गाव ते महानगर आणि उद्योगनगरी ते क्रीडानगरी पिंपरी-चिंचवडचा वैभवशाली प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाव ते महानगर आणि उद्योगनगरी ते क्रीडानगरी पिंपरी-चिंचवडचा वैभवशाली प्रवास}

गाव ते महानगर आणि उद्योगनगरी ते क्रीडानगरी पिंपरी-चिंचवडचा प्रवास

पिंपरी-चिंचवड महानगर. अवघ्या ३९ वर्षांच शहर. त्यापूर्वीची असलेली छोटी-छोटी खेडी आता उपनगरे झाली आहेत. त्यांच्यामुळे स्मार्ट शहराची निर्मिती झाली आहे. या स्मार्ट शहरात राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडत आहे. गावागावांचे बनलेली उद्योनगरी महानगर झाले. त्याची वाटचाल आता स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी बरोबरच क्रीडानगरीकडेही सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईच्या संघाकडून खेळलेल्या सांगवीतील ऋतुराज गायकवाडने पिंपरी-चिंचवडच्या लौकिकात, इतिहासात, वैभवशाली प्रवासात भर घातली आहे. पूर्वीचे गावागावांत असलेले पहेलवानांचे आखाडे, तालमी जीवंत ठेवत क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, हॉलिबॉल, फुटबॉल, सायकलींगसह अन्य मैदानी खेळांसाठी क्रीडांगणे उभारली आहेत. यासाठी महापालिकेसह खाजगी संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ‘पिंपरी-चिंचवडमधील आमची मुलेही होऊ शकतात खेळाडू,’ ‘पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत घडत आहेत राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय खेळाडू’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पिंपरी-चिंचवड शहर हे कौलारू घरे जाऊन उद्योगांचे नगर म्हणून नावारुपास आलेसे आहे. ही केवळ उद्योगनगरी नसून क्रांतिकार चापेकर यांची जन्मभूमी आहे. महासाधू मोरया गोसावी यांचे समाधीस्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारक घडविणाऱ्या राष्ट्रीय पाठशाळेचे गाव आहे. सुमारे दोन हजार वर्षापूर्वी होऊन गेलेल्या भोज राजाच्या राजधानीचे शहर आहे. ते म्हणजे भोजापूर. आताची भोसरी.

वेंगसरकर अकादमी मैदान

महापालिकेच्या माध्यमातून थेरगाव येथे क्रिकेटचे मैदान उभारले आहे. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून त्याची देखभाल केली जाते. त्याला पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी नावाने ओळखले जाते. इनडोअर आणि आऊटडोअर दोन्ही प्रकारची मैदाने येथे आहेत. अकॅडमीतील विद्यार्थ्यांना भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर स्वतः मार्गदर्शन करतात. नुकत्याच झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईच्या संघाकडून खेळलेला सांगवीतील ऋतुराज गायकवाड हा अकॅडमीचाच विद्यार्थी आहे. वेगवेगळ्या वयोगटानुसार अकॅडमीतर्फे ‘व्हेरॉक चषक’ स्पर्धा आयोजित करून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे.

मुलींचीही बाजी

पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये मुलींनाही क्रीकेटचे धडे दिले जात आहेत. नुकत्याच गुजरातमध्ये झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत महाराष्ट्राचा मलींचा संघ खेळला. त्यात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या तीन विद्यार्थिनींचा समावेश होता. त्यात खुशी मुल्ला, स्वांजली मुळे, श्रावणी देसाई यांचा समावेश आहे. सध्या श्रावणीने पुण्यातील क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहे. मात्र, क्रिकेटचे प्राथमिक धडे तिने वेंगसरकर अकॅडमीतच घेतले आहे. गुजरात दौऱ्यात तिने महाराष्ट्र संघाचे उपकर्णधारपद सांभाळले आहे.

हेही वाचा: ‘आयपीओं’च्या लाटेतून प्रभावी मार्ग कसा काढावा?

गहुंजेतील क्रिकेट स्टेडियम

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम असलेले अर्थात सुब्रता रॉय सहारा स्टेडियम असलेले गहजे गाव मावळ तालुक्यात असले तर, पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवर आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग जिथे सुरू होतो. त्या किवळे-मामुर्डीनजिक स्टेडियम आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने येथे झाले आहेत. ते पाहण्याची संधी पिंपरी-चिंचवडच्या क्रिकेट प्रेमींसह उदन्मुख खेळाडूंनाही मिळाले आहे. पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गाच्या बाजूला गहुंजे गावाजवळ असलेले हे स्टेडियम आहे. एप्रिल २०१२ मध्ये ते बांधण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च आला आहे. एक एप्रिल २०१२ रोजी आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष व केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन झाले होते. २०१३ मध्ये सुब्रता रॉय यांच्या सहारा इंडिया परिवाराने या स्टेडियमचे नामकरण हक्क विकत घेतले होते. त्यामुळे स्टेडियमचे नाव सुब्रता रॉय सहारा स्टेडियम असे ठेवले. आयपीएल मधील सहारा पुणे वॉरियर्स या संघाचे गहुंचे स्टेडियम हे घरचे मैदान होते. मात्र,२०१३ नंतर स्टेडियमचे नाव पुन्हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम असे ठेवण्यात आले. २०१५ च्या इंडियन प्रीमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे काही सामने येथे खेळवण्यात आले होते.

