धरणांमध्ये बुडालाय मावळ्यांचा गौरवशाली इतिहास | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 glorious history of the Mavalas drowned in the dam}
धरणांमध्ये बुडालाय मावळ्यांचा गौरवशाली इतिहास

धरणांमध्ये बुडालाय मावळ्यांचा गौरवशाली इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) बारा मावळातील मावळे (Mavala) एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. तसेच, स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावरून (Rajgad) स्वराज्याचा विस्तारही केला. मावळातील दगड-माती या इतिहासाच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाच्या साक्षीदार आहेत. हा इतिहास (History) ऐकून व वाचून आजही रक्त सळसळते. मात्र, मात्र, स्वराज्याचा आणि त्यापूर्वीचाही गौरवशाली हा इतिहास धरणांच्या (Dam) पाण्यात लुप्त झाला आहे. धरणांचे पाणी ओसरल्यानंतर काही काळापुरता तो पुन्हा उजेडात येतो.(The glorious history of the Mavalas drowned in the dam_


पानशेत धरणाच्या टोकाला असलेल्या ठाणगाव येथील दुर्मिळ अर्धवट कोरलेली लेणी पाहण्यासाठी नुकताच गेलो होतो. या परिसरात पहिल्यांदाच जाण्याचा योग आला होता. या मार्गावर ऐतिहासिक शिरकोली गाव आहे, अशी माहिती होती. येथील मंदिरातील शिरकाई देवीची मूर्ती अत्यंत सुंदर व सुबक आहे, असे ऐकून होतो. त्यामुळे उत्सुकता ताणलेली होती. ठाणगावला जाताना प्रवासात शिरकोली गाव लागले. मात्र, परतीच्या प्रवासात शिरकाई देवीचे दर्शन घ्यायचे ठरले. मात्र, शिरकोली गाव सोडून पुढे गेल्यानंतर धरणाच्या पाण्यातून एका मंदिराचा अत्यंत सुंदर आणि रेखीव असा कळस बाहेर डोकावताना दिसू लागला. उत्सुकतेने पाहिल्यानंतर समजले की, शिरकोली गावातील शिरकाई देवीचे ते मूळ मंदिर आहे. पानशेत धरणात ते बुडाले आहे. देवीचे मंदिर धरणात बुडाल्यामुळे ग्रामस्थांनी धरणाच्या वरच्या भागात वस्ती केलेल्या ठिकाणी नवीन मंदिर उभारून तेथे देवीची स्थापना केली. शिरकोली गावाला मोठा इतिहास आहे. त्याची साक्ष देणारे हे मंदिर धरणात बुडाले आहे. मात्र, धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये हे संपूर्ण मंदिर उघडे होते.तर, पुणे जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग हा जागतिक वारसा ठरलेल्या पश्चिम घाटात येतो. या परिसरावर निसर्गाने मुक्तहस्त उधळण केली आहे. चार महिने धो-धो पाऊस कोसळत असतो. त्याकाळात या भागातील निसर्गसौंदर्य एवढे खुलते की, त्याची भुरळ सर्वांनाच पडते. पाऊस थांबल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर सह्याद्री आपले रौद्र रूप धारण करतो. उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या व घनदाट जंगल असलेल्या या रांगड्या राकट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. याच भागातील रायरेश्वर पठारावरील रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि एवढेच नव्हे; तर स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला याच भागात आहे. या किल्ल्यावरून महाराजांनी सुमारे अनेक वर्षे आपला राज्यकारभार हाकला. त्यामुळे या परिसराचे इतिहासात मोठे स्थान आहे. या भागातील मावळे महाराजांसाठी तळहातावर प्राण घेऊन लढले. या भागातील दगड, माती, नदी, ओढे, वाडे, महाराजांच्या या इतिहासाचे साक्षीदार आहेत.

