मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रवास सुखकर व्हावा यासाठी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-Pune Express way}

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रवास सुखकर व्हावा यासाठी...

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वरुन स्वतः चे वाहन चालविण्याची मजा काही औरच. तीन तासांत आपण पुण्यातून मुंबई मध्ये टच होतो. पण या रस्त्यावर गाडी चालवताना आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. कारण तुमची थोडीशी चूक, अति वेगाची हौस थेट तुमच्या प्राणावर बेतू शकते. त्यामुळे हा प्रवास करताना आपले वाहन जसे उत्तम हवे तसाच तुमचा चालक ही फिट, नियमांची माहिती असणारा, वाहन चालविण्याचे चांगले प्रशिक्षण आणि अनुभव घेतलेला हवा. तसे असेल तर तुमचा प्रवास तर सुखकर होईलच पण तुम्ही इतर वाहनांमधील प्रवाशांचा जीव धोक्यात न घालता त्यांचा प्रवासही सुखद बनवता. (Mumbai-Pune Express way)

सुट्ट्या लागल्या की, आपली गाडी काढून फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. स्वतःच्या गाडीतून फिरण्याची मजा प्रवासाचा आनंद वाढवते. त्यामुळे भारतात एप्रिल-मे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते. पण या काळात मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर येत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढलेले दिसते. रस्ते अपघातात महाराष्ट्र उत्तरप्रदेशच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातही दुचाकीच्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. पण अलीकडे पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे वर होणाऱ्या अपघातांची संख्या आणि भीषणता जास्त दिसते. त्यामुळे एक्सप्रेस वे भरून प्रवास करताना आपल्याला वाहन चालवण्याची आणि वाहनाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे तरच आपण अपघातात पासून स्वतःला आणि इतरांना वाचवू शकतो.

अपघातांची मालिका-

अति वेगाची हौस भागविण्याची ईर्षा, अप्रशिक्षित वाहनचालक, नादुरुस्त वाहने आणि बेशिस्तपणा यामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आणि इतर महामार्गावर प्राणघातक अपघात वाढत आहेत. हे टाळण्यासाठी नियमांच्या काटेकोर अंमलबजावणी सोबत सतत प्रबोधन आणि प्रशिक्षणावर भर द्यावा लागणार आहे.
सुसाट कार रस्त्याच्या कडेला ट्रकवर धडकून चार तरुणांचा मृत्यू (९ एप्रिल २०२२), सहा वाहने एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू (१५ फेब्रुवारी २०२२), २७ सेकंदात कार चक्काचूर; आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू (१ जुलै २०२१). पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर गेल्या काही महिन्यांत झालेले हे अपघात. एक्स्प्रेस वे किंवा इतर महामार्गावर झालेल्या अपघातांचे विश्लेषण केले, त्याची कारणे शोधली तर ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाले असल्याचे समोर येते. याचाच अर्थ वाहन चालवणे किंवा वाहनांचा प्रवास त्यासाठी लागणारे कौशल्य आणि प्रशिक्षण याकडे आपण गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे स्वतः चा जीव तर धोक्यात घालतोच पण निष्पाप लोकांचा बळीही आपण सहजपणे घेतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी १.३८ लाख जणांचा रस्ते अपघात मृत्यू होतो. महाराष्ट्रात महामार्गावर होणाऱ्या अपघातात दरवर्षी सुमारे बारा हजार जणांचा मृत्यू होतो. ही संख्या कोणत्याही आजार, साथीच्या रोगांपेक्षा मोठी आहे. त्यामुळेच अपघात कमी करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न आवश्यक आहेत.

