सहस्र आविष्कारांचा महानायक | Entertainment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमिताभ बच्चन : सहस्र आविष्कारांचा महानायक}

अमिताभ बच्चन : सहस्र आविष्कारांचा महानायक

हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार ही उपाधी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मिरविली ती राजेश खन्ना यांनी. त्या आधी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार हा सुपरस्टार मानला जात असे. त्याच्या काळात राज कपूर, देव आनंद हे अन्य मोठे अभिनेते होतेच; पण दिलीपकुमारचा स्वतःचा म्हणून एक करिष्मा होता. त्याचा म्हणून खूप मोठा चाहता वर्ग होता, मात्र राजेश खन्नाने चाहत्यांचे आणि हिंदी चित्रपटातल्या नायकाचे गणितच बदलले. लोकप्रियतेचे निकष वेगळे ठरवायची वेळ राजेश खन्नाच्या चाहत्यांमुळे आली. राजेश खन्नाची लोकप्रियता वेगळीच होती. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाकडे नजर टाकली तर दिलीप कुमारच्या आधी कोणी इतकी लोकप्रियता मिळविली नव्हती. लोकप्रियतेचा अर्थातच स्टारडमचा मान दिलीप कुमारकडे जातो. मात्र त्यावर कळस चढविला तो राजेश खन्नाने. एखाद्या नटाची लोकप्रियता काय असते याबद्दलच्या दंतकथा निर्माण झाल्या त्या राजेश खन्नापासून; पण या सगळ्यांवर मात केली ती अमिताभ बच्चन या जित्याजागत्या दंतकथेने. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द सुरू झाली १९७० मध्ये. नुकताच अमिताभ बच्चन यांनी ८० व्या वर्षात प्रवेश केला. त्याच्या चित्रपट कारकिर्दीला ५० वर्षे होऊन गेली, मात्र त्याच्या लोकप्रियतेचे गारूड आजही टिकून आहे. दर दहा वर्षांना एक पिढी बदलते असा हिशेब केला तर अमिताभने सहा पिढ्यांना प्रभावीत केले आहे.

एखाद्या नटाची लोकप्रियता किंवा त्याच्या व्यावसायिक यशापयशाची चर्चा त्याचा चित्रपट किती यशस्वी होतो यावरून केली जाते. अमिताभ बच्चनला मात्र हा नियम लागू झाला नाही. दिलीप कुमार किंवा राजेश खन्ना हे या नियमाला अपवाद ठरले नाहीत; पण गेल्या वीस वर्षांत अमिताभ बच्चन त्या चित्रपटात आहे इतकेच त्याच्या चाहत्यांना पुरेसे आहे. तो चित्रपट चालो किंवा अपयशी ठरो, त्यामुळे अमिताभ बच्चनच्या लोकप्रियतेवर किंवा त्याच्या कारकिर्दीवर परिणाम होत नाही. यशापयशाची कुठलीही गणिते न लावता लोक अमिताभसाठी तो सिनेमा बघतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे २००४ मध्ये अमिताभ बच्चन पोलिस अधिकारी असलेले दोन चित्रपट प्रदर्शित झाले. खाकी आणि देव हे ते चित्रपट. त्यातील देव चित्रपट सपशेल अपयशी ठरला; पण त्याच्या अपयशाचे खापर बच्चनवर फुटले नाही, तसेच खाकी चित्रपट यशस्वी झाला म्हणून त्याचे यश बच्चनच्या नावावर नोंदले गेले नाही. साधारण २००५ पासून बच्चन यांनी कुठल्याही चित्रपटात काम केले तर चित्रपटाची एकूण कामगिरी आणि बच्चन यांची कामगिरी ही वेगवेगळी गणली जाऊ लागली.

हेही वाचा: प्रतिभेची वीज

अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीचा विचार केला तर ५० वर्षांच्या त्याच्या कालखंडात तीन टप्पे येतात. पहिल्या टप्प्यात त्याचा नायक म्हणून स्थिर होण्यापर्यंतचा संघर्षाचा कालखंड त्यानंतर त्याने नायक म्हणून प्रस्थापित झाल्यावर केलेले विविध चित्रपट आणि शेवटच्या २० वर्षांत यशापयशाच्या गणितापलीकडे गेलेला हा नायक. सुरुवातीच्या टप्प्यात अमिताभ बच्चनचे अनेक चांगले चित्रपट आले. यामागे विविध निर्माता, दिग्दर्शकांचे परिश्रम कारणीभूत होते. मात्र नायक म्हणून विशेषतः सुपरस्टारपद मिळाल्यानंतर अमिताभ बच्चनचे जे चित्रपट आले आणि त्याच्या कारकिर्दीचा जो टप्पा आहे म्हणजे १९८५ ते २००० हा १५ वर्षांचा कालखंड लक्षात घेतला आणि अमिताभ बच्चनचेच निकष त्याला लावले तर हा कालखंड उतरणीचा कालखंड म्हणावा लागेल. या काळात त्याच्या नावावर चालतील, त्याच्या लोकप्रियतेचा फायदा कसा घेता येईल हा हिशेब करून अनेक निर्मात्यांनी विविध चित्रपट निर्माण केले. त्यामध्ये अमिताभ हा केंद्रस्थानी असेल, बाकी सर्व गोष्टींना दुय्यम स्थान मिळेल. त्यामुळे यातील काही चित्रपट चालले, तर काही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये एक आठवडासुद्धा टिकू शकले नाहीत. अत्यंत विचित्र असा हा कालखंड म्हणावा लागेल. याच कालखंडामध्ये १९८४ ते १९८७ ही अमिताभच्या राजकारणाची तीन वर्षे हेमवतीनंदन बहुगुणा यांच्यासारख्या हेवीवेट राजकारणी माणसाला पराभूत करून अमिताभ बच्चन खासदार म्हणून निवडून आला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये एखाद्या नटाने किंवा नटीने राजकारणात जाऊन मोठे पद मिळविणे हे मुळीच नवीन नव्हते; पण भारतीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात एखाद्या अभिनेत्याने प्रवेश करणे, दणदणीत मते मिळवून निवडणूक जिंकणे आणि राजकारणात अत्यंत प्रस्थापित असलेल्या मोठ्या नेत्यालाही नेस्तनाबूत करणे हा प्रकार केवळ आणि केवळ अमिताभ बच्चनपासून सुरू झाला. भारतीय राजकीय नेत्यांनी या उदाहरणानंतरच चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांना केवळ प्रचारासाठी न बोलावता थेट तिकीट देऊन खासदार करून मंत्रिपदही देण्यास सुरुवात केली. एका अर्थाने हा वेगळा ट्रेंड होता.

