Pune Smart City: 'स्मार्ट सिटी' पुणेकरांसाठी मृगजळासमान.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांपासून स्मार्ट सिटीचे स्वप्न दूरच}

'स्मार्ट सिटी' पुणेकरांसाठी मृगजळासमान....

‘असे शहर जे नागरिकांच्या गरजेपेक्षा दोन पाऊल पुढे असेल,’ या घोषवाक्यासह भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून २०१५ रोजी शहरांचा विकास करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट शहर योजनेचा प्रारंभ केला होता. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून १०० शहरांची निवड या योजनेत झाली आहे. त्यात पुण्याचाही समावेश आहे. या योजनेतील उद्दिष्टांनुसार पुण्यात कामेही सुरू झाली आहेत. गेल्या सहा वर्षांमध्ये पुण्यनगरीचे रुपडे पालटले आहे. पण त्याचबरोबर शहरातील मूलभूत विकासामधील उणेपणाही पुणेकरांना जाणवत आहे. (Smart City far away from Pune Citizens)

केंद्र सरकारने (Central Government) ५ जून २०१५ मध्ये स्मार्ट सिटी मिशन (Smart City Mission) सुरू केले. देशातील १०० शहरांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे उद्दिष्ट होते. देशातील इतर शहरांना ‘स्मार्ट’ होण्यासाठी प्रेरित करू शकतील, अशा या शहरांची (City) नक्कल करता येण्याजोगे मॉडेल तयार करणे हे देखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय नगर विकास मंत्रालयाअंतर्गत शहरांचा विकास हे लक्ष्य ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे.

शहरी जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे, स्वच्छ पर्यावरण उपलब्ध करणे, वाहतूक व्यवस्था आधुनिक बनविणे, शहरातील झोपडपट्टी हटविणे, स्थानिक भागाचा विकास आणि तांत्रिकदृष्ट्या समर्थ बनण्याबरोबर लोकांच्या जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे हे या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत. ‘‘स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागरिकांना दर्जेदार सेवा सुविधा पुरविण्याचे नियोजन आहे. अशा सुविधांसाठी नागरिकांना जादा पैसे द्यावे लागतील. त्यातूनच सुविधा उभारल्या जाणार आहेत,’’ असे तत्कालीन केंद्रीय नगर विकासमंत्री वेंकया नायडू यांनी त्यावेळी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितले होते. शहरात मेट्रोसारख्या योजनांमुळे शहर विकासाला हातभार लागेल, असेही ते म्हणाले होते.

‘स्मार्ट सिटी’ची घोषणा होऊन आज सहा वर्षे उलटून गेली आहेत. या काळात पुण्यात विकासकामे वेगात सुरु झाली आहेत. पण ही योजना अमलात आणण्यापूर्वी काही पुणेकरांनी रस्ते, वाहतूक, पार्किंग, पाणीपुरवठा, कचरा निर्मूलन आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणे असल्याचे म्हटले होते. स्मार्ट सिटी' ही संकल्पना फक्त कागदावरच राहू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.

सध्याचा विचार करता शहरात रोजच पाणी, पार्किंग, कचरा आणि सार्वजनिक वाहतूक या प्रश्‍नांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यात वाहतूक ही समस्या अग्रभागी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा विनोदाचा मुद्दा ठरत आहे. बससाठी तिष्ठत उभे राहा, ती वेळेत येणार की नाही याबद्दल साशंकता, आली तरी गर्दीत जाणे नकोसे वाटते. यावर उपाय म्हणजे स्वतःचे दुचाकी, चारचाकी वाहन घेण्याचा कल पुण्यात अनेक वर्षांपासून स्थिरावला आहे. घरटी दोन तरी वाहने पुणेकरांकडे असतातच. म्हणूनच सायकलींचे हे शहर आता वाहनांचे शहर झाले आहे.

बीआरटीची समस्या
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही वर्षांपूर्वी ‘बीआरटी’ (बस रॅपिड ट्रान्झिट) योजना आली. कात्रज, धनकवडी, हडपसर, विश्रांतवाडी अशा काही भागात ती सक्षमपणे सुरु आहे. पण यासाठी रस्त्यांच्या मध्ये केलेली स्वतंत्र मार्गिका व त्यावरील थांबे प्रवाशांसाठी अडचणीचे ठरतात. कडेला असलेल्या असलेल्या व्यक्तीला किंवा थांब्यावर उतरल्यानंतर रस्ता ओलांडूनच इच्छित मार्गाकडे प्रस्थान ठेवावे लागते.

