Marathi Literature: साहित्य संमेलने नक्की कशासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्य संमेलनांची खरंच आवश्यकता आहे?}
साहित्य संमेलनाला येते आहे उत्सवी स्वरुप

साहित्य संमेलने नक्की कशासाठी.....?


उदगीर येथील बहुचर्चित ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. नाशिक येथील साहित्य संमेलनाचे कवित्व संपत नाही, तोपर्यंत उदगीरचे साहित्य संमेलन सुरूही झाले होते. अवघ्या चार महिन्यांचा अवधीत साहित्य संमेलन भरविण्याचा अट्टहास कशासाठी केला, याचे समर्थनीय उत्तर अखिल भारतीय साहित्य महामंडळाला उत्तर देता आलेले नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठी परंपरा आहे. काही वर्षांचा अपवाद वगळता दरवर्षी हा साहित्य मेळा आयोजित केला जातो. परंतु दिवसेंदिवस या संमेलनाला आलेले उत्सवी स्वरूप पाहता अशा साहित्य संमेलनांची खरंचच आवश्यकता आहे का, असा प्रश्न पडतो. (whether Marathi Literary Meet really needed)

न्यायमूर्ती रानडे यांनी १८६५मध्ये मराठीत (Marathi Language) प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा (Books) आढावा घेतलेला दिसतो. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यानुसार ११ मे १८७८ रोजी पुण्याच्या (Pune) हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले होते

दुसरे ग्रंथकार संमेलन भरायला १८८५ हे वर्ष उजाडले, अर्थात तेही पुण्यातच भरले. या संमेलनाला शे-सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. २१ मे १८८५ रोजी पुणे सार्वजनिक सभेच्या जोशी हॉलमध्ये हे संमेलन पार पडले. या नंतर जवळपास वीस वर्षांनी म्हणजे १९०५ मध्ये मे महिन्यात तिसरे ग्रंथकार संमेलन सातारा भरविण्यात आले होते. लोकमान्य टिळकांचे (Lokmanya Tilak) एक सहकारी साताऱ्यातील प्रसिद्ध वकील र. पां. ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.

साताऱ्याचा (Satara) पाठोपाठ १९०६मध्ये चवथे ग्रंथकार संमेलन मे महिन्यात पुण्यातच झाले. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले. कालांतराने साहित्य संमेलनात (Literary Meet) याचे रूपांतर झाले. साहित्य विषयक चर्चा हा या संमेलनाचे मुख्य सूत्र होते. परंतु काही दशकापासून हा विचार पूर्णतः मागे पडल्याचे साहित्य संमेलनातून स्पष्टपणे जाणवत आहे.

समाजाला दिशादर्शक
मुळात साहित्य हे समाजाला दिशादर्शक आहे. त्यातून अनेक समाजोपयोगी कामे आणि कार्य उभी राहिली आहेत. वैचारिक आणि सामाजिक परिवर्तनात साहित्याचे आणि साहित्यिकांचे योगदान अनन्यसाधारण आहे. अनेक साहित्यिकांनी स्वतःला साहित्यापुरतेच मर्यादित ठेवले होते. आपल्या लेखणीचा रसिकांना निखळ आनंद घेण्यातच त्यांनी धन्यता मानली होती.

काळ बदलत गेला त्याचा परिणाम साहित्य आणि साहित्यिकांवरही झाला. सकस आणि कसदार साहित्य निर्मिती हे मराठी साहित्याचे बलस्थान आहे. काळानुरूप त्यामध्ये बदल होत गेले तरी निर्मिती मूल्य कायम राहिली. साहित्य संमेलनातून त्यावर जोरकसपणे चर्चा ही होत होती. ही चर्चा मात्र आता थांबली आहे. साहित्य संमेलनातून साहित्यापेक्षा अन्य विषयांवरच अधिक चर्चा होत आहे. ही धोक्याची घंटा आहे

वाढते उत्सवी स्वरूप
हल्ली कोणत्याही चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार कार्यक्रमात कथाबाह्य कार्यक्रम यासाठी स्वतंत्र पुरस्काराची नामावली असते. तोच निकष अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी लावायचा झाल्यास साहित्यबाह्य साहित्य संमेलन म्हणून आता जणू स्पर्धा लागली आहे. या ठिकाणी होणाऱ्या साहित्यावर चर्चा होण्याऐवजी साहित्यिकांची व्यवस्था कशी झाली? मंडप कसा होता? व्यासपीठ आणि प्रवेशद्वार कसे होते आणि संमेनलनासाठी उपस्थित रसिकांच्या भोजनासाठी कोणता मेन्यू आहे? यावर जास्त चर्चा होते आणि त्यावर संमेलनाचे यशापयश मोजले जाते.