हेही वाचा: दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील या घाटमाथ्यावर धो-धो पाऊस कोसळतो. त्यामुळे पुणे-पिंपरी चिंचवड शहराला आणि पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील तहानलेल्या गावांतील शेतीसाठी या भागात धरणे उभारण्यात आली. मात्र, या धरणांनी या परिसरातील अनेक दुर्मिळ मंदिरे, वाडे आपल्या कवेत घेतली आहेत. अनेक ऐतिहासिक घटना आणि साक्षीदार असणाऱ्या वास्तू धरणांच्या पाण्यात आज विसावल्या आहेत. धरणांचे पाणी कमी कमी झाल्यानंतर त्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू शेवटच्या घटका मोजत असलेल्या अवस्थेत, तर काही वर्षांनुवर्षे पाण्याशी संघर्ष करत आपले अस्तित्व टिकून ठेवलेल्या दिसतात. त्यातीलच शिरकोली येथील मंदिराचा कळस आजही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे.

फक्त शिरकोलीच नाही, तर इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरात लिहिल्या गेलेल्या अनेक ऐतिहासिक घटनाही या धरणाच्या पाण्यात लुप्त झालेल्या आहेत. शिवछत्रपतींच्या इतिहासातील महत्त्वाची घटना ठरली पावनखिंडीतील थरार. बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत शौर्य गाजविले आणि धारातीर्थी पडले. स्वराज्य उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. भोर तालुक्यातील शिंद हे त्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावात त्यांचा पुतळाही आहे. ते भोर तालुक्यातील हिर्डस मावळाची जबाबदारी पाहत होते. या परिसरातील पऱ्हर बुद्रुक येथे त्यांच्या वंशजांचा वाडा होता. सन १८५७ च्या उठावात सहभागी असलेले रंगो बापूजी गुप्ते यांच्या घराशी बाजीप्रभूंच्या वंशजांची सोईरीक होती. त्यामुळे इंग्रजांनी त्यांचा वाडा जाळून टाकला, असे सांगितले जाते. या वाड्याचा काही भाग शिल्लक होता. मात्र, भाटघर धरणाच्या निर्मितीनंतर या वाड्याचे शिल्लक अवशेषही पाण्यात बुडाले. त्याचबरोबर एक अनमोल इतिहासही लुप्त झाला. धरणाचे पाणी ओसरल्यानंतर या वाड्याच्या भरावाचे दगड-गोठे त्याची साक्ष देतात.

भोर तालुक्यातीलच वेळवंड खोऱ्यात ३२ गावे येत होती. मात्र, भाटघर धरणाच्या निर्मितीनंतर यातील अनेक गावे बुडाली. वेळवंड खोऱ्याचे प्रशासकीय कामकाज वेळवंड गावातून चालायचे. मात्र, वेळवंड गावही धरणात बुडाल्यानंतर येथील मंदिरे, वाडे, सभामंडप पाण्यात लुप्त झाले. त्याचे अस्तित्व दाखवणारे गावातील प्रशासकीय कामकाज चालायचे ते भव्य सभामंडप, महादेवाचे मंदिर, या मंदिरापुढील पाच फुटांचा नंदी, हे धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा उजेडात येतात.

शिवछत्रपतींच्या इतिहासात मुळशी तालुक्यातील मोसे खोऱ्यालाही महत्त्वाचे स्थान आहे. मोसे खोऱ्यातील वीर बाजी पासलकर यांना मोसे खोऱ्याचे राजे म्हणूनच ओळखले जायचे. बाजी पासलकर यांचे गाव मोसे हे आहे. मात्र, वरसगाव धरणाच्या निर्मितीनंतर मोसे गावासह बाजी पासलकर यांचा वाडाही धरणात बुडाला. आज उभ्या राहिलेल्या लवासा परिसरात फेरफटका मारल्यानंतर या वाड्याचे जुने अवशेष, तेथील मंदिर, घराचे चवथरे यांच्या खाणाखुणा धरणाचे पाणी पूर्ण ओसरल्यानंतर दृष्टीस पडतात.

हेही वाचा: Corona Virus : मास्कपासून मुक्ती कधी?

