Crime History: काय घडलं होतं १९५२ मध्ये जलमंदिर पॅलेसमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा जलमंदिर खटला}

Udayanraje Bhosale: सातारा जलमंदिरातील 175 तोळ्यांच्या सुवर्णमूर्तींच्या चोरीवरुन झालेला वाद माहितीये?

फार पूर्वी एका घटनेमुळं साताऱ्याची खूप चर्चा तेव्हाच्या माध्यमांमध्ये झाली होती....हे प्रकरण होतं चोरीचं....पण ही चोरी किरकोळ नव्हती....ही चोरी झाली होती खुद्द सातारच्या शाहू छत्रपतींच्या जलमंदिर पॅलेसमध्ये....हेच प्रकरण नंतर जलमंदिर प्रकरण म्हणून ओळखलं गेलं.

सातारा (Satara) कधी चर्चेत असतं ते छत्रपती उदयनराजेंच्या (Chatrapati Udayanraje) काॅलर उडवण्याच्या स्टाईलमुळं तर कधी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे (Shivendraraje) यांच्यातल्या वादामुळं...काही वर्षांपूर्वी शरद लेवे खून खटल्यामुळंही साताऱ्याचं नाव चर्चेत होतं. फार पूर्वी एका घटनेमुळं साताऱ्याची खूप चर्चा तेव्हाच्या माध्यमांमध्ये झाली होती....हे प्रकरण होतं चोरीचं....पण ही चोरी किरकोळ नव्हती. ही चोरी झाली होती खुद्द सातारच्या शाहू छत्रपतींच्या जलमंदिर पॅलेसमध्ये. हेच प्रकरण नंतर जलमंदिर प्रकरण म्हणून ओळखलं गेलं. (Satara Udayanraje Jalmandir Palace theft recorded in crime history)

२३ जुलै १९५२ ची ही घटना. त्या दिवशी मध्यरात्री जलमंदिर पॅलेसच्या अंबाबाई देवालयातून सोन्याच्या (Gold) तीन मूर्ती चोरीला गेल्या. सोन्याचा आजचा बाजारभाव आठवा. यापैकी दोन मूर्ती प्रत्येकी नऊ इंचांच्या होत्या आणि त्यांचं वजन प्रत्येकी पावणे दोनशे तोळे होतं. तिसरी मूर्ती पाच इंच उंचीची होती. तिचं वजन ६० तोळे होतं.

खुद्द छत्रपतींच्या पॅलेसमधल्या देवालयातून चोरी (Theft) ही घटना धक्कादायकच होती. साहजिकच सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या घटनेकडं वळलं. तेव्हाच्या वृत्तपत्रांनी (Newspapers) पहिल्या पानावर या बातमीला ठळक जागा दिली होती. या मूर्ती छत्रपतींच्या घराण्यात पूर्वापार होत्या. देवालयातल्या लोकांचा पहाराही देवालयावर होता. पण चोरटे खिडक्यांचे गज वाकवून मंदिरात शिरले आणि त्यांनी मूर्ती चोरल्या...या घटनेचा अनेकांना धक्का बसल्या कै. शाहू छत्रपतींच्या पत्नी श्रीमंत सुमित्रादेवी राणी साहेबांनी मूर्तीचा तपास लावणाऱ्यास ५०० रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. साताऱ्याच्या डीवायएसपी पी. जे. लुईस यांनीही ५०० रुपयांचं इनाम जाहीर केलं. 

या मूर्तींची नित्यपूजा राजघराण्यातल्या लोकांकडून वर्षानुवर्षं केली जात होती. मात्र मूर्ती चोरीला गेल्यानं सुपाऱ्या मांडून पुजा करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्या वेळच्या वृत्तानुसार चोरी झाली त्यावेळी देवडीवर दोन आणि मंदिरात दोन असे वृद्ध पहारेकरी होते. ते चौघेही झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी हा डाव साधला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहरेकऱ्यांना चोरी झाल्याचं समजलं आणि त्यांचं धाबं दणाणलं....त्यांनी कारभाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातला. 