वाहन चालवताना बेशिस्त हे अपघातांचे प्रमुख कारण असल्याने केंद्रीय परिवहन विभागाने नियमभंगासाठी दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. त्याचा काहीसा परिणाम दिसतो आहे, पण वाहन चालवतानाचे नियम अंगात भिणण्याची गरज आहे. २०२१ च्या आकडेवारीनुसार एकट्या महाराष्ट्रात ३.५ कोटी वाहने आहेत. पुण्यात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या जास्त आहे. अशा वेळी वाहन चालविण्याचे योग्य प्रशिक्षण घ्यायलाच हवे. आजही आपण सहज मामा, दादा, काकांकडून वाहन चालवायला शिकतो. मुळात रस्त्यावर वाहन दामटणे म्हणजे ते चालवायला येते हा समज झाला आहे. १८ वर्षं पूर्ण नसलेल्या मुलामुलींना आपण मोठ्या कौतुकाने, लाडाने, अभिमानाने वाहन चालवायला देतो. घरी येऊन मुला बायकोसमोर आज कसा सिग्नल मोडून पोलिस मामांना चकवा दिला याचे किस्से छाती काढून सांगतो, इथेच आपण नियमांना, शिस्तीला
हरताळ फासतो. ज्या ठिकाणी नियम मोडण्यास सुरवात होते, तेथेच अपघाताला निमंत्रण देतो. कोणीतरी नियम न पाळल्यामुळेच तुमच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती एखाद्या अपघातात गमावलेली असते. अपघात बळी गेलेल्यांमध्ये ६५ टक्के तरुण आहे. ज्या घरातील व्यक्ती जाते, ते कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे वाहन हातात घेतानाच आपल्याला ते खरेच चालवता येते का याचा विचार करायला हवा. ९०टक्के अपघात ड्रायव्हरच्या चुकीने तर १० टक्के अपघात इतर कारणांनी झाले असल्याचे अपघातांचा अभ्यास केल्यानंतर सिद्ध झाले आहे.

का होतात अपघात ?
एक्स्प्रेस वे वर अपघात का होतात, याचे बरेच अभ्यास झाले आहेत. यात अति वेग हे प्रमुख कारण समोर आले आहे. एक्स्प्रेसवेवर चालवण्यात येणाऱ्या वाहनांची कंडिशन कशी असावी, टायर कसे असावेत, त्यात हवेचा दाब किती असावा, रिमोल्डिंग केलेले टायर वापरु नयेत, वाहन चालक संपूर्ण प्रशिक्षित असावा, त्याला महामार्गावर वाहन चालविण्याचा अनुभव असावा असे अनेक नियम आहेत. ते अजिबात पाळले जात नाहीत. एक्स्प्रेसवेवर जाऊ म्हणजे जोरात वाहन चालविण्याची हौस पूर्ण करता येईल, अशी अनेकांची समजूत झाली आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वे वरील स्पीड नियंत्रणावर प्रशासनाला आणखी गांभीर्याने काम करावे लागेल केवळ दंड वसुलीचे आकडे मांडून चालणार नाही तर प्रशिक्षणावर ही भर द्यायला हवा.
सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत. स्वतःच्या वाहनातून बाहेर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी शहरात रोज चार पाच किलोमीटर वाहन चालवले म्हणजे आपल्याला वाहन चांगले चालवता येते, असा समज करून न घेता प्रशिक्षित वाहनचालक सोबत ठेवायला हवा. एसयूव्ही किंवा इतर महागड्या गाड्या १००- १५० च्या वेगानेच चालवायला हव्यात असाही अनेकांचा समज आहे. या अति शहाण्यांवरही कडक कारवाई करायला हवी. शालेय शिक्षणापासून वाहतुकीचे नियम शिकवायला हवेत, तरच अपघात रोखणे शक्य होईल. अन्यथा अपघातातील पुढचा बळी कदाचित आपणच असू शकतो.

एक्स्प्रेस वे वर जाताय मग हे चेक करा.

