...म्हणून पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये झाला बीआरटीचा खेळखंडोबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये झाला बीआरटीचा खेळखंडोबा}

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटीचे आगमन होऊन तब्बल १४ वर्षे झाली आहेत.

...म्हणून पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये झाला बीआरटीचा खेळखंडोबा

पुणे : राहण्यास योग्य असलेले शहर, स्मार्ट सिटी प्रकल्प देशात दुसऱ्या क्रमांकाने निवड, उद्योग क्षेत्राचे माहेरघर अशी बहुविध ओळख असलेल्या पुणे शहराची आजची नेमकी समस्या काय आहे, असे कोणालाही विचारले तर उत्तर एकच येते ती म्हणजे वाहतुकीची समस्या.! ही समस्या सोडिवण्यासाठी डिसेंबर २००६ मध्ये बीआरटी हडपसर- स्वारगेट- कात्रज मार्गावर पायलट बीआरटी अस्तित्त्वात आली. पुढे ११० किलोमीटर मार्गावर ११२ रूटची बीआरटी करण्याचा ठरावही मंजूर झाला. तत्कालीन केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजनेतंर्गत (जेएनएनयुआरएम) १०१३ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यात महापालिकेने वेळोवेळी कोट्यावधी रुपयांची भर घातली. पुण्यात सध्याचे चित्र काय, तर शहरात कोठेही बीआरटी अस्तित्त्वात नाही. स्वारगेट- कात्रज मार्गावर फक्त ५ किलोमीटरवर बीआरटी कार्यान्वित आहे. बाकीचे मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत सुमारे १५०० कोटी रुपये खर्च करूनही बीआरटीचा खेळखंडोबा झाल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीची मालकी कशी होते हस्तांतरित?

पुण्याला नैसर्गिक आणि भौगोलिक वरदान लाभलेलं आहे. त्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची समस्या नाही की रस्त्यांची. हवामान उत्तम असल्यामुळे येथील लोकसंख्या ही वाढताना दिसते. शिक्षणासाठी पुण्यात येणारा विद्यार्थी वर्ग शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळवून येथेच राहण्यास प्राधान्य देत असल्याचे गेल्या तीन दशकांतील चित्र आहे. पुण्यामध्ये स्थलांतरितांचे प्रमाण वाढत असतानाच या शहरातील रस्त्यांची लांबी (सुमारे १८०० किलोमीटर) वाढली. मात्र रस्त्यांची रुंदी फारशी वाढली नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची घोषणा वांवार होते. परंतु, कागदी घोडे नाचविण्याशिवाय फार काही होत नाही, असेच दिसते. पुण्यात २६ डिसेंबर २०१६ रोजी मेट्रोचे भूमिपूजन झाले. तेव्हापासून तर मेट्रो धावली म्हणजे वाहतुकीचा प्रश्नच निकालात निघेल, अशी काही लोकप्रतिनिधी आणि निवडक अधिकाऱ्यांची मानसिकता झाली आहे. वनाज- रामवाडी आणि पिंपरी - स्वारगेट या ३१ किलोमीटरच्या मार्गावरच मेट्रो धावणार आहे. उर्वरित पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि दोन्ही हद्दींपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर पीएमपीच प्रवाशांना वाहतुकीची सेवा पुरविणार आहे. दोन्ही शहरे आणि लगतच्या भागातील लोकसंख्या सुमारे ८० लाखांवर पोचली आहे. त्यातील किमान २५ ते ३० लाख नागरिक पीएमपीचे प्रवासी होऊ शकतात. कोरोनापूर्व काळात सुमारे १२ लाखांवर पीएमपीची प्रवासी संख्या पोचली होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे ही प्रवासी संख्या सुमारे ६ लाखांवर घसरली आहे. मात्र, सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार (सीएमपी) पहिल्या टप्प्यात म्हणजे नजीकच्या कालावधीत पीएमपीची प्रवासी २० लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी बीआरटी उपयुक्त ठऱणार असून त्यातून खासगी वाहनांची संख्या कमी होऊन प्रदूषणही कमी होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांत २०१४-१५ दरम्यान एकूण ७५ किलोमीटरचे बीआरटी मार्ग कार्यान्वित झाले होते. पिंपरी चिंचवडमध्ये ४५ तर, पुण्यातील ३० किलोमीटरचा त्यात समावेश होता. परंतु, सध्या फक्त स्वारगेट- कात्रज हा ५ किलोमीटरचाच बीआरटी मार्ग कार्यान्वित आहे.