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारच्या मदतीने टाटा कंपनीने मुळशी परिसरात धरण उभारले. मात्र, त्यावेळी स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. या धरणाविरोधात स्थानिक नागरिकांनी लढा उभारला होता. ‘मुळशी सत्याग्रह’ या नावाने हा लढा इतिहासात ओळखला जातो. या धरणात ४८ गावे बुडाली. मात्र, त्यापूर्वी या लढ्याचा जो काही मोठा संघर्ष झाला, ती आवळस, आकसई ही महत्त्वाची गावे या धरणात पूर्णपणे बुडाली. या धरणात बुडालेल्या इतर गावांतील नागरिकांनी शेजारच्या डोंगरावर वस्ती करून गावे जिवंत ठेवली. मात्र, ही दोन्ही महत्त्वाची गावे, की ज्या ठिकाणी महत्त्वाच्या सभा झाल्या, लढ्याच्या योजना ठरल्या, ती पूर्णपणे बुडाली. आजही धरणाचे पाणी बऱ्यापैकी कमी झाल्यानंतर शिरवली गावाजवळील मंदिराचा कळस त्याची साक्ष देतो. तसेच, या धरणातील वडगाव-शिरगावजवळील महादेवाच्या मंदिराचाही कळस दृष्टीस पडतो. बार्पे, वारक परिसरात गावांतील घरांचे चवथरे उघडे पडतात.

मावळ परिसरातील पवना धरणातही अनेक दुर्मिळ मंदिरे बुडाली. त्यातील वाघेश्वर येथील हेमाडपंती शैलीच्या मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. शिवरात्रीपासून या मंदिरात दर्शनासाठी जाता येते. मावळ परिसरात असलेल्या दुर्मिळ मंदिरांपैकी ते एक होते. मात्र, अनेक वर्षे धरणाच्या पाण्यात असल्यामुळे त्याचे दगड निसटले आहेत. मात्र, तरीही त्याचे सौंदर्य आजही कायम आहे. तरीही या मंदिराचे अनेक दगड व शिळा परिसरात अस्ताव्यस्थ पडलेल्या आहेत.

आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण, खेड तालुक्यातील चासकमान धरण, या तुलनेने अलीकडच्या काळात झालेल्या धरणांमध्येही अनेक ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे लुप्त झाली आहेत. त्यामध्ये चासकमान धरणातील वाडा गावाचे मंदिर आणि डिंभे धरणातील जैन मंदिराचे अवशेष आजही पाणी पातळी खालावल्यानंतर नजरेस मिळतात.

पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर भिंत असलेल्या उजनी धरणातही दुर्मिळ वास्तू लुप्त झाल्या आहेत. सुमारे सव्वाशे टीएमसी एवढी साठवण क्षमता असणाऱ्या उजनी धरणात पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणांचे अतिरिक्त पाणी साठवले जाते. मात्र, या धरणात इंदापूर तालुक्यातील पळसदेव परिसरात असलेले पळसनाथाचे मंदिर बुडाले. सुमारे एक हजार वर्षे जुने हे मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भूत नमुना आहे. या मंदिराच्या परिसरात एकूण पाच मंदिरे आहेत. या मंदिरांवर अनेक दुर्मिळ शिलालेख आहेत, त्याचप्रमाणे पुराणातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरावरील नक्षीकामही मनमोहक आहेत. मात्र, उजनीच्या अथांग जलाशयात ते लुप्त होतात. धरणाची पाणी पातळी खोलवर गेल्यानंतरच हे दुर्मिळ सौंदर्य नजरेस पडते.

फक्त मंदिरे आणि वाडेच नव्हे; तर या धरणांमध्ये अनेक दुर्मिळ वीरगळही बुडाले आहेत. गावोगावी मंदिराच्या परिसरात गावातील शूर व्यक्तींचे वीरगळ उभे केले जात असत. ऐतिहासिक घटनांचे हे वीरगळ साक्षीदार होते. अनेक इतिहास या वीरगळांमध्ये लपून होता. त्याचे वाचन करणारे आज उपलब्ध होत आहेत. मात्र, धरणांच्या पाण्यामध्ये हा दुर्मिळ इतिहास विसावला आहे. या धरणांनी आज अनेकांची तहान भागवली. मात्र, दुर्मिळ इतिहास आपल्या कुशीत सामावून घेतला. तरीही अनेक इतिहास वेडे हा इतिहास जाणून घेण्यासाठी धरणाचे पाणी कमी होण्याची वाट पाहत असतात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :damMaratha
go to top