-प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या वाहनाची संपूर्ण चाचणी करा. यात इंजिन ऑइल पासून, ब्रेकच्या कंडिशन पर्यंत सर्व बाबी तपासून घ्या. गाडीची सर्व्हिसिंग योग्य मॅकेनिक किंवा कंपनीच्या अधिकृत सर्विसिंग स्टेशन व दोनच करावी. यात ब्रेक, क्लच याबाबी खास करून तपासून घ्याव्यात.
- टायर तपासा : तुमच्या गाडीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गाडीचे टायर आहेत. एक्सप्रेसवेवर गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातांची संख्याही मोठी आहे. जर नवीन टायर टाकून गाडीचे रनिंग ४० हजार किलोमीटरच्या पुढे झाले असेल तर तुम्ही तुमचे टायर नक्कीच चेक करायला हवेत. जर टायर गुळगुळीत झाले असतील तर ते अतिवेगाने गरम होऊन फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे असे गुळगुळीत टायर असणारे वाहन एक्स्प्रेस वे वर घेऊन जाऊ नका.
आपल्याकडे रिमोल्डिंग केलेले टायर वापरणाऱ्यांची संख्या मोठी असते, मात्र तज्ज्ञांच्या मते एक्स्प्रेस रचना पाहता या रस्त्यावर रिमोल्डिंग चे टायर व करू नयेत असे टायर फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय लांबचा प्रवास करताना कधीही प्रथम टायर मधील हवा चेक करून घ्यावी.
- एक्स्प्रेस वेवर टायर फुटून होणाऱ्या अपघातांचे कारण शोधण्यासाठी एक प्रयोग केला गेला होता. त्यासाठी त्यांनी एका चार चाकी गाडीच्या तीन टायर मध्ये वेगवेगळ्या प्रमाणात "कमी जास्त" हवा भरली आणि एका टायरमध्ये त्या गाडीच्या कंपनीने दिलेल्या प्रमाणातच हवा भरली. एक फूटला, दोन खूप गरम झाले आणि योग्य प्रमाणातील हवा असणारा टायर व्यवस्थित होता.

याचा निष्कर्ष असा की, कोणत्याही गाडीच्या टायर मध्ये त्या त्या गाडीच्या कंपनीने दिलेल्या प्रमाणातच हवा ठेवावी.
- नियमितपेक्षा काहीशी कमीच हवा टायरमध्ये ठेवावी. यामुळे उन्हाने हवा तापून प्रसरण पावली तरीही टायर फुटण्याचा धोका होत नाही. शिवाय ठराविक अंतरावर वाहनाच्या टायरवर पाण्याचा मारा केल्यास अधिकच उत्तम होऊ शकते. 'डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंट रस्ते आणि टायर यांच्यात घर्षण जास्त होते. त्यामुळे टायर गरम होऊन फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे टायरची स्थिती चांगली आहे हे तपासून घ्या. तसेच वेगावर नियंत्रण ठेवल्यानंतरही टायर तापण्याचा धोका कमी होतो.

प्रशिक्षित वाहन चालकच हवा : शहरात किंवा गावाकडे ठराविक अंतरावर नियमितपणे गाडी चालवली आपल्याला सहजपणे जगात कोठेही गाडी चालवता येते, असा अनेकांचा समज असतो, मात्र एक्सप्रेस वे किंवा कोणत्याही महामार्गावर गाडी चालवण्याचे विशेष कौशल्य आवश्यक असते. एक्स्प्रेस वे किंवा महामार्गावर गाड्यांचा वेग जास्त असतो. जड वाहनांची संख्या जास्त असते. वेगाने जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असते, जर आपल्याला अशा ठिकाणी वाहन चालवण्याची सवय नसेल, तर तुम्ही वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेला चांगला चालक सोबत ठेवा. अशा रस्त्यावर वाहन चालविण्याचा सराव नसेल तर वेगाचा अंदाज येत नाही. शिवाय वाहन नियंत्रण करता येत नाही. त्यामुळे स्वतः वाहन चालविण्यापेक्षा प्रशिक्षित ड्रायव्हरचीच लांबच्या प्रवासासाठी निवड करावी.

ड्रायव्हरची झोप झालीय का? : एक्सप्रेस वे किंवा इतर महामार्गावरही रात्री आणि पहाटेच्या वेळी होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त आहे. या अपघातांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले आहे की, ड्रायव्हरला झोप लागल्याने किंवा डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटतो आणि त्यामुळे ड्रायव्हरची झोप महत्त्वाची आहे. त्याने सलग जास्त काळ गाडी चालवलेली नाही ना, त्याची पुरेशी झोप झाली आहे ना, या सर्व बाबी तपासून पाहाव्यात.