एकेकाळी एखाद्या शहरात साहित्य संमेलन असले की त्या शहरालाच एखाद्या उत्सवाचे रूप यायचे. लोक सहभाग उत्स्फूर्त असायचा आणि त्यामुळे उत्साह दांडगा असायचा. परिणाम स्वरूप ते शहर सहजच साहित्य नगरी बनायचे! साहित्यिक आणि वाचक यांचा एक अनुबंध मांडला जायचा. आताही ग्रंथ दिंडी मोठ्या उत्साहात पार पाडली जाते, परंतु त्यामध्ये कारण नसताना विद्यार्थ्यांनी वेठीस धरले जाते. विविध शाळांचा सहभाग या दिंडीतून असतो. सामान्य रसिक, साहित्यिक किती उत्स्फूर्तपणे सहभागी होतात, हा संशोधनाचा विषय आहे.

मराठी साहित्याला मोठी परंपरा आहे. या परंपरेची सुरुवात थेट संत साहित्यापासून सुरू होते. काळ बदलत गेला त्याप्रमाणे साहित्यही बदलत गेले. आपल्या आसपास असणाऱ्या सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात स्वाभाविकपणे उमटायला लागले. त्यातून साहित्यिक निर्माण होऊ लागले. असे सगळे साहित्यिक, त्यावर प्रेम करणारे रसिकवाचक यांचे एकत्र येणे गरजेचे झाले आणि त्यातून साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. साहित्य संमेलनातील सर्वांत मोठी अपरिहार्यता म्हणजे अध्यक्षपदाची निवड. सध्याच्या काळात थेट निवड होत असल्याने त्यातील वाईट पायंड्यांना खीळ बसली आहे.

साहित्य संमेलन की राजकीय मेळावा
कोणतेही साहित्य संमेलन म्हटले की त्याचे उद्घाटन कोण करणार यापेक्षा संमेलन भरवणारी संस्था कोणती आणि स्वागताध्यक्ष कोण याचीच जास्त उत्सुकता असते. राजकीय व्यक्तींनी साहित्याच्या व्यासपीठावर यायला काहीच हरकत नाही. परंतु यामध्ये किती प्रमाणात हस्तक्षेप करायचा याची सीमारेषा ठरवली पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे साहित्य संमेलनाच्या पालकत्वाची जबाबदारी असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानेही काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरच साहित्यिकांना बसण्यासाठी जागा नसावी, यापेक्षा दुर्दैव दुसरे नाही. उदगीर येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या सत्रात उद्घाटक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी साहित्यिक आणि राजकारणी याबद्दल परखड मत व्यक्त केले. साहित्य रसिकांच्या सहकार्याशिवाय साहित्य रथ धावणार नाही असे सांगत असताना या रथाची लोकाश्रय आणि राजाश्रय ही दोन चाके असल्याची स्पष्ट केले.

साहित्यिकांच्या हाती राज्यकर्त्यांवरील अंकुश हवा. परंतु, राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कंट्रोल असू नये. साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये. साहित्यिकांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये परस्पर समन्वयाचे आणि स्नेहभावाचे नाते असावे. हस्तिदंती मनोऱ्यातील साहित्यात सामर्थ्य नसते तर ते समाजाभिमुख असेल तर त्यात शक्ती येते हे पवार यांनी भाषणातून सांगितलेले सूत्र खरोखरच आचरले जाणार की हा प्रश्न पडतो. समारोप सत्रातही गडकरी यांनी साहित्य संस्कृती ही क्षेत्रे राजकारणापासून मुक्त असावी ही व्यक्त केलेली अपेक्षा भावी काळात प्रत्यक्षात येणार की नाही हा प्रश्न आहे. निदान या पुढील संमेलनातून तरी महामंडळाने याचे भान ठेवायला हरकत नाही.

साहित्य संमेलने खरे तर सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी असावी. समाजाला भ्रमित, भयग्रस्त करणारी नसावी परंतु दुर्दैवाने अशी संमेलने नकारात्मक आणि विरोधाला विरोध करणारी ठरतात तेव्हा ती संमेलने, ते साहित्यिक आणि त्यांचे साहित्य समाज आणि त्यांच्यात अंतर निर्माण करते. अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या जिवावर राजकीय अधिवेशनात असते तशी गर्दी खेचून आणावी लागते. त्यात उत्स्फूर्तता मागे पडते आणि उरते ती औपचारिकता.

याच पद्धतीने बदलत्या सामाजिक विमर्षाचा विचार न करता साहित्यिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून अशी संमेलने भरवली जाणार असतील तर समाज पूर्णपणे या प्रायोजित कार्यक्रमांवर बहिष्कार टाकतील आणि साहित्य संमेलने कालबाह्य होतील! विचार मराठी साहित्य महामंडळाने करण्याची गरज आहे, नव्हे करायलाच पाहिजे. महामंडळाने साहित्य विषयक निखळ हेतूंवर चर्चा करणे जास्त उचित राहील. तसा पायंडा पाडण्याची किमान मानसिकता तरी आवश्यक ठेवली पाहिजे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top