ऐतिहासिक मस्तानी तलावाकडे दुर्लक्ष, साठलाय 50 हजार ब्रास गाळ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mastani Talaw}
ऐतिहासिक मस्तानी तलावाकडे दुर्लक्ष, साठलाय 50 हजार ब्रास गाळ...

ऐतिहासिक मस्तानी तलावाकडे दुर्लक्ष, साठलाय 50 हजार ब्रास गाळ...

पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाटात वरती पोहोचले की, डावीकडे दरीत एक आखीव-रेखीव तलाव लक्ष वेधून घेतो, तोच मस्तानी तलाव. इ.स. १७४० पूर्वी पेशवेकाळात या तलावाचे निर्माण झाले असा इतिहास आहे. यासंदर्भात काही आख्यायिका सांगितल्या जातात. जसं की, वीरयोद्धा बाजीराव पेशवे विश्रांतीसाठी इथे या तलावावर येत. मस्तानी देखील अंघोळीसाठी याठिकाणी येई वगैरे. परंतु, याव्यतिरिक्त तलावाच्या निर्माणात जलविषयक तांत्रिकता म्हणून नेमक्या काय-काय गोष्टी आहेत ते समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न या लेखात केला आहे.

मस्तानी तलावाची जागा, तो परिसर आणि तलावाचे बांधकाम यासंदर्भात फारशी ऐतिहासिक लेखी माहिती उपलब्ध नसली, तरी भूजल वैज्ञानिक म्हणून सहज जलबोधकारचे उपेंद्र धोंडे यांनी या स्थळाला भेट देऊन निरिक्षण केल्यास बऱ्याच गोष्टी आढळतात. ज्यातून तलावनिर्माणशास्त्र संबंधी जल कार्यकर्त्यांना एक छान दृष्टी मिळते. थोरल्या बाजीरावांनी या तलावाचे निर्माण करताना या जागेचा व भोवतालच्या परिसराचा चांगलाच अभ्यास केला होता. हे सहजपणे लक्षात येते. हे पाणलोट नेमकं कोणत्या आकाराचे आहे? परिसरातील पर्जन्यमान आणि स्थानिक डोंगर भुरूपे (चढ-उतार) यानूसार तिथली जल अपधाव स्थिती कशी राहील? सदर तलाव निर्माणाचे नेमके उद्देश्य कसे साधतील? या साऱ्यांचा अतिशय तपशीलवार विचार केलेला आढळतो.

ऐतिहासिक दस्तावेज म्हणावं तर, या संदर्भात पुण्याच्या पेशवे दप्तरात एक स्वतंत्र पत्रच आहे ज्यात असे वर्णन आहे की –
‘सेवेसी जगन्नाथ नागेश विज्ञापना ऐसीजे. छ. १२ मोहरमी.. सेवेशी विनंती हेच की, पहिले पूर्वाचे नक्षत्राचे पाणी, लांबी उत्तरदक्षण तिही बुरुजांमध्ये सुमारे १०० हात व रुंदी पूर्व पश्चिम अशी नव्वद व खोली कोठे तीन हात कोठे चार हात येणेप्रमाणे होते पु(ढे) उत्तराचे दोन-तीन पाऊस बरेच पडले. पूर्वेकडील दोन्ही खोऱ्यांतील ओढे व दक्षणेकडील तल्याचे पालीबाहेरील ओढे जिले वाहो लागले. ते खणोन बांधोन आणून तल्यात आणिले आहेत..सदरहू लि।। प्रमाणे लिंगोजी निंबाणेकर व कुसाजी गायकवाड यांनी आपले नजरेने पाहिले.

तलावाचे आकारमान:
दस्तऐवजातली माहिती आणि वर्तमान स्थिती पाहता मुळ तलाव आकारमानात थोडेफार बदल दिसतात. एकूण १४ एकर क्षेत्र हे तलाव साठाक्षमता म्हणून व्यापलेले आहे. तर, तलावाचे प्रभावक्षेत्र हे साधारण ३०० ते ४०० एकर गृहीत धरले गेले आहे. तलावाचा आकार हा अंडगोलाकार असून सरासरी लांबी २४० मीटर (कमाल लांबी ३०० मीटर) तर सरासरी रूंदी १५० मीटर (कमाल रूंदी २४० मीटर) आहे. खोली कमाल १५ मीटर ते किमान ०५ मीटर (सरासरी ०८ मीटर) आढळते.