कारभाऱ्यांनी राणीसाहेबांच्या कानावर चोरीचा प्रकार घातला. त्यावेळी मूर्ती तरी सुरक्षित असतील असं राणीसाहेबांना वाटलं. त्या तातडीनं मंदिराकडं धावल्या. पण मूर्तीच चोरीला गेल्याचं समजल्यावर त्यांना चांगलाच धक्का बसला. राणीसाहेब या मंदिरात दरवर्षी मंगळवारी आणि श्रावणात मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पुजेसाठी जायच्या. २५ जुलैला श्रावणातला पहिला शुक्रवार होता. मात्र, मूर्ती चोरीला गेल्यानं त्यांना पुजा करता आली नाही. या मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या होत्या प्रतापगड येथील देवीच्या मूर्तींच्या त्या प्रतिकृती होत्या. घरात पुजेसाठी त्या मुद्दामहून तयार करवून घेतल्या होत्या. पूर्वी त्या नव्या राजवाड्यातल्या देवळात असत. १८७४ मध्ये त्यांची जलमंदिरात स्थापना करण्यात आली होती. 

पोलिसांनी पहाणी केली त्यावेळी मंदिराच्या मागच्या भिंतीला असलल्या खिडकीचे सहा गज वाकवून कटावणीनं उखडण्यात आले होते. त्यानंतर काचेचं तावदान फोडून चोरटे आत गेले होते. त्या परिसरात पोलिसांना चोरट्यांच्या पायाचे ठसे सापडले होते. पुजेच्या उपकरणात ६ चांदीची ताटं आणि इतर काही मोल्यवान वस्तू होत्या. पण चोरट्यांनी त्याला हात लावला नव्हता. अंबाबाईच्या देवळाशेजारी असलेल्या राममंदिरालाही चोरट्यांनी हात लावला नव्हता. चोरीला गेलेल्या मूर्तींची किंमत त्याकाळी ५७ हजार ६०० रुपये एवढी ठरवण्यात आली होती. 

हे देखिल वाचा-

अंबाबाईच्या या मूर्ती सिंहासन आणि प्रभावळीत बसवलेल्या होत्या. या दोन्ही गोष्टी चांगल्याच वजनदार होत्या. परंतु, चोरट्यांनी त्यासह त्या मूर्ती पळवल्या. सिंहासन आणि प्रभावळीचे दोन भाग मंदिराच्या मागच्या पटांगणात भिंतीजवळ पडल्याचं पोलिसांना आढळलं होतं. खुद्द छत्रपतींच्या राजवाड्याच चोरी म्हटल्यावर सरकार दरबारीही भूकंप झाला नसता तरच नवल....राज्यभर संदेश पाठवले गेले आणि चोरीचा कसून तपास सुरु झाला......८ आॅगस्ट १९५२ या दिवशी पोलिसांनी आठ जणांना या प्रकरणात ताब्यात घेतलं....त्यांच्याकडं कसून चौकशी सुरु झाली......

हे संशयित होते शंकर नरहर आपटे, नीळकंठ श्रीपाद भावे, पुरुषोत्तम दामोदर कुलकर्णी, का. कृ. जोशी, आबा विठ्ठल अडसूळ, सोपान विठ्ठल अडसूळ, काशिनाथ मालोजी साळवे आणि जगन्नाथ विष्णू गाडे.......यापैकी एका संशयिताच्या घरातून पोलिसांनी दोन पहारीही जप्त केल्या होत्या...याच पहारींच्या सहाय्यानं मंदिराच्या खिडकीचे गज वाकवून चोरी केल्याचा पोलिसांना संशय होता.

१९ आॅगस्ट, १९५२ रोजी सातारच्या न्यायालयात या सर्व संशयितांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. मात्र, दरम्यानच्या काळात या सगळ्याच प्रकरणानं वेगळा रंग घेतला होता. पोलिस कोठडीत आपल्याला प्रचंड मारहाण होत असल्याचा व सक्तीनं जबाब नोंदवून घेतले जात असल्याचा आरोप संशयितांकडून करण्यात येत होता....त्याची दखल सरकारलाही घेणं भाग पडलं होतं. तत्कालिन मंत्रीमंडळातही याची चर्चा त्यावेळी झाली होती.

दरम्यानच्या काळात १२ आॅक्टोबर १९५२ रोजी मंदिरातून चोरीला गेलेल्या चांदीच्या वस्तूंपैकी काही जिन्नस साताऱ्यापासून चार मैलांवर असलेल्या लिंब खिंडीत पोलिसांना सापडले....हे जिन्नस अचानक कसे सापडले याचा मात्र उलगडा त्यावेळच्या बातम्यांमधून होत नाही.

