मावळातील अल्पपरिचित लेणी आणि धबधबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळातील अल्पपरिचित लेणी आणि धबधबे}

मावळ तालुक्यात अशा काही लेणी आणि धबधबे आहेत, जे अल्पपरिचित अन् फार क्वचित लोकांना आणि इतिहास संशोधकांनाच माहिती आहेत.

मावळातील अल्पपरिचित लेणी आणि धबधबे

पुणे जिल्ह्यात तुम्ही खूप हिंडले असाल. तिथले अनेक गडकिल्ले, प्राचीन लेणी, मंदिरेही पाहिली असतील. अन् पावसाळ्यात धबधब्यांखाली मनसोक्त भिजलाही असाल. पण, मावळ तालुक्यात अशा काही लेणी आणि धबधबे आहेत, जे अल्पपरिचित अन् फार क्वचित लोकांना आणि इतिहास संशोधकांनाच माहिती आहेत. जर तुम्ही ट्रेकर्स असाल, पर्यटनाची आवड असेल, नवीन ठिकाणं पाहण्याची व इतिहास जाणून घेण्याची इच्छा असेल, तर या ठिकाणांबद्दल तुम्हाला माहितीच असायला हवं.

मावळ तालुका म्हटलं की पर्यटकांच्या डोळ्यांसमोर पहिलं नावं येत, ते म्हणजे लोणावळा-खंडाळ्याचं. पावसाळ्यात येथील पर्यटनासाठी राज्यभरातून पर्यटक येतात. त्यानंतर इतिहासाची साक्ष देणारे लोहगड, तिकोना, तुंग, विसापूर, राजमाची हे किल्ले पर्यटकांना खुणावतात. लेणींविषयी सांगायचं झालंच तर, कोंढाणे, घोरावडेश्वर, भाजे, बेडसे आणि कार्ला या लेणी तुम्ही बघितल्या असतील किंवा किमान वाचलं तरी असेल. पण, काही अल्परिचित लेणी आहेत, ज्यांच्याबद्दल केवळ स्थानिक गावकरी, अभ्यासक आणि त्या भागातील हाडाचे ट्रेकर्स असतील, त्यांनाच याबद्दल माहितीय.

मावळातील अल्पपरिचित लेणी कोणत्या?

1) फिरंगाई

● कुठंय : नाणोली गाव

● वैशिष्ट्ये काय : ही लेणी कमीत कमी 1800 वर्षे जुनी आहे. इ.स.च्या दुसऱ्या शतकात ती खोदली गेलीय. येथे देवीचं मंदिर आहे. कातळा खोदून राहण्यासाठी मोठ्या खोल्या खोदल्या आहेत. काही दगडी कुसं आहेत. पूर्वी लाकडाचे दरवाजे असल्याचे पुरावे त्या ठिकाणी दिसून येतात. शिवाय ज्या खोलीत देवीची मूर्ती आणि मुख्य गाभारा आहे, तीही एक लेणीच आहे.

● कसं जाल : तळेगाव दाभाडेवरून आंबीमार्गे नाणोली गाव.

2) पिराचा डोंगर

● कुठंय : मंगळूर गाव

● वैशिष्ट्ये काय : ही लेणी डोंगरावर असून इथं स्तंभि टाकं आहेत, ती सुमारे 1400 वर्षे जुनी असल्याचं इतिहास संशोधक सांगतात. इ.स.च्या सहाव्या शतकात या लेणीचं काम झालंय.

● कसं जाल : तळेगाव दाभाडे येथून नवलाख उंबरे एमआयडीसीकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळूर गाव आहे. तिथून पिराच्या डोंगरावर जाता येतं.

3) पद्मावती

● कुठंय : निगडे, आंदर मावळ

● वैशिष्ट्ये काय : ही लेणी प्राचीन काळातील आहे. इथं पाण्याच्या टाक्या दिसतात. मडके व रांजणाच्या तुकड्यांवरून त्या काळात तिथं मानवी वस्ती होती, असं अभ्यासक सांगतात. लेणीच्या दक्षिण बाजूवरून आंदर मावळाचं विहंगम दृश्य नजरेस पडतं.

● कसं जाल : तळेगाव एमआयडीसी रस्ता-आंबळे मार्गे निगडे.

4) कांबरे

● कुठंय : कांबरे गाव

● वैशिष्ट्ये काय : या लेणीत पाण्याच्या टाक्या, व्यापाऱ्यांसाठी राहण्याची खास सोय व सभामंडप आहे. लेणीचे प्रवेशद्वारही सुस्थितीत आहेत. महत्वाचं म्हणजे ही लेणी पावसाळ्यात बंद असते.

● कसं जाल : कान्हे फाट्यावरून टाकवे गाव-माऊ-वडेश्वर-बेंदेवाडी मार्गे कांबरे.

5) पाटण

● कुठंय : पाटण गाव

● वैशिष्ट्ये काय : या लेणीत एक स्तूप आहे.

● कसं जाल : तळेगाव दाभाडेवरून कार्ले फाटा-मळवली रेल्वे स्टेशन मार्गे पाटण. भातराशी डोंगराच्या पोटात.

6) पूर्वाभिमुख लेणी

● कुठंय : लोहगड किल्ल्याच्या पूर्व भागात (पूर्वेकडील कातळकड्यावर) ही लेणी आहे.

● वैशिष्ट्ये : या लेणीत पोढी (पाण्याच्या टाक्या), बसण्यासाठी कट्टे, झोपण्यासाठी दिवाण असून, त्याला उश्या खोदल्या आहेत.