तलावाची जागा निवड :
तलावाच्या माथ्याकडील बाजूला संपूर्ण दक्षिण आणि दक्षिणपूर्व परिसर (साधारण १५०-२०० एकर ) हे या तलावाचे पाणलोट आहे. मात्र, हे पाणलोट आयताकार, तीव्र उताराचे आहे. साधारण २००-२५० एकर पाणलोट परिसरात पडलेल्या वार्षिक ८५० मिमी पाऊस जवळपास ७०-८० कोटी लिटर पाणी उपलब्ध होते. जे सहजच वाहून जाते आणि घाटाखालच्या परिसराला त्याचा उपयोग होत नाही. अर्थात, या पाणलोटात पडलेले पर्जन्य कमी वेळात जास्त वेगाने पाणलोटाबाहेर पडणार त्यामुळे, जमिनीत पाणी मुरण्यासाठी वाव कमी तसेच जमिनीची धूप होण्याचे प्रमाणही जास्त आहे. हे लक्षात घेऊनच पाझर तलाव या श्रेणीत मोडणारा हा तलाव निर्माण केला गेला आहे. इथं उन्हाळ्यात वापरासाठी जलसाठवण असा हेतू नाही.

सहसा ‘पाझर तलाव’ अशा ठिकाणी करतात ज्या ठिकाणी माथ्याकडून आलेल्या गाळाच्या साठवणीतून बऱ्यापैकी खोलीचे गाळखडक बनलेले असतात आणि तिथं तलाव केल्यास पाणलोटातून आलेले पाणी येथे जमा होवून हळूवारपणे जमिनीत झिरपत राहते. शिवाय तलावाच्या उर्ध्व भागात गर्द झाडी निर्माण झाली तर, जमिनीची होणारी धूपही थांबवता येते. मस्तानी तलावाची जागा निवडही अशीच आहे. नेमक्या पाणलोटाच्या मुखाशी हा तलाव आहे. पाणलोटातील सर्व पाणी या ठिकाणी येवू शकते. शिवाय भुयारी जलमार्गानेही हे पाणी पुढं खेळवले गेलेय.

तलावाचे बांधकाम:
या परिसरात जमिनीची धूप थांबविण्यासाठी आणि भूजलस्तर वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न म्हणून ही जलसंरचना निर्माण झाली असावी. बांधकाम करताना जमा होणाऱ्या पाण्याच्या वेगाचा अंदाज घेऊन तलावाच्या भिंती सहा ते बारा फूट जाडीच्या भक्कम बांधणीच्या केल्या आहेत. खास करून तलावाची जी पश्चिम बाजू आहे ती तीन बांधाची आडवी भिंत तर एखाद्या चिरेबंदी किल्ल्याप्रमाणेच आहे. या आडव्या भिंतीला तीन बुरुजांनी भक्कम केले आहे. आजही पावणे तीनशे वर्षांनंतरसुद्धा हे बांधकाम खणखणीत उभे आहे. याव्यतिरिक्त, बांधकाम करताना पाण्याची पवित्रता राखण्यासाठी तलाव काठावर श्रीगणेश, हनुमान आणि शंभू महादेवाची मंदिरे तसेच उघडयावरही काही देवतांच्या मूर्ती आहेत. आजही भरपूर पावसानंतरही हा तलाव गच्च भरून, खालचा भाग पाणथळ झालेला दिसत नाही. कारण इथल्या पाण्याचा निचरा होण्याची केलेली सोय. इथूनच एक भुयारी मार्ग तलावा शेजारच्या विहिरीत उतरतो. तलावाच्या पाण्यास दूरवर खेळवण्यासाठी उपयुक्त असे अजूनही भूयारी मार्ग असावेत जे तलावाच्या पाण्याचा निचरा करतात.

