
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
क्रिकेटचे गच्च भरलेले मैदान अन् मैदानात एकच आवाज सचिन...सचिन...! कारण एक संघर्ष देखील त्या दिवशी मैदानात उतरला होता; ज्याने स्वत:ला सिद्ध केले होते. त्यामुळे तो सचिन घडला. असे अनेक सचिन देशात आहेत. काही घडले तर काही अजूनही घडत आहेत. अशाच एका सचिनची ही यशोगाथा आहे, ज्याने आयुष्याच्या मैदानावर सामना केला तो बिकट परिस्थितीचा. यामध्ये जन्मत: आलेले अपंगत्व, घरची परिस्थिती बेताची, दोन कुबड्यांच्या साहाय्याने दररोज दोन किलोमीटरचा डोंगर पार करुन शाळेत जाणे-येणे. हे सर्व करुन सचिनने नवीन उदाहरण निर्माण केले आहे. त्यामुळे आपसूक डोळे पाणावतील. सचिनची ही यशोगाथा वाचायलाच हवी.
ग्रामीण भागात आजही शिक्षण घेण्यासाठी भांडावं लागतं. ते प्रशासनासोबत असो की परिस्थितीसोबत. शिक्षणासाठी खरोखरच जिवाचं रान करावं लागतं. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील पाले खुर्द आदिवासीवाडी येथे मुख्य रस्त्यापासून डोंगरात वसलेली कातकरी जमातीची लोकवस्ती आहे. कुणी फारसं शिकलेलं नाही. मजुरी करून पोट भरणारी लोकं. जिथे दोन वेळच्या जेवणाची सोय होण्याची मारामार तिथे सचिनने शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले.
जमतेम ४० घरांची ही वस्ती इथे गरिबीमुळे लहान वयातच मुलांच्या खांद्यावर परिस्थितीचा भार पडतो. अशा लोकवस्तीत महेंद्र वाघमारे आणि सुशिला वाघमारे राहतात. मोलमजूरी आणि एक-दोन शेळ्यांचे पालन, असे त्यांच्या उदर्निर्वाहाचे साधन. यांना तीन अपत्य आहेत. मोठी मुलगी शुभांगी ही या वस्तीतील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेली पहिली मुलगी आहे. सचिन हा त्यांचा दुसरा मुलगा. सचिन जन्मापासून दिव्यांग होता. त्यामुळे त्याच्या भविष्याची चिंता आई-वडिलांना होती.

Sachin and his parents
शिक्षणाचा अभाव असललेल्या खेड्यापाड्यात शिक्षकांवर मोठी जबाबदारी असते. सर्व शिक्षा अभियान असो की अन्य सरकारी योजना त्यांना लोकांच्या घरापर्यंत पोहचाव्या लागतात. मुलांना शाळेत घाला म्हणून वस्तीतील लोकांना समजावून सांगावे लागते. सचिनचे नशिब चांगले होते की त्याला चांगले शिक्षक लाभले.
गजानन जाधव हे कातकरी समाजाची लोकवस्तीतील प्राथमिक शाळेत २००६ ते २०१६ मुख्याध्यापक होते. त्यांनी वस्तीतील प्रत्येक घरात जावून शिक्षणाचे महत्व सांगितले. सचिनची बहिण आणि सचिनलासुद्धा जाधव सरांनीच शाळेत दाखल केले. सचिन दिव्यांग असला तरी त्याला घरी ठेवू नका त्याला शिकवा, अशी विनवणी गजानन जाधव यांनी सचिनच्या आई-वडिलांना केली होती. त्यामुळे सचिनला घरी ठेवण्यापेक्षा त्याचे आई-वडील त्याला उचलून शाळेत आणत आणि कामाला जात असत. सचिन दिवसभर शिक्षकांसोबत शाळेत राहत असे. चार वर्ष हा दिनक्रम सुरू होता. पहिली ते चौथी सचिनने असेच शिक्षण घेतले. सचिनचे शिक्षक त्याचे दुसरे आई-वडील झाले होते.

