दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

differently abled sportspersons in India}

दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

प्रशांत केणी, वरिष्ठ क्रीडा पत्रकार

prashantkeni@gmail.com

दिव्यांग खेळाडूंनी यंदा ऑलिम्पिकपासून सगळ्याच स्पर्धा गाजवल्या. त्यांच्या यशामागे मोठा वाटा आहे, त्यांच्या प्रशिक्षणाचा. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या खेळाडूंना प्रशिक्षण देताना नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो?

Shooter Avani Lekhara with Coach Suma Shirur

Shooter Avani Lekhara with Coach Suma Shirur

अवनी लेखारा आणि सुमा शिरुर- जिद्दीचा गुणाकार

अवनी लेखाराला मिळालेले ऑलिम्पिक म्हणजे अवनी लेखारा आणि तिच्या प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या नेमबाज सुमा शिरुर या दोघींच्या गुणवत्ता आणि जिद्दीचा गुणाकार आहे.

दहा वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अवनी लेखाराच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली. त्यामुळे तिला चालता येईना.

पण ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राचे आत्मचरित्र वाचून अवनीला नेमबाजीत पराक्रम गाजवण्याची प्रेरणा मिळाली. अवनीच्या वडिलांनी द्रोणाचार्य पुरस्कार विजेती नेमबाज सुमा शिरूर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी विचारणा केली.

सुरुवातीला सुमा यांनी यासाठी राजी नव्हत्या. पण वडिलांनी अवनीसह सुमा यांची भेट घेत त्यांना प्रशिक्षणासाठी राजी केले.

या अनुभवाबाबत सुमा म्हणाल्या, ‘‘व्हिलचेअरवरील अवनीला प्रशिक्षण देण्यासाठी सर्वप्रथम मी पॅरा-नेमबाजीचा अभ्यास केला. सर्वसामान्य नेमबाजाच्या शरीराचा भार खालील भागांवर (लोवर बॉडीवर) असतो. परंतु अवनीचा हा भार शरीराच्या वरील (अप्पर बॉडीवर) येणार असल्याने त्यानुसार तिचे तंत्र विकसित करणे महत्त्वाचे होते. मग सामर्थ्यनिर्मिती, रायफल स्थिती, आदी मुद्द्यांवर मेहनत घेतली. यात फिजिओ, मानसतज्ज्ञ यांच्यासारख्या सहाय्यक मार्गदर्शकांची भूमिकासुद्धा उपयुक्त ठरली.’’

पॅरालिम्पिकपटूंच्या प्रशिक्षणाकडे कसे पाहता येईल, या प्रश्नाला उत्तर देताना सुमा म्हणाल्या, ‘‘पॅरा-नेमबाजांना मार्गदर्शन करताना पहिले आव्हान हे शारीरिक असते. पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून अनुभवसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचा होता. त्या क्रीडापटूंमधील झुंजण्याची वृत्ती पाहून मी भारावून गेले.’’

पाय गमावला पण हिंमत कमावली - मानसी जोशी

पॅरा-बॅडमिंटनपटू मानसी जोशीला बॅडमिंटन खेळात कारकीर्द घडवायची होती. पण बाइकवरून कामावर जात असताना झालेल्या अपघातात एक पाय तिने गमावला. कृत्रिम पायासह ती पुन्हा समर्थपणे उभी राहिली. इतकेच नव्हे, तर पॅरा-बॅडमिंटनमध्ये आपली यशोपताका फडकावत ठेवली.

‘‘अपघातातून सावरल्यानंतर बॅडमिंटनमध्ये पारंगत असलेला माझा भाऊ कुंजनने मला पुन्हा खेळाचे धडे द्यायला प्रारंभ केला. माझ्या उणिवांची त्याला जाणीव होती. आम्ही नामांकित बॅडमिंटनपटूंच्या आणि गाजलेल्या सामन्यांच्या चित्रफिती पाहायचो. त्यानुसार कोर्टवर मी अंमलबजावणी करायचे. हे बंधूप्रशिक्षण २०१७पर्यंत अविरत चालू होते. जागतिक अजिंक्यपद पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत काही पदकेही जिंकली. पण उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी हैदराबादच्या पुलेला गोपीचंद अकादमीत स्थलांतराचा निर्णय घेतला.’’

गोपीचंद अकादमीत कशा प्रकारे प्रशिक्षण मिळाले, याविषयी मानसी म्हणाली, ‘‘सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप यांच्यासारख्या दर्जेदार खेळाडूंना घडवणाऱ्या गोपीचंद अकादमीतील मी पहिली अपंग बॅडमिंटनपटू होते. त्यामुळे यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे विचार केला नव्हता. पॅरा-बॅडमिंटन मार्गदर्शकांची उणीव होती.

तेथील व्यायामशाळेतही काही साहित्यांचा वापर करून व्यायाम करणे कठीण असल्याचे लक्षात आले. पण जिम ट्रेनर, स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग कोच यांनी माझ्या दृष्टीने काही मार्ग काढले. माझ्या एकमेव पायाला दुखापत झाली की प्रशिक्षक चाके असलेल्या स्टूलवर मला बसवून बॅडमिंटनचा सराव करून घ्यायचे. जेणेकरून पायाला त्रास होणार नाही, परंतु सराव कायम राहील.’’