अशी झाली बीआरटीची सुरवात

शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तीव्र होत असलेल्या वाहतुकीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सक्षम सार्वजनिक व्यवस्थेची गरज अधोरेखित झाली आणि त्यातून पीएमपी सक्षमीकरणाची घोषणा झाली. पीएमपी सक्षम करण्याचे काही प्रमाणात प्रयत्न झाले. परंतु, शहरात सार्वजनिक वाहतुकीची अन्य प्रभावी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे कोलंबियाची राजधानी बोगोटोच्या धर्तीवर पुण्यातही बीआरटी कार्यान्वित करावी, असा प्रस्ताव तत्कालीन महापालिका आयुक्त नितीन करीर यांनी २००५ मध्ये मांडला. त्यावेळी बीआरटीचे सादरीकरण शहरात विविध ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात केले आणि त्यातून डिसेंबर २००६ मध्ये हडपसर- स्वारगेट (१०. २ किलोमीटर) आणि स्वारगेट- कात्रज (५. २ किलोमीटर) दरम्यान सुमारे १६ किलोमीटर अंतराची पायलट बीआरटी अस्तित्वात आली. तेव्हा बीआरटीसाठी स्वतंत्र मार्ग अस्तित्त्वात नव्हते. तसेच बीआरटीच्या वापराबाबत पुरेशी जागरूकता झाली नव्हती. परिणामी काही अपघात झाले. त्यामुळे जनमानसात नकारात्मक प्रतिक्रिया उमटली. परंतु, त्यात टप्याटप्प्याने सुधारणा करण्याचे ठरविले. केंद्र सरकारनेही त्यासाठी मदतीचा हात पुणे महापालिकेला पुढे केला. पहिल्या टप्प्यात २००७ मध्ये पहिल्या टप्प्यासाठी केंद्राने ६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी, तत्कालीन महापौर रजनी त्रिभुवन, महापालिका आयुक्त नितीन करीर यांच्या पुढाकाराने हडपसर- स्वारगेट- कात्रज कॉरीडॉरमध्ये बीआरटी सुरू झाली. त्यानंतर दोनच महिन्यात केंद्र सरकारने बीआरटीसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यानंतर दोन-तीन वर्षांत पुणे महापालिकेला बीआरटीसाठी तब्बल १०१३ कोटींचा निधी दिला. त्यातून कर्वे रस्ता, सिंहगडरस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, औंध, बाणेर, विश्रांतवाडी येथील रस्ते सिमेंटचे झाले. बीआरटीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या अंदापत्रकातही दरवर्षी तरतूद करण्यात येत होती आणि खर्चही होत होता.

हेही वाचा: दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’

१५५ किलोमीटरचे बीआरटीचे जाळे

केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळत असल्यामुळे दोन्ही शहरातील महापालिकांना हुरूप आला. त्यामुळेच पुणे शहरात ११० किलोमीटरचे तर, पिंपरी चिंचवड महापालिकेतच्या कार्यक्षेत्रात ४५ किलोमीटरचे बीआरटीचे जाळे तयार करण्याचा ठराव दोन्ही महापालिकांत मंजूर झाला. त्यातून पुण्यातील बाणेर रस्ता, गोखले रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सिंहगड रस्ता, गणेशखिंड रस्ता, संगमवाडी रस्ता, धानोरी रस्ता, नेहरू रस्ता, मुंढवा बायपास, नगर रस्ता, विमानतळ रस्ता, येरवडा- विश्रांतवाडी रस्ता, सोलापूर रस्ता, रामवाडी - विमाननगर, धानोरी या रस्त्यांवर बीआरटी करण्याचे ठरले. त्यासाठीची आखणी आणि नियोजन महापालिकेने केले. निविदाही प्रसिद्ध करण्यास सुरवात केली. दरम्यानच्या काळात रस्ते सिमेंटचे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले. २०१४- १५ मध्ये ते पूर्णत्त्वास आले. त्यावेळी संगमवाडी- विश्रांतवाडी, येरवडा- खऱाडी रस्त्यावर बीआरटीचे काम पूर्ण झाले. त्या बीआरटीचे ऑगस्ट २०१५ मध्ये उद्घाटन झाले. पाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील औंध- रावेत, नाशिकफाटा- वाकड दरम्यानच्या बीआऱटीचे सप्टेंबर २०१५ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पायलट बीआऱटीमधील चुका टाळून नवी बीआरटी तयार करण्यात आली. बससाठी स्वतंत्र मार्ग, रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या बस थांब्यांवर लेव्हल क्रॉसिंग, तसेच डिस्प्ले बोर्डवर बसचे वेळापत्रक, बसमध्ये पुढील थांबा कोणता याची माहिती देणारा डिसप्ले बोर्ड, थांब्यावर स्वयंचलित दरवाजे, बस थांब्यापासून रस्ता ओलांडण्यासाठी स्वतंत्र पादचारी क्रॉसिंग, बस आणि थांब्यांवर पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीम आदी वैशिष्ट्यांचा या रेनबो बीआरटीमध्ये समावेश करण्यात आला.