रस्ता नीट समजून घ्या : ज्या रस्त्यावर प्रवास करायचा आहे तो नीट समजून घ्यावा. आजकाल गुगल मॅपमुळे कोणत्या ठिकाणी ट्रॅफिक आहे, कुठे रस्ता नादुरुस्त आहे, कोठे घाट आहे अशी सर्व माहिती उपलब्ध होते. त्याचा वाहन चालकाने अभ्यास करावा.
- चिन्हे, रिफ्लेक्टर नीट पहा : एक्स्प्रेस वे किंवा इतरही महामार्गावर प्रवास करत असताना रस्त्याच्या मधोमध किंवा डाव्या बाजूला दिलेल्या सूचना फलकावरील सूचना, चिन्हे नीट पहा म्हणजे वळण, चढ-उतार, तीव्र उतार, अपघाताची जागा यांचा तुम्हाला योग्य अंदाज येईल. त्याप्रमाणे तुम्हाला वाहनांचा वेग कमी जास्त करता येईल व त्यातून अपघाताचा धोका कमी होऊ शकतो.
अपघात रोखण्यासाठी हे करायला हवे-
- वाहन परवाना देण्याचे नियम काटेकोर करणे.
- योग्य ठिकाणाहून प्रशिक्षण घेतले तरच परवाना देणे.
- एक्स्प्रेस वे वर वाहन कसे चालवावे याचे स्वतंत्र प्रशिक्षण देणे.
- बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई
- लेन कटिंग तसेच अति वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर तत्काळ कारवाई.

अभ्यास काय सांगतो -

- जगात दररोज सुमारे ३ हजार ४०० लोक रस्‍त्यावर अपघातात मृत्‍युमुखी पडतात. १० लक्ष दक्ष लोकांना इजा होते किंवा ते अपंग होत असतात.
- रस्‍त्‍यांवर लहान मुले वयोवृद्ध व सायकल चालवणारे यांना अपघाताचा सर्वात जास्‍त धोका संभवतो.
- हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना सिट बेल्ट न लावणे, मद्यपान करून गाडी चालवणे, अधिक वेगाने गाडी न चालवणे, मोबाईलवर बोलत गाडी चालविणे, इत्यादी कारणांमुळे अपघात होतात.
--
एक्स्प्रेस वे वरील अपघातात मृतांची संख्या
२०१८ : ११०
२०१९ : ९२
२०२० : ६६
२०२१ : ८८
२०२२ : ८ (एप्रिल अखेर)
----
बेशिस्त वाहनचालकांना हा होतो दंड

बेशिस्त वाहनचालकांना हा होतो दंड -

- अतिवेगाने वाहन चालविल्यास मोटार वाहन कायदा कलम ११२ /१८३ (१) प्रमाणे कारवाई व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा. जड वाहनास चार हजार रुपये दंड.
- धोकादायक रीतीने वाहन चालवल्यास मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे खटला न्यायालयात दाखल केला जातो.
- महामार्गावर वाहन पार्किंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम २२(२) (एस)/७७ प्रमाणे खटला दाखल होतो.
- अवजड वाहने उजव्या बाजूच्या मार्गीकेमधून चालविल्यास (लेन कटिंग ) केल्यास मोटार वाहन कायदा कलम ६(१)/१७७ प्रमाणे खटला तसेच मोटार वाहन कायदा कलम ४(५), ६ (२)/११७ ए प्रमाणे खटला न्यायालयात दाखल होतो.
- नादुरुस्त बिघाड झालेले वाहन चालवले तर मोटार वाहन कायदा कलम ९०(१) प्रमाणे खटला न्यायालयात सादर केला जातो.
---
या संदर्भात महामार्ग पोलिस अधीक्षक संजय जाधव म्हणाले," अतिवेगाने वाहन चालविल्याने अपघात होतात. वेगावर नियंत्रण आणण्यासाठी अशा वाहनांवर महामार्ग पोलिसांच्या वतीने तातडीने दंडात्मक कारवाई केली जाते. २०१९ मध्ये नऊ लाख सहा हजार वाहनांवर कारवाई करून ७० कोटी रुपयांचा दंड वसूल केला तर फेब्रुवारीअखेर ८८ हजार ९३५ वाहनांवर कारवाई करून १६.२४ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. वाहनचालकांना शिस्त लागावी तसेच मार्गातील अडथळे दूर करण्यावरही उपाय योजना केल्या जात आहेत."
----