फक्त विहिरींच्या पाण्यानेच भागायची पुणेकरांची तहान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फक्त विहिरींच्या पाण्यानेच भागायची पुणेकरांची तहान}

शहरातील प्रत्येकाच्या घरामागे स्वतःच्या मालकीची विहीर होती. या विहिरींना भर उन्हाळ्यातही मुबलक पाणी असायचे. आताच्या पुणे शहराच्या मध्यवस्तीत विविध कारणांसाठी खोदाई करताना या विहिरींचे अवशेष ठिकठिकाणी मिळतात. तसेच, पुण्यात पेशवे काळामध्ये पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनीही होती. त्याच्याही अस्तित्वाच्या खुणा दिसतात.

फक्त विहिरींच्या पाण्यानेच भागायची पुणेकरांची तहान

sakal_logo
By
नीलेश शेंडे

लेखाचा मथळा वाचून आश्चर्य वाटेल...पण, एकेकाळी पुणे शहराची तहान फक्त विहिरींच्या पाण्यावर भागली जात होती. ऑफिसमधील एका सहकाऱ्याशी गप्पा मारत होतो. विषय होता पुण्याच्या पाण्याच्या चवीचा. तो मूळचा विदर्भातील एका खेडे गावातला. त्याने सांगितले, ‘पुण्याच्या पाण्याची एवढी सवय झाली आहे की, आता गावाच्या पाण्याची चवच लागत नाही. एवढंच काय, उन्हाळ्यात गावाला जायला ही नको होतं.’ पुण्याच्या पाण्याची चवच अशी आहे की, ते ज्यानं चाखलं; तो पुण्याचाच झाला. अशा या पुणे शहराची तहान एकेकाळी फक्त विहिरींच्या पाण्यावर भागली जात होती. पण, हळूहळू वाढणारं पुणं असं काही वाढलं की, पाच-पाच धरणांचं पाणीही या शहराला आता कमी पडू लागलं आहे.

पुण्याच्या विहिरींपासून धरणांच्या पाण्यापर्यंतचा इतिहास रंजक आहे. एकेकाळी सायकलींचे, पेन्शनरचे आणि आल्हाददायक हवेचे शहर म्हणून पुण्याची ओळख होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर शिक्षण संस्थांमुळे शिक्षणाचे माहेरघर म्हणून शहराला ओळख दिली. या शहरापासून जवळ असलेल्या हिंजवडी-माण या गावांच्या उजाड माळरानावर जागतिक दर्जाचे आयटी पार्क उभारले गेले आणि या शहराचा आणि त्याच्या आसपासच्या परिसराचा झपाट्याने विकास आणि पसारा वाढत गेला. गेल्या काही वर्षांपासून प्रचंड होणारा विस्तार पाहता मुंबईला मागे टाकेल, अशी अस्ताव्यस्त वाढ या शहराची होत आहे. शहरे वाढत असताना नागरी प्रश्नही निर्माण होतात. तसेच या शहराच्या बाबतीतही झाले. कोणत्याही शहरातील नागरिकांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा असणारा पाणी प्रश्न इतर शहरांच्या तुलनेने पुण्यात कमी जाणवतो. एवढंच काय, शहराला २४ तास पाणी पुरवठा करणारी योजनाही महानगरपालिकेने मंजूर केली आहे. फक्त योजना अद्याप पूर्णत्वाला आलेली नाही.

हेही वाचा: रासायनिक खताच्या दुष्परिणामावर 'नॅनो युरिया' चा पर्याय

अशा या पुणे शहरातील नागरिकांना एकेकाळी केवळ विहिरींतून पाणी पुरवठा होत असे. शहरातील प्रत्येकाच्या घरामागे स्वतःच्या मालकीची विहीर होती. या विहिरींना भर उन्हाळ्यातही मुबलक पाणी असायचे. आताच्या पुणे शहराच्या मध्यवस्तीत विविध कारणांसाठी खोदाई करताना या विहिरींचे अवशेष ठिकठिकाणी मिळतात. तसेच, पुण्यात पेशवेकाळामध्ये पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिनीही होती. त्याच्याही अस्तित्वाच्या खुणा दिसतात. पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या बुधवार पेठ परिसरात शनिवार वाड्याच्या दक्षिण दिशेला असलेल्या ‘सकाळ’च्या इमारतीमध्येही अशीच एक विहीर आहे. त्यातील पाणीही बाराही महिने तुंडुंबच असते. अशा अनेक खुणा शहरात आढळतात.