१९५२ सालच्या आॅक्टोबरच्याच शेवटच्या आठवड्यात पोलिसांनी पुण्यातून फुटरमल बलदोटा आणि त्याचा मुनिम चुनीलाल ताराचंद परमार यांना पुण्यातून अटक केली.....या दोघांनी अंबाबाईच्या देवळातून चोरी झालेल्या मूर्ती मुंबईत नेऊन विकल्याचा पोलिसांचा आरोप होता. या दोघांनी सुमारे ३३ हजार रुपयाचं सोनं मुंबईत नेऊन विकल्याचा कथित पुरावा पोलिसांना सापडला होता....मात्र या सोन्याच्या पावत्या या व्यापाऱ्यांनी पोलिसांना दाखविल्यानंतर या दोघांनाही सोडून द्यावं लागलं होतं....

एकूणच या प्रकरणात कुणाला तरी गुंतवायचं याचा पोलिसांचा अट्टाहास सुरु होता असा आरोप त्यावेळी केजा जात होता. आरोपपत्र दाखल झालं तरीही खटला सुरु व्हायला १९५३ चा जुलै महिना उजाडावा लागला.....मधल्या काळात सरकारी पक्षानं ७ एप्रील १९५३ रोजी बाँबे हायकोर्टात एक अर्ज दाखल केला. हा खटला सातारा सिटी मॅजिस्ट्रेट ऐवजी दुसऱ्या कोर्टात वर्ग करावा, अशी सरकार पक्षाची मागणी होती. उत्तर-दक्षिण सातारा, पुणे, कोल्हापूर वगळता अन्य ठिकाणी हा खटला चालवला जावा असा सरकार पक्षाचा आग्रह होता.

हे देखिल वाचा-

१९४८ साली महात्मा गांधींची हत्या झाली. ही हत्या केली होती नथूराम गोडसेनं.साहजिकच ब्राह्मण वर्गाबद्दल त्या काळात असंतोषाचं वातावरण होतं. त्यानंतरच्या काळात काही हिंसक प्रकारही घडले होते. नथूराम गोडसे आणि दुसरा आरोपी नाना आपटे यांचा संबंध आरएसएसशी. त्यामुळं संघाबद्दलची भावनाही तीव्र होती. जलमंदिर चोरी प्रकरणात पकडलेले आरोपी ब्राह्मण आहेत, सुशिक्षीत आहेत त्यातले काही संघाचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळंच त्यांना पोलिसांनी या प्रकरणात गुंतवलंय असा एक सूर त्यावेळी उठत होता. .याच भावनेतून सरकार पक्षाने खटला चालवण्याचं ठिकाण बदलण्याची मागणी हायकोर्टाकडं केली होती. जुलै १९५३ मध्ये हायकोर्टानं सरकार पक्षाची ही मागणी फेटाळली आणि साताऱ्यातच खटला चालवण्याचा आदेश दिला.

२० जुलै १९५३ ला साताऱ्याच्या कोर्टात प्रत्यक्ष खटला चालवण्यात सुरुवात झाली.....२० जुलै ते १२ आॅगस्ट १९५३ या काळात हा खटला चालला. सरकार पक्षानं संशयित आरोपींपैकी काशिनाथ साळवेला माफीचा साक्षीदार म्हणून कोर्टासमोर उभं केलं. खटल्याच्या कामकाजातही पोलिस कस्टडीत आरोपींना मारहाण आणि त्यांचा छळ झाल्याची बरीच चर्चा झाली. सर्वच संशयितांनी आपल्याला कशी मारहाण झाली याचं वर्णन कोर्टासमोर मांडलं. एवढं होऊन खटल्यातला मुद्देमाल म्हणजेच देवीच्या सोन्याच्या मूर्ती किंवा सोनं सापडलं नव्हतं.

सरकार पक्षाचा पुरावाच कच्चा होता आणि त्याची दखल कोर्टाला घेणं भाग पडलं. १२ आॅगस्टला कोर्टानं हा खटलाच काढून टाकला आणि झालेल्या मानहानीबाबत अन्य न्यायालयात दाद मागण्याची सूचना या प्रकरणातल्या संशयितांना केली.

हे एवढ्यावरच थांबलं नाही. ९ आॅक्टोबर १९५७ च्या वृत्तपत्रांमध्ये एक बातमी झळकली.......सातारा जलमंदीर खटला निकाल....आरोपी बावरीस ७ वर्षं सक्तमजुरी. अखेर जलमंदीर चोरी प्रकरणातला खरा आरोपी पोलिसांना सापडला होता. १९५३ साली मूळ केसचा निकाल लागल्यानंतरही सीआयडी या प्रकरणाच्या मागं होते. कोण होता हा बावरी. त्याचं पूर्ण नाव हणमंता लखनी बावरी. हा एक आंतरराज्य गुन्हेगार आणि घरफोड्या होता. या पूर्वीही त्याला शिक्षा झाल्या होत्या आणि पुण्याच्या येरवडा जेलमध्ये त्यानं त्या भोगल्याही होत्या. तो आणि त्याच्या पाच साथिदारांनी जलमंदीरात मूर्तींची चोरी केली होती.

हणमंता बावरी योगायोगानंच सीआयडीच्या हाती लागला होता. १७ डिसेंबर १९५५ ला इंदूरच्या महेश्वरी मंदिरातल्या चोरी प्रकरणात गोकुळ महाराज या साधूला कल्याण पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडूनच जलमंदीर चोरी प्रकरणाचा उलगडा सीआयडीला झाला. त्याच्याकडूनच हणमंता बावरीचं नाव पोलिसांना समजलं. त्यावेळी बावरी उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगर इथं वास्तव्याला होता. त्याला सीआयडीनं तिथून उचललं.

वास्तविक त्या आधी काही महिने हणमंता बावरी व त्याचे साथीदार पोलिसांच्या तावडीत सापडलेही होते. पुण्याजवळ असलेल्या चाकणच्या परिसरात हे सगळे साधूंच्या वेषात लपले होते. त्यावेळी आसपासच्या नागरिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी या सगळ्यांना उचलून नेलं. मात्र आपण खरोखरचेच साधू आहोत हे बावरीनं पोलिसांना पटवून दिलं आणि पोलिसांनी या सर्वांना सोडलं. त्यानंतर बावरी थेट उत्तर प्रदेशात गेला.

बावरीनं रामशेठ या नावानं कल्याणहून मुंबईला जाऊन गुन्ह्यातलं सोनं तिथल्या एका सराफाकडं मोडलं होतं याचा पुरावा सीआयडीला सापडला. जलमंदीरात चोरी झाली त्यावेळी तिथल्या खिडकीच्या काचेवर पोलिसांना बोटांचे काही ठसे मिळाले होते. हे ठसे बावरी आणि अन्य फरारी आरोपींच्या बोटांच्या ठशाशी जुळले. 1952 पासून १९५४ या काळात पुण्याच्या फिंगर प्रिंट ब्युरोनं सुमारे १४ हजार ठसे या प्रकरणात तपासले होते. त्यापैकी बावरीच्या टोळीतल्या करणसिंग या साथीदाराच्या हाताचं मधलं बोट आणि करंगळी यांचे ठसे मंदिरातल्या काचेवर सापडलेल्या ठशांशी जुळले होते.

बावरी हा उतारवयाला लागलेल्या गुन्हेगार होता. त्यानं आपलं वय ७५ असल्याचं सांगत कोर्टाकडे दयायाचना केली होती. मात्र कोर्टानं ते मान्य न करता त्याला सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सीआयडीनं कोर्टात मांडलेल्या पुराव्यानुसार हणमंता बावरी हा साधूच्या वेशात वावरायचा आणि मंदिरात चोऱ्या करायचा. त्याला साथ असायची ती त्याचा मुलगा कणी, जावई रामू आणि इतर काही जणांची. चोरी-घरफोड्यांतून मिळालेल्या पैशांतून त्यानं मुंबईत इस्टेट केली होती. मुंबई, पुणं, सातारा, कलकत्ता, हैदराबाद, नागपूर, अहमदाबा, राजकोट, काठेवाड इथंही त्यानं घरफोड्या केल्या होत्या.

या खटल्यातला आणि संपूर्ण प्रकरणातला एक मोठा योगायोग म्हणजे चोरी झाली होती ती सातारा छत्रपतींच्या कुलदेवतेच्या मूर्तींची. हणमंता बावरीवर खटला चालला तोही सातारा छत्रपतींच्या राजवाड्यातच असलेल्या कोर्टाच्या भवानी दरबारात. नियतीच्या चक्राचा एक फेरा पूर्ण झाला होता.