कात्रज, हडपसर, संगमवाडी, विश्रांतवाडी, नगर रस्ता, वाकड, किवळे, सोमाटणे या मार्गांवर बीआरटी सुरू झाल्यावर प्रवासी संख्येत वाढ झाल्याचेही पीएमपीच्या आकडेवारीतून उघड झाले होते.

रेनबो बीआरटीचे मार्ग

- जुना मुंबई- पुणे रस्ता - १२ किलोमीटर - ३८ स्थानके

- संगमवाडी - विश्रांतवाडी - ८ किलोमीटर - ९ स्थानके

- येरवडा - वाघोली - १४ किलोमीटर - १३ स्थानके

- काळेवाडी फाटा- देहूरोड, आळंदी रस्ता - ११ किलोमीटर - २० स्थानके

- नाशिक फाटा- वाकड - ८ किलोमीटर - १५ स्थानके

- सांगवी फाटा - किवळे - १४ किलोमीटर - २० स्थानके

‘रेनबो’नंतर बीआरटी रखडली

संगमवाडी - विश्रांतवाडी, नाशिक फाटा - वाकड मार्गावर बीआरटी सुरू झाल्यावर शहरातील अन्य बीआरटी मार्गांना वेग येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सिहंगड रस्ता, कर्वे रस्त्यावर मार्गांसाठी निविदा काढण्यात आल्या. परंतु, पुढे कार्यवाही झाली नाही. विद्यापीठ चौक औंध दरम्यानच्या मार्गाचेही काम सुरू झाले. परंतु, पुढे अडथळे आले आणि त्याचे काम थांबले. दरम्यान हडपसर- स्वारगेट मार्गावरील बीआरटी बंद पडली. स्वारगेट- कात्रज दरम्यान जेधे चौक, प्रेमनगर आणि धनकवडीत उड्डाण पूल उभारण्यात आले. त्यामुळे तेथील रस्त्याची फेररचना करण्यात आली. २०१७ मध्ये ते काम सुरू झाले. दोन वर्षांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, त्यावर ११० कोटी रुपये खर्च होऊनही काम लांबले. अखेर २०२१ मध्ये हे काम पूर्ण झाले. नगर रस्त्यावरही येरवडा- खराडी दरम्यान मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले. त्यामुळे तेथील बीआरटी बंद पडली. पिंपरी चिंचवडमध्येही पिंपरी - स्वारगेट हा मेट्रो मार्ग सुरू झाला. त्यामुळे तेथील बीआरटीची सेवा खंडीत झाली. संगमवाडी - विश्रांतवाडी दरम्यानही रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तेथील बीआरटी मार्ग बंद पडला आहे. केवळ पुण्याचाच विचार केला तर, सध्या फक्त कात्रज- स्वारगेट या ५ किलोमीटरच्या बीआरटी मार्गाचे काम सुरू आहे.

पीएमपीचे प्रयत्न पडले अपुरे

बीआरटी मार्ग सुरू झाल्यावर बस थांबे मध्यभागी असल्यामुळे दोन्ही बाजूने दरवाजे असलेल्या बसची खरेदी करण्यात आली. स्वयंसेवी संस्थांच्या पाठपुराव्यामुळे पीएमपीने बीआरटी सेल २०१५ मध्ये कार्यान्वित केला. परंतु, त्यात पुढे सातत्या राखले गेले नाही. त्यातील कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होत गेली. त्याच धर्तीवर महापालिकेतही झाले. पथ विभागाच्या अखत्यारित बीआरटी सेल कार्यान्वित झाला. परंतु, तेथेही सातत्या राखले गेले नाही. त्यातच महापालिका आणि पीएमपी यांच्यात बीआरटीबाबत समन्वयचा अभाव असल्याचे अनेक वेळा दिसून आले. त्यामुळेही बीआरटी अयशस्वी ठरल्याचे दिसून आले. बीआरटी मार्गांत खासगी वाहनांची घुसखोरी कमी व्हावी, यासाठी वॉर्डन नियुक्त करण्यात आले. परंतु, त्यांचे वेतन नियमितपणे देण्यास महापालिका, पीएमपी असमर्थ ठरली. परिणामी खासगी वाहने बीआरटी मार्गातून सर्रास प्रवास करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांकडूनही त्यावर पुरेसे लक्ष दिले जात नाही.

हेही वाचा: पालकांनो, मुले आळशी एकलकोंडी बनलीत, काय करावे?

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बीआरटीचे जाळे शहरात ११० किलोमीटर करण्याचा ठराव मंजूर केला असला तरी, शहराच्या विविध भागांतील आमदार, नगरसेवकांनी बीआरटीला विरोध केला आहे. त्यामुळे सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, औंधमधील बीआऱटी कार्यान्वित होऊ शकली नाही. हडपसर भागातील एका नगरसेवकाने तर, बीआरटीचा मार्गच उखडून टाकला. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीची समस्या दूर करणाऱ्या बीआरटीपुढे अडथळे निर्माण झाले आहेत. बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण करण्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्षाने केली होती. परंतु, गेल्या चार वर्षांत महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपची पावले काही त्या दिशेने पडली नाहीत. त्यातच मेट्रो प्रकल्पामुळे पालकमंत्री अजित पवार यांचेही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. खासदार, आमदार, नगरसेवक जर बीआरटीच्या पाठिशी उभे राहिले तरच बीआरटी शहरात यशस्वी होऊन पुण्यात ११० आणि पिंपरी चिंचवडमध्ये ४५ किलोमीटरचे मार्ग साकारेल.

शहरातील वाहतुकीची कोंडी कोंडविण्यासाठी बीआरटी उपयुक्त आहेच. मेट्रोच्या कामामुळे काही ठिकणी बीआरटी तात्पुरती खंडीत झाली आहे. परंतु, मेट्रोचे काम अल्पावधीत पूर्ण होईल. त्यानंतर बीआरटी पुन्हा एकदा जोमाने सुरू करण्यात येईल. बीआरटीचे जाळे वाढविण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.

- महापौर मुरलीधर, मोहोळ

पीएमपी आणि महापालिकेत बीआरटी सेल सक्षमपणे कार्यान्वित करणे, दोन्ही शहरांतील लोकप्रतिनिधींनी बीआरटीला पाठबळ देणे गरजेचे आहे. तसेच बीआरटीचा फायदा प्रवाशांपर्यत पोचविणे गरजेचे आहे. महापालिका आणि पीएमपीमधील समन्वय सक्षम करणे गरजेचे आहे. बीआरटीच्या पायाभूत सुविधांची नियमितपणे देखभाल करायला हवी.

- प्रांजली देशपांडे (सार्वजनिक वाहतुकीच्या अभ्यासक)

बीआरटी मार्गासाठीच्या बस पीएमपीकडे उपलब्ध आहेत. मात्र, हे मार्ग महापालिकेने खुले करून देणे गरजेचे आहे. नव्या मार्गांबाबतही आमचा पाठपुरावा सुरू आहे. बीआरटी मार्ग उपलब्ध झाले तर, त्यावर प्रवासी वाहतूक पीएमपी निश्चितच करू शकेल. बीआरटीसाठीचा स्वतंत्र सेल पीएमपीमध्ये कार्यान्वित आहेच.

- चेतना केरूरे (सहव्यवस्थापक, पीएमपी)

टॅग्स :puneBrtBrt Bus