पुणेकरांसाठी १२ जुलै १९६१ हा दिवस प्रकोपाचा ठरला होता. या दिवशी पानशेतधरण फुटून शहरात मोठा प्रलय आला होता. त्याच्या नुकसानीबाबत पुण्यातीलच गोखले अर्थशास्त्र संस्थेने एक अभ्यास केला. तो ‘पानशेत प्रलय समस्या व पुनर्वसनाचे प्रयत्न’ या पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये पुण्यातील अठराव्या शतकापासून ते पानशेत धरण फुटेपर्यंतच्या पुणे शहरात असलेल्या पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेची माहिती दिली आहे. त्यात पुणेकरांची तहान भागविणाऱ्या विहिरींची माहिती उपलब्ध आहे.

हेही वाचा: भारतीयांना विम्याचे महत्त्व! तुम्ही विमा घेतला आहे?

विशेष म्हणजे अनेक पुणेकरांच्या बोलण्यातून जाणवते की, पुणेकरांची तहान खडकवासला धरणातून भागते. पण, ते तसे नाही. शिवकाळापासून पुण्याचे महत्त्व आहे. पेशवेकाळात ते वृद्धिंगत झाले. पण, सन १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यानंतर पुण्याचे महत्त्व तुलनेने कमी झाले. पण, सन १८५६-५७ मध्ये पुणे नगरपालिकेची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संरक्षण सामग्रीचे कारखाने पुण्याच्या आसपास उभारले गेले. त्यामुळे पुणे शहराच्या वाढीस चालना मिळाली. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर सन १९५० मध्ये पुणे महानगरपालिकेची स्थापना केली. त्यावेळी पुण्याच्या परिसरातील जवळपास १७ गावे शहराला जोडली गेली.

अठराव्या शतकाच्या सुरवातीला पुणे फक्त एक छोटेखानी गाव होते. त्यावेळी गावाजवळून वाहणारी मुठा नदी व नागझिरा ओढा आणि गावातील घरांजवळ असलेल्या विहिरींवरूनच नागरिकांना पाणीपुरवठा होत असे. विशेष म्हणजे विहिरींतून होणारा पाणी पुरवठाच त्यावेळी पुणेकरांना पुरेसा होत असे. त्यानंतर १७२० पासून मराठा साम्राज्यापासून पुण्याचा विकास होण्यास सुरुवात झाली. पेशवेकाळात पुणे देशाच्या केंद्रस्थानी होते. त्यामुळे शहराच्या पाण्याची गरजही वाढली. फक्त विहिरींच्या पाण्यावर अवलंबून राहणे अशक्य झाले. त्यामुळे सन १७५० मध्ये नानासाहेब पेशवे यांनी शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या कात्रज येथील डोंगराच्या दरीत एकाखाली एक दोन दगडी बंधारे बांधले. त्यातून तलावाची निर्मिती केली. तेथून अडीच फूट रुंद व सहा फूट उंच भूमिगत जलवाहिनी तयार केली. त्यात दर तीनशे फुटांवर ४ ते १० फूट खोल ७० उच्छवास तयार केले. त्यातून शहरातील विविध भागात पाणी पुरवठा केला जात होता. त्यावेळी कात्रज तलावातून दररोज साडेसहा लाख गॅलन (युनायटेड स्टेट्समध्ये वापरले गेलेले गॅलन अगदी २३२ क्युबिक इंच किंवा ३.७८५४११७८४ लिटर समान आहे.) पाणी पुरवठा होत असे.

हेही वाचा: चोरीला गेलेला मोबाईल परत मिळेल, पण...

पेशवेकाळात पुण्याचा विकास झपाट्याने होऊ लागला. कात्रज परिसरातून आणलेले पाणीही अपुरे पडू लागले. त्यामुळे सन १७९० मध्ये नाना फडणीस यांनी पुण्याच्या दक्षिणेस असलेल्या आंबेगाव येथून जिवंत झऱ्यातून जलवाहिनी तयार केली. तेथून पाणी थेट सदाशिव पेठ व विश्रामबागवाड्यात आणले. तेथून दररोज सुमारे १ लाख गॅलन पाणी पुरवठा होत असे. तसेच, सरदाररास्ते व चौधरी यांनी शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या कोंढवे धावडे येथील जिवंत झऱ्यात रास्ते वाड्यात व गंज पेठेतील चौधरी वाड्यात पाणी आणले. तेथूनही सुमारे ५० हजार गॅलन पाणी पुरवठा रोज होत असे. दरम्यानच्या काळात पर्वती देवस्थानचे महत्त्व वाढले. त्या परिसरासाठी दुसरे बाजीराव पेशवे यांनी सन १८१० मध्ये एक योजना आखली होती. पण, सन १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यामुळे ती प्रत्यक्षात आली नाही.