मानसीच्या यशाने प्रेरित होऊन अनेक जण तिच्याकडे कानमंत्र घेण्यासाठी येतात. ‘‘पॅरा-बॅडमिंटनसाठीच नव्हे, तर एकंदरीतच पॅरा-क्रीडा प्रकारांसाठी खास प्रशिक्षण केंद्र असायला हवे. कारण आतापर्यंत याचा गांभीर्याने विचारच केला गेलेला नाही.

आम्ही सर्वच अपंग क्रीडापटूंनी फक्त मार्ग काढूनच यश मिळवले आहे. कोणताही सराव किंवा व्यायाम साहित्य वापरताना म्हणून आम्हाला दोनदा विचार करावा लागतो.’’

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू निखिल कानिटकरांची 'पाठशाळा'

पुण्याचे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू निखिल कानिटकर हे निखिल कानिटकर बॅडमिंटन अकादमी चालवतात. जागतिक आणि आशियाई स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या सांगलीच्या सुकांत कदमनेही कानिटकर यांचेच मार्गदर्शन घेत यशस्वी वाटचाल केली.

त्याच्याबद्दल कानिटकर म्हणाले, ‘‘सुकांत जेव्हा माझ्याकडे आला, तेव्हा सर्वप्रथम त्याचे शारीरिक सामर्थ्य आणि अपंगत्व समजून घेतले. पॅरा-बॅडमिंटनमध्ये व्हिलचेअर, अर्ध-कोर्ट, पूर्ण-कोर्ट असे तीन प्रकार पडतात. सुकांत पूर्ण-कोर्ट खेळत असल्याने अधिक फायदेशीर ठरले. त्याचे प्राथमिक स्टोक्स सुधारणे महत्त्वाचे होते. ज्या कॉर्नरला त्याला समस्या जाणवायच्या तिथे मेहनत घेतली. मग त्याला अपेक्षित यश मिळून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू लागला.’’

कानिटकर यांच्याकडे नभा वांबुरकर आणि आर्या जाधव हे बधीर (डीफ) बॅडमिंटनपटूनीही प्रशिक्षण घेतले. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली. तसेच क्रमवारीत प्रशंसनीय मजल मारली. ''नभा आणि आर्या या दोघांना प्रशिक्षण देताना संवाद हा शब्दांचा नव्हता, तर हातवारे, खुणा यांचा होता,’’ असे कानिटकर यांनी सांगितले.

भारतीय पॅरालिम्पिक समिती 

अर्जुन पुरस्कार विजेत्या एम. महादेव यांच्या प्रयत्नांमुळे १९९२मध्ये शारीरिकदृष्ट्या अपंगांच्या भारतीय क्रीडा महासंघाची स्थापना झाली. कालांतराने ‘भारतीय पॅरालिम्पिक समिती’ असे संघटनेचे नामकरण करण्यात आले.

त्याआधी कित्येक वर्षे भारताचे अपंग क्रीडापटू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत होते. १९६८पासून भारतीय क्रीडापटूंनी पॅरालिम्पिकमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. अपंग क्रीडापटू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवतात. गतवर्षी टोकियोत झालेली पॅरालिम्पिक स्पर्धा भारतासाठी क्रांतिकारक ठरली. पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य अशी एकूण १९ पदकांची भारताने लयलूट केली होती. ही सूचिन्हे असली तरी पॅरालिम्पिकपटूंचे प्रशिक्षण आणि सराव देशात मिळणे सोपे नाही.

दिव्यांग खेळाडूंपुढील आव्हाने

अपंग क्रीडापटूंपुढे सरावासाठी क्रीडांगण शोधणे, हे पहिले लक्ष्य असते. त्यानंतर योग्य मार्गदर्शक लाभणे, हे दुसरे आव्हान समोर असते. इतके वर्षे उलटली, तरी त्याचा गांभीर्याने विचार अद्याप झालेला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील भारताच्या अपंग क्रीडापटूंच्या यशाचा आढावा घेतल्यास त्या क्रीडापटू किंवा प्रशिक्षकांनी वैयक्तिक मार्ग काढून प्रशिक्षण घेतल्याचे सिद्ध होते.

काही वर्षांपूर्वी पॅरालिम्पिक संघटनेला मतभेद आणि गैरकारभारामुळे निलंबितसुद्धा करण्यात आले होते. मग पॅरालिम्पिकपटू दीपा मेहता यांनी अध्यक्षपद सांभाळल्यापासून संघटनेला चांगले दिवस आले आहेत. केंद्र सरकारकडून संघटनेला आणि क्रीडापटूला आर्थिक पाठबळ हे क्रीडापटूला आता इमानेइतबारे मिळते. प्रशिक्षणाची व्यवस्था उभी करताना हे अर्थबळ उपयुक्त ठरेल, अशी आशा बाळगूया!