हेही वाचा: बहरलेल्या फळबागांचा धोरणकर्ता

मात्र चित्रपटाच्या क्षेत्रात अत्यंत यश मिळविलेल्या महानायकाला राजकीय क्षेत्रातून बाहेर पडावे लागले. इथले डावपेच आणि इथले शह-काटशह यांना तो भारी पडू शकला नाही. राजकारणातून निवृत्ती घेऊन तो परत चित्रपटसृष्टीत आला आणि त्याच्या लाडक्‍या प्रेक्षकांनी त्याला परत स्वीकारलेदेखील. अमिताभच्याच बाबतीत हे घडू शकते. अन्यथा राजकारणात प्रवेश केल्यानंतर पुन्हा चित्रपटसृष्टीत येणे अन्य अभिनेत्यांना जमले नाही. बच्चनने मात्र हे लीलया साध्य केले. राजकारणातून परतल्यानंतर याच वाईट कालखंडात एकीकडे बच्चन यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरलेला होता त्याच वेळा वैयक्तिक पातळीवर त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीला झालेल्या तोट्यांमुळे, बॅंकांचा ससेमिरा त्यांच्यामागे सुरू झाला. हा ससेमिरा इतक्‍या मोठ्या पातळीवर गेला होता, की ते राहत असलेले त्यांचे निवासस्थान आणि त्यांचे आई-वडील राहत असलेले निवासस्थान लिलावात निघण्याची वेळ आली होती. मात्र आयुष्य हादरवून टाकणाऱ्या या सगळ्या घटनांना मागे सारून अमिताभ बच्चनने आपली कारकीर्द पुढे नेली. दूरचित्रवाणीच्या पडद्यावर त्याने प्रवेश केला आणि इतिहासच घडला.

हेही वाचा: ओटीटी - नंगा-पुंगा दोस्त?

दूरचित्रवाणीवर ‘कौन बनेगा करोडपती' या प्रश्‍नमंजुषेच्या मालिकेत होस्ट म्हणून त्याने पदार्पण केले आणि त्यानंतर एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करायचे याचा मापदंड म्हणजे अमिताभ बच्चन याने केलेले सूत्रसंचालन असे समीकरण तयार झाले. आपल्या पडझडीच्या काळात अमिताभ बच्चनने विविध प्रकारच्या जाहिराती केल्या. कारकिर्दीच्या ऐन शिखरावर असताना त्याने एकही जाहिरात केली नव्हती; पण पडत्या काळात केलेल्या जाहिराती त्याला वाचविणाऱ्या तर ठरल्याच; पण त्यांच्या कारकिर्दीत वेगळेच वळण देणाऱ्या ठरल्या. पुढे विविध राज्यांनी आणि केंद्र सरकारनेदेखील त्याच्या जनहिताच्या कार्यक्रमांसाठी आणि योजनांच्या जाहिरातीसाठी बच्चन यांच्या प्रतिमेचा वापर केला. हादेखील वेगळा इतिहास नोंदविला गेला.
वयाची ८० वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा केला जातो.

अमिताभच्या बाबतीत बोलायचे झाले तर ८० वर्षे पूर्ण करणाऱ्या या महानायकाने आपल्या अभिनयाचे सहस्र आविष्कार दाखवून रसिकांना वेगळा आनंद दिला, असे म्हणावे लागेल. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा ज्यांच्यावर प्रभाव आहे अशा पिढ्यांच्या एखाद्या प्रतिनिधीला विचारले तर अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीचे वर्णन करताना तो असे सांगेल, पु.लं.च्या साहित्याने अभिरूची, तर अमिताभच्या अभिनयाच्या प्रभावाने जीवनात स्टाइलबाज कसे वागावे ते शिकविले. यातील अतिशयोक्ती सोडली तरी अमिताभ बच्चनने अनेक पिढ्यांना गारूड करताना त्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकला आहे, यात शंका नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
टॅग्स :Bollywood News
go to top