काय सुरु आहे पुणे महापालिकेत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काय सुरु आहे पुणे महापालिकेत?}

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका होत आहे.

काय सुरु आहे पुणे महापालिकेत?

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका होत आहे. त्या दृष्टीने महापालिकेतील राजकारण हळुहळू तापू लागले आहेत. या निवडणुकांची झलक नुकत्याच झालेल्या पीएमआरडीएच्या पुणे महानगर नियोजन समितीवर ३० सदस्य निवडून देण्याच्या निवडणुकीत दिसून आली. युती आणि आघाडीतील मित्र पक्षावर दबाव टाकण्याबरोबरच सोयीनुसार एकमेकांना मदत करण्याचे प्रकार पाहावयास मिळाले. येत्या काही दिवसात हे प्रकार आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात हळू हळू रंगत भरु लागली आहे.

मागील निवडणुकीचा इतिहास

महापालिकेची २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने झाली होती. त्यावेळी एकूण ४२ प्रभाग होते. या निवडणूका भाजपला बहुमत मिळाले. कारण राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता होती. प्रभाग रचनेची सुत्रे त्यावेळी सरकारच्या हाती म्हणजे भाजपकडे असल्यामुळे हवे तसे बदल आणि हवी तशी मोडतोड करून प्रभाग रचना करण्यावर भाजपने भर दिला. त्याचे फळ भाजपला मिळाले आणि महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आली. शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केले तर काय होते, हे त्यावेळी भाजपने दाखवून दिले. परंतु प्रभाग रचनेचे खरे महत्त्व भाजपला यापूर्वी २००२ मध्ये तीन सदस्यांचे मिळून एक प्रभाग या पद्धतीने झालेल्या निवडणुकीत कळाले. त्यावेळी एकूण ४८ प्रभाग होते. त्यामध्ये दोन प्रभाग हे चार सदस्यांचा मिळून एक प्रभाग असे होते. त्यावेळी भाजपचे सर्वाधिक म्हणजे ३५ भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. तर शिवसेनेचे २१ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीमध्ये लढले होते. एक अथवा दोन ऐवजी बहुसदस्यी प्रभाग पद्धतीने निवडणुका झाल्या, तर स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यात यश येऊ शकते, हे लक्षात आल्याने २०१७ च्या निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला करून घेता आला.

हेही वाचा: लॉकडाउनला करुयात नॉकडाउन

आगामी निवडणुकीत काय

२०२२ मधील निवडणूक कशी होणार

आगामी महापालिका निवडणुकीत एक सदस्यीय कि बहुसदस्यीय प्रभाग रचना असावी, यावरून महाविकास आघाडीत सुरुवातीला मतभेद दिसून आले. कारण महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाच्या वेगवेळ्या गरजा आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादी कॉंग्रेसला, तर मुंबई आणि लगतच्या महापालिका शिवसेनेला आणि कॉंग्रेसला नांदेड महापालिका ताब्यात हवी होती. प्रत्येकाचे प्राधान्य वेगवेगळे असल्यामुळे एकमत होत नव्हते. अखेर त्यावर तोडगा म्हणून पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका या तीन सदस्यांचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने घेण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला आहेत. त्यामुळे पुणे शहरात एकूण ५५ प्रभाग होतील. त्यापैकी एक प्रभाग हा चार सदस्यांचा मिळून होईल. सभासदांची सदस्य संख्या १७३ राहील. त्यामध्ये ८७ महिला सदस्य असतील. २०१७ च्या निवडुकांचा अनुभव लक्षात घेता प्रभाग रचना हवी तशी करून घेण्यावर राष्ट्रवादीचा अधिक भर राहिला. महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी जी काही साधने आहेत, त्यापैकी आणि सर्वात महत्त्वाचे एक साधन प्रभाग रचना हे एक असणार आहे. त्यावर विरोध पक्षातील उमेदवारांना आपल्या कडे खेचणे, संभाव्य आघाडीसाठी दबाव निर्माण करणे सारख्या हत्यारांचा सहज वापर करणे शक्य होणार असल्याची जाणीव राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवार ‘वेट ॲड वॉच’च्या भूमिकेत आहे.

राजकीय पातळीवरील सद्यस्थिती

तीनचा प्रभाग झाल्यामुळे सध्या तरी भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाकडे १७३ उमेदवार स्वबळावर रिंगणात उतरविण्याची ताकद नाही. भाजपची क्षमता असली, तरी सर्वच प्रभागात सक्षम उमेदवार या पक्षाकडे नाहीत. तसेच तीनच्या प्रभागामुळे भाजपातून बाहेर जाणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. मात्र काही विद्यामान अन्य पक्षांचा विचार करू शकतात. (उदा: संजय काकडे यांच्याशी संबंधित नगरसेवक). तर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाली, तर भाजपला जेथे सक्षम उमेदवार नाहीत, तिथे या माध्यमातून उमेदवार आपल्याकडे खेचण्याची संधी मिळू शकते. राष्ट्रवादीने मात्र जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषत: उपनगराच्या भागात भाजपचे विद्यमान काही नगरसेवकांना (उदा: वडगाव शेरी, हडपसर) पुन्हा आपल्याकडे आणण्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी झाली, तरी १७३ पैकी सर्वाधिक जागा या राष्ट्रवादीकडे जातील. त्यासाठी मागील निवडणुकीतील विद्यमान नगरसेवक, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते याचा विचार करून जागा वाटप होईल. या निकषानुसार ८० ते ९० जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता अधिक आहे. शिवसेना- महाविकास आघाडी करण्याबाबत जास्त इच्छुक. एक वेळ कॉंग्रेस नाही आली, तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी करण्यात जवळपास एकमत आहे. कारण शिवसेनेकडे सक्षम उमेदवार कमी. त्यामुळे आघाडीशिवाय पर्याय नाही, ही जाणीव पक्षात आहे. आघाडी झाली, तर पक्षाच्या वाट्याला तीस ते पस्तीस जागा मिळू शकतात.