तलावाची उपयुक्तता:
तलावाची खोली भरपूर असल्यामुळे तलावाची पाणी साठवण्याची आणि जमिनीत झिरपवण्याची क्षमता खूप मोठी आहे‌. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पाणलोट क्षेत्रातून- घाटातून वाहून जाणारे पाणी या तलावात उतरवून इथे पाणीसाठा झाल्यास परिसरातील ४ गावांच्या/वस्त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटत असे. आजही या प्रभावक्षेत्रातली पाणीपातळी उत्तम स्थितीत आहे. पाझर तलाव ही मुख्य उपयुक्तता, जवळपास तीन-चारशे एकरात थेट फायदा आणि तलाव भरल्यानंतर अधिकचे पाणी या भुयारी मार्गाने शहरापर्यंत वाटेत विविध ठिकाणी विहिरींना जलपूरवठा करीत पोचवले गेलेले. त्यामुळे साधारणतः २५ कोटी लिटर क्षमतेचा तलाव हा अशा भुयारी जलमार्ग जोडल्याने त्याची उपयुक्तता अधिक पटीने वाढलेली. पेशवेकाळात पुणे शहरात अशी तलाव आणि शहरातील विहिरी-हौद जोडणारी जलव्यवस्था अस्तित्त्वात असल्याचे दुर्मिळ अवशेष आढळतात. नुकतंच मेट्रो उत्खननातही असे भुयारी मार्ग आढळले आहेत. अशा छुप्या भुयारी जलमार्गांमुळेच हा तलाव पोहण्यासाठी उपयुक्त नाही, भीतीची शक्यता आहे असं म्हणतात. शिवाय इथल्या डोंगर-दऱ्यांच्या, त्यातील हिरवाईचा आनंद घेत चार क्षण घालवणे हा सौंदर्य दृष्टीकोन आहेच, यासाठी तिथं लहानसा महाल, घोड्यांसाठी पागा, जागोजागी छोट्या खोल्या, कोनाडे, भुयारी मार्ग, पायऱ्या, बसण्यासाठी ओटे-धक्के अशी रचना होती. ज्याचे काही अवशेष अद्यापही आढळतात.

वर्तमान स्थिती:
आज या तलावाच्या प्रभावक्षेत्रात जवळपास चारशे एकर शेतजमीन आहे तसेच पुणे शहर लोकवस्ती पासून हा परिसर जवळच आहे, त्या दृष्टीने इथला परिसर भूजल संपृक्त होण्यासाठी या तलावाचे योगदान महत्त्वपूर्ण राहील. परिसरातील पन्नास-शंभर विहिरी-बोअरवेल या पाझर तलावावर अवलंबून आहेत. कालौघात तलावाचा रखरखाव दुर्लक्षित राहिल्याने त्यात प्रचंड गाळ साठला आहे. पाणलोट परिसरात गर्द झाडी नामशेष होत आहे. आणि प्रभावक्षेत्रात भूजल उपसा सुरूच आहे. त्यामुळे भूजल पातळीवर परिणाम होतोय. महात्मा फुले जलसंधारणअभियानांतर्गत वर्ष २००३ मध्ये या तलावातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली होती. परंतु अन्य ‘सरकारी’ कामांप्रमाणेच हे कामही अर्धवट अवस्थेतच राहिले. यावेळी जो काही गाळ काढण्यात आला तो जेमतेम दहा टक्केच होता असे मानले जाते. या तलावात सुमारे ५०,००० ब्रास पेक्षा जास्त गाळ असल्याचा जलसंपदा विभागाचा अंदाज आहे. याठिकाणी साधारण ५-६ पायलट बोअरहोल घेऊन माती-मुरुम खोलीचा अंदाज घेता नेमकी आकडेवारी कळू शकते. मात्र, या तलावाची साठाक्षमता आणि उपयुक्तता भरपूर मोठी आहे हे नक्की. आजही या तलावाचा गाळ काढण्याचे काम सुरू करता या तलावाचे प्रभावक्षेत्रात या झिरप्याचा जास्तीत जास्त फायदा पोचवता येईल. शिवाय या पाणलोटात देवराई निर्माणाची मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. पुणे शहरातील व आसपासची पर्यटक मंडळी इथं फिरायला येतात, त्यांनी या ऐतिहासिक वास्तूकडे शास्त्रीय विचार वारसा म्हणून पहावं आणि तो टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत.