Pune Shopping- पुण्याचा पहिला माॅल- तुळशीबाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळशीबाग}

पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

पुणं आणि तुळशीबाग हे एक अतूट नातं. पेशवाईच्या काळात बहरलेली तुळशीबाग अजूनही तशीच आहे...जाणून घेऊ यात माॅल संस्कृती येण्याअगोदर सुरु झालेल्या या सर्व काही मिळणाऱ्या बाजारपेठेबाबत.....

दुसऱ्या शहरातून पुण्यात आल्यानंतर विशेषतः महिलांची पावलं शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या तुळशीबागेकडे नाही वळली तरच नवल....दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायचं....चितळेंची बाकरवडी घ्यायची आणि एक पूर्ण दुपार तुळशीबागेत घालवायची हा नियमच जणू. (Pune City specialty Tulshibaug Market)

पुण्यातून (Pune) लग्न करुन अन्य शहरांत गेलेल्या माहेरवाशीणी पुण्यात आल्या की हमखास तुळशीबागेत जाणारच.....कारण शास्त्र असतं ते......इमिटेशन ज्वेलरी, विविध कपडे, तिथलं प्रसिद्ध कोल्ड्रिंगचं (Cold Drink) दुकान आणि तुळशीबागेचा पुण्यातला मानाचा चौथा गणपती (Ganapati) या पलिकडेही तुळशीबागेत काही तरी आहे....ज्याचा विसर आजच्या पिढीला पडलाय.

आज तुळशीबागेत जायचं म्हणजे घासाघीस करुन खरेदी करायला हे समीकरण ठरलेलं. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. तुळशीबागेत जाणं म्हणजे देवदर्शनाला जाणं. तुळशीबाग हा पुण्यात खास महिलांसाठी असलेला बाजार असून त्यात श्रीरामाचं (Sri Ram) मंदीरही आहे असं प्रसिद्ध विनोदी लेखक कै. चिं. वि. जोशी यांनी आपल्या पुस्तकात चेष्टेनं लिहिलं होतं....दुर्दैवानं आज हे तंतोतंत खरं ठरलं आहे.

संपूर्ण परिसरात अनेक मंदीर आहेत. जोगेश्वरी, बेलबाग, रामेश्वर. थोडक्यात या परिसराचा फेरफटका हे एक प्रकारचा 'रिलिजयस वाॅक'च. तुळशीबाग संस्थानची स्थापना पेशवाईच्या काळातली. नारो आप्पाजी खिरे यांनी ही स्थापना केली. त्यानंतर खिरे घराणं तुळशीबागवाले म्हणून ओळखलं जाऊ लागलं....

या मंदिराच्या स्थापनेसाठी नारो अप्पाजींनी निवड केली होती सरदार खासगीवाल्यांच्या तुळशीच्या एक एकर बागेची..१७७३ मध्ये विधीपूर्वक या मंदीराच्या उभारणीचं काम सुरु झालं. श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती आणवल्या गेल्या. समोर हात जोडलेला मारुती, शेजारी गणपती, त्र्यंबकेश्वर महादेव, पाठीमागं शेषशाही भगवान, विठ्ठल-रखुमाई अशा मूर्तींची स्थापना करत हा परिसर भक्तीनं फुलवला...

या ठिकाणच्या मारुतीला नाव होतं खरकट्या मारुती. या मंदीरासमोर (Temple) अनेक प्रवासी शिदोऱ्या सोडून जेवायला बसत. त्यामुळं हे नाव पडलं असावं. मंदीरांची प्रवेशद्वारं सहसा पूर्वेला असतात. पण तुळशीबाग मंदीराची प्रवेशद्वारं मात्र पश्चिम, दक्षिण आणि उत्तरेला आहेत, हे आणखी एक वैशिष्ट्य. उत्तरेकडील दरवाजा होता संगित दरवाजा. त्यावर होता नगारखाना. त्याला माधवराव पेशव्यांनी वर्षासन दिलं होतं...

हे देखिल वाचा-

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

सुरुवातीच्या काळात हे संस्थान चांगलंच बहरलं होतं. पण पेशवाईच्या अखेरच्या काळात वाताहत व्हायला लागली. पुढं १८८५ मध्ये रे मार्केटची म्हणजेच आताच्या महात्मा फुले मंडईची स्थापना झाली. व्यापाराच्या निमित्तानं हा परिसर गजबजला. संस्थान चालवण्यासाठी मग मंदीराच्या ओवऱ्यांच्या परिसरात दुकानांसाठी जागा दिल्या गेल्या. हा पाया होता आजच्या तुळशीबागेचा.

नंतरच्या काळात तुळशीबागेचा बोलबाला चांगलाच वाढला. एखादी गोष्ट मिळत नाही असं या तुळशीबागेत होतच नसे. पुढच्या काळात तुळशीबाग विशेषतः महिला मंडळाची लाडकी बनली. तिची महती आजही कमी झालेली नाही. 

आजही तुळशीबाग मंदीराच्या परिसरातल्या गल्ल्या सकाळपासून रात्री उशीरापर्यंत गजबजलेल्या असतात. गर्दीत दुकानदारांशी घासाघीस करणाऱ्या महिला आणि शेजारी अंग चोरून उभे असलेले त्यांचे पतीदेव असं दृश्य तुळशीबागेत केव्हाही जा, दिसतंच. इमिटेशन ज्वेलरीपासून महिलांचे कपडे, प्लास्टिकच्या नित्य वापराच्या वस्तू यांची खरेदी आज शहरात माॅल झाले तरी अनेकांकडून तुळशीबागेतच केली जाते. 

या परिसरात राहणाऱ्यांना या सगळ्या गर्दीचा त्रास सोसावा लागणं साहजिकच आहे. गेल्या काही दशकांत तुळशीबागेतले रस्ते अतिक्रमणांनी व्यापले आहेत. व्यापारीही दुकानं पुरी पडत नसल्यानं रस्त्यावर आपला माल लावायला लागलेत. तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांचं स्थलांतर करुन या परिसराचा विकास करण्याचा सूर अधूनमधून ऐकू येतो. पण तो तेवढ्यापुरता. 

१८ व्या शतकापासून सुरु झालेला तुळशीबागेचा हा प्रवास. पण अजूनही तुळशीबाग एव्हरग्रीन आहे, हे मान्य करावंच लागेल. तुळशीबागेचं आणखी एक आकर्षण आहे ते पुणेकर खवय्यांना. याला कारण आहे तिथली प्रसिद्ध मिसळ आणि कोल्ड्रिंगचं. खरेदी झाल्यानंतर या दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेणं म्हणजे 'सोने पे सुहागा'च! 

टॅग्स :puneLaxmi Road