औंध रस्त्यावरून चिंचवडला जाताना रस्त्यावर सांगवी फाटा बीआरटी स्थानकावर पोहोचण्यासाठी मार्गिकाच नाही. त्या स्थानकावर उतरल्यानंतर सांगवी किंवा पिंपळे गुरवकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. पण पलिकडे कसे जायचे हा प्रश्‍नच आहे. गतिमान वाहतूक हे बीआरटीचे उद्दिष्ट असले तरी खासगी वाहनेही त्या मार्गातून जात असतात. काही वेळा यातून अपघातही घडले आहेत. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी अहमदाबादमधील बीआरटीचे कौतुक अनेकांनी केले. त्या धर्तीवर महाराष्ट्रात बीआरटी असावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत होती. पण पुण्याचा विचार करता ती अद्यापही पूर्ण झालेली नाही, असेच म्‍हणावे लागेल.

मेट्रोचे स्वप्न दूरच
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्‍घाटन केले. मेट्रो सुरू होणे ही पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. पिंपरी ते फुगेवाडीवाडी हा सहा किलोमीटरचा तर वनाज ते गरवारे महाविद्यालय हा केवळ ४.३५ किलोमीटरचा मार्ग खुला झाल्याने त्याचे अप्रूप म्हणून काही दिवस त्यातून फेरफटका मारण्यासाठी सुटीच्या दिवशी जत्रेसारखी गर्दी होती. पण आता ‘नव्याचे नऊ दिवस’ उलटल्यावर मेट्रोच्या प्रवाशांमध्ये घट झाल्याचे व चालक वेतनापासून वंचित असल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.

शहरातील इतर मार्गांवरील मेट्रो ‘रुळा’वर आल्यानंतरच वेंकया नायडू म्हणतात त्याप्रमाणे विकासमार्ग दृष्टिपथात येऊ शकेल. मेट्रोसाठी वनाज ते गरवारे मार्गावरील मेट्रो मार्गावरील एसएनडीटी स्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे. त्या स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी वर्तुळाकार बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पण मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने त्याला प्रतिसाद मिळत नाही. या बस मार्गाचा विस्तार केल्यास कर्वेनगर परिसरातील बसप्रवाशांना लाभ होऊ शकतो.

बससाठी अजून ‘थांबा’च
स्मार्ट सिटीच्या आर्थिक आराखड्यात स्मार्ट सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारणे हे एक उद्दिष्ट्य आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना प्रत्येक थांब्यावर दर २० मिनिटांनी बससेवा उपलब्ध होणार असून त्यासाठी मार्गावरील बसगाड्यांची संख्या व फेऱ्या वाढविण्यात येणार असे त्यात म्हटले आहे. पण याची प्रचिती अनेक मार्गांवर येतच नाही. गोखले नगर, कर्वे नगर आदी भागात बससाठी तिष्ठत उभे राहिलेले प्रवासी रोजच पाहायला मिळतात.

कोरोनानंतर बससेवा विस्कळित झाली आहे, असे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासी सांगतात. स्मार्ट बसथांबे उभारल्याचे अजून तरी दिसत नाही. काही बस स्थानकावर तेथे येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक असते. पण त्यावर बसचा पहिला व शेवटचा थांबा आणि वारवांरिता याचाच उल्लेख असतो. कधीतरी बसने प्रवास करणाऱ्यांना त्यातून काहीही बोध होत नाही. मोबाईल ॲपच्या माध्यमातून अचूक बस ‘ट्रॅकिंग’ सेवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे त्यामुळे बस नेमकी कुठे आणि तिला पोचण्यासाठी किती वेळ लागणार, याची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही.

रस्ते कोणासाठी
वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा
स्मार्ट सिटीअंतर्गत पुण्यातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता अशा वर्दळीच्या रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्तेही चकाचक झाले आहेत. पादचाऱ्यांसाठी ऐसपैस मार्ग तयार झाले आहेत. तेथे खुले जिम, कलाकरांसाठी कट्टा असा अभिनव संकल्‍पना राबविण्यात आल्या आहेत. हे सर्व डोळ्यांना सुखावत असले तरी पादचारी मार्ग मोठे केल्याने रस्ते लहान झाले, हे सत्य आहे. शिवाय वाहने उभी करण्यासाठी मर्यादित जागा असल्याने आकुंचन पावलेल्या रस्त्यांवरच गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अपुरी जागा उपलब्ध होते आणि कोंडीत भर पडते.

हे चित्र तर हल्ली शहरातील गल्लीबोळातही नित्याचे झाले आहे. बर पुणेकरांना रस्त्यावरून पायी चालणे सुलभ व्हावे, यासाठी भव्य पादचारी मार्ग निर्माण केले, पण पथारीवाल्यांच्या ‘पथ्यावर’ ते पडले आहेत. भाजी, पुस्तके, विविध वस्तूंचे विक्रेते, स्टॉलधारक यांचा या पदपथांवर ठिय्या असतो. काही ठिकाणी तर राजकीय नेत्यांचे फलक लावून निवारा उभा केलेला आहे.

पदपथांवर भिक्षेकऱ्यांचा वावर वाढलेला आहे. कसबा पेठ ते शिवाजीनगरला जोडणाऱ्या छत्रपती शाहू सेतू या नव्या पुलालगत पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था केलेली आहे. पण त्या रस्त्यावर भिक्षेकरी, फुगे किंवा अन्य वस्तू विकणाऱ्यांनी अतिक्रमण करून राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपातील निवारे केले आहेत. येथून फारसे कोणी चालत जात नसल्याने त्या जागेवर त्यांचीच मालकी झाल्यासारखे आहे.

नागरिकांसाठी स्मार्ट सिटी आराखड्यात...
-पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन : घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्या पाण्यासाठी मीटर पद्धत, घरोघरी १५० लिटर दरडोई पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या सात टाक्‍या, ५० किलोमीटरची जलवाहिनी होणार. पर्जन्य जलसंचय योजना १०० सोसायट्यांत कार्यान्वित होणार. स्वतंत्र सांडपाणी वाहिन्यांचे जाळे निर्माण करणार. राम नदीचा चार किलोमीटरचा काठ स्वच्छ करणार.
- घनकचरा व्यवस्थापन : घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे, त्याचे वर्गीकरण करण्याचे १०० टक्के उद्दिष्ट, औंध- बाणेर- बालेवाडीमध्ये ‘स्वच्छ’ द्वारे स्वच्छता राखली जाणार, ७४ सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी आणि दुरुस्ती, कचरा टाकण्यासाठी ३७४ छोट्या पेट्या.
- वीजपुरवठा, सौरऊर्जा : घरोघरी २४ तास वीजपुरवठ्यासाठी ‘स्मार्ट ग्रीड’ची उभारणी आणि आधुनिक वीज मीटरचे जाळे उभारणार, या परिसरातून १५ टक्के सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट, परिसरात तीन हजार ७० एलईडीचे स्मार्ट पथदिवे उभारणार.
- जीवनमान सुसह्य करण्यासाठीच्या सुविधा : सुमारे साडेतीन किलोमीटरचा नदीकाठ जागतिक दर्जाचा करणार, नागरिकांना पायी फिरण्यासाठी १३ उद्याने आणि मोकळ्या जागांचा समन्वय साधणार, चार अतिरिक्त सार्वजनिक शाळा आणि तीन रुग्णालये उभारणार, परिसरात १०० टक्के सीसीटीव्ही आणि सुरक्षिततेसाठी नियंत्रण कक्ष, वेळीच मदत मिळण्यासाठी पोलिसांच्या मदतीने यंत्रणा निर्माण करणार. या भागात आणखी दोन अग्निशमन केंद्र उभारणार.

वरील सर्व गोष्टी रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असल्या तरी कागदावरील प्रकल्प प्रत्यक्षात उतरलाच नसल्याने अन्न, वस्त्र, निवारा या तीन गरजांप्रमाणेच रस्ते, पाणी, वीज, सार्वजनिक वाहतूक आदी बाबीही जीवन सुखमय करणाऱ्या आहेत. पण ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत त्यांची अंमलबजावणी अर्धवट झाली आहे. त्यातून ‘स्मार्ट’ पुणेकर असे अभिमानाने सांगण्याची संधी अजून तरी मिळालेली नाही. पुढील काही वर्षांत तरी ‘पुणे तेथे नाही काही उणे,’ असे चित्र निर्माण होईल, अशी एक पुणेकर या नात्याने अपेक्षा आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top