कोरोनाचा तमाशा; कलावंतांची फरपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा तमाशा; कलावंतांची फरपट}

मागील दोन वर्षांपासून कलाकारांचा जीवनसंघर्ष सुरू

कोरोनाचा तमाशा; कलावंतांची फरपट

सगळं सोंग घेता येतात, पण पैशाचं सोंग घेता येत नाही. संसाराचा गाडा ओढायचा, तर कामाची लाज बाळगून कसं चालंल? घरातील चिलीपीलींच्या पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करायला जात आहे, ही व्यथा आहे तमाशा फडातील एका महिला कलाकाराची...

राज्य सरकारने लॉकडाउनकाळात समाजातील अनेक घटकांना सर्वोतोपरी मदत केली, मात्र अद्याप तमाशा कलावंतांना कोणतीही मदत न मिळाल्याची खंत सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’च्या माध्यमातून खेडकर यांच्याशी संवाद साधला असता भावनांना त्यांनी वाट मोकळी करून दिली.

तमाशा ही कला महाराष्ट्रात सतराव्या शतकापासून कार्यरत आहे, पण ही कला कोराना काळात आर्थिक संकटात सापडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १६ मार्च २०१९ रोजी कार्यक्रम बंद झाले. म्हणजे ज्या दिवसापासून कार्यक्रम सुरू होतात, त्याच दिवसापासून आम्हाला घरी बसावं लागले. राज्यातील एकूणच सर्वच तमाशा कलाकारांवर दोन वेळची चूल पेटण्यासाठी ससेहोलपट सुरू आहे. ज्या लोककलावंतांना स्टेजवर अनेकदा वन्स मोर दिला जायचा, आज त्याच महिलांना एकवेळ जेवणासाठी पडेल ते काम करावं लागत आहे. काही मुली धुण्या-भांडीची कामे करीत आहे, कोणी रस्त्यावर भाजीपाला विकत आहे, कोणी गवंड्याच्या हाताखाली काम करीत आहे, तर कोणी रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकत असल्याचे खेडकर यांनी नमूद केले.

हेही वाचा: बिटकॉईन आणि आभासी चलनांचे विश्व!

कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच क्षेत्राला झळ बसलेली आहे, त्याला तमाशा फडही अपवाद नाही. तमाशा हा मुख्यत्वेकरुन गावागावातील जत्रा, यात्रांवर चालतो. मात्र, कोरोनामुळे यावर निर्बंध आल्याने तमाशा पूर्णपणे बंद आहेत. मार्च ते मे हा खरा लोककलांचा हंगाम असतो. या काळात गावोगावीच्या जत्रा असतात. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, नगर जिल्ह्याच्या खेडोपाड्यातून अजूनही ही कला जिवंत ठेवली जात आहे. आजसुद्धा ‘यात्रा’ म्हंटले की सकाळी काल्याचं कीर्तन आणि रात्री तमाशाची परंपरा जपणारी गावे आहेत.

महाराष्ट्रात १५० पेक्षा अधिक तमाशा फड आहेत. त्यावर जवळपास ३० हजारांपेक्षा जास्त लोकांची उपजीविका अवलंबून आहे. एका फडात शंभर ते दीडशे कलाकार असतात. कोरोनामुळे सर्वांवरच निर्बंध आल्याने फडमालकांनी एवढ्या लोकांचे पोट कसे भरायचे? असा प्रश्न खेडकर यांनी सरकारला विचारला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने समाजातील अनेक घटकांना आर्थिक पॅकेज जाहीर केले, मात्र जो कलावंत आपले दुःख विसरून दुसऱ्याचे मनोरंजन करतो त्याच कलावंताकडे सरकारने पाठ फिरविल्याचे खेडकर यांनी नमूद केले. सर्व तमाशा कलावंतांना पाच हजारांची आर्थिक मदत द्यावी, खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी साह्य करावे, तमाशा ही कला जिवंत राहावी, यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलावी, या अन्य मागण्यासाठी उपोषण केले होते. मात्र सरकारने निव्वळ तोंडाला पाने पुसल्याचेही त्यांनी सांगितले. फडमालकांना यातून बाहेर पडण्यासाठी लवकरच विशेष पॅकेज देणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते, मात्र अद्याप ना पॅकेज जाहीर केले, ना कुठल्या कलावंताला अद्याप मदत मिळाली नसल्याने मिळालं तर खायचं, नाही तर उपाशी झोपायची वेळ आम्हा कलावंतावर आल्याची खंत खेडकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: क्रिकेटमध्ये पुन्हा येतंय गोलंदाजांचं राज्य?

२२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मनोरंजनाची द्वारे खुली झाली आहे. जवळपास गेली दीड वर्षांपासून बंद असणारा घुंगराचा छनछनाट आता सुरू झालाय. सांस्कृतिक क्षेत्राला लागलेली आणीबाणी आता सरली आहे. कलावंतांच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण आहे. कोरोना महामारीचे मळभ दूर सारून मनोरंजनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा कलेचे इंद्रधनुष्य खुलेल, नव्या उमेदीने रसिकांची सेवा करायची अन् कलेचे गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करायचे, असा ठाम विश्वास या कलावंतांना आहे.

रूपरेषा तमाशाची

तमाशा हा शब्द मूळ अरबी असून, त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा आहे. तमाशाचे प्रयोग गावोगाव भरणाऱ्या यात्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. त्यामुळे प्रयोगाला फारसे नेपथ्य लागत नाही. तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक असते. तमाशातील गायक, वादक, सुरत्ये (सुरत्या= गायनात सूर देऊन साथ करणारा) व नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत ‘बोर्ड’ म्हटले जाते. गायनाला ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रॅंगल यांची साथ असते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते.

बिना तालासुराचा ऑर्केस्ट्रा

मूळ तमाशाची सुरवात गणगवळणीने होते, नंतर बतावणी. यामध्ये रेटून खोटं बोलत मनोरंजन करायचे असते. पुढे सवालजबाब होतो. त्यात लावण्या ऐकायला मिळतं. नंतर वगनाट्य मात्र आता गणगवळण संपली की, लगेच बिना तालासुराचा ऑर्केस्ट्रा सुरू होतो. त्याचबरोबर कलाकारांच्या पोटात भीतीचा गोळा उठविणारा धिंगाणाही. तमाशा हा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार आहे.

हेही वाचा: ‘लालपरी’चा गळा घोटला कुणी?

तमाशा व्यवसायाचे अर्थशास्त्र

खर्चाची बाजू -

- कलावंतांचे मानधन

- व्यवस्थापकाचे वेतन

- कर्जावरील व्याज व हप्ते

- वाहतूक खर्च, टोल

- भोजनावर होणारा खर्च

- व्यासपीठ, तंबू उभारणे

- जनरेटरचे भाडे, डिझेलवरील खर्च

- विद्युत रोषणाई

- ध्वनिवर्धक

- गावातून लोकनाट्याच्या प्रयोगाचा प्रचार करणे

- कलावंतांचा विमा उतरविणे

- कलाकारांना प्रशिक्षण देणे

- आरोग्यावरील खर्च

- आकस्मिक खर्च

उत्पन्नाची बाजू-

- अनेक तमाशा फड वर्षभर चालत नसतात. काहींना तर यात्रांपुरत्याच सुपाऱ्या असतात. फडमालकाला एकाच बाजूने उत्पन्न मिळते ते म्हणजे जेवढी सुपारी ठरली आहे, तेवढेच उत्पन्न. याशिवाय तमाशा व्यवसायाला अन्य उत्पन्नाचा मार्ग नाही.

- व्यवसाय सुरू करताना मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. सरकारी बँका फडमालकांना कर्ज देत नाही. शिवाय त्यांच्याकडे तारण देण्यासाठीही काही स्थावर मालमत्ता नसते. त्यामुळे अनेकांना खासगी सावकारांकडून भरमसाठ व्याजाने पैसे उचलावे लागतात. त्याची परतफेड करताना व्यावसायिकांची चांगलीच फरफट होते. त्यामुळे बहुतांश फडमालक कर्जबाजारी झाल्याचे दिसून येतात.

- तमाशा व्यवसाय सुरू करण्यापासून आर्थिक मिळकतीपर्यंतचे उत्पन्न व होणारा खर्च यातील बारकावे टिपल्यास तमाशा व्यवसाय कितपत सक्षम आहे, याची पडताळणी करता येईल.

हेही वाचा: कामगार संहिता : भविष्यवेधी पाऊल

अनलॉकनंतरची आव्हाने

पन्नास टक्के उपस्थितीची अट :

- थिएटर्स खुली झाली असलीतरी ५० टक्के उपस्थितीच्या अटीमुळे बऱ्याच मर्यादा येणार आहेत. अल्प उपस्थिती फडचालकांना परवडणारी नाही. इतर सर्व बाबी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असताना प्रेक्षकांची शंभर टक्के उपस्थितीची परवानगी देणे गरजेचे असल्याचे फडचालकांनी सांगितले आहे.

दर्जेदार कलाकृतीची आवश्यकता :

- मागील जवळपास दोन वर्षांपासून थिएटर बंद असल्याने प्रेक्षकांची प्रत्यक्ष प्रयोगाला जाण्याची सवय काहीशी मोडली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा खेचून आणण्यासाठी दर्जेदार कलाकृती सादर कराव्या लागणार आहेत. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानेच या क्षेत्राची गाडी रुळावर येण्यास मदत होणार आहे.

प्रेक्षकांना थिएटरकडे वळविण्याचे आव्हान :

कोरोनाच्या काळात निर्बंध कडक असताना अनेकांना मोबाईलवर नाटक, सिनेमे, तमाशा पाहण्याची सवय लागली होती. यू-ट्युबवर सर्च केल्यावर सर्वच प्रयोग उपलब्ध होत असल्याने प्रेक्षक प्रत्यक्ष थिएटरवर येण्यास टाळाटाळ करणे शक्य आहे. त्यामुळे या प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे वळविणे फडमालकांसमोर आव्हान असणार आहे.

पैसा खर्च करण्यावर मर्यादा :

कोरोनामुळे श्रीमंतांपासून अगदी सामान्य माणसाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे उद्योगधंडे बुडाले, अनेकजण कर्जबाजारी झाल्याने रसिक प्रेक्षकांच्या हातात पैसा उरलेला नाही. जो उरला आहे, तो प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार असल्याने त्यातील कितीजण पैसा तमाशा कलाकारांवर मनोरंजनासाठी उडवणार हे येणारा काळच ठरवेल.

प्रेक्षकांच्या अभिरुचीत झालेला बदल

- शहरालगतची खेड्यांचे आता शहरीकरणात रुपांतर होऊ लागले आहे. शहरीकरणामुळे लोकांच्या आवडीनिवडीही बदलू लागल्या आहेत. मॉलमधील मल्टिप्लेक्सला जावून सिनेमा पाहण्याकडे तरुणाईचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे बदलत्या अभिरुचीचा फटका तमाशाला बसत आहे.

हेही वाचा: शहाणी गुंतवणूक : माझ्या 'मनी' चे प्रश्न!

विखुरलेले कलावंत एकत्रित करण्याचे आव्हान

- कोरोनाच्या निर्बंधामुळे तमाशा थिएटर बंद असल्याने दररोजची चूल पेटविण्यासाठी कलावंतांनी पडेल ते काम स्विकारले. काहींनी छोटेमोठे व्यवसाय सुरू केले, तर काहींनी मिळेल त्या नोकऱ्या धरल्या. आता मात्र पुन्हा एकदा फड जमवायचा म्हणजे विखुरलेल्या कलावंतांना एकत्रित करणे गरजेचे आहे. मागील दोन वर्षांपासून सुरू केलेल्या व्यवसायात जम बसल्याचे दिसून येत आहे.

कोरोना व लॉकडाउनमुळे आम्हा कलावंतांचे खूप हाल झाले. लॉकडाऊन सुरू झाल्यावर लगेचच गावी निघून गेलो. शिल्लक पुंजीवर व घरातील मौल्यवान वस्तू विकून एकवेळ खाऊन कसेबसे दिवस काढले. घरातील वृद्धांचे आजारपण, औषधे यासाठीही पुरेसे पैसे नव्हते. सरकारी किंवा अन्य कोणाकडूनही मदत मिळाली नाही. आम्ही तमाशा कलावंत कायमच उपेक्षित आहोत. ऐन तारुण्यात जेवढी पुंजी जमवता येईल त्यावर उतारवय ढकलायचं असतं. जेवढं शक्य आहे, तेवढं धावायचं. शरीर थकलं की गपगुमान घरी बसायचं, अशीच सर्वच तमाशा कलावंतांची अवस्था आहे. सरकारने तमाशा कलावंतांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

- अंबिका शिंदे, (तमाशा कलावंत, चौफुला)

माझ्याकडे नर्तकी, गायक, वादक असे वीस जण होते. लॉकडाउन सुरू झाल्यावर सर्वांना आपापल्या गावी पाठवले. जी काही शिल्लक रक्कम होती, ती सर्वांना वाटून दिली, परंतु ती पुरेशी नव्हती, त्यामुळे आम्हा सर्वांचे खूप हाल झाले. या काळात कोणतेही सरकारी अनुदान वा मदत मिळाली नाही. आपल्या साथीदारांचे हाल बघवत नव्हते, परंतु काहीही करता आले नाही. प्रसंगी घरातील सोने विकून उदरनिर्वाह केला. सरकारने तमाशा कलावंतांचे हलाखीचे जीवन पाहून त्यांच्यासाठी विशेष मंडळ स्थापून त्यामार्फत मदत करावी.

- नेहा पुणेकर (फड मालकीण, सणसवाडी)

go to top