हेही वाचा: कसे आहे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ!

कॉंग्रेस : पूर्वी स्वबळाचा आग्रह होता. परंतु आता मानसिकता बदलत आहे. पक्षातील एक गटात आघाडीत सहभागी होण्याची मानसिकता आहे. तर एक गट आघाडीच्या विरोधात आहे. आघाडी झाली तर पक्षाच्या वाट्याला वरील सुत्रानुसार तीस ते चाळीस जागा वाटपात येऊन मिळू शकतात. तिकीट वाटपात शहर पातळीपेक्षा प्रदेशाध्यक्षांकडे नाना पटोले यांचा हस्तक्षेप जास्त राहणार आहे. परंतु पीएमआरडीएच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीवाने आमचे ऐकावे लागेल, असा एक प्रकारे संदेश दिला आहे. परंतु कॉंग्रेस नरमाईची भूमिका घेण्याच्या तयारीत अद्याप नाही, हे चित्र सध्या तरी आहे.

सदस्यस्थितीत महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या प्राथमिक गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. वाटपाच्या दृष्टीने अद्याप फारशी प्रगती झालेली नाही. प्रभाग रचनेनंतर वेग येईल त्यानंतर निर्णय होईल, तो देखील प्रदेशाच्या पातळीवरील नेत्यांमध्ये होईल. विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने सध्या बुथ यंत्रणा सक्षम करण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. तर काही प्रमाणात कॉंग्रेसकडून बुथ यंत्रणा उभारणीचे काम सुरू आहे. मनसे आणि भाजप युतीची एक शक्यता व्यक्त केली जात आहे. या युतीसाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांकडून पक्षाकडे आग्रह धरला जात आहे. भाजपकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. भाजप दबावाचे राजकारण करून मनसेला वीस जागांपेक्षा अधिक जागा देण्यास तयार नाही. शेवटच्या टप्प्यात झाली, तर युती होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

नव इच्छुकांची मोर्चेबांधणी

शहरात सध्या विद्यमान नगरसेवकांपेक्षा इच्छुक उमेदवारांनी आपले नाव घराघरात पोहचविण्यासाठी विविध उपक्रम, कार्यक्रम घेण्यास सुरवात केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने काही नगरसेवकांनी दिवाळी फराळ कार्यक्रम घेतला, पण यामध्ये देखील इच्छुक पुढे होते. राज्य सरकारने तीनचा प्रभाग करताना पुण्यातील ९ प्रभाग वाढवले आहेत. त्यामुळे उपनगर म्हणजे समाविष्ट गावात प्रभाग वाढणार आहेत. मात्र प्रभागात महिला, ओबीसी आरक्षण नेमके कसे असेल याबद्दलही धाकधूक असल्याने इच्छुक उमेदवारांनी आता पत्नीलाही निवडणुकीच्या रिंगणात आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. उपनगरांमध्ये इच्छुकासह त्यांच्या पत्नीचेही फोटो होर्डिंगवर झळकत आहेत. पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे विद्यमान नगरसेवकांनी महिला आरक्षण पडले, तर पर्याय म्हणून आतापासून पत्नीचे नावाची तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा: संघटीत अर्थव्यवस्था : पारंपरिक चष्मा का बदलावा लागेल?

२०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजपने इतर पक्षातील लोकांना उमेदवारी दिली. पण भाजपची सत्ता असूनही विशेष काही फायदा झाला नाही, त्यामुळे काही नगरसेवक भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे. पण प्रभाग रचना अंतिम न झाल्याने पक्षांतरासाठी प्रयत्न करत असणारे नगरसेवक शांत झाले आहेत. अंतिम प्रभाग रचनेनंतर नगरसेवकांकडून पक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू होतील. यामध्ये विशेषत वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात भाजपचे चार ते पाच नगरसेवक राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. केवळ भाजप मधील नव्हे, तर कॉंग्रेस मधील काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या गाळाला लागण्याची शक्यता आहे. परंतु हे सर्व प्रभाग रचना कशी होती, त्यावर ठरणार आहे. त्यामुळे अनेकांनी सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जुळवून घेण्याची मानसिकता तयार केली आहे.

महापालिकेतील सध्याचे संख्याबळ

पक्षनिहाय संख्याबळ

- भाजप-९९

- राष्ट्रवादी - ४२

- शिवसेना- १०

- कॉंग्रेस -१०

- मनसे-२

- एमआयएम- १

एकूण संख्या १६४ ( समाविष्ट अकरा गावे धरून सदस्य संख्या) आरपीआय-भाजप युती झाली होती. या युतीमध्ये कमळ चिन्हावरच आरपीआयच्या उमेदवारांना निवडणूक लढण्याचे बंधन घालण्यात आले. त्यामुळे या निवडणूक आरपीआय फक्त नावापूरती होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top