पुण्यावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर सन १८६० नंतर पुणे-मुंबई लोहमार्ग सुरू झाले. त्यावेळी पुणे व खडकी परिसरातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी पुण्याच्या नैऋत्य दिशेला असलेल्या खडकवासला गावाजवळ मुठा नदीवर धरणाची निर्मिती करण्याचे ठरले. त्यानुसार सन १८६९ मध्ये मुठा नदीवर दगडी बंधारा बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली. ते काम दहा वर्षानंतर म्हणजे सन १८७९ मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी धरणाची पाणी साठवण क्षमता ३००० दशलक्ष घनफूट एवढी होती. या धरणातील पाणी व्यवस्थापनासाठी डावा व उजवा कालवा केला. त्यातून पुण्याच्या पाण्यासोबतच शेती सिंचनालाही पाणी पुरवठा केला गेला.

पाण्याच्या या मुबलक उपलब्धतेमुळे सन १८८४ मध्ये पुण्यातील १५ टक्के घरांतून नळाद्वारे पाणी पुरवठा केला गेला. त्यासाठी खडकवासला तलावातून साडेसहा लाख गॅलन पाणी उचलले जात असे. तसेच पेशवेकालीन कात्रज तलावातूनही पाणी पुरवठा होत असे. त्यावेळी दरमाणसी १५ गॅलन पाणी मिळत होते. तसेच, त्यावेळी खासगी व सार्वजनिक अशा १२९० विहिरीतूनही पाणी पुरवठा होत असे. उत्तरोत्तर यामध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, सन १९२३-२४ मध्ये शहरात भूमिगत मलोत्सारण पद्धतीची सोय झाली. त्यामुळे पाण्याची गरजही मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे सन १९३८-३९ मध्ये धरणातून दररोज ९० लाख गॅलन पाणी घेतले जात असे. तर, दरमाणसी ४० गॅलन पाणी वापरले जात होते.

हेही वाचा: तुफान, बादल, वादळ! इंजिने धावणार कधी?

पुणेकरांची पाण्याची मागणीदिवसेंदिवस वाढतच गेली. त्यामुळे सन १९४६ पासून खडकवासला धरणातील पाणीही पुणेकरांना कमी पडू लागले. त्यामुळे पानशेत व वरसगाव येथे मातीचे धरण बांधण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार सन १९५७-५८ मध्ये पानशेत धरणाच्या कामाला सुरुवात झाली. धरणाचे कामही बऱ्यापैकी झाले. मात्र, १२ जुलै १९६१ रोजी सकाळी धरण फुटले. त्यानंतर खडकवासला धरणही फुटले आणि पुणे शहरात मोठा प्रलय आला. त्याचा फटका शहराच्या पाणीपुरवठ्याला बसला. कारण, शहराचा संपूर्ण पाणी पुरवठाच बंद झाला होता. त्यावेळी फक्त पेशवेकालीन पाणी पुरवठा व्यवस्था व शहरातील जुन्या विहिरींतूनच पाणी पुरवठा शक्य होते. त्यावेळी शहराची रोजची पाण्याची गरज तीन कोटी गॅलन झाली होती. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात मुळशी धरणातून मुळा नदीद्वारे पाणी आणून औंध येथे बंधाऱ्यात अडविण्यात आले. तेथून ते राजभवन परिसरात शुद्ध करून चतुःश्रुंगी येथील टेकडी येथूनपुरवठा करण्यास सुरुवात केली. खडकवासला साखळीतील धरणांचे काम पूर्ण होईपर्यंत तीव्यवस्था होती.

पानशेत प्रलयानंतर खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांची निर्मिती केली. मात्र, तरीही शहराची वाढता लोकसंख्या विचारात घेऊन पश्चिमेला मुळशी तालुक्यातील टेमघर परिसरात धरण उभारण्याचा विचार पुढे आला. टेमघर धरणाच्या प्रत्यक्ष कामास सन २००० पासून सुरुवात केली. त्याचे काम सन २०१०-११ मध्ये पूर्ण झाले. तसेच, खेड तालुक्यातील भामा आसखेड या धरणातून शहराच्या पूर्वेकडील भागाला पाणी पुरवठा केला जात आहे. खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर व भामा आसखेड या पाचधरणांतून होणार पाणी पुरवठाही सध्या पुणे शहराला कमी पडत आहे. त्यामुळे पश्चिमेला असलेल्या व पानशेत प्रलयावेळी मदतीस आलेल्या मुळशी धरणातील पाण्यावर पुणेकरांचे लक्ष आहे. त्यातून मुळशी धरणाचे वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी कोकणातील भीरा येथून उचलून वरसगाव धरणात सोडण्याचा किंवा थेट जलवाहिनीने शहरात पाणी आणण्याचाही विचार पुढे येत आहे. एकेकाळी विहिरींवर तहान भागवणारे हे शहर आज सहा धरणांकडे डोळे लावून आहे, हे विशेष!

पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे, क्षमता

- खडकवासला- १.९७ टीएमसी

- पानशेत- १०.६५ टीएमसी

- वरसगाव- १२.८२ टीएमसी

- टेमघर- ३.७१ टीएमसी

- भामा आसखेड- ८.१४ टीएमसी

go to top