● कसं जाल : लोणावळ्याजवळील मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस वे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारा रस्ता पकडावा.

● या लेणींना जाताना काय काळजी घ्याल?

- संबंधित परिसराची पूर्व माहिती असावी

- समूहानं जावं

- हातात काठी असू द्यावी

- रात्री जाणं टाळावं

● लेणींबद्दल अभ्यासक काय म्हणतात...

तळेगाव दाभाडे येथील इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे सांगतात, "या बऱ्याच लेणी अपूर्ण आहेत. कारण खोदकाम करताना चिवट दगड संपला किंवा मुरूम लागल्यावर आत पाणी यायला लागलं, तर त्यात कसं राहणार, कसं जगणार? काही वेळा जर थोडासा दगड फुटला असेल, तर त्या ठिकाणी पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी मोऱ्या काढतात. मात्र, मोठा मुरूम लागल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आत शिरणार आहे, त्यामुळे त्या लेणीत राहण्यात काहीच अर्थ नसतो. शिवाय प्लेग, अवर्षण, दुष्काळ पडणं, लेणी खोदण्यासाठी पैसे न मिळणे किंवा पैसे संपणं अशा अनेक कारणांमुळे लेणी अर्धवट राहतात. तसेच, प्रत्येक लेणी ही मोठीच असावी असंही काही नाहीये. पूर्ण लेणींमध्ये भाजे, बेडसे, कोंढाणे, कार्ला, घोरावडेश्वर या येतात. या लेणी पूर्ण खोदून घेतल्या आहेत."

● या वास्तूंचं संवर्धन कसं करणार?

याविषयी डॉ. बोराडे सांगतात, की सरकारने पुरातत्व विभागाला विशेष निधी देऊन आणि आयोजन करून लेणींचं संवर्धन करावं. एखादी लेणी खोदताना वरचा कातळा बघितला जातो. तिथे मोठी गटार म्हणजे मोरी असते. ती उजव्या आणि डाव्या बाजूला तीन-तीन फुटांपर्यंत खोदल्या पाहिल्या आहेत. यामध्ये डोंगरावरून येणारे पाणी किंवा दगडं खाली वाहून जातील अन् लेणीचं काहीही नुकसान होणार नाही, अशी रचना असते. त्यामुळं सरकारनं पुरातत्व विभागाला सांगून या मोरींची दरवर्षी साफसफाई करायला हवी. लेणींमध्ये दगड, लाकूड आणि लोखंड या तीन गोष्टी आहेत. याव्यतिरिक्त जुने कुठलेही अवशेष नाहीत. यातील दगड किंवा शिल्प कोणी फोडू नये किंवा शोभेसाठी घरी नेऊ नये, यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. स्तुपावरील छत्र आणि कमानी या लाकडात आहेत. हे लाकूड ओवण्यासाठी लोखंडी कुऱ्हाडी खिळे मारले आहेत. त्यांना गंज लागू नये, याकरिता विशिष्ट केमिकल आहे, ते प्रतिवर्षी लावायला हवं. याशिवाय लाकडाला दरवर्षी वॉर्निश करायला हवं.

"सरकारने पुरातत्व खात्याच्या माध्यमातून त्या-त्या तालुक्यातील इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी. ऐतिहासिक वास्तूंवर लक्ष ठेवणं, येणाऱ्या पर्यटकांची नोंद ठेवणं या बाबी करता येतील."

- डॉ. प्रमोद बोराडे, इतिहास संशोधक

अल्पपरिचित धबधबे कोणते?

● उलटा धबधबा (रिव्हर्स वॉटरफॉल)

लोहगड किल्ल्याचा पाण्याचा प्रवाह दक्षिणेकडे वाहत जातो, त्याठिकाणी हा उलटा धबधबा आहे. मावळात अनेक दुर्ग आहेत, त्यापैकी उलटा धबधबा असणारा हाच दुर्ग आहे. वाऱ्यामुळे धबधब्याच्या पाण्याचा एकही थेंब खाली जात नाही.

● विसापूर दुर्ग

येथे अनेक धबधबे आहेत. मात्र, एक मोठा धबधबा आहे, जो दगडधोंडे वाहून नेतो. त्यामुळे या धबधब्याखाली भिजण्याची सोय नाही.

● आंदर मावळ

आंदर मावळचा संपूर्ण भाग मिनी काश्मीर म्हणून ओळखला जातो. याला भाताचे आगारही म्हटलं जातं. या भागात सुमारे हजार लहान-मोठे धबधबे आहेत. माऊ या गावापासून सुरू होऊन कांबरे, कुसुम, खांडी, पिंपरी ते भोयरेपर्यंत धबधबे आहेत.

● भीमाशंकरकडे जाताना

तळपेवाडीवरून डोंगराच्या वाटेने भीमाशंकरला पायी जाताना सुरुवातीला उजव्या बाजूला एक मोठा धबधबा लागतो. तो पर्यटकांना अपरिचित आहे. हा मार्ग फक्त चालत जाण्याचा आहे. याबाबत फारस कुणालाही माहीत नाही. या धबधब्याचं वैशिष्ट्ये म्हणजे याचं पाणी स्वच्छ असून, ते पिण्यायोग्य आहे. या भागात मानवी वस्ती नाही. शिवाय कुणी जातही नाही. जे हाडाचे ट्रेकर्स आहेत, तेच या भागात जातात.

टॅग्स :Day Maharashtra