Sachin studied in this school till the fourth standard
मुख्याध्यापक गजानन जाधव सचिन आणि त्याच्या पालकांना घेऊन तालुक्याला गेले. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत त्याची तपासणी केली. यावेळी जयपुरवरुन सचिनला कृत्रिम बुट मागवण्यात आला. मात्र त्याचा फार काही फायदा झाला नाही. बुटामुळे त्याला चालायला त्रास व्हायचा. नंतर त्याला कुबड्या मिळाल्या. पण कुबड्यावर चालायचा तो कंटाळा करत असे. तो पाय टेकीत चालायचा पण दोन्ही पायाची उंची कमी जास्त असल्याने त्याचा परिणाम त्याच्या मणक्यावर होऊ लागला व पाठदुखीचा त्रास होऊ लागला.
गावात चौथीपर्यंत शाळा असल्यामुळे सचिनने कसेबसे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सचिनचा खरा संघर्ष सुरू झाला. कारण चौथीनंतर गावात शिक्षण नव्हते. त्यामुळे दिव्यांग असलेला सचिन पुढील शिक्षण कसा घेईल?, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
पाचवीसाठी सचिनला घरापासून एक दोन किलोमिटरचा डोंगर चढून-उतरून, पुढे चार किलोमीटर कोलाडमधील माध्यमिक शाळेत जावं लागत असे. सचिनला असा रोजचा येणे-जाणे प्रवास करायचा होता. त्यामुळे तो हे सर्व कसं करेल असा प्रश्न त्याच्या शिक्षकांना आणि पालकांना पडला होता. मात्र सचिन थांबला नाहीच. इच्छाशक्ती आणि ध्येय निश्चित असलं की तुम्ही कोणत्याही संकटावर मात करु शकता. हे सचिनने दाखवून दिलं.

Abode of Katkari community
शाळेच्या एक ते दिड तास आधी घरातून लवकर निघायचं, कुबड्यांच्या साहाय्याने डोंगर चढा-उतरायचा. धडधाकट माणसालाही घाम फोडेल असा तो डोंगर. मग सचिनसाठी तर हा प्रवास किती खडतर असेल याची कल्पनाच करवत नाही. दोन-दोन वेळा थांबत, कधी दमलेले पाय ओढत सचिन हा अवघड डोंगर पार करुन शाळा गाठत असे. नुसताच शाळेत जात नसे तर मनापासून अभ्यासही करत असे. बाकीचे विद्यार्थी दहावीच्या वर्षात मागे हटले पण सचिनने जिद्दीने ते पूर्ण केलं आणि दहावीत ६१.८० टक्के गुण मिळवले.
शिक्षण घेणारी वाघमारे कुटुंबातील ही पहिली पिढी. त्यामुळे मोठं होऊन कोण व्हायचं, असं काही स्वप्न नाही. केवळ आपल्या पायावर आपण उभं राहायचं हेच स्वप्न. कातकरी समाजात जिथे शाळागळतीचं प्रमाण जास्त आहे, तिथे राहून, डोंगर चढून शाळेत पोहोचणारा एक सचिन दहावीत पहिल्या फटक्यात प्रथम वर्गात उत्तीर्ण होतो ही म्हणूनच अतिशय खास आणि कौतुकाची बाब आहे.

Abode of Katkari community
सचिनचे आई-वडील महेंद्र वाघमारे आणि सुशिला वाघमारे इतर काम न मिळाल्याने मासेमारी करून गुजराण करतात. तर बारावी झालेली मोठी बहिणी शुभांगी, जवळपासच्या फार्म हाऊसवर काम करते. मात्र हे कामही नियमीत नाही. फार्म हाऊसवर जेव्हा पर्यटक येतात तेव्हाच तिला रोजगार मिळतो. मात्र वाघमारे कुटुंबियांनी मुख्यत: सचिनने जिद्द सोडलेली नाही. तो आजही भविष्याचं स्वप्न पाहत आहे.
सचिनचे शिक्षक गजानन जाधव सांगतात, सचिनने भलेही शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे ९०टक्क्यांच्या टप्प्यात गुण मिळवले नाहीत. मात्र ज्या समाजात मुले दहावीपर्यंत पोहोचणेही कठीण होते. तिथे या दिव्यांग विद्यार्थ्यांने अनंत अडचणींवर मात करत परीक्षा उत्तीर्ण केली इतकंच नव्हे तर त्यात चांगले गुणही मिळवले. माझ्या या विद्यार्थ्यांचे मला खूप कौतुक आणि अभिमान आहे. पहिलीपासून दहावीपर्यंतचा त्याचा प्रवास पाहिल्याने त्याच्या यशाचं गांभीर्य मला आहे. त्याची गुणपत्रिका हातात आली तेव्हा खरंतर माझाच आनंद गगनात मावत नव्हता. ऊन-पाऊस-वारा याची पर्वा न करता दररोज कुबड्यांच्या सहाय्याने डोंगर चढून-उतरून जाणारा सचिन माझ्या डोळ्यासमोर आला आणि माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.