ऐतिहासिक वारसा लाभलेले रुबाबदार राजभवन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐतिहासिक वारसा लाभलेले रुबाबदार राजभवन!}

महाराष्ट्राच्या राज्यपालांना अधिकृतरित्या चार निवासस्थाने असून, विशिष्ट काळात त्यांचा वापर करावा असा पूर्वीपासून संकेत आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेले रुबाबदार राजभवन!

इंग्रजांच्या काळापासून राज्यपाल या पदाला असणारा संपन्न वारसा, त्या पदाची गरीमा या गोष्टी विचारात घेता त्यांच्या निवासस्थानासदेखील पूर्वीपासून एक वेगळेच महत्त्व आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे निवासस्थान ज्या प्रमाणे राजकीयदृष्ट्या एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे, त्या प्रमाणे पूर्वीपासून अनेक ऐतिहासिक घटना-घडामोडींचे साक्षीदार राहिलेल्या राजभवनचेदेखील महत्त्व आजही अबाधित आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना अधिकृतरित्या चार निवासस्थाने असून, विशिष्ट काळात त्यांचा वापर करावा असा पूर्वीपासून संकेत आहे.

राज्यपाल या पदाला ब्रिटिश काळापासून एक वलय प्राप्त झाले आहे. राज्य विधिमंडळाची दोन्ही सभागृहे (विधानसभा आणि विधान परिषद) तसेच मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांची भूमिका राज्य कारभार करताना महत्त्वाची असली तरी कोणत्याही राज्याचे राज्यपाल हे त्याचे घटनात्मक प्रमुख असतात. घटनात्मक प्रमुख या नात्याने राज्य कारभारातील त्यांच्या भूमिका, त्यांचे विवेक अधिकार, तसेच काही वेळा एखाद्या राजकीय पक्षाशी असणाऱ्या विशेष जवळीकीमुळे त्यांना अनेकदा माध्यमांमधून टिकेला सामोरे जावे लागते. राज्यघटनेनुसार आपल्याकडे प्रत्यक्ष राज्यकारभार मुख्यमंत्री आणि त्यांनी निवडलेल्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून केला जातो. तर राज्यपाल केवळ घटनात्मक प्रमुख असल्याने त्यांना बरेचदा ‘रबर स्टँप’ म्हणून हिणवले जाते. तसेच ते केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत असल्याने त्यांच्यावर ‘कठपुतली’ असल्याचादेखील आरोप केला जातो.

हेही वाचा: गाव ते महानगर आणि उद्योगनगरी ते क्रीडानगरी पिंपरी-चिंचवडचा प्रवास

महाराष्ट्राच्या राज्यपालांची मुंबई, नागपूर, पुणे आणि महाबळेश्वर येथे अधिकृत निवासस्थाने असून, या सर्व निवासस्थानांना समृद्ध इतिहास आहे. भारतात आणि त्यातही विशेषतः मुंबई, सूरत परिसरामध्ये आपली सत्ता प्रस्थापित होऊ लागल्यानंतर ब्रिटिशांची पोर्तुगीजांकडून एका लग्नात आंदण म्हणून मिळालेल्या बेटावर विविध वास्तूंची उभारणी सुरुवात केली. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी फोर्ट येथील मध्यवर्ती भागात मनोर हाऊस येथे ‘दि बॉम्बे कॅसल’ गव्हर्मेंट हाऊस उभारले. यानंतरच्या काळात तत्कालीन गव्हर्नरांसाठी अपोलो मार्गावरील घर देण्याची योजना होती. मात्र, नंतरच्या काळात जसजसा मुंबईचा विस्तार होत गेला तसे गव्हर्नरांनी मध्यवस्तीतील परळ येथील घराची निवड केली.

परळ परिसरात वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे तेथे प्रदूषण, रोगराई वाढायला सुरुवात झाल्यानंतर गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांनी तेथून १८८० च्या दशकात आपले निवासस्थान अधिकृतरित्या मलबार पॉइंट येथे हलविले. नंतरच्या काळात मुंबईत नव्हे तर संपूर्ण देशभर पसरलेल्या प्लेगच्या साथीत परळ येथील गव्हर्मेंट हाऊसचे दवाखान्यात रुपांतर करण्यात येऊन असंख्य रुग्णांवर त्याठिकाणी उपचार करण्यात आले. डॉ. वाल्डमेर हाफकिन यांनी तेथेच प्लेगवरील लस शोधून काढल्यामुळे गव्हर्मेंट हाऊसचे रुपांतर पुढील काळात त्यांच्या स्मरणार्थ हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आले. तर मलबार पॉइंट येथील समुद्राला लागून असलेल्या ४९ एकरच्या विस्तीर्ण परिसरात तेव्हाच्या गव्हर्नरचे व नंतरच्या काळातील राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान विकसित करण्यात आले.

हेही वाचा: फक्त विहिरींच्या पाण्यानेच भागायची पुणेकरांची तहान

भोवताली अथांग सागर असल्याने राजभवन परिसरातील प्रमुख वास्तूंच्या नावाभोवती ‘जल’ नाव देण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील वास्तूंची नावे जल भूषण, जल चिंतन, जल लक्षण, जल विहार आणि जल सभागृह अशी आहेत. यापैकी जल भूषण हे राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय असून, त्यात भारतीय चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे ठेवण्यात आली आहेत. साधारणपणे २०० वर्षांचा इतिहास असणारी ही इमारत सुरक्षेच्या दृष्टीने असुरक्षित असल्याचे आढळून आल्याने जल भूषण या नवीन इमारतीची पायाभरणी २०१९ मध्ये करण्यात आली. जल चिंतन हे राज्याच्या भेटीवर आलेल्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आहे. समुद्राच्या अगदी कड्यावर उभारण्यात आलेल्या या बंगल्यातून सागराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

राष्ट्रपती राज्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांचे राज्यातील राहण्याचे अधिकृत निवासस्थान हे राजभवनातील जल लक्षण हे निवासस्थान आहे. या ठिकाणी परदेशी चित्रकाराने रेखाटलेल्या मराठा सरदारांच्या तसबिरी संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय राजभवनातील मेजवानी दिवानखाना जल विहार या नावाने ओळखला जातो. राज्यपाल त्यांच्याकडे येणाऱ्या प्रतिष्ठित पाहुण्यांसाठी येथील भव्य दालनामध्ये मेजवानी आयोजित करतात. येथील सभागृह हे जल सभागृह या नावाने ओळखले जाते. मंत्रिमंडळाच्या शपथविधी, मान्यवरांचे सत्कार आदी महत्त्वाचे कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.

हेही वाचा: चोरीला गेलेला मोबाईल परत मिळेल, पण...

सन २०१६ मध्ये सी. विद्यासागर राव यांच्या कारकीर्दीत राज्यपालांचे निवासस्थान असणाऱ्या जल भूषण या इमारतीखाली तळघरात ब्रिटिशकालीन बंकर आढळून आले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिकांसाठी तसेच युद्धाच्या सामग्रीसाठी सुरक्षित जागा म्हणून हे बंकर येथे उभारण्यात आल्याचे बोलले जाते. राज्यपाल राव यांनी तत्कालीन राज्य सरकारला सूचना केल्यानंतर, बरेच दिवसांपासून बंद अवस्थेत असणाऱ्या तळघरातील या जागेची पुनर्उभारणी करून सन २०१९ मध्ये येथे बंकर संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. यामध्ये बंकरमधील कामकाजाची तसेच राज्यातील गडकिल्ल्यांची ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने माहिती येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना देण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी या संग्रहालयाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्याची सांस्कृतिक राजधानी असे भूषण मिरविणाऱ्या, राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पुणे शहरात राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असून, शहरातील औंध रस्त्यावर असणाऱ्या या निवासस्थानाला इंग्रजांच्या काळापासून ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ब्रिटिश सत्ता देशात प्रबळ होण्याआधीच्या काळात ज्या वेळी मुंबई शहराला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व मिळण्याआधी पुणे या शहराचे लष्करीदृष्ट्या असणारे महत्त्व लक्षात घेऊन येथे तत्कालीन बॉम्बे प्रोव्हिन्सच्या गव्हर्नरसाठी निवासस्थान उभारण्यात आले होते. पावसाळ्यात पुण्याचे हवामान आल्हाददायक असल्याने तत्कालीन गव्हर्नर पुण्यात मुक्कामासाठी येऊन येथून कारभार करत असत.

हेही वाचा: तुफान, बादल, वादळ! इंजिने धावणार कधी?

स्वातंत्र्योत्तर काळात राज्याच्या राज्यपालांचे एक अधिकृत निवासस्थान म्हणून हे ठिकाण ओळखले जाऊ लागले. घटनात्मक प्रमुखांनी पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या काळात येथे राहून आसपासच्या प्रदेशातील विकासकामांचा आढावा घ्यावा हा यामागील उद्देश आहे. तथापि, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्रीप्रकाश वगळता बाकीचे राज्यपाल या काळात पावसाळी निवासस्थानात सलगपणे राहिले नसल्याचे समजते. या काळात देशाचा स्वातंत्र्य दिन येत असल्याने राज्यपाल पुण्यातील या निवासस्थानी मुक्काम करून विधान भवन येथे ध्वजवंदन करतात. ही पद्धती मात्र गेली अनेक वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.

सह्याद्री पर्वतरांगांतील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर येथे राज्याच्या घटनात्मक प्रमुखांचे उन्हाळी निवासस्थान आहे. मूळ थंड हवेच्या प्रदेशातील असणाऱ्या इंग्रज गव्हर्नरांना उन्हाळ्यातील मुंबईमधील दमट हवामानापासून सुटका मिळावी याकरिता हे निवासस्थान बांधले होते. ज्या प्रमाणे सागराचा सहवास असल्याने मुंबईच्या राजभवनातील वास्तूंना ‘जल’ असे नाव दिले आहे,त्या प्रमाणेच सभोवार असणाऱ्या पर्वतराजीमुळे येथील निवासस्थानाला ‘गिरी दर्शन’ असे नाव देण्यात आले आहे. बरेचदा मे महिन्यात राज्यपाल या ठिकाणी राहून आसपासच्या जिल्ह्यांतील सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. इतरवेळी राज्यपाल येथे नसतानाच्या काळात मुख्यमंत्री वगैरे उच्चपदस्थ व्यक्ती या ठिकाणी आल्यास ते येथेच मुक्काम ठेवून कामकाज करतात.

आधी राजधानीचा आणि नंतर उपराजधानीचा दर्जा मिळालेले देशातील एकमेव शहर म्हणजे नागपूर! हे शहर पूर्वी ब्रिटिशांच्या काळात मध्य प्रांत आणि वऱ्हाड (सी. पी. ॲण्ड बेरार) या स्वतंत्र राज्याच्या राजधानीचे शहर होते. तेथील गव्हर्नरांचे राहण्याचे ठिकाण पुढे या प्रांतातील मराठी भाषिक विदर्भाचा भाग ज्यावेळी मुंबई प्रांताला १९५६ साली जोडला गेला, त्यानंतर हे ठिकाण राज्याच्या राज्यपालांचे उपराजधानीतील राहण्याचे अधिकृत ठिकाण झाले. सुमारे ९४ एकर परिसरावर पसरलेले नागपूर येथील राजभवन क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्व राजभवनांमध्ये सर्वांत मोठे आहे. शहरातील सेमिनरी हिल्स परिसरात असणारे घटनात्मक प्रमुखांच्या उपराजधानीतील या विस्तीर्ण निवासस्थानात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी राज्यपालांकडून प्रशासकीय प्रमुखांकरिता व विधिमंडळ सदस्यांकरिता चहापानाचे आयोजन केले जाते. हे चहापान....या नावाने ओळखले जाते.

या राजभवनाचे खास वैशिष्ट म्हणजे जैवविविधतेने समृद्ध असणारे हे देशातील एकमेव राजभवन आहे. राजभवन परिसरातील ८० एकर परिसरात जैवविविधता उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानात विविध प्रकारच्या ५०१ वनस्पतींच्या प्रजातीची लागवड करण्यात आली असून, या ठिकाणी असणाऱ्या जैवविविधतेमुळे येथे विविध प्रजातींच्या पक्षांचा वावर आहे. जैवविविधता उद्यानामध्ये नक्षत्र वन, निवडूंग वन, गुलाब उद्यान, औषधी वनस्पती उद्यान,फुलपाखरू उद्यान अशी वेगवेगळ्या प्रकारची उद्याने विकसित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी नेचर ट्रेल, मधमाशी पालन केंद्र, बर्ड्स रेस्टॉरंट, हर्बल गार्डन विकसित करण्यात आले आहे. राज्यपालांच्या निवासस्थानाखेरीज त्या आवारातच अप्रतिम वास्तू, उद्याने हा खरोखरच राज्यातील एक अमूल्य ठेवा असून, याची जपणूक होणे मनुष्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने हितावह आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top