चात्य आणि अपुरा वाद्यमेळ का योजला,` असा प्रश्न आशाताईंनी त्यावेळी मोडक यांना विचारला होता. अर्थात त्याचं उत्तर नंतर मिळालंच.

हे गाणं किती अवघड परिस्थितीत रेकॉर्ड झालं हेही माहीत करून घेण्यासारखं आहे. गाण्यात मुळात कोणतीही तालवाद्यं नाहीत, त्यामुळे तो आधार नाही. गायकाच्या आवाजाबरोबर जे सॉंग व्हायोलिन वाजत असतं ते वाजवणारे गजानन कर्नाड त्यावेळी प्रकृती ठीक नसल्यामुळे आले नव्हते. शेवटी मोडक यांनी हार्मोनियमवर साथ केली (जे अर्थात रेकॉर्डिंगमध्ये येणार नव्हतं, तर फक्त गायकाच्या आधारासाठी होतं). एका कानात हार्मोनियम ऐकत, दुसऱ्या कानातून पियानोची, बासरीची सुरावट ऐकत आशाताईंनी दोन-तीन रिहर्सल केल्या आणि अप्रतिम टेक दिला. हा सगळा व्याप, गुंतागुंत असताना सूर, विलक्षण भावदर्शन हे मात्र कुठंही हलत नव्हतं. काय कमाल गायिका असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो आपण. टेक झाल्यावर सगळे अक्षरशः स्तंभित झाले नसते तरच नवल. मोडक यांच्या डोळ्यांत पाणीच आलं. मात्र, सगळे जण कौतुक करत असले, तरी अत्युच्च प्रोफेशनल असणारी ही दिग्गज गायिका मात्र संगीतकाराला ते पसंत पडलंय का याच्या चिंतेत होती. मोडक यांचं मन ओळखून या गाण्यातल्या फक्त दुसऱ्या अंतऱ्यातली पहिली ओळ त्यांनी पुन्हा रेकॉर्ड केली. आज `कळीतला ओला श्वास, पाषाणाचा थंड स्पर्श` ही एकच ओळ मला जास्त का आवडते असा विचार करतो, तेव्हा इथं त्याचं उत्तर मिळतं. आशाताईंनी शंभर टक्के दिलंच होतं; पण या एका ओळीसाठी त्यांनी एकशे एक टक्के दिलं. समूहस्वराचा भाग नंतर रेकॉर्ड करण्यात आला.

हेही वाचा: काय सुरु आहे पुणे महापालिकेत?

गंमत बघा. साधारण अशाच प्रकारचं गीत नंतरही तयार झालं. `मनोगत` नावाच्या मालिकेच्या शीर्षक गीताच्या वेळी. तेव्हा पुन्हा हीच टीम. तेही गीत जबरदस्त आहे. त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी आशाताईंनी मोडक यांचा `मना तुझे मनोगत` या गाण्यातला वाद्यमेळाचा विचार किती जबरदस्त होता हे मान्य केलं. कलाकार किती प्रांजळ असतो आणि बदलांना खुलेपणानं सामोरं जाऊ शकतो याचा हा आदर्श. या गाण्यासाठी आशा भोसले यांना राज्य पुरस्कार मिळाला. मोडक यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला. खरं तर आशाताईंना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हवा होता, पण तो मिळाला नाही. अर्थात चित्रपटाला मात्र तो मिळाला. अर्थात दुसऱ्या गाण्यासाठी आणि दुसऱ्या गायिकेसाठी. याच चित्रपटातल्या `हे एक रेशमी घरटे` या गाण्यासाठी अनुराधा पौडवाल यांना हा पुरस्कार मिळाला. तेही गाणं अर्थातच उत्तम आहे यात वादच नाही. काही वेळा दोन अप्रतिम गोष्टींमध्ये तुलना करताना परीक्षकांचा एखादा बारीक विचार काही तरी परिणाम करून जातो. असो. `मना तुझे मनोगत` या अप्रतिम गाण्याची कल्पना ज्या गाण्यातून मोडक यांना मिळाली ते गाणंही फार महत्त्वाचं आहे. `परख` चित्रपटातल्या `मेरे मन के दिये` या लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यातून मोडक यांना नवीन प्रयोगाचं तत्त्व सापडलं. अर्थात मोडक यांचा प्रयोग पूर्णपणे स्वतंत्र, विलक्षण आहे; पण प्रतिभाशाली कलाकार सजगपणे कसं टिपत स्वतः नव्या पूर्णपणे नव्या कलाकृतीला जन्म देतो त्याचं हे उदाहरण आहे.

`मना तुझे मनोगत`सारखं गाणं पुन्हा झालं नाही, पुन्हा होणे नाही. मोडक यांनी नंतर किती तरी मास्टरपीसेस तयार केले, पण `मना तुझे मनोगत` ही एक वीज होती. ती एकदाच चमकून गेली...पण ती संगीतजगताला धक्का देऊन गेली एवढं मात्र खरं!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top