म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडानगरी

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील मुळा नदीच्या काठावरील गावे महाळुंगे पाडळे आणि बालेवाडी. या गावांचा आता पुणे महानगरपालिकेत समावेश झाला आहे. दोन्ही गावांच्या शिवारात शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे. त्यालाच शिवछत्रपती क्रीडासंकुल असेही म्हणतात. येथे १९९४ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या. २००८ मध्ये कॉमनवेल्थ खेळ झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित केलेले जाणारे महापौर चषक क्रिडा स्पर्धाही येथे झाल्या आहेत. हे क्रीडा संकुल पिंपरी-चिंचवड शहरालगतच आहे. त्याचा समावेश पुण्यात होत असला तरी बंदोबस्त अथवा कायदा-सुव्यवस्थेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अख्त्यारित येते. त्यामुळे क्रीडा संकुलाचा संबंध पिंपरी-चिंचवडशी येतो.

मगर स्टेडियम

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नेहरूनगर येथे तीस वर्षांपूर्वी क्रिकेट स्टेडियम उभारले होते. अनेक क्रीडा स्पर्धा येथे झाल्या आहेत. याच परिसरात प्रस्तरारोहणासाठी कृतिम भिंतही उभारली आहे. गिर्यारोहक सरावासाठी याचा उपयोग करतात. याच ठिकाणी महापालिकेने जलतरण तलावही बांधला आहे. मात्र, स्टेडियमच्या पुनर्बांधणीसाठी दोन वर्षांपूर्वी त्याची इमारत व प्रेक्षक गॅलरी पाडण्यात आली आहे. आता नवीन बांधकाम सुरू झालेले नाही.

हेही वाचा: रासायनिक खताच्या दुष्परिणामावर 'नॅनो युरिया' चा पर्याय

पॉलिग्रास हॉकी मैदान

नेहरूनगर येथेच महापालिकेने पॉलिग्रास हॉकी मैदान उभारले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हॉकीची अनेक सामने येथे खेळली गेली आहेत. हॉकीतील जादुगर या नावाने ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचे नाव या मैदानाला देण्यात आहे. त्यामुळे हे मैदान मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडियम नावाने ओळखले जाते.

क्रीडाप्रबोधिनी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नेहरूनगर येथे क्रीडाप्रबोधिनी आहे. त्यामाध्यमातून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमधून खेळाडूंची निवड केली जाते. आतापर्यंत क्रीडाप्रबोधिनीच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय खेळांमध्ये दैदीप्य कामगिरी केली आहे.

जलतरण तलाव

महापालिकेने शहरात १२ जलतरण तलाव बांधले आहेत. त्यामाध्यमातूनही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये जलतरणपटू चमकले आहेत. असोसिएशन शहरात आहेत.

महापालिकेचे क्रीडाधोरण

महापालिका क्रीडा समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. खेळाडूंना विमा योजना लागू करण्याचा विचारही महापालिका करत आहे. क्रीडा विषयक धोरण आखून अंमलबजावणी केली जात आहे. नुकतीच शहरातील विविध क्रिडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही महापालिकेने घेतली आहे. क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षक अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवे, क्रीडा पर्यवेक्षक रंगराव कारंडे, क्रीडा पर्यवेक्षक महाकाळ आत्माराम किसन, क्रीडा पर्यवेक्षक विश्वास गेंगजे, दत्तात्रय झिंजुर्डे यांच्या माध्यमातून क्रीडा प्रबोधिनीचे काम सुरू आहे.

हेही वाचा: भारतीयांना विम्याचे महत्त्व! तुम्ही विमा घेतला आहे?

कबड्डी असोसिएशन, ॲथलेटिक्स संघटना, कराटे संघटना, योग संघटना, बॉक्सिंग संघटना, बॅडमिंटन संघटना, किक बॉक्सिंग असोसिएशन, आर्चरी धनुर्विद्या या खेळाच्या सरावासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अॅथलेटिक्स या खेळासाठी सुविधा आहेत. इंद्रायणीनगर येथे ग्राउंड आहे. येथील मैदानातील ट्रॅक तयार आहे. बॉक्सिंगसाठी शहरात अपुरे मैदाने आहेत.

कबड्डीचे प्रशिक्षणे दिले जात आहे. शहराला कबड्डीची पंढरी म्हणूनही ओळखले जात आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाही शहरात झाल्या आहेत. महानगरपालिका खेलरत्न पुरस्काराचे धोरण तयार करत आहे. यामध्ये स्थानिक खेळाडूंना प्राधान्य देण्यात येणार आहे. खेळाडूंना राहण्यासाठी नेहरूनगर येथील मगर स्टेडियम येथे तीन मजली हॉस्टेल बांधण्यात येणार आहे. विविध खेळांसाठी हॉल बांधण्याचे नियोजनही आहे. महानगरपालिकेच्या वतीने कबड्डी राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. धनुर्विद्या खेळासाठी दत्तक खेळाडू अंतर्गत मैदान देण्यात येणार आहे.

विविध खेळामध्ये खेळाडू खेळताना दुखापत होईल हे सांगता येत नाही. बहुतांश खेळाडू हे गरिबीतून आलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक चणचण असते. भविष्यात खेळाडूंना अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी खेळाडूंना विमा योजना अमलात आणण्यासाठी व खेळाडूंचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी, स्पर्धेतील मैदानात खेळण्यासाठी उतरण्यापूर्वी फिटनेस चाचणी होऊन तो यशस्वी होऊ शकतो का नाही हे तपासण्यासाठी फिटनेस सेंटर करण्याचे नियोजनही आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top